विशाची मैत्रीण...
विशाची मैत्रीण...
खरंतर लग्नानंतर आपल्या पतीशी अथवा पत्नीशी जुळवून घेण्यासाठी किंवा एकमेकांना समजून घेण्यासाठी किमान वर्षभराचा तरी काळ उलटतो. हे जोडलेलं नातं बऱ्याचदा तनावपूर्व असू शकतं. एकमेकांच्या पसंतीने जरी जोडलेलं असलं तरी आपण एकमेकांसाठी अनोळखीच असतो. प्रत्येकाच्या स्वभावातील चढ-उतार समजायला थोडं अवघडच. मग आईवडील, बायको, घर, नातेसंबंध अशी तडजोड सुरू होते. अशीच काहीशी अवस्था झालेल्या माझ्या मित्राची ही कहाणी. थोडी निराळी आहे पण मनाला स्पर्श करणारी होती.
मी पाटणला निघालो होतो. इथे पुण्यात असलेल्या कामापेक्षा मला आणखी चांगलं काम मिळालं होतं. एका नामांकित कंपनी मध्ये मी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. तिथे मला सांगितलं तुम्ही पाटणला जाल का मी ही हो म्हंटलं सगळ्या सुविधा असल्यावर काय हरकत आहे म्हणून मी होकार दिला. तिथल्या जागेची तिथल्या लोकांची थोडी माहिती असावी म्हणून तेच पाहण्यासाठी मी तिकडे जाण्यासाठी निघालो होतो. पाहण्यापेक्षा तिथलं निरीक्षण करायला जात होतो असच म्हना. मी गडबडीत स्वारगेटला गेलो सताऱ्याची एस. टी. उभी होती त्यात जाऊन बसलो. तेवढ्यात माझ्या मागून माझा एक साताऱ्याचा मित्र गाडीत चढला. तशी आमची भेट कायम होते असं काही नाही खुप दिवसांनी तो आज भेटला होता सुरवातीच्या काळात आम्ही पुण्यात एकत्र कामाला होतो तेंव्हाची आमची ओळख. विश्वास नाव त्याचं पण आम्ही त्याला विश्या म्हणून हाक मारायचो. पहिल्यांदा क्लीन सेव मध्ये असणारा विश्वास आता धाडी वाढलेला होता. एवढ्या दिवसांनी तो खुपच वेगळा दिसत होता. लग्नागोदर सगळेच वेगळे असतात लग्नानंतर बराच फरक पडतो हे त्याच्याकडे पाहून सहज जाणवलं. एकमेकांची खुशाली विचारून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर तो अचानकच म्हणाला.
"काय मग कवी तू तर आता कथाही लिहितोस की"
"नाही रे असच जे सुचतं ते लिहितो"
"माझ्यावरही लिही की एखादी कथा"
हे बोलत असताना विश्या माझी तोंडभरून स्तुती करत होता. मग माझ्यातला लेखक जागा न होईल ते नवलच आणि तसही एखादया कवीला किंवा लेखकाला स्तुतीशिवाय आणखी काय हवं असतं नाही का..? मी त्याला त्याची स्टोरी एकवायला सांगितली. मनात म्हटलं असेल काहीतरी तर लिहूयात नाहीतर साताऱ्यात जाईपर्यंत टाईमपास होऊन जाईल. विश्याला बोलायला खूप लागतं नाही म्हटलं असतं तरी शांत बसेल तो विश्या कसला मग त्याने सांगायला सुरुवात केली...
माझं लग्न झालं आणि घरातले सगळेच एका मोठया जबाबदारीतून मुक्त झाले. लग्नानंतर सुरवातीचा महिन्याभराचा काळ मजेत गेला. पण नंतर माझ्या बायकोची घुसमट होऊ लागली. तिला गावी राहणं मान्य नव्हतं. तसंही जिकडे मी तिकडे ती असणारच हे मलाही कळत होतं. पण एकत्र कुटुंब नको असं तिचं मत मला न पटण्यासारखं होतं. आधीच परिस्थिती बेताची त्यात लग्नासाठी घेतलेल्या पैश्यानी कर्जाचा डोंगर आणखी थोडा मोठा दिसत होता. अशात वेगळं रहाणं कसं जमणार..? घर म्हंटलं की भांड्याला भांडं लागतंच या अतिशयोक्तीप्रमाणे आमच्या घरातलं वातावरणही काही असंच झालं. लाडागोडात वाढलेल्या तिला इथं जमत नव्हतं. मग मलाही काही गोष्टी समजून घेण्यात समजून सांगण्यात खुप त्रास झाला. कामावर लक्ष लागत नव्हतं. मन कुठेच रमत नव्हतं वर-वर जरी खुश असलो तरी आतून खुप नाराज होतो. या नेहमीच्या रडगाण्यात आणखी एक वर्ष सरलं. आला दिवस सारखाच या प्रमाणे दिवस ढकलत होतो आणि ती भेटली.
हे सगळं बोलताना विशा कमालीचा गंभीर वाटला पण ती भेटली इथं येऊन तो थांबला तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. पुढे काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार या उत्सुकतेने मी कान टवकारले. विशा बोलतच होता. "निल्या तुला माहितेय का माझं एका मुलीवर प्रेम होतं. अरे माहितेय की तुला, सगळ्यांनाच तर माहीत होतं माझं प्रेमप्रकरण". त्याचं बोलणं मधेच थांबवत मी म्हणालो "अरे तिचं तर दुसरंच कोणाबरोबर तरी लग्न झालं ना? म्हणजे तीच भेटली की काय परत तुला.?"
नाही रे तू ऐक तरी. तिच्याबद्दल नाही सांगणार आता ते तर सगळ्यांनाच माहितेय पण योगायोग असा की आत्ता भेटलेल्या मुलीचं नाव तेच होतं जे तिचं होतं. कावेरी... ही भेटली आणि माझ्यात खूप बदल झाले. छोट्या- छोट्या गोष्टी त्या अगदी सहज तिला कळत होत्या. तू कविता छान लिहितोस पण तुलाही शब्द अपुरे पडतील अगदी अशीच ती होती खूप वेगळी. तिचे बारीक पण बोलके डोळे बरंच काही सांगून जायचे. तिच्याकडे आकर्षित व्हावं असं काही नाही पण ती लक्ष वेधणारी नक्कीच होती. खरं तर अगदी सहजच घरच्या कटकटीपासून सुटका म्हणून मी तिच्याशी मैत्री केली पण ती मैत्री घट्ट प्रेमात बदलली हेही तितकंच खरं. निल्या तू हसशील माझ्यावर पण एक सांगतो माणसाला जिथं प्रेम मिळेल ना तिथे तो थांबतोच. आमचं हळूहळू बोलणं सुरू झालं मग भेटीही व्हायला लागल्या. एकमेकांशी फोनवर बोलल्याविना आमचा दिवस सुरूच होत नव्हता. तशी माझ्यापेक्षा ती बरीच लहान होती. नकळत आम्ही एकमेकात गुंतत चाललो होतो पण अशातही माझं मन मला खात होतं. माझं लग्न झालं होतं,
माझ्या माघारी माझी बायको होती.
कधीतरी हे सत्य तिला कळणारच होतं किंवा सांगायला लागणारच होतं आणि तो दिवस उजाडला त्या दिवशी मला ती खूप दुःखात वाटली. मी खोदून खोदून विचारलं तेव्हा ती तिच्या आयुष्यातली दुःख सांगत रडत होती. तुम्हीच माझा आधार आहेत तुमच्यासोबत असल्यावर बरं वाटतं. असलं काहीतरी ती बोलत होती. गांज्याच्या नशेत असणारा बाप, वैतागलेली आई आणि त्यातच आपल्याच मुलीवर काढलेला सगळा राग असं बरंच काही ती सांगत होती. जमेल त्या परीने मी तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हीच संधी आहे म्हणून मी तिला सगळं खरं सांगितलं. घरातल्या कटकटीपासून अगदी ती भेटली तिथपर्यंत सगळं. "माझं लग्न झालंय" हे वाक्य ऐकल्यावर तिच्या मनाची झालेली अवस्था याची मी फक्त कल्पनाच करू शकतो. तिची माफी मागत मी तिला सावरलं. तेव्हा ती जे बोलली ते आजही माझ्या लक्षात आहे. ती म्हणाली होती "माझ्या स्वार्थासाठी मी दुसऱ्या मुलीचं वाटोळं नाही करणार" या नंतरही आमचं भेटणं, बोलणं कधी बंद नाही झालं आम्ही एकमेकांचे मित्र झालो होतो. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी तिने समजावून सांगितल्या फक्त तिच्यामुळेच मला माझ्या बायकोची किंमत कळू लागली. मीच आखडत्या घेतलेल्या माझ्या स्वभावामुळे संसारात रस वाढत गेला. आता माझ्या संसारात मी खुश आहे. आज जे काही आहे ते फक्त तिच्यामुळेच.
मी एकत होतो. विश्याच्या नजरेत मला त्या मुलीबद्दल असणारा आदर स्पष्ट दिसत होता आणि प्रेमाची झालरही. तितक्यात गाडी थांबली नाश्ता वगैरे करण्यासाठी लोक खाली उतरून जात होते. तेवढ्यात मी म्हणालो "चल चहा घेऊयात" आम्ही दोघेही खाली उतरलो चहा पिऊन परत गाडीत येऊन बसलो. गाडी सुरू झाली "मग पुढं..! पुढं काय झालं विश्या..?" पुढची गोष्ट ऐकण्यासाठी मी प्रश्नार्थक नजरेनं त्याला विचारलं. त्यावर तो सांगू लागला.
मग काय फोनवर बोलणं सुरू होतं. आमच्यातली घट्ट मैत्री आणखी घट्ट होत गेली. मैत्री तर घट्ट झाली पण हळूहळू बोलणं आणि भेटणं कमी होत गेलं. तसं ती जाणूनबुजून करत होती हे मला समजत होतं आणि अचानक एक दिवस तिचा फोन आला म्हणाली भेटायचंय मी हातातली कामं सोडून भेटायला गेलो. तसा तर खुप काळ गेला नव्हता पण तरीही दोन महिन्यानंतर मी तिला भेटणार होतो. आणि ही भेट आमची शेवटची भेट होती. नेहमीच्या बोलक्या स्वभावाप्रमाणे ती खुप बोलली. तिचं लग्न ठरल्याचं सांगत होती. नेहमीपेक्षा जास्त खूश होती. मला सांगत होती ते अगदी तुमच्यासारखेच आहेत मनातलं जाणणारे, समजून घेणारे. या वेळी ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलच बोलत होती. थोडावेळ बसून मी तिला म्हणालो चल निघूयात आता. तर तिचे डोळे पाणावले आणि सगळं भान विसरून तिने मला गच्च मिठी मारली. खूप रडली ती त्यावेळी. तुम्ही माझ्या नशिबात का नाही? हा भाबडा प्रश्न विचारत होती. तिला मिठीतून बाजूला करत मी तिला समजावलं. आणि तिथून यायला निघालो. तेव्हा ती म्हणाली तुमच्या बायकोची काळजी घ्या आणि माझी काळजी नका करू जेव्हा कधी खूप दुःखात असेल तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हालाच आवाज देईन. तिच्या आयुष्यातील मी तिचं पहिलं प्रेम होतो. माझं काय... माझं लग्न झालं होतं आणि मी संसारात रमलो होतो तेही तिच्यामुळेच सहज शक्य झालं होतं. पण त्या दिवशी मनोमन वाटून गेलं हीच आपली बायको असती तर...
या भेटीनंतर मात्र आमचं फोनवरचं बोलणंसुद्धा तुरळक होत गेलं. तिने तिच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं मला. मी तिच्या लग्नाला गेलो तिथेही भर मांडवात तिने मला मिठी मारली होती. यावेळी मात्र मी खूप घाबरलो होतो हे नक्की. ती आजही कधीतरी फोनवर बोलते. मी नाही करत तिला फोन तीच मला फोन करते तिच्या नवऱ्यालाही माहीत आहे की आम्ही खूप चांगले मित्र आहोत म्हणून. तिच्या असण्याचीही सवय हळूहळू कमी केली मी. आता वेगळं आभाळ तिचंही आणि माझंही. पण तरीही बरंच काही शेअर करतो आम्ही जेव्हा ती फोन करते आणि म्हणते... "बायको कशी आहे तुमची..?" बघ ना निल्या जिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो ती "कावेरी" मला सोडून निघून गेली. आणि जी माझ्यासाठी सगळं सोडून यायला तयार होती त्या कावेरीला मी मिळवू शकलो नाही. शेवटी काय विश्वास-कावेरी हे नाव एकत्र यावं असं देवालाही वाटलं नव्हतं. पण ए निल्या मी माझ्या वैवाहिक आयुष्यात खूश आहे बरं का. पण एक सांगू ती आयुष्यभर लक्षात राहील एक चांगली मैत्रीण म्हणून.
नकळत आलेला अश्रू पुसत विश्या थोडासा हसला आणि म्हणाला "आहे की नाही एकदम फिल्मी स्टोरी, मग कधी लिहितोस."
"हे काय घरी गेल्यावर करेल सुरवात पहिलं कामाचं तर होऊ दे", मी थोडंसं हसत म्हणालो.
एव्हाना गाडी साताऱ्याला पोहचली होती विश्या त्याच्याबरोबर जाण्याचा आग्रह करत होता, म्हणत होता, "चल रे तुझी वहिनी सुगरण आहे. थोडंसं जेवून जाशील." पण पाटणला जायला उशीर होईल म्हणून मीच नाही गेलो. विशाचा निरोप घेऊन मी पाटणच्या प्रवासाला रवाना झालो. साताऱ्याच्या डेपोतून बाहेर पडताना विशाची ती मैत्रीण डोक्यात कालवा करून जात होती...