Nilesh Jadhav

Drama

4  

Nilesh Jadhav

Drama

उरूस

उरूस

7 mins
508


त्या दिवशी आमच्या गावचा उरूस होता.... उरूस म्हणजे जत्रा किंवा यात्रा प्रत्येक ठिकाणी त्या साठी वेगळा शब्द वापरला जातो आता तो तुम्ही तुमच्या परीने घ्या.... तर त्या दिवशी आमच्या गावचा उरूस होता. उरूस म्हंटलं की नुसताच धिंगाणा, मजा, मस्ती पण तसं तर रेवड्या खायचे आणि दोन रुपयांची गाडी घेऊन खेळायचे दिवस कधीचेच पालटले होते. आता दिवस होते ते धतींग करायचे. नुकत्याच कोवळ्या फुटलेल्या मिशा आणि जवानीची रग अंगात असल्यावर दुसरं काय सुचनार नाही का...? तसं गावच्या राजकारणात आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण जर का कोणी माझ्या जवळच्या व्यक्तीच्या आडव्यात गेला तर मग मात्र त्याची खैर नाही इतकं टार्गेट नक्कीच होतं. 

      त्याच नाजूक आणि अल्लड वयात एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडणं सहाजिकच आहे ना... मलाही आवडायची ती..... आज यात्रेला पाव्हन्या रावळ्यांची तुफान गर्दी असली तरी मी मात्र त्या गर्दीतही तिलाच शोधत होतो. संध्याकाळी देवाच्या पालखीची मिरवणूक निघाली होती. गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखी पुढे सरकत होती. गावच्या लोकांनी पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने ढोल ताश्याच्या संगीतावर ताल धरला होता.. गोल करून किंवा दोन ओळी करून खेळ करण्याची कला म्हणजे अवर्णनीय अशीच आहे. माझं म्हणाल तर आपल्याला नाही बरं का नाचता येत आपण कधीच नाही नाचत म्हणून मग मी बाजूलाच उभा असायचो. मी सुद्धा गुलालाने पूर्ण माखलो होतो. आणि अचानक धुकं बाजूला होऊन दूर डोंगरावरून खळखळ वाहणारा धबधबा दिसावा तशी गुलालाची उधळण बाजूला होताना मुलींच्या घोळक्यात ती मला दिसली. 

     मोरपंखी रंगाची भरजरी साडी परिधान केलेली ती मला क्षणभर एखाद्या परीसारखी भासली. तिचं ते नितळ निखळ सौंदर्य पाहून मन पार घायाळ होऊन गेलं. तसं तर मी तिला किती वेळा पाहिलंय पण आज ती वेगळीच दिसत होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची किरणं तिच्यावर पडल्यामुळे ती सोन्यावाणी चमकत होती. तिच्या त्या गोड हास्याच्या लकेरीत मी कधी हरवून गेलो कळलंच नाही. मी तिलाच एकटक पहातोय हे कळाल्यावर राहुल्या माझ्या शेजारी येऊन थांबला आणि पाठीवर थाप देत म्हणाला अरे "बस की आता नाही बोलली आहे ना ती तुला..." च्या आयला या राहूल्यानी मधेच येऊन अख्या मूडची वाट लावली. अहो मधेच आला त्याचं काही नाही पण तिने मला नकार दिलाय याची आठवण करून द्यायची काय गरज होती का...? त्याच्या जागेवर दुसरा कोण असता ना तर नक्कीच हाणला असता पण राहुल्या वाचला कारण राहूल्या आपला दोस्त आहे ना.. म्हणून. 

      ती नाही म्हंटली म्हणून काय झालं माझ्या मनातली तिची जागा कोण हिरावून घेणार आहे का किंवा तिच्या बद्दल असणारं प्रेम कमी होणार आहे का..? नाहीच ना मग झालं तर असं मनाशी ठरवत मी तिच्याकडे परत पाहू लागलो. एव्हाना पालखी ग्रामदैवत असलेल्या मंदिरा पाशी पोहचली होती. खरंतर मी मनोमन ठरवलं होतं की आज तिला शेवटचं विचारायचं तसं तर तिला शेवटचं विचारायचं म्हणून या आधी मी चार वेळा विचारलं होतं तो भाग वेगळा.. हा पण या वेळी मात्र खरंच शेवटचंच विचारायचं होतं. कारण आता ते सर्व सहन न होणारं होतं. तुफान गर्दी आणि सोबतीला मित्र मंडळी असल्यामुळे मला काही संधी मिळालीच नाही आता संधी होती ती म्हणजे रात्री नऊ वाजल्या नंतर.. रात्री पालखी परत आहे त्या ठिकाणी वाजत गाजत जाते वेगवेगळ्या गावचे ढोल ताशा पथके येतात. त्यांच्या स्पर्धा होतात. हे सर्व झाल्यावर मग अगदी मध्य रात्री उशिरापर्यंत तमाशा चालू होतो. तमाशाला बाया माणसं नाही थांबत पण जो पर्यंत खेळ चालू असतात तोवर मुली बाया खेळ पहायला असतात. 

      पण ही संधी मला नको होती. कारण जागरण मी करत नाही आणि या वेळी तिच्यापेक्षा मला झोप जास्त प्रिय होती. मग काय मी गेलो झोपून रात्रीचा तमाशा त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. आणि तसंही मी झोपायला गेलोय याचा आनंद सहसा घरातील मंडळींना होतोच कारण संध्याकाळी यात्रेत हमखास भांडण हे ठरलेलं आणि या भांडणापासून मला अलिप्त ठेवणं हा घरच्यांचा केविलवाणा प्रयत्न असायचा. 

      दुसरे दिवशी मी उठलो आणि सरळ नदीची वाट धरली कालच्या दिवशी सर्वच जण गुलालाने माखलेले असल्यावर गावातील सर्व मुलं नदीवरच अंघोळीला जायची पुण्या-मुंबईला रहाणारी मुलं नदीवर जाण्यासाठी अग्रेसर असायचीत मी पण त्यातलाच एक होतो. आणखी महत्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याने तळ घाटलेला असायचा पिण्याच्या पाण्याची भारीच वणवण असायची. एक दिड किलोमीटर लांबून पाणी आणावं लागायचं मग अंघोळीला नदीवर गेलेलं बरं नाही का..? कपडे धुण्यासाठी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर हे गर्दी व्हायची. सर्व मुलं जरी नदीवर आलेली असली तरी सर्वांचे कान मात्र गावात मंदिरावर लावलेल्या स्पीकर कडेच होते. कारण आज यात्रेचा दुसरा दिवस होता. थोड्या वेळांत तमाशाचा फड उभा राहील हे सर्वांनाच माहीत होतं. अंघोळीसाठी सर्वांचीच गडबड चालू होती. माझी नजर मात्र तिला शोधत होती. कारण कपडे धुण्यासाठी ती सुद्धा नदीवर असणार याची मला खात्री होती. आणि माझा अंदाज अगदी बरोबर होता. मी बराच वेळ तसाच खडकावर बसून राहिलो होतो. खरंतर त्या नदीच्या पाण्याप्रमाणे खळखळणारं तिचं हास्य ऐकण्यात मी मग्न होतो. कपडे धुता धुताच हळुवार पणे ती तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकत होतो. किती तो मधुर आवाज अगदी तिच्या नावाला साजेसा असाच होता. मी तिला लहानपणापासून पहात आलो होतो. या आधीही मी तिला चार वेळा माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. तिचा नकार ठरलेलाच असायचा पण तिने माझ्याशी बोलणं कधीच बंद नव्हतं केलं. आणि म्हणूनच ती मला आणखी आवडू लागली होती. 

      तिच्या विचारात पूर्ण गडून गेलेलो असताना गावातल्या एका घाबड्याने मला आवाज दिला. आवाज दिला हे ठीक आहे ओ पण तो मला म्हंटला तुला पोहायला येतं का..? त्याच्या या टोमन्यावर आजूबाजूची पोरं पण माझी टर उडवायला लागली. हे ही ठीक होतं ना पण जेव्हा ती सुद्धा मिश्किल पणे हसली तेंव्हा मात्र मला राग आला. मी रागातच कपडे काढली आणि नदीत उडी घेतली. माझ्या काही जवळच्या मित्रांना माहीत होतं याला पोहता येतं पण ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्या गालावर मी घेतलेली उडी म्हणजे चपराक ठरली. सूर मारल्यानंतर मी निम्म्या नदीत पाण्याच्या आतून पोहत गेलो होतो. मग मात्र तिचा विचार थोडा बाजूला ठेऊन मी येथेच्छ पोहण्याचा आनंद घेतला. पोहण्याच्या नादात तिची कपडे कधी धुवून झाली आणि ती कधी निघून गेली कळलंच नाही. मी ही मग पटकन आवरून घरी निघालो. 

      चैत्र पालवी फुटून झाडे नव्या पानांनी बहरलेली दिसत होती. गावची यात्रा असल्याने आज मात्र शेतात कोणीच दिसत नव्हतं. असं असलं तरी दोन्ही बाजूनी शेती मात्र फुलली होती. नदीला बारमाही पाणी असल्यामुळे भर उन्हाळ्यातही शेती हिरवाईने नटलेली होती. एव्हाना आंब्याच्या मोहराची जागा लहान लहान कैऱ्यानी घेतली होती. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघत असतानाच मंदिरावरती लावलेल्या स्पिकर मधून येणाऱ्या देवाच्या गाण्याची सुरावाट थांबून तमाशातील मोरख्याचा आवाज ऐकू आला तशी पोरांची लगबग चालू झाली. थोड्या वेळातच तमाशा चालू होणार हे लक्षात आलं होतं. मी घरी जाऊन मस्त नवीन कपडे घालून मंदिरावरती आलो. तमाशातील बायांनी लावणीच्या तालावर ठेका धरला होता. काही टवाळखोर पोरं पैसे उडवण्यात मगलूल होती. म्हातारी मंडळी मात्र लावणीचा आंनद घेत वगनाट्य कधी चालू होतंय याची वाट बघत बसली होती. घराघरातून पाव्हन्या माणसांची वर्दळ चालूच होती. प्रत्येक ठिकाणी मटनाचाच बेत होता. खेळण्याच्या दुकानांपाशी लहान मुलांनी गर्दी केलेली दिसत होती. तिकडे तमाशातील ती बाई भसाड्या आवाजात लावणी म्हणत होती. " मांजर आडवं गेलं की राया अंगावर पडली पाल, राया वाटलं होतं तुम्ही याल" या ओळीवर मात्र मी हरकून गेलो. तसा तर तमाशा हा प्रकार आपल्या पचनी पडत नव्हता. पोरांच्या नादानी मी आपला बसलो होतो. 

      इतक्यात राहुल्या पळतच माझ्या जवळ आला आणि म्हणाला "बावळ्या इथं काय बसलाय चल ती आलीये आमच्या घरी" मी पण ताडकन उठून निघालो. राहुल्याला बरोबर माहीत होतं आज मी तिला विचारणार आहे ते, तसा तो हुशारच होता म्हणा. आम्ही राहुल्याच्या घरात शिरलो तेंव्हा ती बाहेर ओसरीवर राहुल्याच्या बहिणीबरोबर गप्पा मारत बसली होती. आम्हाला पहिल्या बरोबर लाडिक स्वरात ती उद्गारली "ये मोकळ्या हाताने येऊ नका कोणीतरी आईस्क्रीम खाऊ घाला" आयती संधी चालून आली म्हणून मी पटकन खिशातून पैसे काढले आणि तिथेच खेळत असणाऱ्या एका लहान मुलाला आईस्क्रीम आणायला सांगितलं. तितक्यात राहुल्याने त्याच्या बहिणीला काहीतरी कारण काढून आत घरात बोलावून घेतलं आणि मला इशारा केला. मी पण वेळ न घालवता तिला मनातलं सर्व सांगून टाकलं. यावर ती म्हणाली "अरे काय रे...! किती वेळा तेच विचारणार आहेस आणि मी किती वेळा नाही म्हणू..? अचानक अंगाला चटका बसावा तसंच काहीसं माझं मन जाळून गेलं. मनाला लागलेल्या त्या दुःखाची झळ डोळ्यात उतरायला वेळ नाही लागला पण तरीही मी सर्व सावरून नेलं. माझ्या डोळ्यात दाटून आलेल्या भावना तिनेही जाणल्या असाव्या बहुदा, माझा हात अलगद हातात घेऊन ती म्हणाली "तू माझा मित्र आहेस आणि कायम मित्रच म्हणून रहावा असं मला वाटतं म्हणूनच सांगते तुझं आणि माझं नाही जमणार रे..! दाराच्या मागून राहुल्या आमचं बोलणं ऐकत होता तो ताडकन बाहेर आला आणि तिला म्हणाला "अगं तू त्याला समजून तरी घे..." राहुल्याचं बोलणं मी मधेच थांबवलं आणि तिला म्हणालो " मी नाही देणार आता परत त्रास तुला..." यावर तिने हळूच हास्य केलं तेंव्हा मनातून वाटलं किती समजदार आहे ना ही पण आपल्या नशिबात मात्र तिचं असणं नाही. 

      थोड्या वेळातच ते बारकं पोरगं आईस्क्रीम घेऊन आलं. आम्ही सर्व आईस्क्रीम खात होतो इतक्यात ती उठली आणि दारात जाऊन उभी राहिली. राहुल्याच्या दारातून मंदिराचा संपुर्ण परिसर दिसत होता. मला जवळ बोलावून ती म्हणाली "तो बघ तो आहे माझ्या मनातला कृष्ण" मंदिराच्या कट्टयावर पोरांच्यात बसलेल्या तिच्या त्याचा मला मनोमन खुप हेवा वाटत होता. कृष्ण काळा आहे हे माहीत होतं मला पण तिच्या मनातला कृष्ण एवढा काळा असेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर मी घरी गेलो माझं अजिबात जेवणावर लक्ष नव्हतं अजूनही तिचे शब्द माझ्या कानावर धडका देत होते. कसंबसं जेवण उरकून घरातल्या पाहुण्यांकडे लक्ष न देता बाहेर निघून आलो. थोड्या वेळातच तमाशा संपला, कुस्त्यांचा आखाडा चालू होऊन शेवटच्या कुस्तीचे बक्षीस कुठल्या पैलवानाने पटकावले याचीही खबर नव्हती मला. हळुहळु अंधार चढू लागला पाहुण्यांची गर्दी कमी होत गेली आणि यात्रा संपली. मी न जेवताच अंगणात अंथरून टाकलं आणि पडलो. बाया बापडे अंगणात बसून गप्पा मारत होते. हळूच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने मन प्रसन्न होत होते. आभाळाकडे एकटक पहात असताना मला मात्र तीच दिसत होती. पालं उठून गेल्यानंतर गाव जसं भकास वाटत होतं तसंच काहीसं मलाही वाटत होतं. गावची यात्रा संपली होती आणि माझ्या प्रेमाचा मात्र उरूस झाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama