त्या रात्री तीन वाजता
त्या रात्री तीन वाजता
आज मानव मला माझ्या बाजूला झोपलेला दिसला. गेले दोन-तीन दिवस हेच पाहून माझ्या मनाला शांती मिळाली आहे. कारणच तसे झाले होते. दोन आठवड्यापूर्वी जे घडले तेव्हा पासून मी, माझे सासू-सासरे यांनी धसकाच घेतला होता. तर झाले असे होते की, मानव म्हणजे माझा नवरा काही कामानिमित्त आमच्याच गावी गेला होता. त्याने गावीसुद्धा कंपनीची एक ब्रांच सुरू केली होती. सगळे सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस सकाळी मला फोन आला, समोरची व्यक्ती मानवला विचारत होती तसे मी त्याला हॉलमध्ये जाऊन फोन दिला. तब्बल पंधरा मिनिटे बोलून झाल्यावर तो मला फक्त एवढेच म्हणाला, "मला आताच गावी निघायला हवं." मी फक्त होकार दिला आणि त्याचे कपडे भरून सुटकेस तयार ठेवली. नेमके किती दिवस राहणार हे काही माहिती नसल्याने मी जरा जास्तच कपडे भरले होते. मानव तयारी करेपर्यंत मी नाश्ता करून घेतला व आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या कानावर सगळे घातले. पहिल्यांदा तर आई थोड्या रागावल्या होत्याच पण मी त्यांना थोडे समजावून सांगितले आणि त्या शांत झाल्या.
मानव बाहेर आला आई-बाबांचा निरोप आणि आशिर्वाद घेण्यासाठी. आईचा चेहरा त्याने ओळखला पण तिला सॉरी बोलून बाहेर आला. मी कारमध्ये त्याची सुटकेस व फाईल्स ठेवून घेतल्या. आम्ही दोघे निघत असताना बाबांनी आमच्या सोबत येण्याची इच्छा दर्शवली. आता काय मग राग घालवण्यासाठी मी आईला पण तयार करून घेतले. आम्ही सर्व निघालो मानवला स्टेशनला सोडायला. मानव कारने जाणार होता पण मला थोडी भीती वाटत होती म्हणून मी त्याला ट्रेनने जायला सुचविले तसा तो काही न बोलता तयार झाला. ट्रेनला जास्त गर्दीसुद्धा नसल्याने मस्त रिझर्व्हेशन करून त्याला स्लिपर कोच मिळाली होती. आम्ही तिघेही त्याला ट्रेनमध्ये बसवून घरी परतलो. आईचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता. दुपारचे जेवण करून झाल्यावर बाबांच्या आवडीचे थंड आईस्क्रीम आम्ही खाल्ले. रात्री मानवने गावी व्यवस्थित पोहोचल्याचे कळवायला फोन केला. आई-बाबा आधीच झोपले असणार हे माहिती असल्याने त्याने मलाच फोन केला होता. मी सुद्धा त्याला स्वतः ची काळजी घे आणि जास्त कामात व्यस्त नको राहू असे बोलून फोन ठेवला. पाच दिवसानंतर तो घरी परतला. खूप थकलेला दिसत होता तो. नेमका तो मध्यरात्री घरी आला होता ते सुद्धा आधी काहीच न कळविता. घरात आल्यानंतर फ्रेश होऊन तो गाढ झोपी गेला. मी सकाळी नेहमीप्रमाणे उठून माझ्या ऑफिसमध्ये गेले. सायंकाळी घरी आले असता, मानव व आईबाबा गप्पा मारत बसले होते. रात्री थोडा लवकरच झोपी गेला तो आज. मी कामात व्यस्त असल्याने एवढे काही लक्ष दिले नाही. रात्री सहजच कूस बदलत असताना मी बाजूला पाहिले तर, मानव नव्हता कदाचित वॉशरूममध्ये असेल असा विचार करून मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मानव उशिरापर्यंत झोपला होता. त्याचे ऑफिसचे काम पाहून मी माझ्या ऑफिसला गेले. सलग दोन-तीन दिवस असेच घडत होते. मी जास्त काही विचार केला नाही पण आईला काहीतरी वेगळं जाणवले.
एकदा अशीच रात्री मी झोपले असताना आई माझ्या खोलीत धापा टाकत आली. मला काही सुचेना, मी बाजूला पाहिले तर मानव तिथे नव्हता. मी त्याला हाक मारणार होते, तोच आईने मला गप्प राहण्यास सांगितले आणि माझा हात धरून मला स्टोअर रूमजवळ घेऊन गेल्या. रात्रीचे साडेतीन वाजले असतील कारण खिडकीतून फक्त चंद्राचा प्रकाश येत होता. आम्ही दोघी रूमच्या बाहेर थांबलो तर आईने मला इशाऱ्याने आत पाहायला सांगितले. मी आत पाहिले तर, मानव खिडकीच्या दिशेने पाहत काहीतरी बडबडत होता आणि बाजूला असणाऱ्या एका लाकडाजवळ जाऊन सारखा हात आपटत होता. त्याच्या हातावर खूप जखम झाली होती. आईच्या डोळ्यात अश्रू आले हे लक्षात येताच मी त्यांना घेऊन माझ्या खोलीत गेले. कसेबसे त्यांना शांत करून त्यांना त्यांच्या खोलीत झोपवले. तोपर्यंत मानव खोलीत आला नव्हता. मी जशी पलंगावर झोपले तसा तो आला आणि झोपी गेला. माझ्या मनात विचार आला की, आत्ताच याला सगळं विचारावे पण नंतर आईबाबांचा विचार करून मी शेवटी झोपी गेले. सकाळी मी उठले आणि स्वयंपाक घरात जात असताना आईबाबांना पाहिले. ते दोघेही टेन्शनमध्ये दिसत होते. मी त्यांना नाश्ता देत असतानाच आईने माझा हात पकडून मला त्यांच्याजवळ बसवले.थोड्या गंभीर आवाजात त्या बोलू लागल्या. " हे बघ मानसी, मी इतके दिवस बघते. पण काल जे पाहिले त्यावरून तुला आज सांगते. मानव घरी आल्यापासून एकदाही आमच्या सोबत किंवा स्वतः हून कधी देवघरात गेला नाही. मला वाटत आहे की, मानवसोबत तिथे काहीतरी झाले असावे." यानंतर आई काही बोलणार तोपर्यंत बाबांनी तिचा हात पकडला. मानव खोलीतून बाहेर आला होता. मी त्याला नाश्ताची बशी दिली व आईला माझ्या खोलीत नेऊन गेले. बाबा तिथे मानवसोबत गप्पा मारत बसले जेणेकरुन आम्हा दोघींना मोकळेपणाने बोलता येईल.
आम्ही दोघी खोलीत आलो आणि मी खोलीचा दरवाजा बंद केला. कपाटातून काही साड्या बाहेर काढून ठेवल्या. जर मानव कधी आलाच तर त्याला कपड्यांचे निमित्त सांगून परत पाठवता येईल. मी आईला पलंगावर बसवले आणि पाणी दिले. मी आईला बोलली, "आपल्या बाजूच्या सोसायटीमध्ये गुरुजी राहतात. आपण त्यांच्यासोबत सविस्तर बोलू या सर्व गोष्टी. तोपर्यंत फक्त आपल्याला काही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे." अगं, मानसी काय करते तू आत? दार का बंद आहे?," मानव बाहेरून आवाज देत होता. मी आईला आज सायंकाळी जाऊ असे बोलत दार उघडले. मानसी, अगं हे बघ ना. माझा हात बघ कसा झाला? मला कळत नाही कसं झाले हे? एका लहान मुलासारखा तो बोलत होता. "अरे, थांब मी औषध लावून देते, असे बोलून आईला मी बाहेर जायला सांगितले. दुपारी मी व आईंनी मिळून मानवला आवडते तशी बिर्याणी बनवली. सायंकाळी जाण्याची तयारी करून झाली होती. मानवला काही समजू नये म्हणून आणि त्याच्या हाताच्या जखमेचे निमित्त साधून मी चहाऐवजी आज त्याला दूध दिले. त्यात थोडी जायफळ पूड घातली झोप लागावी म्हणून. गुरुजींच्या घरी किती वेळ लागेल याचा नेम नसल्याने ही तरतूद मी केली होती. हेतू एवढाच होता की, "आम्हा दोघींच्या अनुपस्थित बाबांना मानवने काही त्रास देऊ नये." आम्ही सगळयांनी चहा व मानवने दूध घेतले. जशी मानवला झोप येऊ लागली, मी व बाबांनी त्याला खोलीत नेऊन झोपवले आणि बाहेरून दार लावून घेतले. मी व आई देवाला नमस्कार करून गुरूजींकडे जायला निघालो.
"कल्पतरू सोसायटी" मी नाव वाचले आणि गेटजवळ थांबले. वॉचमनला मी गुरूजींचे नाव सांगितले आणि रजिस्टरवर एन्ट्री करून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. दाराबाहेर नावाची पाटी वाचून मी घराची बेल वाजवली. एका वयस्कर बाईंनी दार उघडले आणि आम्हाला काही न विचारताच आत येण्यास सांगितले. मी व आई आश्चर्याने एकमेकींना पाहत राहिलो. पुन्हा त्या बाईंनी आम्हाला आत येण्यासाठी सांगितले असता आम्ही आत प्रवेश केला. आम्हाला सोफ्यावर बसायला सांगून ती बाई घरात गेली. आता गुरुजी बाहेर आले. त्यांच्या हातात पूजेचे ताट होते. आम्ही नमस्कार करून तिथे बसलो. गुरुजी ताट घेऊन आत गेले आणि काही वेळातच बाहेर आले. गुरुजींनी त्या बाईला बोलावून त्यांची पत्नी अशी ओळख करून दिली. त्या बाईंनी आमच्यासाठी सरबत आणून ठेवले. मी गुरूजींना माझी व आईंची ओळख करून दिली. मी मानवचा विषय काढत असतानाच त्यांनी मला थांबवले आणि मानवबद्यल , त्याच्या हाताबद्यल जे झाले ते अगदी जसेच्या तसे सांगितले. आई तर काहीच बोलत नव्हत्या. मी बोलले, "गुरुजी तुम्हाला कसं माहिती की आम्ही इथे येणार आहोत? आणि मानवबद्यल एवढ सगळे कसे काय समजले? " ते शांतपणे बोलले की," जे संकट येणार आहे त्याची पूर्वसूचना मिळण्याचा वरदान माझ्या पूर्वजांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे हे सगळे मला माहित आहे. आता तू मला सांग," मानव जेव्हा घरी परतला तेव्हा किती वाजले होते?" " मला नक्की आठवत नाही पण तीन वाजले असतील, " मी उत्तरले. " तुम्ही रात्री जेव्हा मानवला हात आपटताना पाहिले ती वेळ कोणती होती? पुन्हा गुरूजींनी प्रश्न केला. " कदाचित तीन वाजले होते" मी आणि आई एकत्र बोललो. " कदाचित नव्हे तीनच वाजले होते. या सगळ्या गोष्टींची सुरुवात तीन वाजताच झाली होती ते पण मानव त्या दिवसापासून जेव्हा तो घरी आला होता. फरक फक्त एवढाच होता की, तुम्हाला ते लवकर निदर्शनास आले नव्हते." गुरुजी बोलले. "आता यावर उपाय काय गुरुजी? आईने
काळजीच्या स्वरात विचारले. "माझी व मानवची भेट झाल्यानंतर मी काही सुचवू शकतो. या सर्वांची सुरुवात कशी झाली हे समजणे गरजेचे आहे," गुरूजींनी सांगितले. मला ते पटले आणि सत्यनारायणची पूजा करण्याच्या उद्देशाने आईने गुरुजींना घरी येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही दोघींनी गुरूजींना नमस्कार केला व घरी आलो.
सात वाजायला आले होते. घरी आल्यावर मानव अजून झोपेत आहे असे बाबा बोलले. मी रात्रीचे जेवण करायला गेले आणि तोपर्यंत आईंनी बाबांना गुरुजी व आमच्यातील संवाद सांगितला. काही वेळाने मानव डोळे चोळत बाहेर आला. त्याच्या हाताची जखम अजूनही तशीच होती. आईचे बोलणे ऐकून बाबांचा चेहरा खुलला होता. रात्री आम्ही नेहमीप्रमाणे जेवून झोपी गेलो. गुरुजी सोमवारी पूजा व लागणारी साहित्य सामग्रीची यादी देण्याच्या उद्येशाने घरी येणार होते. याचाच अर्थ दोन दिवस आम्हाला मानवला सांभाळून घ्यावे लागणार होते. रात्री तीनच्या सुमारास मला काहीतरी आवाज ऐकू आला. मी पलंगावर झोपून होते त्यामुळे तसेच मागे वळले तर मानव दरवाजा उघडून बाहेर पडत होता. मी त्याच्या नकळतपणे हळूच जाऊन पाहिले तर, तो पुन्हा स्टोअर रूममध्ये जाऊन तसेच हात आपटून घेत काहीतरी बोलत होता. मी फक्त हतबलतेने सगळे पाहत होते. अगदी दोन्ही रात्री हा प्रकार असाच घडत होता. एकदाचा काय तो सोमवार आला. मी मानवला गुरुजींच्या येण्याबद्दल सांगितले होते. सकाळचा नाश्ता आवरून झाला असता दाराची बेल वाजली. आईने दार उघडले तर, गुरुजी व त्यांच्या सौ. आल्या होत्या. घरात पाऊल ठेवताच त्यांना काहीतरी जाणवलं पण काही न सांगता ते आत आले. मी त्या दोघांना पाणी आणून दिले व बाबा, मानवची ओळख करून दिली. दिवसभर मानव नॉर्मल वागायचा जे काही व्हायचे ते रात्री तीन वाजता. गुरुजींनी मानवची विचारपूस केली. गावातील गोष्टी, वातावरण व कामातील प्रगती या गोष्टी विचारून घेतल्या. मी, आईबाबा हे सगळे एका ठिकाणी उभे राहून पाहत होतो. एक तास होऊन गेला आणि मानव माझ्याजवळ आला व त्याने गुरुजींना आज रात्री जेवायला बोलवण्याचा बेत आखण्यास सांगितला. आमच्या मनात जे होत तेच शेवटी झाले. गुरूजी आम्हाला यादी देऊळ निघाले व रात्री जेवायला येण्याचे नक्की झाले. आधी गुरुजी त्यांच्या सौ, मानव आणि बाबा जेवून उठले. मी व आई नंतर जेवलो. दहा वाजता आम्ही सगळे झोपलो. गुरुजी व त्यांच्या सौ. आमच्या बाजूच्या खोलीत झोपले होते. रात्रीचे पावणेतीन झाले, मी आज जागी होते. कसेबसे तीन वाजले आणि पुन्हा मानवचे सुरू झाले. मी गुरूजींना उठवण्यासाठी खोलीबाहेर आवाज दिला आणि त्यांनी दार उघडले. मी त्यांना घेऊन स्टोअर रूमजवळ गेले. गुरूजींनी मानवला पाहिले, पण त्यांच्या नजरेने काहीतरी वेगळे असल्याचे भासले.
सकाळी आम्ही उठलो. आज घरात पूजा गुरुजींनी केली होती. सवयीप्रमाणे आजसुद्धा मानवने पूजेच्या तबकाला स्पर्श देखील केला नाही. गुरूजी कामाचे निमित्त सांगून बाहेर गेले. मी माझ्या ऑफिसची व मानवच्या ऑफिसची कामे पूर्ण केली. दुपारी ते जेवायला आले. मी मानवसोबत बोलत असताना गुरुजी बाबांना काहीतरी सांगत होते. रात्र झाली तसे गुरुजींनी देवघराबाहेर एक होम तयार केले व काही साहित्य मांडले. मानव तर झोपला होता पण मी, आईबाबा,गुरुजी व त्यांच्या सौ.जागेच होतो. तीनचा टोला पडला तसा मानव खोलीबाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागला पण त्याला काही शक्य झाले नाही. तो चिडू लागला, रागराग करू लागला. गुरूजी मंत्रोच्चार करत होते. मानवचा आवाज पूर्णपणे बदलून गेला होता. एका स्रिच्या आवाजात तो बोलत होता.तो आवाज ऐकून आई घाबरून गेली व रडू लागली. बाबांनी व गुरूजींच्या अर्धांगिनीने आईला सावरले. मानवच्या शरीरातील ती स्री आता जोरजोरात दरवाजावर आवाज करत होती. लाथ मारून ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. गुरुजींनी तिला मानवच्या शरीरात येण्याचे कारण विचारले असता ती हसू लागली. गुरूजींनी पुन्हा मंत्र सुरू केले. आता ती रडू लागली आणि दयेची भीक मागून हे सगळे थांबवायला विनवू लागली. गुरुजींनी रक्षासूत्र घेऊन ते मला दिले आणि मला ते मानवच्या हातात बांधायला सांगितले. हे थोडे कठीण होते पण मला त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी हातात गंगाजल असणारी वाटी घेतली आणि दार उघडले. जसे दार उघडले तसेच त्यांनी ते जल मानवच्या अंगावर शिंपडून मला इशारा केला. मी ते सूत्र बरोबर उजव्या हातात बांधले आणि मानवला बाहेर आणून बसवले.आता जे काही होणार ते आईबाबा पाहू शकणार नाहीत म्हणून गुरूजींनी त्यांना खोलीत जाण्याची विनंती केली. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केले होती. काही झालं तरी मानवला ठीक करायचे होते असा निश्चियच मी केला होता. मानवला शुद्ध आली तेव्हा तो बसला होता. त्याच्या हातातील रक्षासुत्राने त्या स्रीला त्याच्या शरीरातून काढले होते पण ती तिथेच कुठेतरी होती.
गुरुजींनी मानवला गावी असताना कुठे बाहेर गेला किंवा काही विचित्र असे पाहिले का असे विचारले. मानवने नकारार्थी मान डोलावली. मी व गुरुजी विचारात पडलो. तेव्हा मानव बोलला," गावी असताना एकदा त्याला खूप उशीर झाला होता. तिकडच्या कंपनीतून तो बाराच्या सुमारास निघाला होता तेव्हा त्याला एक बाई दिसली. ती बाई झाडाच्या एका बाजूला उभी राहून रडत होती. त्याला राहावले नाही मी तो थोडा जवळ गेला व तिची विचारपूस करू लागला. कोण तुम्हाला? इथे ह्या वेळी काय करता? ती फक्त एवढेच बोलली, मला तो घेऊन गेला नाही. येणार होता पण आला नाही. आता कोणासोबत आणि कसे माझ्या घरी जाऊ? कोण घेऊन जाणार मला? मला तिची दया आली. मी तिला फक्त एवढेच बोललो, "माझ्यासोबत या." मी बोललो आणि मला गाडीचा आवाज आला. माझ्या शाळेतला मित्र मी फोन उचलला नाही म्हणून मला घ्यायला आला. मी त्याला त्या बाईबद्यल सांगणार तोच ती गायब झाली. त्यानंतर माझे त्या बाईबद्यल काही बोलणं झालं नाही आणि माझे काही संपवून मी इथे मुंबईत आलो. "मानव, तुझ्या त्या शब्दावर ती बाई इथपर्यंत आली आहे. तुझ्या नकळत ती तुला त्रास देत आहे," गुरुजी बोलले. मानवसाठी हे सगळे नवीन होते. तो आल्यानंतर जे झाले ते कोणीच त्याला सांगितले नव्हते. गुरुजींनी ध्यान लावून त्या स्रीला पाहण्याचा, तिच्या बद्यल काही माहिती मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न केला.अशीच पंधरा मिनिटे गेली असतील आणि गुरुजी बोलले. ते म्हणाले," ती एका अतृप्त बाईची आत्मा आहे. ती एका मुलावर जीवापाड प्रेम करत होती. परंतु, तिला भेटायला येत असताना अचानक काळ त्याला घेऊन गेला. अपघातात मरण पावला तो. ही बातमी समजताच ही कन्यासुद्धा हे जग सोडून निघून गेली. त्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली पण या मुलीची त्याला भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली आणि ती अशी भटकू लागली. तू त्या रात्री तिला येण्यास सांगितले आणि हे सगळे दुष्टचक्र सुरू झाले. "आता यावर उपाय काय? मी गुरूजींना विचारले. गुरुजींनी एक छोटा कलश घेतला. काही मंत्रपठण करून तिला बोलावले. तिचा भूतकाळ आम्हाला समजला होता. ती आता एका निरागस मुलीसारखी दिसत होती. गुरुजींनी तिला त्या मुलाच्या मृत्यूची बातमी सांगितली आणि तो तिची वाट पाहत आहे असे पटवून दिले. बऱ्याच प्रयत्नानंतर तिने होकार दिला व गुरुजींनी तिच्या आत्म्याला त्या कलशात बंद केले. ती पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून तो कलश पूर्णपणे बांधला. या सगळ्यात पहाट झाली होती. मानव आता ठीक झाला होता.
गुरुजींनी तो कलश एका कोपऱ्यात ठेवला होता आणि आम्ही सगळे झोपायला गेलो. रात्रभर जागरणामुळे मी आज नेहमीपेक्षा थोडी उशीरा म्हणजेच नऊ वाजता उठले. आईंनी सगळा नाश्ता बनवून ठेवला होता. गुरुजी व त्यांच्या सौ. नाश्ता करून सकाळीच त्या कलशाला घेऊन गेले होते. मी बाहेर येताच आईंनी मला मिठी मारली. आमचे नातं जरी सासूसूनेचे असले तरी त्या मला मुलीसारखी जपत होत्या. आई मला बोलली की, "गुरूजींनी रात्री जे झाले ते सर्व त्यांना व बाबांना सांगितले. तो कलश कोणालाही सापडू नये म्हणून ते त्याला सुरक्षित ठिकाणी जाऊन ठेवणार होते." आम्ही बोलत असताना मानव बाहेर आला. त्याने आईबाबांना नमस्कार केला आणि देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून आला. आमच्या घरातील घडी नीट बसली होती. सायंकाळी गुरुजी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. आता मानव त्याचे आणि मी माझे ऑफिस सांभाळत होते. " All's well that ends well."