Renuka Jadhav

Romance

3  

Renuka Jadhav

Romance

एक निर्णय

एक निर्णय

6 mins
245


मी आणि निहार बालपणापासूनचे मित्र-मैत्रीण. मी नुपुर देशमुख. माझे आणि निहारचे बाबा विद्युत विभागात वेगवेगळ्या प्रभागात ऑफिसर होते. आम्ही तिकडेच असणाऱ्या एका सोसायटीत राहत होतो. आम्ही दोघेही शाळेत एकत्र जाण्यापासून, एकत्र खेळणे, एकमेकांच्या घरी राहणे अगदी फिरायला पण एकत्र जाणे, असे समीकरण होते. शाळेनंतर कॉलेज पण योगायोगाने एकच मिळाले. त्यानंतर मात्र मी सीए आणि निहारने एमबीए केले. निहारने विविध शहरात त्याच्या कंपनी उभारल्या होत्या. मी मस्त माझे काम करुन घरी येऊन आईसोबत बसायचे. कारण निहार इंदूरला कामानिमित्त गेला होता. या काळात आम्ही दोघे जरी विविध क्षेत्रात असलो तरीही आम्हाला एकमेकांच्या जीवनात काय होत आहे याची पूर्ण कल्पना होती. मला वेळ मिळाला की मी त्याला आणि तो मला असे आमचे एकमेकांना फोन रोज फोन असायचे. सगळं सुरळीत चालू असताना एक विचित्र घटना माझ्या आणि निहारच्या आयुष्यात घडली. ऑक्टोबरचा महिना सुरू झाला होता. पुढच्या महिन्यात दिवाळी होती आणि निहार प्रत्येक दिवाळी आमच्या सोबत साजरी करायचा. मी, माझे आईबाबा, निहार आणि त्याचे आई-वडील असे आम्ही सगळे अगदी इतरांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जाऊन यायचो. यावेळी सुद्धा तसेच होणार असे ठरवून मी त्याला शॉपिंगच्या निमित्ताने फोन लावला. पण आश्चर्य असे की, पहिल्यांदाच त्याचा फोन बंद येत होता. कदाचित तो विसरला असेल कामाच्या व्यापात म्हणून मी जास्त विचार केला नाही. सायंकाळी पण त्याचा फोन काही आला नाही. मी असे एक-दोन आठवडे त्याला फोन करत होते पण त्याचा फोन काही केल्या लागत नव्हता. असे करत-करत एक महिना कधी गेला कळलेच नाही. मी एक-दोनदा त्याच्या आई-वडिलांना विचारले पण त्यांनाही निहारने फोन केला नव्हता.


नोव्हेंबर महिना सुरु झाला आणि दिवाळीच्या पहाटे माझा फोन वाजला. मी ब्लू टूथने फोन रिसिव्ह केल्याने तो फोन कोणाचा होते ते समजले नाही.


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, निहार म्हणाला.


मला थोड्या वेळासाठी काही सुचलेच नाही. मी गप्प बसले.


काय गं, कुठे हरवली? मी बोलतोय निहार.


तू, कुठे आहेस? तुझा फोन बंद का आहे? काय झाले तुला? असे. कितीतरी प्रश्न मी त्याला विचारले. तो काहीच न बोलता फक्त हसला. पण त्याचे हसणे मला बनावटी वाटत होते.


आज घरी येणार नाही?, निहारने मला प्रश्न केला.


घरी? तू आलास मुंबईत? माझा पुन्हा प्रश्न.


हो, मी आलो आहे. बाकी सगळे घरी बोलू. एवढे बोलून त्याने फोन ठेवला.


मागच्या महिन्यात त्याचा फोन बंद असणे आणि आज त्याचे काही न सांगता घरी येणे मी गोंधळून गेले होते. मी आणि आई-बाबा त्यांच्या घरी गेलो. संपूर्ण दिवस मजेत गेला माझा. पण दुसऱ्या दिवशी मला माझ्या भावाने बोलावून घेतले आणि मी अगदी भाऊबीज होईपर्यंत तिथेच राहिले. निहार कदाचित इंदूरला गेला असणार या विचारात मी उदास मनाने घरी परतले. दुपारी मी घरात बसून माझे काम करत असताना माझा फोन वाजला. मी नंबर पाहिला तर तो निहारचा फोन होता. नक्कीच माझ्यावर रागावला असणार असे समजून मी थोडा दीर्घ श्वास घेऊन फोन घेतला.


तू आता कुठे आहेस, निहारने विचारले.


मी घरी आहे रे, मी उत्तरले.


कधी आलीस तू दादाच्या घरून, निहारचा पुढचा प्रश्न.


आज सकाळीच आले रे, माझे उत्तर.


आज सायंकाळी मला आपल्या घराजवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटू शकते?, निहार म्हणाला.


तू घरीच आहेस? इंदूरला नाही गेला?, मी विचारले.


नाही, मला तुला भेटायचं होते. पण तू दादांच्या घरी गेली आणि आपले बोलणं झाले नाही फार, निहारच्या बोलण्यात गांभीर्य जाणवत होते.


सायंकाळी बरोबर पाच वाजता तो माझ्या घरी आला. आई-बाबांसोबत गप्पा मारत तो माझी वाट पाहत होता. मी तयार होऊन बाहेर आले आणि आम्ही दोघे निघालो. घरातून बाहेर पडल्यानंतर ते शॉपमध्ये जाईपर्यंत निहार काहीच बोलला नाही. आम्ही दोघेही बसलो असताना मला एका क्लायंटचा फोन आला. मी फोनवर बोलत दुसरीकडे गेले आणि तिथून माझी नजर सहजच त्याच्यावर गेली. तो सारखा फोन बघत होता पण नंतर पुन्हा फोन ठेवून दिला. माझे बोलून झाले आणि मी कॉफीची ऑर्डर दिली व बसले. अजूनही तो शांत बसला होता. घरात बसून गप्पा मारणारा काही वेळापूर्वीचा निहार आणि आत्ता माझ्या समोर बसलेला निहार दोघेही वेगळे भासत होते मला. मी त्याला कसबसे बोलतं केले. त्याने जे काही सांगितले ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता.


तो म्हणाला की, त्याचे एका मुलीवर मनापासून प्रेम होते. नमिता नाव होते त्या मुलीचे. अगदी तो तिच्या सोबत लग्नसुद्धा करणार होता. पण त्याला बंगळुरूला कंपनीचे काम पाहण्यासाठी काही दिवस तिथेच राहावे लागले. एक महिन्यानंतर जेव्हा तो इथे आला तेव्हा त्याला समजले की, तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केले आणि दुसरीकडे राहायला गेली. तिच्या घरी जाऊन आल्यावर तिचे आई-वडील गावी गेल्याचे कळले. तो पूर्णपणे खचून गेला होता. स्वतःला सावरण्यासाठी तो इंदूरला गेला. तिथे अगदी रात्रंदिवस काम करून एका मोठ्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला. त्या बाबतीत सेलिब्रेशन म्हणून एक पार्टी ठेवण्यात आली होती. ज्या रात्री पार्टी होती त्याच रात्री एका अनोळखी नंबरवरून त्याला फोन आला. पलीकडचा मुलीचा आवाज हा नमिताचा होता. तिने शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. पण निहार पुढे काही बोलणार तेवढ्यात फोन बंद झाला. त्यानंतर कितीतरी वेळा तो नंबर बंद होता. त्याला फक्त नमिताने असे अचानक लग्न का केले हे जाणून घ्यायचे होते. निहार आता माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्ही दोघेही घरी जायला निघालो. मी माझ्या बिल्डिंग जवळ आले आणि निहारला बाय बोलत असतानाच तो जवळ आला आणि मला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील पाणी माझ्या खांद्यावर ओघळले होते.


कितीतरी दिवस मी त्याचा फोन रिसिव्ह करत नव्हते की त्याला भेटत नव्हते. मी फक्त घर आणि ऑफिस एवढेच सांभाळत होते. एकदा सायंकाळी मी ऑफिसमधून निघत असताना निहार माझ्या कारजवळ उभा असलेला दिसला मला. आम्ही दोघेही माझ्या कारमध्ये बसलो. मला त्याने त्याच कॉफी शॉपजवळ गाडी थांबवायला सांगितली. निहार माझ्याकडे एकटक बघत होता.


निहार, तू नमिताला विसर आता. तिने तिच्या आयुष्याची सुरुवात केली आहे आता तू पण तेच कर. झाडांची सुकलेली पाने फांदीवरून जमिनीवर पडली तरी झाड काही कमकुवत होत नाही. नव्या पालवीने ते झाड अजून सुंदर आणि सुशोभित होतं, मी बोलले.


निहार फक्त मला बघतच होता व म्हणाला, आणि मग तिचा तो फोन करून मला शुभेच्छा देणे आणि नंतर...


विसरून जा, मी मध्येच त्याचे वाक्य तोडले. माझे शब्द आज नक्की त्याला टोचणार होते पण जर आज तो यातून बाहेर पडला नसता तर पुढे मात्र सगळच अवघड झाले असते. मी तिथून निघून गेले. कार तिथेच ठेवून. रात्री दहा वाजता निहारने कारची किल्ली बाबांना आणून दिली. मी तेव्हा झोपले होते. आज मला माझाच राग येत होता. निहारच्या भविष्याचा विचार करताना त्याच्या आत्ता होणाऱ्या त्रासाकडे मी दुर्लक्ष केले होते. दोन-तीन दिवस आमच्यामध्ये बोलणं झालं नव्हतं. तो पण कुठे दिसत नव्हता. मला प्रचंड वाईट वाटले. मी माझा फोन बंद करून ठेवला पण ऑफिसमध्ये मी जात होते. शनिवारी मला सुट्टी असल्याने मी मस्त घरी बसले होते. आईने छान पावभाजी, गुलाबजाम, बासुंदी बनवली होती. बासुंदी बघून मला थोडे नवल वाटलं पण मी छान चार गुलाबजाम खाल्ले. दहा वाजत आले होते आणि दाराची बेल वाजली. बाबांनी दार उघडले आणि निहार घरात आला. एवढ्या रात्री तो कधीच आला नव्हता. मी घरातील भांडी घेऊन आत गेले. निहार जेवूनच आला असल्याने आईने त्याला बासुंदी दिली. बासुंदी त्याला खूप आवडायची ते पण माझ्या आईने बनवलेली. मी स्वयंपाकघरात भांडी धूत होते तोपर्यंत यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या पण जसे मी सगळे आवरून बाहेर येत होते सगळे शांत बसले. मी निहारने ठेवलेला बासुंदीचा पेला उचलला आणि त्याने तो त्याच्या हातात घेतला. मी मागे वळले आणि माझा कोणीतरी हात पकडला अगदी हलक्या हाताने. मी वळाले आणि निहार गुडघ्यावर बसला होता. मी आई-बाबांकडे बघत होते पण ते काहीच बोलत नव्हते. निहारने एक छोटा बॉक्स बाहेर काढून त्यातील अंगठी हातात घेऊन ती माझ्या समोर केली आणि मला लग्नाची मागणी घातली. मला हे सगळे अनपेक्षित होते. इतके दिवस मी निहारचा विचार करत होते पण गोष्टी अशा तऱ्हेने वळण घेतील याची कल्पनासुद्धा केली नव्हती मी. निहार तसाच बसला होता माझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत. तो उत्तर मिळेपर्यंत उठणार नव्हता हे निश्चितच होते. मी पण गुडघ्यावर बसले आणि त्याला नक्की काय झाले ते विचारले.


निहार फक्त एवढेच बोलला की, नुपुर तू मला समजून घेतले आणि मला माझ्या वर्तमानाची जाणीव करून दिली. तुझ्यासारखी समजूतदार आणि खंबीर दुसरी कोणीही नाही. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर मला तसेच सोडून निघून गेली असती. पण तू मला समजावून सांगितले. तू माझी बायको बनून माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी राहावी असे वाटते आहे मला.


मला निहारकडे पाहता येत नव्हते आणि त्याला माझा होकार मिळाला होता. पुढच्याच महिन्यात आम्हा दोघांच्या आई-बाबांनी अगदी धुमधडाक्यात आमचे लग्न लावून दिले. निहारने घेतलेला लग्नाचा निर्णय हा त्याला एक सुखद अनुभव होता आणि आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात पण झाली होती.


............................समाप्त..............................


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance