Gauspasha Shaikh

Drama

3  

Gauspasha Shaikh

Drama

दौलतबी

दौलतबी

7 mins
229


उन्हाळ्याचे दिवस होते.दुपारची वेळ झाली होती.सूर्य पृथ्वीवर आग ओकत होता.फुलगावच्या फाट्यावर एक काळी पिवळी जीप माणसांनी खचाखच भरली होती.लोकं अगदी एकमेकांच्या मांडीवर बसल्यासारखी चिकटून बसली होती.तरीही जीपचा क्लिनर फुलगाव...फुलगाव म्हणून ओरडतच होता.त्यात एक म्हातारी म्हणाली,

" आता कुठं डोक्यावर बशिवणार हाईस का बापू?चल की आता"

" झालं आज्जी अजून दोन माणसं भेटली की निगल गाडी " जीपचा क्लिनर गुटखा थुंकत बोलला.

     जीपमधली माणसे उकाड्याने हैराण झाली होती.तरी पण कुणीही काहीही तक्रार करत नव्हते.तालुक्याचा बाजार करून फुलगावला जाताना ही अशी गर्दी होणं नित्याचंच होतं.पण रेहानला मात्र हे सहन होत नव्हतं.काळी पिवळीत बसण्याआधी त्याने बारा तासांचा रेल्वेचा प्रवास केलेला होता.शिवाय त्याच्या लहान लहान मुलांची त्याला काळजी वाटत होती.पण दादीच्या गावाला जाण्याच्या खुशीत पोरं जाम खुश होती.त्यांच्या चेहऱ्यावर काहीही त्रास जाणवत नव्हता.

           मागील दहा वर्षांपासून रेहान बायको पोरांसोबत पुण्यात राहत होता.काही सणवार असले की अधून मधून तो कुटुंबासहित फुलगावला यायचा.आताही सुमारे अकरा महिन्यानंतर तो फुलगावला येत होता.त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला होता की पुढच्या रविवारी ग्यारवी शरीफचा सण आहे,येऊन जा.रेहानलाही वाटले ग्यारवी शरीफच्या निमित्ताने आई वडीलांसोबतच सगळ्या नातेवाईकांचीही भेट होऊन जाईल.जाऊनच येऊ.

            काही वेळाने काळी पिवळीच्या वरच्या कॅरिअरला पकडून दोन तीन माणसे लटकली आणि जीप एकदाची फुलगावच्या दिशेने निघाली. काळी पिवळीतून उतरून रेहान घराजवळ पोहोचला तेंव्हा त्याची मुले दादी दादी म्हणत त्याच्या पुढे पळाली.मुलांचे आवाज ऐकून रेहानची आई दौलतबी,त्याची बहीण फिरदोस धावतच घराबाहेर आल्या.दौलतबीने रेहानच्या छोट्या मुलाला पटकन उचलून घेतले आणि त्याचे मुके घेतच घरात शिरली.बॅगा सांभाळत रेहान आणि त्याची बायको इरमही लगेच घराच्या मुख्य दाराजवळ पोहोचले तेंव्हा त्यांचे स्वागत रमाबाईने केले.रेहानला आश्चर्य वाटले कारण रमाबाई तर चार घरे सोडून असलेल्या कांतीबाईच्या घरात भाड्याने राहायची.

" तुम्ही इकडं कसं काय रमाबाई " रेहानने एका हाताने बॅग सांभाळत विचारले.

" आरं हितच हाय मी तुज्या घरात लई दिवसापासून" रमाबाईने हसत उत्तर दिले.

 त्यांचे अजून काही संभाषण होण्याआधी रेहानची मोठी बहीण तस्लिमा घरातून आली आणि रेहानच्या हातातील बॅग्स घेत रेहानला म्हणाली,

" सही टाइम पे आये,बकरा जिबाह करण्याची तयारीच चालू आहे..आओ अंदर "

रेहान घरात शिरला.घरातील अलाव खोदून तिथे एक खड्डा करण्यात आला होता. त्याचे वडील, काका आणि चुलत भाऊ मिळून बोकड कापण्याच्या घाई गडबडीत गुंतले होते.बाकी पुरुष मंडळी अंगणात इकडे तिकडे बसून चहापान,बिडी,तंबाकू आणि गप्पांच्या मैफिलीत रंगली होती आणि महिला घरातील छोट्या मोठया कामात गुंतलेल्या होत्या.रेहान डोक्यावर रुमाल बांधून वडिलांच्या मदतीला अलावकडे गेला आणि इरम लसूण सोलत बसलेल्या बायकांच्या घोळक्यात शिरली.

   बोकड जिबह करून झाल्यावर रेहान,त्याचे वडील,काका आणि चुलत भाऊ या सगळ्यांनी मिळून बोकडाच्या बोट्या केल्या.रेहानच्या मामाने घराच्या अंगणात मोठाली तीन दगडे जमिनीवर ठेवून चूल तयार करून ठेवली होती.त्यावर भली मोठी एक देग ठेवलेली होती.चुलीच्या बाजूला बसूनच इरफान कांदे कापत होता.इरफान फुलगावचा प्रसिद्ध बावर्ची होता.तहारी बनविण्यात त्याचा हातखंडा होता.

" मसाला सब रेडी हो गया मामु,गोश्त लाओ जलदी " इरफानने कांदे कापल्यामुळे आलेले अश्रू गळ्यातील भल्या मोठ्या ठिपकेयुक्त रुमालाने पुसत म्हटले.

" अब्बी लाया " म्हणत रेहानचे वडील उठले.

रेहान आणि त्याच्या वडिलांनी मिळून बोकडाच्या बोटीचे पातेले चुलीजवळ नेले.इरफानने तहारीची फोडणी मारली आणि सगळ्या घरात घमघमाट सुटला.

   संध्याकाळ होत आली होती.तहारी बनून तयार होती.रेहानच्या आईने,दौलतबीने तहारीच्या देगमधून एक मुशकाब भरून तहारी काढली आणि अलावजवळ नेऊन ठेवली.तिथे सर्व बाया बापुडे गोलाकार बसली होती.रेहानने ते मुशकाब समोर ठेवून फातेहा म्हटली.त्यानंतर दुआ झाली.सर्वजण आमीन म्हणत दुआमध्ये सामील होत होते.दुआ झाल्यावर पंगती बसवायची घाई गडबड सुरू झाली कारण गावातील आमंत्रित मगरीबची नमाज पठण करून थेट रेहानच्या घराकडे निघाले होते.घरासमोर टाकलेल्या शामियान्यात त्यांची गर्दी वाढत होती.लवकरच पहिली पंगत बसली आणि जेवणावळीला सुरुवात झाली.

        पंगतीवर पंगती उठत होत्या.स्त्रियांच्या पंगतीत रमाबाईची नुसती धावपळ चालली होती.कोणाला काही कमी पडायला नको म्हणत ती सारखी चुलीवरच्या देगपासून पंगतीपर्यंत,पुन्हा पंगतीपासून चुलीवरच्या देगकडे अक्षरशः धावत होती.

" रमाबाई,तुझी तब्येत बरी नसते,एवढी धावपळ करू नको,अंग दुखेल,त्रास होईल " दौलतबीने तिच्या हातातून मुशकाब घेत म्हटले.

" कुठं रोज रोज करायचं हाय,रात्री एक हिरवी गोळी खाऊन झोपते मंग मस्त झोप येईल,तू काळजी करू नको भाभी" रमाबाईने देगकडे धावतच म्हटले.

" अगं ऐक माझं,पाय सुजतील पुन्हा तुझे,तू आराम कर तुझ्या खोलीत थोडा वेळ,माझ्या मुली हायेत की वाढायला" दौलतबीने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला.

" आराम करायचा दिवस हाय का आज भाभी? उद्या करते की दिवसभर आराम " रमाबाई काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. 

 रेहान त्या दोघींचे संभाषण ऐकत होता.त्याला रमाबाईचे फार कौतुक वाटले.रेहानच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे ती वागत होती.त्याच्या आईचे आणि रमाबाईचे संबंध किती मधुर होते हे त्याच्या लक्षात आले होते.पण कसलातरी विचित्र विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला.त्याची हालचाल मंदावली.तो विचार त्याच्या डोक्यात भूताप्रमाणे नाचू लागला.

          रात्रीचे अकरा वाजले होते.घरातील सगळी धावपळ संपलेली होती.नातेवाईक जिथे जागा भेटेल तिथे झोपले होते.रमाबाई पण हिरवी गोळी खाऊन झोपी गेली.रेहानच्या कुटुंबातील सगळे सदस्य अंगणातील थंड झालेल्या देगजवळ खुर्च्या टाकून गप्पा मारीत बसले होते.दिवसभर सारखी धावपळ करून आलेला थकवा ते अशाच गप्पा मारून घालवायचे.गप्पांच्या ओघात रमाबाईचा विषय निघाला.

" अम्मी ही... रमाबाई कधीपासून राहतीय आपल्या घरात ?" रेहानने दौलतबीकडे पाहत म्हटले.

" झालेत चार महिने " दौलतबीने तंबाकू थुंकत म्हटले.

" मला का सांगितलं नाही ?" रेहानने नाराजी व्यक्त केली.

" यात सांगण्यासारखं काय होतं ? " दौलतबीने प्रतिप्रश्न केला.

" सांगण्यासारखं कसं नाही अम्मी ? तिच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न झाल्यानंतर ती एकटीच राहत होती शिवाय ती सतत आजारी असते,हे माहीत आहे न तुला ?" रेहानने म्हटले.

" मला वाटते तुला काहीतरी विशेष बोलायचं आहे या विषयी,नेमकं काय म्हणायचं तुला?" दौलतबीचे रेहानकडे डोळे रोखत म्हटले.

"अम्मी तुला समजत का नाही,हे प्रकरण आपल्याच अंगलट येऊ शकते" रेहान पुरता वैतागून बोलत होता.

" काही अंगलट बिंगलट येणार नाही,मी काही वाईट काम करत नाही,माझ्या अल्लाहला माहीत आहे मी नेक काम करत आहे,तो माझ्यावर काही संकट येऊ देणार नाही" दौलतबी आपल्या निर्णयावर ठाम होती.

" तुझं बरोबर आहे अम्मी पण आजचा जमाना नेक काम करण्याचा नाही" रेहानने समजावण्याच्या सुरात म्हटले.

" असा कोणताच जमाना कधी आला नाही आणि येणारही नाही बेटा,ज्या जमान्यात नेकी करणे गुन्हा होत असेल" दौलतबी सौम्य आवाजात रेहानलाच समजावण्याचा प्रयत्न करीत होती.

" पण मला एक सांग उद्या तिचं काही बरं वाईट झालं आणि तिचे नातेवाईक आपल्यालाच म्हणाले की तिच्या अंगावर इतके इतके दागिने होते ते कुठे आहेत ? तर आपण काय बोलणार ?" रेहानने नेमकी भीती व्यक्त केली.

दौलतबी रेहानच्या या प्रश्नावर गप्प झाली.थोडा वेळ विचारमग्न झाली.रेहानचा प्रश्न चुकीचा नव्हता.असे होऊ शकले असते.एक शक्यताही गृहीत धरली तरी विचार करण्यासारखी ती बाब नक्कीच होती. दौलतबीला असे आरोप सहन झाले असते काय? बरं तसं काही घडलं तर तर तिच्या नातेवाईकांना तुमची काय रक्कम होते ते सांगा आणि चालते व्हा म्हणण्याइतपत तिची ऐपतही नव्हती.बराच वेळ शांत राहून दौलतबी बोलली.

" तिच्या घरमालकाने तिला अर्ध्या रात्री सामानासहित रस्त्यावर फेकली होती.त्यांच्यात काय घडलं मला माहित नाही,परंतु ती माझ्या दरवाज्यावर मदत मागायला आली.मी तिला रस्त्यावर अशीच कशी सोडू शकले असते.घेतलं मी तिला घरात." दौलबीने खरं काय ते सांगून टाकलं.

      ती हकीकत ऐकून रेहान नरमला.त्याला दौलतबीचा अभिमान वाटला.कारण रमाबाईकडून भाडं मिळण्याची तर काहीच अपेक्षा करता येत नव्हती.तरी दौलतबीने रमाबाईला आसरा दिला होता.रमाबाईची एकुलती एक मुलगी राजस्थानमध्ये दिलेली होती.लग्नाचा सगळा खर्च त्या नवऱ्या मुलानेच केला होता.हे रेहानला माहीत होतं.तिच्या मुलीच्या लग्नानंतर ती एकटी पडली होती.मुलगी कधीतरी येऊन भेटून जायची.कदाचित त्या वेळेस ती रमाबाईच्या घरमालकाचे खोली भाडेही देत असावी.आता बऱ्याच महिन्यांपासून तिची मुलगी आलेली नव्हती म्हणजे घरमालकाला भाडे मिळाले नसेल आणि त्याने तिला घरातून काढून टाकलं असेल,असा विचार रेहानने केला.पण पुन्हा तोच विचित्र विचार त्याच्या डोक्यात रुंझी घालू लागला.त्याने दौलतबीला तो विचार पुन्हा बोलून दाखवला,

" अम्मी पण तिचं काही बरं वाईट झालं आणि तिच्या नातेवाईकांनी आपल्या कुटुंबावरच काही आळ घेतला तर ...? म्हणून म्हणतोय की तिला लवकरात लवकर दुसरे घर शोधायला सांग "

"तिच्या नातेवाईकांना तोंड तरी आहे का ? मला सवाल करायला.ते काहीही असो मी रमाबाईला घराबाहेर काढणार नाही...बस्स ..झालं.."

दौलतबीने आपला अंतिम निर्णय ऐकवला आणि खुर्चीवरून उठून तंबाकूची पीक थुंकायला ती दरवाज्याबाहेर गेली.

     दौलतबीने घेतलेल्या निर्णयावर रेहान काही बोलला नाही.शिवाय इतरही कुणी काही बोलले नाही. त्यांना तिची कृती योग्यच वाटत होती आणि तिने एक अभिमानास्पद कामगिरी केलीय याविषयी त्यांना काही शंका नव्हती.परंतु भविष्यातील अनामिक वाईट कल्पनेच्या भीतीने त्यांच्या चांगुलपणावर मात केली होती.

      रेहान आठवडाभर गावात राहिला.त्यानंतर तो आपल्या बायको मुलांना घेऊन पुण्याला कामावर निघून गेला.दिवस सरत होते.शहरातील धकाधकीच्या जीवनात गावची आठवण विरून गेली होती.एके दिवशी रेहान कामावरून येऊन घरी विसवलाच होता की त्याचा मोबाईल खणखणला.त्याच्या वडिलांचा कॉल होता.

 " रेहान बेटा,रमाबाई का इंतकाल हो गया है.उद्या सकाळी दहा अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.तू आजच निघ."रेहानच्या वडिलांनी नेमकं बोलून कॉल कट केला.

         रेहानला ग्यारवी शरीफच्या सणाला दौलतबीशी झालेल्या संवादाची आठवण झाली.तो व्याकुळ झाला.त्याने इरमला घाईघाईनेच बातमी दिली आणि लगेच बॅग भरण्यास सांगितले.इरमने चपळाई दाखवत प्रवासाची सर्व तयारी केली.रिजर्वेशन करण्याची संधीच नव्हती.त्यांनी जनरल कोचने प्रवास करत गाव गाठले.घरासमोरील मोकळ्या जागेत वाहनांची गर्दी दिसत होती.अंगणात पण लोकांची गर्दी जमली होती.रेहानने त्याच्या कुटुंबाला घरात सोडले व स्वतः अंगणात वडिलांच्या शेजारी जाऊन उभा राहिला.

" कितना टाइम है और ? " रेहान वडिलांच्या कानात कुजबुजला.

" हो गया सब..थोडया वेळात स्मशानात घेऊन जायचे आहे " वडिलांनी धीम्या स्वरात उत्तर दिले.

" रमाबाईची मुलगी आली की नाही अजून ?" रेहानने दुसरा प्रश्न केला.

" आली आहे,आत आहे " वडिलांनी उत्तर दिले.

 दोघांचे संभाषण चालू असतानाच तिरडी उचलून लोकं चालू लागली.रेहान आणि त्याचे वडीलही लोकांमध्ये मिसळून चालू लागले.अंतिम संस्कार विधी पूर्ण करून ते घरी आले.अंगणात विसवलेच होते की त्यांना रमाबाईच्या नातेवाईकांचा एक घोळका येताना त्यांना दिसला.रेहानच्या मनात विचारांचं भूत पुन्हा नाचू लागलं.रेहानचे वडील चपापले.दौलतबी डोक्यावर पदर घेऊन सावरून बसली.

" दौलतबी कोण आहे ? " घोळक्यातून एक व्यक्ती पुढे होत बोलला.

रेहानच्या मनात धस्स झाले पण दौलतबी स्थितप्रज्ञ उभी होती.ती पुढे झाली.

" मी आहे दौलतबी " तिने पदर सावरत उत्तर दिले.

त्या व्यक्तीचे डोळे विलक्षण चमकले.त्याने दौलबीचे पाय धरले.

" माई,तू साक्षात देवी आहेस." त्या व्यक्तीने डोके दौलबीच्या पायावर टेकवत म्हटले.

 रेहानने सुटकेचा निःश्वास सोडला.रेहानच्या वडिलांचा जीव भांड्यात पडला.

 दौलबीने त्या व्यक्तीच्या खांद्याला धरून त्याला उठवले आणि म्हणाली,

" सब अल्लाह करता है..हम तो बस जरिया हैं"

" माई, अंतिम संस्काराला आलेल्या लोकांची,त्यांच्या चारचाकी,दुचाकी वाहनांची गर्दी पाहिलीस ना!एवढा मोठा गोतावळा होता तिचा पण आम्ही सगळे तिच्यासाठी करू शकलो नाही ते तू करून दाखवलंस.तू फार मोठ्या मनाची आहेस.पुण्यवान बाई आहेस.ईश्वर तुला काहीच कमी पडू देणार नाही." त्या व्यक्तीने डोळे पुसत म्हटले.

 रेहान फक्त त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहत होता.त्याच्या उरात प्रचंड अभिमान दाटून आला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama