Sarita Sawant Bhosale

Drama Inspirational

4  

Sarita Sawant Bhosale

Drama Inspirational

उमलू द्या गोड कळ्यांना

उमलू द्या गोड कळ्यांना

9 mins
826


तनिष्का आज हॉस्पिटलमधून लवकरच निघाली. कारणही तसं खास होतं ना.. त्याला भेटायचं होतं.. तो म्हणजे अपूर्व. तसे दूरचे नातेवाईक असल्याने बऱ्याच कार्यक्रमातून तोंडओळख होती परंतु आज समोरासमोर थेटभेट होणार होती तेही लग्नाच्या संदर्भात. पारंपरिक कांदेपोहे पद्धत दोघांनी नाकारुन बाहेर भेटून एकमेकांना समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी घरच्यांकडून ही थेटभेट स्वीकारली होती.


दोघेही डॉक्टर, सुस्वभावी आणि मनमिळाऊ त्यामुळे दोघांची मने जुळायला फारसा वेळ नाही लागला. दोघांची पहिलीच भेट असली तरी मनात कोणताही संकोच न ठेवता आपापली मते अगदी मनमोकळेपणाने एकमेकांसमोर मांडत होते. लग्नानंतरही मी आहे त्याच हॉस्पिटलमध्ये जॉब चालू ठेवेन असं तनिष्का अपूर्वला सांगत होती. पण स्वतःचं मोठं हॉस्पिटल असताना तुझ्या गुणवत्तेचा फायदा आपल्या पेशंटसना होऊ दे शिवाय आपलं हॉस्पिटल घरापासून खूप जवळ असल्याकारणाने तेच सोयीचं पडेल तुला असं अपूर्वचं म्हणणं...


तनिष्कालाही अपूर्वच म्हणणं पटलं आणि दोघेही पहिल्याच भेटीत भविष्याची स्वप्नं रंगवू लागली. तनिष्काला लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं असलं तरी तिच्या घरच्यांसमोर आणि अपूर्वच्या परिवाराच्या हट्टापायी दोघांचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर दोघेही हनिमूनला स्वित्झर्लंडला गेले. तिथल्या गुलाबी थंडीत, निसर्गाच्या स्वप्ननगरीत दोघे इतके हरवून गेले की पुन्हा आपल्या जगात वास्तवात येऊच नये असं त्यांना वाटत होतं... पंधरा दिवसांनी ते पुन्हा घरी आले. तनिष्का आता स्वतःच्या घरच्याच हॉस्पिटलमध्ये काम करायला मिळणार म्हणून खूप खुष होती. अपूर्वचा मोठा भाऊ आणि वहिनीही डॉक्टरच... आतापर्यंत तिघेजण मिळून हॉस्पिटल सांभाळायचे आता तनिष्का सोबतीला असेल म्हणून वहिनीही खुष होती.


तनिष्का सकाळी उठून नाश्ता वगैरे बनवून सगळ्यांसोबत हॉस्पिटलला जाण्याची तयारी करू लागली.. तसं अपूर्वची आई तिला म्हणाली, "इतकी काय घाई तुला लगेच हॉस्पिटल जॉईन करायची.. नवीन लग्न, नवीन संसार जरा घरी राहून इथल्या चालीरिती, पद्धती शिकून घे मग जा पंधरा दिवसांनी.. आयुष्यभर तेच तर करायचं आहे ना पण घरातील जबाबदाऱ्याही कळणं महत्वाचं आहे."


अपूर्वनेही आईच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि काही दिवस घरी राहायचा सल्ला तनिष्काला दिला. मनोमन तनिष्काला हे पटलं नसलं तरी आपल्या संसारासाठी आणि घरच्यांसाठी पंधरा दिवस तर घर सांभाळू शकतेच असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये न जाता सासूबाईंसोबत किचनमध्ये गेली. तनिष्का डॉक्टर असली तरी खाण्याची आवड आणि खाऊ घालायचीही आवड तिला.. त्यामुळे चारच दिवसात किचनचा ताबा तिने स्वतःकडे घेतला.. आता सगळ्यांनाच तिच्या हातचं जेवण आवडत होतं. सासूबाई आणि वहिनी तिचं कौतुक करता करता थकत नव्हत्या तर दिर, सासरे, नवराही तिच्यावर खुष होते. काही बाबतीत सासू, सासरे आणि कधीतरी नवराही जुन्या परंपरा, जुने विचार यांनाच धरून चालायचे हे तनिष्काला फारसं पटायचं नाही पण ती काही बोलली तर तू अजून नवीन आहेस.. या घरातलं तुला काही माहीत नाही, असं बोलून अपूर्व तिला शांत करायचा. हसत खेळत पंधरा दिवस संपले आणि तनिष्काने हॉस्पिटल जॉईन केलं.


पहिल्याच दिवशी सगळ्या स्टाफकडून तिचं छान स्वागत झालं. अपूर्वने तिची केबिन दाखवून पूर्ण हॉस्पिटलची ओळख तिला करून दिली. खूप आनंदात आणि उत्साहात तनिष्काने आपलं काम सुरू केलं. तिचं गोड बोलणं, लाघवी हसणं आणि प्रेमाने समजावणं यामुळे सगळे पेशंट तिच्यावर खूप खुष होते. स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने सगळ्या स्त्रियाही तिच्यासमोर आपलं मन मोकळं करायच्या. खूपदा डिलिव्हरीच्या वेळेसही तनिष्का मॅडमच सोबत हव्यात अशी मागणी पेशंट करायचे. अपूर्व आणि त्याच्या घरचे तनिष्कावर खुष होतेच पण बऱ्याचदा संध्याकाळी एखादं तिचं पेशंट आलं की अपूर्व किंवा तिचा मोठा दिर बघायचा. कारण संध्याकाळी सहानंतर तनिष्का आणि वहिनीला हॉस्पिटलमध्ये यायची परवानगी नव्हती. दिवसभर हॉस्पिटल सांभाळताच निदान संध्याकाळी तरी आपल्या घराला, परिवाराला वेळ द्यायला घरी राहायचं हा नियम सासुबाईंचा असल्या कारणाने दोन्ही सुनाही निमूटपणे तो पाळायच्या. तसं तनिष्काने अपूर्वशी बोलून इमर्जन्सीच्या वेळेस तरी हा नियम लावू नये हे समजावण्याचा प्रयत्न केला होता पण अपूर्वही आईच्या शब्दाबाहेर नव्हता. स्त्री डॉक्टर होवो वा इंजिनिअर पण तिने घराकडे दुर्लक्ष करू नये.. संध्याकाळी तिने घरीच राहावं.. घरच्यांना काय हवं नको ते बघावं या विचारांचा पगडा त्याच्यावर असल्याने त्यानेही कधीच सहानंतर तनिष्काला हॉस्पिटलमध्ये येऊ दिलं नाही. तनिष्का या नियमाने खुष नव्हती पण कधीतरी हे बदलेल म्हणून ती शांत होती.


एक दिवस तिच्या एका पेशंटचा तिला संध्याकाळीच फोन आला. पंधरा दिवस पुढे प्रसुतीची तारीख असताना तिला अचानक कळा सुरू झालेल्या आणि खूप त्रास होत होता. अशा वेळेस तनिष्का तुम्ही याच म्हणून पेशंट आणि तिच्या घरचेही हट्ट करायला लागले. तिने त्यांना समजावलं की मी यायचा प्रयत्न करते पण तोवर अपूर्व सरांकडून ट्रीटमेंट चालू करुन घ्या. तनिष्का अपूर्वला फोन करते पण त्याचा फोन लागत नव्हता.. या पेशंटची केस जरा कॉम्प्लिकेटेड पण आहे हे तिला अपूर्वला सांगायचं होतं पण त्याचा फोन नेहमीप्रमाणे संपर्क क्षेत्राच्या बाहेरच.. आता फार उशीर झाला तर बाळ आणि त्या आईच्या जीवालाही धोका निर्माण होईल या भीतीने ती कोणताही विचार न करता गाडी घेऊन घराबाहेर पडते.


सासुबाई,वहिनी कोणीच घरात नव्हतं आणि त्या येईपर्यंत ती थांबू शकत नव्हती. कशीबशी ती हॉस्पिटलमध्ये पोहचते.. पेशंटला ऍडमिट करायला सांगून ती अपूर्वच्या केबिनकडे जायला निघते पण, आत खूप महत्त्वाची मिटिंग चालू आहे मॅडम.. आत जाऊ नका सर आम्हाला ओरडतील असं स्टाफ सांगत असतानाही ती घाईत अपूर्वच्या केबिनमध्ये जातेच. तिला असं अचानक आलेलं पाहून अपूर्व पुरता गोंधळतो. तनिष्का मात्र केबिनमध्ये जे चाललेलं ते पाहून शॉक होते. आपल्याच माणसाने मागून येऊन आपल्यावर आघात करावा आणि त्या विश्वासघाताने आपण कोसळून जावं अशीच काहीशी अवस्था तनिष्काची झाली होती.


पेशंटची अवस्था खूप नाजूक होत चाललीये, असा निरोप घेऊन सिस्टर येताच तनिष्काने तातडीने पेशंटकडे धाव घेतली. मनात हजारो प्रश्नांचं वादळ, विश्वासघात, अपूर्वचा खोटेपणा सगळं घुमत असूनही ती आधी डॉक्टर आहे हे विसरली नाही. मनातील भावनांना तिथेच आवर घालून सगळ्या अडचणींचा सामना करत तनिष्काने त्या महिलेची प्रसुती यशस्वीपणे केली. मुलगी झाली लक्ष्मी आली म्हणून पूर्ण परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांचे आनंदी चेहरे पाहून तनिष्काला केबिनमधील दृश्य आठवलं आणि ती तडक अपूर्वकडे गेली. अपूर्व काही घडलंच नाही असा आव आणून बसलेला.


तनिष्का येताच, “तू यावेळी इथे का आलीस... घरच्या नियमांमध्ये हे बसत नाही, याआधीही तुला सांगितलं.”


“मी एका जीवासाठी धडपडत आले ते नियमांचं उल्लंघन आणि तू अशा जीवांशीच खेळ खेळतोस हे नियमांमध्ये बसतं का तुझ्या?? संध्याकाळच्या वेळेत हॉस्पिटलमध्ये गर्भलिंगनिदान करता तुम्ही म्हणूनच या वेळेत आम्हाला इथे येण्याची परवानगी नाही.. हेच खरं कारण आहे तर यामागचं. घरातल्यांना माहीत आहे का हे अवैध पद्धतीने तू जे करतोस??” तनिष्काचा राग अनावर होत होता.


"हे बघ तू जे समजतेस तसं काही नाही. त्या पेशंटने खूपच गयावया केली.. आधी तीन मुली आहेत त्यांना म्हणून मी फक्त मदत करत होतो.” अपूर्वची सारवासारव करण्याची धडपड तनिष्कापासून लपली नाही. त्याचं काहीही ऐकून न घेता ती रागातच घरी पोहचली. अपूर्वने घरी फोन करून परिस्थितीची जाणीव करून दिली होती पण कोणीच तसं दाखवत नव्हतं. उलट सासुबाईंनी तनिष्कावर कुठे गेली, का, कशाला अशा प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. तनिष्का आधीच खूप चिडलेली.. “कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आता मागू नका.. अपूर्व आला की बोलू,” असं सांगून ती बेडरूममध्ये गेली.


एव्हाना तनिष्काला हॉस्पिटलमध्ये गर्भलिंगनिदान केलं जातं ही बाब कळली हे घरात सर्वांना कळलं होतं. तिला या बाबतीत कसं समजवायचं हा विचार जो तो करत होता. अपूर्व गर्भलिंगनिदान करतोय आणि समोरच्या पेशंटला सांगतोय की मुलगी आहे abort करू शकता हे दृश्य तनिष्काच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हतं. काही वेळातच अपूर्व येतो.. डायनिंग टेबलवर जेवण्यासाठी सगळे जमले असताना तनिष्का घडला प्रकार सांगते. यावर सासुबाई आणि सासऱ्यांचं पहिलं उत्तर असतं, “बरं मग घडतात अशा गोष्टी.. यात तू स्वतःला त्रास का करून घेतेस?? अपूर्वने स्वतःच्या मर्जीने काहीच नाही केलं.. जे झालं ते पेशंटच्या सांगण्यावरून.”


“पण हा कोणीही केला किंवा कोणत्याही परिस्थितीत केला तरी गुन्हाच आहे हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको-“


”तनिष्का अगं पण एकदा केलं म्हणून तो नेहमीच करेल असं नाही.. तू टेन्शन न घेता जेव आणि इथून पुढे असल्यात पडू नकोस.” सासुबाईंनी एवढं बोलून खटकाच मिटवला. तनिष्का मात्र शांत बसणारी नव्हती.. घरातलेही अपूर्वचीच साथ देत होते याचं तिला आश्चर्य वाटत होतं.


दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तनिष्काने स्टाफमधल्या एका महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली.. त्यावरुन तिला कळले की हे फक्त कालच घडलं असं नाही.. हे काम अपूर्व, त्याचा भाऊ फार वर्षांपासून करत आलेत. गर्भलिंगनिदान करून मुलगी असल्यास abort करण्याचाच सल्ला देतात. हे ऐकून तनिष्काला धक्काच बसतो.. काल अपूर्व खोटं बोलत होता आणि त्याच्या घरचेही त्यात सामील आहेत हे तिला कळलं. पण वहिनीला हे सगळं पटतं? वहिनीशी बोलायचं ठरवून ती वहिनीकडे जाते.


वहिनी मान्य करते हॉस्पिटलमध्ये हे सगळं चालतं ते तिलाही माहीत होतं पण घरच्यांच्या दबावामुळे ती यापासून लांबच राहिली. पण मुलगी आहे म्हणून तो जीव संपवणं कितपत योग्य आहे?? सुशिक्षित कुटुंब असून कसले हे मागासलेले विचार यांचे?? आणि आता हे घराबाहेर घडतंय उद्या तुझ्या-माझ्यावर अशी वेळ आली तरी गप्पच बसणार का?? तनिष्का वहिनीला प्रश्न विचारत होती.


वहिनी- स्वतःवरही ही वेळ येईल अशी भीती वाटते म्हणून तर मुलाचा अजून विचारच नाही केला. तुझ्या विरोधाने काही होणार नाही तनिष्का.. उलट हे लोक आपल्यालाच घराबाहेर काढतील किंवा हे आरोप आपल्यावरच लावून स्वतः हात वर करतील अशी वृत्ती आहे यांची. आणि मुळात ते पालकच या गोष्टीस खतपाणी घालतात.. त्यांनाही वंशाचा दिवा हवा असतो म्हणून तर अशा पेशंटसमुळे या डॉक्टरांचं पण फावतं.


तनिष्काला वहिनीच्या या विचारांची कीव येते. आपण डॉक्टर झालो ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी.. कोणाचा जीव घेण्यासाठी नाही. इतकंच बोलून ती तिथून निघून येते. या प्रसंगाने अपूर्व आणि तनिष्काच्या नात्यात दुरावा येतोच पण घरातील इतर सदस्यांसोबतही तनिष्का अबोला धरते. या ताणतणावातच तनिष्का आई होणार असं कळतं. या बातमीने तरी घरातील वाद मिटेल आणि पुन्हा आधीसारखं सगळं होईल असं सासुबाईंना वाटत राहतं. तनिष्काही आईपणाच्या आनंदात हरवून जाते. पण तिच्या घरच्यांचे विचार कधीच बदलत नाहीत.. काही दिवसातच तनिष्कावरही गर्भलिंगनिदान करण्यासाठी दबाव आणला जातो. या गोष्टीला तनिष्का कधीच तयार होत नाही. अपूर्व आणि तिच्यात खूप वाद होतात आणि एक दिवस ती घर सोडून माहेरी निघून येते.


तनिष्काच्या घरच्यांना सगळा घडलेला प्रकार ऐकून धक्काच बसतो. इतकं सुशिक्षित घर, समाजात चांगलं नाव असणारं कुटुंब आणि विचार आणि कृती मात्र अशिक्षितालाही लाजवतील असे.. तनिष्काने जे केले ते योग्य केले असं म्हणून तिचं कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहतं. इकडे अपूर्व आणि त्याच्या घरच्यांना भीती असते की तनिष्का हॉस्पिटलमधील सत्य सगळ्यांसमोर आणेल आणि सगळ्यांनाच बदनामीला सामोरं जावं लागेल. यापासून वाचण्यासाठी त्यांनी तनिष्काला परत बोलवायचा प्रयत्न केला पण ज्या गोष्टी तनिष्काच्या तत्त्वात बसत नव्हत्या त्याच गोष्टी घरात आणि हॉस्पिटलमध्येही घडत होत्या.. विश्वासघात करणारी माणसं तिथे होती. लोकांचे जीव वाचवतो म्हणून डॉक्टरला लोक देव समजतात पण इथे तिचा नवराच देवाच्या रुपात राक्षसी कृत्य करत होता.. त्या राक्षसासोबत पुढे तिला संसार करायचा नव्हता. अशा व्यक्ती आणि त्यांच्याकडून होणारे संस्कार तिला तिच्या बाळावर होऊ द्यायचे नव्हते.. त्या घरात पुन्हा कधीही न जाण्याचा निर्णय तिने केव्हाच घेतला होता.


काही दिवसांनी काही सहकारी, मित्र परिवार सोबत घेऊन तनिष्काने मोठ्या हुशारीने स्टिंग ऑपरेशन करून अपूर्व आणि दिराचं गर्भलिंगनिदानाचं सत्य जगासमोर आणलं. आता वाद अजूनच पेटला.. घटस्फोटाचा निर्णय दोन्हीकडून झाला. याच दरम्यान तनिष्काला मुलगा झाल्याची बातमी तिच्या सासरी कळते. मोठ्या मुलाला तर अजून मुल नाही आता अपूर्वला मुलगा झाला.. घराला वंश मिळाला तो आपल्या घरी आणलाच पाहिजे या विचाराने तनिष्काची सासू पुन्हा तनिष्काशी गोड बोलून संबंध सुधारू पाहते पण तनिष्का सगळ्यांना पुरती ओळखून होती. मुलाजागी जर मुलगी झाली असती तर परत असे माझ्या दारात आला असता का?? हा एक प्रश्न विचारूनच ती सगळ्यांची तोंड बंद करते.


तनिष्का काही दिवसातच स्वतःचं हॉस्पिटल चालू करून सगळ्या पेशंटची मनं जिंकते. मुलाचाही आनंदाने योग्य सांभाळ करते. सोबतच जिथे जिथे गर्भलिंगनिदान होतं असं तिला कळतं तिथे ती तिच्या टीमसोबत स्टिंग ऑपरेशन करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठीही प्रयत्न करते. या सगळ्यासोबतच ती तिच्याकडे ज्या गरोदर महिला येतात त्यांचं मुलगा आणि मुलगी भेद न मानता दोघांना समान हक्काने आणि अधिकाराने वाढवा असं समुपदेशनही करते. बऱ्याच प्रमाणात ती या महिलांना, पालकांना समजावण्यात यशस्वीही होते. स्त्रीनेच स्त्रीचं अस्तित्व संपवणे हा स्त्रीच्याच जन्मातील स्त्रीने केलेला मोठा गुन्हा आहे.. आई म्हणून या कळ्यांना उमलू देण्याचा हक्क आईलाच आहे ही जाणीव तनिष्का महिलांमध्ये करुन देते.


तनिष्का तिचं सासर, नवरा, भूतकाळ सगळं सोडून आपल्या आई, वडिलांसोबत आणि मुलासोबत खूप लांब निघून आली. मुलगा झाल्यानंतर ती आपलं घर, नवरा, संसार या भावनिक गुंतागुंतीत अडकून परत जाऊ शकली असती. पण जिथे मुलीचाच सन्मान केला जात नाही.. गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात पण त्याच घरात मुलगी लक्ष्मी म्हणून नाकारली जाते तिथे तनिष्का कधीच सुखी, समाधानी राहू शकली नसती. आज मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी तिच्याकडून जे समाजकार्य शक्य होतंय ते ती सासरी करू शकली नसती. आज कलयुगात समाजातील स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या उन्मत्त, पुरुषी अहंकार गाजवणाऱ्या महिषासुरांना संपवण्यासाठी तनिष्कासारख्या अनेक दुर्गा, रणरागिण्यांची गरज आहे. वंशाचा दिवा ही प्रथा मोडून मुलगा मुलगी भेद नाकारून समानता आणण्याची गरज आहे. सामान्यातल्या सामान्य स्त्रीनेही दुर्गा बनून गर्भलिंगनिदान करण्यास विरोध करून आपल्या अंशास या जगात आणलंच पाहिजे. आपल्यासारखं आपल्या गोड कळ्यांनाही उमलू दिलं पाहिजे, फुलू दिलं पाहिजे, उडू दिलं पाहिजे आणि तिलाही दुर्गा बनवली पाहिजे. ही स्त्रीशक्ती प्रत्येक स्त्री मध्ये जागरूक झाली पाहिजे.


तुम्हाला काय वाटतं तनिष्काने जे केलं ते योग्य की अयोग्य?? प्रत्येक स्त्रीने आजूबाजूला स्त्रीभ्रूणहत्यासारख्या घटना घडत असतील मग ते डॉक्टर करत असो वा पेशंट.. या विरोधात आवाज उठवायला पाहिजे की नाही?? तुम्ही काय कराल??? ही कोणाची वैयक्तिक जबाबदारी नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे की नाही???



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama