तिने भविष्य पाहिले होते
तिने भविष्य पाहिले होते


आज तब्बल वीस वर्षे उलटून गेली त्या घटनेला. आजही ते सर्व आठवले की अंगावर काटा उभा राहतो. विवेक आणि नमिता यांचे नुकतेच लग्न झालं होतं. शहरात कोर्ट मैरीज केले असल्याने फक्त जवळच्या मंडळींनी शहरात येऊन रिसेप्शनला हजेरी लावली होती. पण नंतर मात्र आबा म्हणजे विवेकच्या वडिलांनी त्या दोघांना गावी येऊन कुलदेवीचे दर्शन घेण्यास आग्रह धरला. विवेक मूळचा गावातील होता म्हणून त्याला सर्व माहिती होती ,प्रश्न होता नमिताचा. तिचा जन्म मुंबईत झाला होता. कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात असतानाच तिच्या आई-बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. भाऊ-बहिण असे कोणीच नव्हते. त्यानंतर तिच्या मावशीने तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. लग्नानंतर सुद्धा तिला मावशीला सोडून जायचे नसल्याने विवेकने मावशी राहते तिथे शेजारच्या इमारतीत फ्लॅट घेतला होता. सगळे कसे मनासारखे झाले होते तिच्या. पण आबांना सुद्धा तिने आपल्या वडिलांची जागा दिली होती. जेव्हा तिला आबाचा निरोप मिळाला तेव्हा ती लगेच तयार झाली. कारण आबांना तिला दुखवायचे नव्हते. एकदा मावशीला भेटून यावे या विचाराने ती तिला भेटायला घरी गेली.
घरातील कामे आटपून साधना म्हणजे नमिताची मावशी थोडा वेळ बसली होती. दारावर पडलेली थाप साधनाने क्षणार्धात ओळखली आणि दार उघडले. नमिता उभी होती , मावशीला पाहताच तिला मिठी मारली. नकळतपणे दोघींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. जरी भाची असली तरीही तिने नमिताला मुलीसारखी माया लावली होती. नमिताल घरात बसवून ती किचनमध्ये जाणार इतक्यात नमिताने तिचा हात धरला व तिला बसायला सांगितले. नमिताने आपला मोर्चा किचनमध्ये वळविला व दोघींसाठी चहा बनवून आणला. चहाचा एक-एक घोट घेत तिने मावशीला आपण गावी जाणार असल्याचे सांगितले. नमिता गावी जाणार हे ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पण नमिताला तिने हे कळू दिले नाही उलट सांभाळून जा, तिथे सर्वांची काळजी घे असे थोडे फार सल्ले दिले. दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या. काही वेळाने विवेकचा फोन आला. तिने त्याला मावशीच्या घरी यायला सांगितले. साधना आपल्या खोलीत गेली व हातात दोन पिशव्या घेऊन आली. "हे काय गं, आई ? नमिताने विचारले. आई गेल्यानंतर नमिता तिला आई म्हणून हाक मारायची. "अगं, ह्या साड्या आहेत गं. तू गावी जातेस ना, मग तिथे तिकडच्या बायकांना भेट दे आपल्याकडून," साधना म्हणाली. " अगं, पण ह्याची गरज आहे का? आणि विवेक सोबत मी जाऊन घेतले असत गं. तू का त्रास करून घेतला?," नमिताने विचारले."त्यात कसला त्रास?," आई ह्या नात्याने करायचे नाही का?", साधनाने नमिताला विचारले. "हो, कबूल आहे. पण तू मला सांगितले पाहिजे होते. मी केली असती खरेदी," नमिता उत्तरली. साधना काही बोलणार तोच दाराची बेल वाजली. नमिता दार उघडायला गेली. विवेक उभा होता. तिने त्याचा हात पकडून खेचून मावशीसमोर उभे केले. "आता काही खरं नाही," असे विवेक मनात बोलत होता. नमिताने विवेकला सगळे काही एका दमात सांगितले आणि त्याला नक्की कोणाची चूक हे देखील विचारले. बिचारा कावराबावरा होऊन दोघींना पाहतच राहिला. साधनाने त्याला पाणी आणून बसायला सांगितले. पाणी पिल्यावर त्याला बरे थोडे वाटले. " विवेक सांग ना आईला. बघ ना, उगाच तिने खरेदी केली," नमिता खोटा राग आणत बोलली. विवेकला बोलणे भाग होते. तो म्हणाला, "आई , हे बघा तुम्ही खरं तर ही खरेदी करायला नको होती. आम्ही केली असती खरेदी." पण जावईबापू मध्येच साधना बोलली, " मी तर सहजच केली खरेदी." आई, तुम्ही मला विवेक अशी हाक मारा, आणि राहिला प्रश्न ह्या सर्व गोष्टींचा तर आम्ही फक्त एका अटीवर त्या घेऊ ," विवेक म्हणाला. " अट , कोणती अट ?,"साधनाने विचारले. " आम्ही हे सर्व तेव्हा घेऊ जेव्हा तुम्ही या सर्वांचे पैसे घेणार," विवेक उत्तरला. अवाक् नजरेने दोघी विवेकला पाहत होत्या. नमिताला तर आनंदच झाला. शेवटी साधनाच्या हातात पैसे ठेवले आणि तिचा आशिर्वाद घेऊन ते दोघे प्रवासाला निघाले. विवेकच्या कारने दोघे रात्रीच्या दहा वाजता गावी जाण्यासाठी निघाले होते. इथे घरी मात्र साधना वेगळ्याच काळजीत होती. ते दोघे निघाल्यानंतर साधना तडक जवळच्या मंदिरात तिची पत्रिका घेऊन गेली. तिथे गुरुजी देवीची पूजा करीत होते. साधनाची चाहूल त्यांना लागली होती. पूजा संपन्न झाल्यावर त्यांनी तिला प्रसाद देऊ केला. तिला काही न विचारता गुरूजींनी तिच्या कडून नमिताची पत्रिका घेतली. " तुझ्या मुलीला धोका आहे. काही तरी विपरित घडणार आहे. काहीही होऊ शकते. त्यांना बोलवा इथे", गुरुजी चिंतेने म्हणाले. साधनाच्या मनात धस्स झाले. तिला स्वतः ची अशी मुलगी नव्हती. नवऱ्याच्या निधनानंतर ती एकटीच राहत होती. नमिताचे आईवडील गेल्यावर तिनेच तिला आईची माया लावली होती. आता आलेल्या संकटातून तिला त्या दोघांना वाचवायचे होते. नवे जोडपे आणि त्यात नमिताला मनुष्यगण होते. साधनाच्या मदतीला गुरुजींनी त्यांच्या आयुध नावाच्या शिष्यास पाठवले. " आता वेळ दवडू नका, उद्या सकाळच्या गाडीने जा. मी माझ्या परीने काही होते का ते पाहतो," गुरुजींनी ती पत्रिका देत साधनाला आश्वासन दिले.
सकाळ झाली होती आणि आयुध व साधना गाडीत बसले होते. गुरूजींचे काही भक्त तिकडच्या एका गावात जात होते तर साधना व आयुध त्यांच्या सोबत गेले. विवेक व नमिता गावी सकाळी पोहोचले होते. रात्री पर्यंत नमिता ठीक होती पण अचानक तिला काही तरी झाले आणि ती तापाने फणफणू लागली. गाडी वाड्या जवळ लावून विवेक तिला घरात घेऊन गेला. घरात सगळ्या घाबरून गेले. डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतलं. त्यांना सुद्धा काही समजत नव्हते. त्यांनी एक इंजेक्शन दिले व गरज पडल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सलग दिला. सायंकाळी साधना व आयुध गावात आले. काही गावकऱ्यांना विचारुन ते विवेकच्या वाड्यावर पोहोचले. विवेक व त्याची आई बाहेर चिंतेत बसली होती. साधनाला पाहून तिचा अश्रूंचा बांध फुटला. तिला जे कळायचं ते कळून गेलं. नमिताला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिचा ज्वर उतरला होता व शुद्ध आली होती. साधनाच्या सांगण्यानुसार विवेक तिला घेऊन आला. आयुध व साधना माजघरात बसले होते. नमिता घरात पाऊल ठेवणार तोच तिचा पाय मागे सरकला. विवेक मात्र घरात आला. आयुधला तिथे वाईट शक्ती जाणवली व तो बाहेर आला. इथे नमिताचा आवाज बदलला होता, तिचे शरीर वेगळे जाणवू लागले. आयुध पुढे आला व त्याने त्याच्या जवळ असणारी विभूती नमिताच्या कपाळावर लावली. ती किंचाळली व काही क्षणात बेशुध्द पडली तोच साधनाने व विवेकने तिला पकडले. आयुधच्या सांगण्याप्रमाणे तो तिला देवघरात नेऊन गेला. तिच्या भांगेत कुंकू भरले व तिला खोलीत झोपविले. आता विवेक बाहेर आला. तो येताच आयुधने सर्व हकिकत सांगितली. " तुम्ही रात्री प्रवासाला निघाले असताना एका ठिकाणी तुमची गाडी थांबली. खरे तर ती मुद्याम थांबवली गेली होती त्या वाईट शक्तीने. मनुष्यगण असल्याने नमिताने तिला पाहिले पण काही कळण्याआधी तिने नमिताच्या शरीरात प्रवेश केला. पण आता मी तिला बाहेर काढून टाकले आहे. काळजी करू नका. कुलदेवीचे दर्शन करा. सगळे ठीक झाले आहे," आयुध बोलला. साधनाला फक्त नमिताला मनुष्यगण आहे एवढेच माहिती होते आणि आईचे काळीज होते तिला काही तरी होणार याची जाणीव झाली होती म्हणून तिने लगेच गुरुजींना कळवले होते. आता नमिता आधी सारखी झाली होती. खळखळून हसणारी. कुलदेवीचे दर्शन घेऊन तिघे मुंबईत आले.