Renuka Jadhav

Drama Romance

3.9  

Renuka Jadhav

Drama Romance

लग्नाची वरात

लग्नाची वरात

30 mins
687    " अजून किती मुलींना तू नकार देणार आहेस? अभिनवची आई त्याला विचारत होती. अभिनव फक्त फाईल्स घेऊन काम करत होता. जरी तो काम करत होता तरी आईचे बोलणे त्याने ऐकले होते. अभिनव आर्किटेक्ट होता. त्याचे ऑफिससुद्धा एकदम छान होते. अनघा म्हणजे अभिनवची बहीण डॉक्टर होती. ती वयाने जरी लहान असली तरीही तिच्या भावाच्या मनात नक्की काय आहे ते तिला माहिती असायचे. आज नेमका शनिवार होता. पाच दिवस कामाचे असल्याने शनिवारी-रविवारी अभिनव त्याचे प्रोजेक्ट्स आणि पेपरवर्क पाहायचा. एक तर पप्पा एका महिन्यासाठी लंडनमध्ये गेले होते व आत्याने त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या मैत्रीणीच्या मुलीचे स्थळ पाठवले होते. अभिनवने तिला न पाहताच नकार दिला होता. त्याच्या निर्णयाने आत्या अभिनवच्या आईवर रागावली होती. पंचवीस वर्षाचा असून पण अभिनव काही लग्नाचा विचार करत नव्हता. आपला मुलगा ऐकत नाही हे पाहून मनस्वीला म्हणजे अभिनवच्या आईला वाईट वाटले आणि तिने अनघाला हॉस्पिटलमध्ये फोन करून सगळे सांगितले. अनघाने सगळं समजून घेऊन आईला थोडे शांत राहायला सांगितले.

    रात्री जेवत असताना दोघी मायलेकी नजरेतच बोलत होत्या. शेवटी नाईलाजाने अनघाने आईच्या समाधानासाठी अभिनवला नकार देण्याचे कारण विचारले. " मला खूप दमल्यासारखे वाटत आहे असे बोलून तो खोलीत निघून गेला." विषय तिथेच संपला होता. अनघाने अभिनवच्या खोलीचे दार वाजविले तर दार उघडे होते. ती आत गेली. अभिनव खिडकीतून बाहेर बघत होता. " दादा, काय झाले आहे?", अनघाने विचारले. अभिनवने नकारार्थी मान हलवली. अनघाने तो विषय तिथेच थांबवला आणि खोलीत झोपायला गेली. मनस्वीने रात्रीच मोहित म्हणजे अभिनवच्या वडिलांना सगळी हकिकत सांगितली. त्यांनी मनस्विला समजावून ते येईपर्यंत काही न करण्याचे सुचविले. मोहितचा सल्ला तिला योग्य वाटला आणि त्याप्रमाणे तिने अभिनवसमोर लग्नाचा विषय काढणे सोडून दिले. इथे आई सध्या शांत असल्याने अभिनव आणि अनघा आपापल्या कामात व्यस्त झाले होते. दोन आठवड्यांनी मोहित पण घरी परतला होता. आता मात्र बायकोची बाजू घ्यायची की मुलाला साहाय्य करायचे या पेचात तो अडकला होता. एक दिवस रविवारी मस्त चहा घेऊन झाल्यावर मोहितला एक युक्ती सुचली. त्याने अभिनवला त्याच्या सगळ्या मित्रांना घरी जेवायला बोलवायला सांगितले. खर तर हा गनिमीकावाच होता पण मोहितने बरोबर योजना आखली होती. रात्री सगळ्यांचे जेवण झाले की, त्याच्या समक्ष त्याच्या मित्रांना तो अभिनवच्या मनात नक्की काय आहे ते विचारणार होता. झालेही अगदी तसेच पण हाती काहीच लागले नाही. अभिनव मात्र थोडा चिडला होता पण मित्रांसमोर तो गप्प बसला. आपल्या आईवडिलांचे मन त्याला समजत होते पण कुठेतरी तो म्हणजे अडकला होता. त्याने तर अनघाचे लग्न झाल्यावर मी करेल असे म्हटले होते पण मनस्विला आधी घरात सून पाहिजे होती. कितीतरी दिवस अभिनव घरात कोणाशीही बोलत नव्हता. सकाळी लवकर उठून जायचा आणि रात्री जेवून झोपायचा. मनस्विने शेवटी या विषयाला पूर्णविराम दिला. या सगळ्यात अभिनवला त्याच्या मैत्रिणीचा लतिकाचा नंबर मिळाला होता. हे होते माझे त्याच्या आयुष्यात पुनरागमन. 

    मी व अभिनव शाळेपासून एकत्र होतो. पण मी आईबाबांची बदली झाल्यावर माझ्या पंजोबांनी बांधलेल्या वास्तूत नाशिकमध्ये राहत होतो. या मधल्या काळात आम्ही सोशल मीडियावर बोलायचो पण नंतर मात्र मी कामात गुंतले आणि आमचे बोलणं थांबले. माझा फोन नंबर मिळाला आणि तो तर खूशच झाला. आता महत्त्वाचा मुद्या होता ते आमची भेट. योगायोग असा झाला की, मला माझ्या मैत्रिणीचे तिच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत बोलावून घेतले. ही गोष्ट जशी मी अभिनवला सांगितली त्याच्यात कमालीचा बदल झाला. प्रत्येक शनिवार-रविवार आम्ही भेटू लागलो. मस्त फिरणे, मुव्ही बघणे आणि डिनर. पाच दिवस ऑफिस आणि त्यानंतर येणारे ते दोन दिवस याची तो आतुरतेने वाट पाहायचा. दोन आठवडे आणि त्यात सोबत मज्जा केलेले ते चार दिवस. मैत्रिणीचे लग्न आणि बाकीचे कार्यक्रम होऊन गेले होते. मी माझी निघायची तयारी करत होते. अभिनव मात्र दुःखी दिसत होता. न राहावून त्याने मला त्याच्या घरी एक दिवस बोलावले. त्याच्या घरी त्याने फक्त मैत्रीण येत आहे असेच सांगितले होते. मी सकाळी अकरा वाजता तिथे पोहोचले. माझे त्याच्या घरी गेल्यानंतर जो बदल अभिनवच्या घरच्यांनी पाहिला ते पाहून ते सगळे आश्चर्याने मलाच बघत होते. जेवण झाल्यावर मी घरी निघत असताना अभिनवच्या आईने मला त्यांच्या घरी एक दिवस राहायला सांगितले. मला काही हरकत नव्हती म्हणून मी पण होकार दिला. सायंकाळी पाच वाजता मी - अभिनवच्या घरातले असे गप्पा मारत बसलो होतो. अभिनव फक्त मलाच पाहत होता हे मी आणि अनघाने एकाच वेळी बघितले. मस्करी म्हणून मी अभिनवच्या लग्नाचा विषय काढला व सगळे एकदम गप्पच झाले आणि अभिनवकडे बघू लागले. अभिनव मात्र काही न बोलता माझ्या जवळ येऊन बसला. माझ्या डोळ्यात बघून तो फक्त एकच बोलला," अजून ती भेटली नाही". मला हसू आवरले नाही आणि मी हसायला लागले सोबत बाकीचे पण हसत होते. अभिनव झोपायला गेला आणि त्याच्या आईने मला अनघासोबत तिच्या खोलीत झोपायला दिले. आम्ही दोघी खोलीत जात होतो तर अनघाला फोन आला. तिला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले होते एक तातडीची सर्जरी होती. जसा फोन ठेवला तशीच ती तिची पर्स घेऊन गेली. मी एकटीच खोलीत झोपले. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि अभिनवच्या आईने मिळून नाश्ता बनवला. आजही अभिनव खूपच आनंदी दिसत होता. कदाचित त्याच्या आईला काहीतरी जाणवले होते. अनघा सकाळी सात वाजता येऊन झोपली असल्याने आम्ही तिला उठविले नाही. दुपारी जेवत असताना मी अभिनवच्या आईला निघत असल्याचे सांगितले. कोणी काहीच बोलले नाही. मी माझे सामान भरत असताना अभिनवची आई खोलीत आली अनघा तिथे आधीच होती. तिच्या आईने माझा हात एका आपुलकीने पकडला आणि त्यांच्या मनात असलेली अभि बद्यलची (अभिनवचे शॉर्ट फॉर्म) चिंता बोलून दाखविली. आता मला समजले की, का बरं सगळे काल शांत झाले होते त्याच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा. मी थोडा विचार केला आणि अभि सोबत बोलले. त्याने माझे बोलणं ऐकून घेतले व मी बाहेर आले. मी जाईपर्यंत अभि बाहेर आलाच नाही. मला घ्यायला बाबांनी कार पाठवली असल्याने मी लगेच कारमध्ये बसले आणि घरी परतले. मी तिथे असताना अनघाने माझा नंबर घेतला होता म्हणून तिने मी घरी पोहोचल्यावर मला फोन केला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये गेले. संपूर्ण दिवस कामात व्यस्त असल्याने मी काही फोन पाहिलाच नव्हता. सायंकाळी मी जसा फोन हातात घेतला मला एक वॉईस मैसेज दिसला. अनघाने मला दुपारीच अभिच्या घरी येण्यासाठीचा वॉईस मैसेज पाठविला होता. मी लगेचच तिला फोन केला पण ती हॉस्पिटलमध्ये असल्याने तिने काही तो उचलला नाही. रात्री नऊच्या सुमारास तिचा फोन आला. अभिची आई होती आता फोनवर. त्या बोलल्या," लतिका, तू काही दिवसांसाठी येऊ शकतेस का बाळ,?" त्यांच्या आवाजात चिंता आणि काळजी जाणवत होती मला. मी क्षणार्धात त्यांना होकार दिला. आईबाबांना सांगून आणि ऑफिसमधली कामे घेऊन मी पुन्हा अभिच्या घरी गेले. सकाळचा नाश्ता करून अभि ऑफिसमध्ये गेला होता. पण त्याचे वागणे आधीसारखे होते तुटक-तुटक. कदाचित माझ्या जाण्याने तो हिरमुसला होता. सायंकाळी अभि घरी आला आणि मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर तेज आले. आता आम्ही सगळे एकत्र हॉलमध्ये बसलो होतो. अभिनवने मला सांगितले की, तो लग्न करायला तयार आहे पण त्याला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. जेव्हा तो हे सगळं सांगत होता त्याच्या बोलण्यात एक आत्मविश्वास दिसत होता. पण इथे त्याचे आईबाबा थोडे गोंधळून गेले होते. एखाद्या वेळेस हे सगळे जुळून येईल पण कोणती मुलगी तयार होईल? हा तर यक्षप्रश्न होता. अभि त्याचा निर्णय सांगून आरामात खोलीत शिरला. 

    आज सोमवार होता आणि आमचा मुलगी शोधण्याच्या मोहिमेचा पहिलाच दिवस. मी माझे काम आटोपून मनस्वी काकू सोबत त्यांच्या पसंतीच्या सहा जणी निवडल्या आणि प्रत्येक मुलीला एक दिवसाआड अशा पद्धतीने बोलवण्याचे ठरविले. सगळ्या मुली जवळपासच राहणाऱ्या असल्याने सगळ्या आपल्या आईवडिलांसोबत आल्या. अभिचे आईवडील मुलीच्या पालकांसोबत.बोलत असताना मी त्या पहिल्या मुलीला कोमलला घेऊन अनघाच्या खोलीत गेले. कोमल जरा लाजतच होती. मी तिला अभिनवच्या अटीबद्यल सांगितले. माझे, अनघा आणि अभिच्या आईवडिलांचे आधीच ठरले होते की, आधी मुलीला हे सगळ्या समजावून सांगायचे आणि नंतरच तिच्या आईवडिलांना लिव्ह इन बद्यल सांगायचे. माझे आणि कोमलचे बोलून झाले आणि अभि ऑफिसमधून हाफ डे घेतला आला. थोड्या वेळाने मी कोमलची ओळख त्याला करून दिली आणि दोघांना अनघाच्या खोलीत बसवून बाहेर आले. बस एकदा कोमल आणि अभिचे मत जुळले की आमची योजना सुरू होणार होती. मुली पाहत असतानाच आम्ही चौघांनी( मी, अनघा आणि अभिचे आईवडीलांनी) एक छान यशस्वी होणारा प्लॅन बनविला होता. तो म्हणजे:

१. अभिच्या पसंतीचीच मुलगी ठरवियची लिव्ह इन साठी - कारण आम्ही ठरविले तर तो लगेच आवडली नाही बोलून मोकळा झाला असता.

२. त्या मुलीला जास्तीत जास्त अभिसोबत वेळ घालवायला देणे - तेवढीच जास्त ओढ निर्माण होईना

३. वेळ मिळेल तसा त्या मुलीला अभिच्या आवडीनिवडी सांगणे- हे काम आई आणि अनघा करणार होते

४. शक्य तितके त्यांच्या मध्ये वाद होणार नाही याकडे लक्ष देणे- अभिला भांडण करणे आवडत नव्हते

५. दोघांना एकत्र बाहेर जायला देणे- अभिला बाहेर फिरणे आवडत होते

    मी मस्त अभिच्या लग्नात खरेदी करायच्या सामानाची लिस्ट फोनमध्ये करत होते आणि मला काकांनी बाहेर बोलवले. घरात फक्त काका-काकू होते. कोमल आणि तिचे आईवडील गेले होते. काकूंचा चेहरा पडला होता. काका फक्त एवढे बोलले की, मुलीने नकार दिला. मला थोडे वाईट वाटले पण अजून पाचजणी होत्याच म्हणून मी धीर करून दुसऱ्या मुलीला ठरल्याप्रमाणे बोलावले. ती मुलगी मात्र मैत्रीणीला घेऊन आली कारण तिचे आईवडील गावी राहत होते आणि ती इथे कामासाठी तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. आजपण अभि हाफ डे ने घरी आला होता. मी जसे कोमलला सांगितले तसेच ह्या मुलीला सांगून अभिसोबत बोलायला पाठविले. मी चक्क देवाला बोलत होते की, ही तरी मुलगी हो बोलू दे. पण झाले उलटच. अर्धा तास झाला आणि ती मुलगी काही न बोलता रागाने आपल्या मैत्रिणीला घेऊन गेली. मला त्या मुलीचे उत्तर कळले होते पण मी पुन्हा एकदा तिला फोन लावला तर तिने माझा फोन उचलला नाही. बाकीच्या चारजणींबाबत असेच झाले. त्या प्रत्येकजणी आपल्याला पालकांसोबत घरी आल्या. मी त्यांना सगळे सांगितले पण अभिसोबत बोलून झाले की, सगळ्या निघालो जायच्या. फोन तर सगळयांनी बंदच करून ठेवले होते. अभिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. ना सुखद ना दुःखद. अभिच्या आईने अभिसमोर शस्र ठेवण्याचा म्हणजे रणांगण सोडण्याचा निर्णय घेतला. मी मात्र ठाम होते. काकू अभिला सांगणार तोच मी त्यांना थांबविले आणि अभिला अजून एक मुलगी पाहून घ्यायला सांगितले. गंमत म्हणजे आम्ही ज्या सहाजणी निवडल्या होत्या त्यांच्या नकारानंतर तिथून पुढे काहीच निरोप आला नव्हता. मग आता नवीन कोणती मुलगी? अभि आणि सगळे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. " उद्या तू त्या मुलीला बघ.जर ही नाही पसंत पडली तर आम्ही तुला लग्नासाठी नाही विचारणार," मी अभिनवला सांगितले. मी आणि अनघा झोपायला गेलो. सकाळी आम्ही सगळे लवकरच उठलो. आज शनिवार असल्याने अभि पण घरीच होता. दाराची बेल वाजली आणि एक सुंदर अशी मुलगी घरात आली. मी तिची सगळयांना ओळख करून दिली आणि अभिला व तिला हॉलमध्ये बसवून आम्ही चौघे अनघाच्या खोलीत बसलो. ही मुलगी होती माझी ऑफिसची मैत्रीण माल्विका. तिला मुलांच्या वागण्याचा जरा जास्त अनुभव असल्याने नेमके सगळ्या मुलींच्या नकाराचे कारण काय हे शोधून काढण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतलं होतं. माझ्या प्लॅननुसार ती पण इतर मुलींसारखे अभिसोबत बोलणार होती आणि माझ्याशी काही न बोलता मला सायंकाळी भेटून खरी गोष्ट काय आहे ते सांगणार होती. सायंकाळी मी आणि अनघा तिला गार्डनमध्ये भेटायला गेलो. माल्विकाचा साखरपुडा आधीच झाला होता पण मी बोलले म्हणून ती अभिला भेटायला आली होती. आम्ही तिघीजणी बसलो आणि तिने सगळे सांगायला सुरुवात केली. " अभिनव स्वभावाने छान आहे. अगदी जसे तू सांगितले तसा आहे तो. लिव्ह इन बद्यल त्याने मला सांगितले. अगदी मला हवे तसे वागण्याची मुभा पण दिली. फक्त अट एवढीच होती की, लिव्ह इनमध्ये असताना जर दुसरी मुलगी आवडत असेल तर मी त्याला रोखायचे नाही." अनघा आणि मी तिला पाहत बसलो. मुलींच्या नकार देण्याचे कारण समजले होते आम्हाला. मी माल्विकाला भेटून अनघासोबत घरी आले. अभिनवच्या आईला आता त्याच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले होते. अशी अट घातली तर कोणती मुलगी होकार देईल. आम्ही तर सगळ्यांनी जी मुलगी लिव्ह इनसाठी तयार होईल तिच्या सोबत अभिचे लग्न लावून देण्याचे ठरविले होते. अभिनवच्या बाबांनी त्याला हॉलमध्ये बोलावले आणि या सगळ्या गोष्टींबद्यल विचारले. मी अनघाच्या खोलीत जाऊन बसले कारण आता वाद होणार असे वाटत होते मला. एक तास झाला आणि अभिनवच्या आईने मला बाहेर येण्यास सांगितले. कोणीच काही बोलत नव्हते. " अभि, तू असे केले तर कोणती मुलगी तुला होकार देईल? काकूंनी अभिनवला विचारले. अभिनवने खूप वेळ विचार केला आणि बोलला, "आहे एक अशी मुलगी जिच्यासोबत मी लिव्ह इनमध्ये राहायला तयार आहे." अभिनवने आम्हाला आनंदाचा धक्का दिला होता. "कोण आहे ती?, आम्ही सगळे एकाच वेळी बोललो.

क्रमशः

लग्नाची वरात (भाग दोन)

    इतके दिवस जे ऐकायला आमचे कान आतुर होते ती गोष्टी अखेर अभिनवने बोलून दाखवली होती. काकू तर वाटच बघत होत्या त्या क्षणाची. अभिनव उठला आणि मी बसले होते त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. "बोल ना दादा, कोण आहे ती मुलगी? कुठे राहते? नाव काय? कधी भेटला तुम्ही?," अनघाने एकाच वेळी त्याला खूप प्रश्न विचारले होते. अभिनव माझ्याकडे वळला आणि मला बघून बोलला," ही आहे ती मुलगी". मला तर हसू आवरत नव्हते. मी शांत बसले आणि अभिनवला विचारले," हे बघ, अभि मस्करी पुरे झाली. आता नीट सांग कोण आहे ती मुलगी?" अभिनवने पुन्हा माझ्याकडे बोट दाखवून उत्तर दिले. अनघाने तर मला येऊन मिठीच मारली. "अभि, तुला माहिती आहे तू काय बोलतो ते? मी गंभीरपणे बोलते आणि तू अशी थट्टा करतो," मी थोडे चिडून बोलले. माझा स्वर अभिने ओळखला आणि बोलला," लतिका, मी पण मस्करी नाही करत आहे. मला खरचं वाटतं की, आपण लिव्ह इन मध्ये राहूया. तशी हरकत काय आहे? तू मला नीट ओळखतेस आणि घरातील सगळ्यांना तर तू माहीती आहेस. मग त्रास काय आहे यामध्ये?" मी मनातल्या मनात आमच्या बनवलेल्या नियमावलीत असणारे नियम आठवत होते. नेमके आम्ही सगळ्यांनी जी मुलगी लिव्ह इन मध्ये राहिल तिच्याशी अभिनवचे सूत जुळवायचे असे ठरविले होते. आता मला कुठे कल्पना होती की, ती मुलगी दुसरी कोणी नसून मीच असेन. " काय झालं, लतिका?," अभिनवने विचारले." तुला असे वाटते का की, लिव्ह इन मध्ये राहत असताना मी आणि तू??? एकत्र?? मी अभिनवला गप्प बसायला सांगितले. काकू माझ्याकडे आल्या आणि बोलल्या," बाळा, काय हरकत आहे? एकच महिन्याचा प्रश्न आहे ना? तुला काही अडचण आहे का?" मी काकूंना घेऊन अनघाच्या खोलीत गेले आणि दार घट्ट बंद केले. " काकू, तुम्हाला माहित आहे ना,की आपण काय ठरविले होते ते? तरीही तुम्हाला अभिनवचा निर्णय योग्य वाटतो? जर अभिनवला मी आवडले तर तो माझ्याशी लग्न करेल. तुम्हाला चालेल का?," मी काकूंना बोलले. काकू थोडा वेळ विचार करू लागल्या आणि बोलल्या," लतिका, तुला जर असे वाटते तर राहू दे. मी तुझ्यावर जबरदस्तीने माझ्या मुलासोबत राहायला सांगू शकत नाही. पण एवढी शाश्वती देऊ शकते की, तो तुला त्या एका महिन्यात कोणत्याही प्रकारचा स्पर्श करणार नाही. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. वाटल्यास या एका महिन्यात मी दुसरी मुलगी शोधून ठेवते. जर अभिनवला तू आवडली नाही तर त्या मुलीची आणि अभिनवची मी भेट घालून देईन." मी त्या खोलीतून बाहेर पडले आणि हॉलमध्ये आले. अनघा आणि काका बसले होते. अभिनव त्याच्या खोलीत जाऊन बसला होता. मी अभिनवच्या खोलीत गेले आणि त्याला माझा निर्णय सांगितला. अभि पाठमोरा पलंगावर बसला होता. मी हळूच जाऊन त्याच्या बाजूला बसले आणि बोलले," अभि, मी तयार आहे तुझ्या सोबत लिव्ह इनमध्ये राहायला." अभि माझ्या कडे एकटक बघत होता. " तू काय बोललीस?पुन्हा बोल," अभि म्हणाला. " Mr. Abhinav,I am read for the live in," मी थोडे हसूनच उत्तर दिले. " खरं बोलते तू," अभिनवने आश्चर्याने विचारले. "Yes, Handsome," मी उत्तरले. आम्ही दोघेही बाहेर आलो आणि आमचा निर्णय सांगितला. पण अजून एक गोष्ट अशी की, माझ्या घरी हे सांगायचे होते. मी आईपप्पाना हे सगळे फोनवर कळविले आणि अभिच्या घरी एकदा त्याच्या आईवडीलांना भेटायला देखील बोलविले. आम्हा दोघांच्या आईवडीलांनी बाहेर जाऊन एक गुप्त चर्चा केली. मला, अभिला आणि अनघाला यापासून लांबच ठेवले होते. दोन दिवसांनी माझे आणि अभिचे लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाले. मला आईने येताना अजून जास्तीचे कपडे आणून दिले होते म्हणून मी आनंदात होते. मे महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांसाठी मी माझ्या घरी गेले कारण नंतर जुलै महिन्यातच मी आईबाबांना भेटणार होते. ते चार दिवस मसाला घरी मजेत घालवले होते मी. 

    आज १ जून होता. मी अभिच्या घरी आले. सकाळीच आठ वाजता तिथे गेले. काकू सहा वाजता उठून सगळं आवरून घेत असल्याने मला घरात पाहून त्यांनी आधी मला फ्रेश झाल्यावर गरमागरम पोहे दिले. अभि,अनघा आणि काका त्यांच्या वेळेनुसार निघून गेले होते. घरात आम्ही दोघीच होतो. माझे सामान अनघाने अभिच्या खोलीत व्यवस्थित ठेवले होते. मी माझ्या ऑफिसच्या मुंबई ब्रांचमध्ये जॉईन झाले. अभिला माझे ऑफिस सुटण्याची वेळ माहीत असल्याने तो बरोबर पाच वाजता माझ्या ऑफिसच्या बाहेर माझी वाट बघत होता. मी थोडी दमले होते म्हणून अभि मला एका आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेला व तिथे माझ्या आवडीचे बटरस्कॉच आईस्क्रीम खाऊ घातले. छान गप्पा मारत नंतर आम्ही अभिच्या कारने घरी परतलो. मनस्वी काकूने छान पुलाव, श्रीखंड-पुरीचा बेत केला होता. माझी रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करण्याची सवय अभिला माहिती असल्याने त्याने माझी पर्स कुठेतरी लपवून ठेवली होती. मग आता काय? झोपावेच लागणार होते. मी अभिच्या रूममध्ये गेले तर अभि आधीच जमिनीवर अंथरुणावर झोपला होता. मी मनातल्या मनात हसत होते. रुमचे दार बंद करून मी पलंगावर डोळे मिटून झोपले. थोडया वेळाने मला कसला तरी आवाज आला आणि मी बघितले तर अभिने खोलीचे दार उघडले होते व तो पुन्हा येऊन झोपला होता. हे लिव्ह इन रिलेशनशिप खरंतर काहीतरी नवीन वळण घेणार होते. सकाळी अभिनवच्या फोनचा पाचचा अलार्म वाजला आणि आम्ही दोघेही तो बंद करायला उठलो. बिच्चारा अभि मला कितीतरी वेळा सॉरी बोलत होता आणि शेवटी फोन ऑफ करून झोपला. सात वाजता मी फ्रेश होऊन बसले. मनस्वी काकूने आज उपमा बनवला होता. जेव्हा त्यांनी मला पाहिले त्या तशाच माझ्या जवळ आल्या. "काय गं लतिका, झोप झाली का तुझी?,"काकूंनी विचारले. " हो काकू," मी उत्तरले. " अगं ही तुझी पर्स.काल सायंकाळी जेव्हा तू फ्रेश व्हायला गेली तेव्हा अभिने मला ही माझ्या खोलीत ठेवायला सांगितली आणि तुला सकाळी उठल्यावर पुन्हा द्यायला पण सांगून ठेवले," असे म्हणत काकूंनी मला पर्स दिली. थोड्या वेळाने काका, अनघा नाश्ता करायला आले. अनघाने तर मॉर्निंग किस करून मिठी मारली. असे करत असताना अभि तिथे आला आणि त्याने हे सगळे पाहिले. त्याच्या हावभावाने तो थोडा चिडला होता ते समजले होते आम्हा सगळयांना. मी स्वतः मुद्यामच अभिला प्लेटमध्ये उपमा वाढून दिला. त्याने फक्त मला पाहिले आणि काही न बोलता सगळा खाल्ला व आत तयारी करायला गेला. तो गेला तसेच काकू मला बोलल्या की, " लतिका, तो उपमा कधीच खात नाही. आज तू दिला आणि त्याने सगळा खाल्ला." हे ऐकून आम्ही सगळे हसू लागलो. मी पण माझे आवरायला खोलीत गेले. अभिनवने खोलीचे दार उघडले ठेवले म्हणजे तो तयार झाला होता. पण तरीही मी दारावर नॉक करून आत गेले. अभि आज फॉर्मलमध्ये खूपच छान दिसत होता. मी गंमत म्हणून त्याला उपम्याबद्यल विचारले तर तो काहीच न बोलता फक्त मला एक छान स्माईल देऊन बाहेर गेला. अनघा आणि मी एकत्र जाणार होतो पण तिला थोडे लवकर बोलवून घेतल्याने ती माझी कार घेऊन गेली होती. काका तर नाश्ता केल्यानंतर निघून गेले होते. माझी पर्स घेऊन मी खाली आले तर अभिनव अजून तिथेच उभा होता. मला पाहून त्याने कारचा दरवाजा उघडला आणि मला इशाऱ्याने बसायला सांगितले.अगदी वेळेवर मी ऑफिसमध्ये आले. आता हे नेहमीच समीकरण झाले होते. माझी कार असो वा नसो अभिनव नेहमीच मला ऑफिसमध्ये सोडायचा व घ्यायला यायचा. एकदा तर मज्जाच झाली. मला ऑफिसमध्ये अभिच्या वडीलांनी फोन केला व काकूंसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायला माझी मदत मागितली. अनघाला हॉस्पिटलमध्ये थांबावे लागणार असल्याने त्यांनी मलाच फोन केला. मी तसे सांगयला अभिनवला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. मी आणि काका शेवटी शॉपिंगला गेलो. अभिनव एक तास ऑफिसच्या बाहेर थांबला व नंतर घरी आला. जसा तो घरी आला आणि मला पाहिले तसाच धावत तो माझ्या कडे आला व मला घट्ट मिठी मारून रडला. अनघा, काका-काकू फक्त बघत होते आम्हाला. मी अभिनवचे डोळे पुसले आणि त्याला फ्रेश व्हायला सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या हावभावाने तो घाबरला होता हे समजले होते आम्हा चौघांना. अभिनवला मी पहिल्यांदाच असे रडताना पाहिले जाते. मी रात्री जेवून झाल्यावर अभिला स्वतः हूनच मी कुठे गेले होते ते सांगितले. पण ह्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती करायची नाही असे मी मनोमनी ठरविले.दोन दिवसांनी मनस्वी काकूंचा बर्थडे होता. आम्ही तो बाहेर साजरा करणार होतो पण अनघाची वेळ तिच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यामुळे जुळत नसल्याने अखेरीस आम्ही घरीच साजरा करायचे ठरवले. शनिवार होता आणि अभि व मला सुट्टी होती. काका पम घरीच होते. आमच्या प्लॅननुसार काकूंना घराबाहेर पाठवायचे होते. अभिनवने काकांना या मोहिमेवर पाठवून त्या दोघांना दुपारी जेवून झाल्यावर बाहेर खरेदीसाठी जायला सांगितले. अनघाने सुद्धा थोडे जास्तीचे सामान सांगितले जेणेकरुन आम्हाला इथे घरी सजावट करायला वेळ मिळेल. क्रेप पेपर्स वापरून घरात सगळीकडे छान डेकोरेशन केले होते. ह्दयाच्या आकाराचे फुगे फुगवून ते लावण्याचे काम आम्ही दोघींनी केले. केकची ऑर्डर अभिनवने दिली होती. मला एक कल्पना सुचली तसे मी एका ठिकाणी फोन करून फिक्कट गुलाबी रंगाची गुलाबाची फुले व लाल रंगाच्या गुलाबांचा गुच्छ मागवून घेतला. लाल रंगाचे गुलाब काका देणार होते. आता गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्या आम्ही एका ताटात घेतल्या. सेलिब्रेशन हॉलमध्ये होणार असल्याने मी टेबलावर चढून अनघाला सोबत घेतले आणि त्या पाकळ्या व्यवस्थित पंख्याच्या प्रत्येक पातीवर ठेवल्या. अट ही होती की, जोपर्यंत केक कापला जाणार नाही तोपर्यंत पंखा कोणीच लावणार नाही. माझे काम झाले आणि मी उतरत असताना माझा थोडा तोल गेला. माझ्या धक्क्याने बिचारी अनघा सोफ्यावर जाऊन बसली आणि अभिने मला हातात पकडले. मी जेव्हा पडत होते तेव्हा घट्ट डोळे मिटून घेतले होते. पण योगायोगाने अभिनवने येऊन मला पकडले होते. मला अलगदपणे त्याने बसविले आणि भलेमोठे भाषण ऐकविले. पण त्याच्या बोलण्यात माझ्यासाठी असलेली काळजी मला जाणवली. अनघा लांब उभी राहून फक्त हसत होती. रात्री सात वाजता काका-काकू घरी आले. काकूंना आम्ही केलेले डेकोरेशन खूप आवडले. त्यानंतर केक आणून कापणार तोच पंख्याने सुंदर पाकळ्यांचा घरात वर्षाव झाला. मी काकांना हळूच गुलाबाचा गुच्छ आणून दिला आणि या सगळयांचे रेकॉर्डिंग फोनवर करून घेतले. रात्री बाहेरून जेवणाची ऑर्डर करून आम्ही खूप फोटो काढले. मनस्वी काकूंनी आम्हाला सगळ्यांना शाबासकीची थाप दिली होती. तो दिवस काकूंसाठी खूप छान रीतीने साजरा करण्यात आला होता. पण अनघाला फोन आला आणि ती एका सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली. काका-काकूंना मी झोपायला सांगितले आणि स्वयंपाकघर थोडे आवरून घेतलं. मला सोबत म्हणून अभिनव पण हॉलमध्ये बसला होता. माझे आवरून झाल्यावर आम्ही दोघेही रुममध्ये गेलो. मी आल्यापासून तो जे जमिनीवर झोपत होता ते अजूनही तसेच होते. मी त्याला बोलले होते की, वाटल्यास एक दिवसाआड तू पलंगावर आणि मी जमिनीवर झोपेन पण तो काही ऐकतच नव्हता. रूमचे दार हलकेसे उघडे ठेवून अभिनव लाईट ऑफ करून झोपी गेला.

क्रमशः

लग्नाची वरात (भाग तीन)

    आज मी काकूंना उठून मदत करायला गेले. तसे पण काकू मला काही काम करायला देत नसत. पण आज रविवार होता आणि मला सुट्टी पण होती मग काय अभिनव आणि काका आले व मला काकू सोबत बसवून त्या दोघांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. सकाळचे आठ वाजले होते व दाराची बेल वाजली. मी दार उघडून पाहिले तर, अनघा दमून आली होती. तिचे सामान घेऊन मी तिला खोलीत जायला सांगितले. इथे हे दोघेजण इडली आणि चटणी बनवून आमची वाट बघत उभे होते. जशी अनघा नाश्ता करायला आली मी अभिनवला आधी तिला वाढायला सांगितले. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला सुरुवात केली. आज दिवसभर अनघाला आम्ही आराम करायला दिला. मला येऊन दोन आठवडे झाले होते. आज थोडे काकूंनाही वेगळेपण म्हणून या हेतूने मी काकांना विचारून जवळच्या हॉटेलमध्ये पाच जणांसाठी जेवणाचे टेबल बुक करून घेतले. सायंकाळी आम्ही सगळेजण छान पैकी तयार होऊन जेवायला हॉटेलमध्ये गेलो. जेवण झाल्यानंतर माझ्या कडून मी सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट पण दिली. नऊ वाजता तिथून निघून बाहेर आलो असता अनघाने सगळ्यांसोबत एक फोटो काढायचा हट्ट धरला. मग पंधरा मिनिटे आम्ही फोटोच काढत होतो. अनघाने मुद्याम माझा आणि अभिनवचा एकत्रितपणे फोटो काढून घेतला. दहा वाजता आम्ही सगळे घरी आलो आणि फ्रेश होऊन मस्त झोपलो. काकूंना आज बाहेर गेल्यामुळे मस्त वाटत होते. तसे त्यांनी मला घरी आल्यावर सांगितले सुद्धा. 

    सकाळी मग नेहमीप्रमाणे मी उठून आज काकूंच्या आवडीचे थालीपीठ बनविले. अभिनवने जेव्हा मला स्वयंपाक घरात पाहिले तेव्हा तो पाहतच राहिला. काका खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी आभिनवला इशाऱ्याने घडी दाखवून तयार व्हायला सांगितले. आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. अभिनवला आज ऑफिसमध्ये जायला थोडा वेळ होता मग काकांनी मला ऑफिसमध्ये सोडले आणि ते गेले. दिवसभर मी मिटींगमध्ये असल्याने आज थोडा उशीरच झाला मला लंच करायला. त्यात अजून भर पडली ती परदेशी पाहुण्यांच्या येण्याची. मी सायंकाळी निघत असताना ते परदेशी पाहुणे नेमके आले मिटींगसाठी. माझा स्टाफ माझ्या सोबत होता पण मिटींग जास्त वेळ असल्यामुळे रात्र कधी झाली ते समजले नाही. मला अगदी घरी कळवायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. मी पहिल्यांदाच नऊ वाजता ऑफिसमधून निघाले होते. माझ्या ऑफिसची बिल्डिंग ही एका बाजूला असल्याने रस्ता पूर्ण सामसूम होता. मी फोन पाहिला तर नेटवर्क केव्हाच गेले होते. आता तर फोन करता येणार नव्हता पण कोणीही मला फोन करू शकणार पण नव्हते. मी रस्त्यावरून चालत होते. थोड्या अंतरावर बसस्थानक असल्याने मला काळजी वाटत नव्हती. मला बसच्या वेळेचा अंदाज नव्हता. मी तिथे उभी होते तेव्हा एका माणसाने मला लिफ्ट ऑफर केली पण मला तो माणूस ठीक वाटला नाही म्हणून मी दुर्लक्ष केले. अर्धा तास उलटून गेला होता पण अजून बस आली नव्हती. काही अंतरावर मला चार जण माझ्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या हालचालीने ते सगळे प्यायलेले दिसत होते. मी गप्प बसच्या दिशेने पाहत होते तोच त्यातील एकाने मला पाहिले आणि इतर तिघांना थांबविले. ते सगळे काहीतरी बडबडत होते पण मला काहीच समजले नाही. मी लक्ष देत नाही हे पाहून त्यातील एक जण माझ्या जवळ आला तशी मी मागे सरकले. तो पुन्हा जवळ येणार तोच त्याच्या तोंडावर एक चपराक बसली. मी वळून पाहिले तर अभिनव आणि काका तिथे आले होते. अभिने ज्याला मारले तो खाली पडला आणि बाकीचे तिघेजण अभिला मारायला धावले. काकांनी मला कारची किल्ली देऊन बसायला सांगितले. अभिने मला इशाऱ्याने थांबवून जो माझ्या जवळ आला होता त्याला थोबाडीत मारायला सांगितले. मी आधीच त्या चौघांना बघून चिडले होते मग काय माझी हाय हिल्सची सँडल काढली आणि त्याला मी पण मारले. बाकी सगळ्यांना अभिने खूप मारून नंतर पोलिसांच्या हवाली केले. मी कारमध्ये बसणार असताना काकांनी मला मागे बसायला सांगितले आणि अभिनवला माझ्या शेजारी बसवले. ऑफिसचे काम आणि परत हा प्रसंग यामुळे मी दमले होते. कारमध्ये बसले असताना मला झोप कधी लागली कळलेच नाही. अभिने पण मला काही उठवले नव्हते. घरी गेल्यावर पण अभिने मला जेव्हा उचलले तेव्हा कुठे मला जाग आली. मी जेवले आणि झोपले पण. अभि आणि काकांनी सगळे काही अनघा आणि काकूंना सांगितले. तेव्हा पासून काकूंनी मला रात्री उशिरापर्यंत थांबायचे नाही असे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बजावले. 

    अभिनव दिवसेंदिवस मनाने माझ्या जवळ येत होता. मी सोडून इतरांच्याही लक्षात ही गोष्ट आली होती. मी फक्त माझे काम आणि घर यामध्ये लक्ष देत होते. सगळेजण आम्ही दोघे वेळ कसा एकत्र घालवू याची खात्री करत होते. त्यासाठी कधीतरी लंचसाठी, शॉपिंगसाठी आम्ही दोघेजण बाहेर जायचो. दिवस कापूरासारखे उडून जात होते. पण या सर्वांत एक भयानक गोष्ट घडली जी आम्हा सगळ्यांना अनपेक्षित होती. मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी येत होते पण मला माझी मैत्रीण शमिका भेटली. ती अभिनवच्या घराजवळ राहत असल्याने मी अभिच्या घरी जाऊन काकूंनी सांगून शमिकाच्या घरी गप्पा मारत बसले. मी अभिला तसा वॉईस मैसेज पाठवला पण त्याचा फोन ऑफिसमध्येच राहिला. त्यामुळे त्याला मी कुठे आहे ते समजले नाही. अभि मला न्यायला येत होता पण त्याच्या समोर चारजण येऊन उभे राहिले. ते चारजण अजून कोणी नसून अभिने ज्यांना मारले तेच होते. अभिनव कारमधून बाहेर आला व त्यांना जायला सांगितले पण ते कुठे ऐकणार होते? मी शमिकासोबत असताना काकूंनी मला अभि घरी आला नसल्याचे कळविले. मी आणि शमिका अभिनवला बघायला माझी कार घेऊन निघालो. वाटेतच अनघाची भेट झाली आणि ती पण आमच्या सोबत आली व तसे तिने काकूंना फोन करून सांगून टाकले. आभिनवच्या ऑफिसच्या थोड्याच अंतरावर आम्ही तिघींनी अभिला चारजणांसोबत मारामारी करताना बघितले. मी जवळच कार लावली आणि आम्ही तिघीजणी अभिच्या दिशेने धावलो. मी आणि शमिकाने दोन जणांना पकडून खूप मारले. अनघाने पण तिच्या कराटे किकने एकाला धूळ चाखली. नंतर आम्ही तिघी अभिकडे गेलो आणि त्या चौथ्या इसमाला बेदम धुतले. काही वेळाने तिथे तिकडचे पोलिस अधीक्षक आले व त्या चौघांना घेऊन अटक करून आम्हाला घरी सुखरूप सोडले. अभिनवला मी मागे कारमध्ये बसवले आणि आम्ही तिघीजणी आलो. शमिका पण थोडा वेळ घरी बसली आणि तिच्या घरी गेली. काकूंनी अनघाला आधी अभिनवची मलमपट्टी करायला सांगितली. अभिनवला मी आणि अनघाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो. मी अनघाला फर्स्ट एड किट आणून दिली. अभिच्या चेहऱ्यावर थोडे खरचटले होते आणि खांद्याला दुखापत झाली होती. मी किट देऊन निघत असताना अभिने एका हाताने माझा हात घट्ट पकडला. मी फक्त त्याला पाहत राहिले.अनघा आमच्या दोघांमध्ये होणाऱ्या इशाऱ्याला समजली होती आणि मनातच हसत होती. अभिला काकूंनी खोलीत नेऊन जेवण दिले. आज मात्र मी अभिनवला पलंगावर झोपायला सांगून मी खाली जमिनीवर अंथरूण घाला झोपी गेले. बाहेर अनघा काका आणि काकूंसोबत काहीतरी बोलत होती. पण मी अंथरुणावर जशी विसावले लगेच झोप लागली. सकाळी अभिनव उठून बसला होता. मी बाहेर नाश्ता बनवून त्याला खोलीत पाहायला आले असता त्याला खांदा दुखत असल्याने टी शर्ट काढायला जमत नव्हते. माझ्या मागोमाग काकू तिथे आल्या आणि त्यांनी त्याला मदत केली व सोबत तीन दिवस घरी थांबायचे असे त्याला ठाम सांगितले. मी माझ्या ऑफिसला काका आणि अनघासोबत निघून गेले. सायंकाळी आम्ही तिघेही एकत्र आलो. अनघाला पण जास्त कामाचा ताण नसल्याने ती पण आमच्या सोबत घरी आली होती. रात्री जेवण करून झाल्यावर काकूंनी आम्हा सगळ्यांना रात्रीच्या वेळी ऑफिसमध्ये न थांबायची ताकीद दिली. अनघाला ते थोडे कठीण होते म्हणून काकूंनी तिला गरज असल्यास हॉस्पिटलमध्ये थांबायला सुचविले. अभिनवचा फोन त्याच्या ऑफिसमधील एका मित्राने घरी आणून दिला होता. 

    अभिनवला काही घरी राहायला जमत नव्हते म्हणून तो अनघाला घेऊन जाण्याच्या कारणाने मला पण नेण्यासाठी येत होता. त्याच्या खांद्याची दुखापत बऱ्यापैकी ठीक झाली होती. तीन दिवस होऊन गेले होते. अभिनव आता ऑफिसला पुन्हा जाऊ लागला होता. तीन आठवडे कसे गेले काही समजलेच नाही. हळूहळू आमचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मुदत संपत आली होती.

क्रमशः

लग्नाची वरात (भाग चार)

    जून महिन्यात हवा तसा पाऊस काही झाला नसल्याने मी आणि अनघा कधीतरीच छत्री घेऊन जात होतो. तसे पण नेहमी अभि किंवा काका आम्हाला पिक अँड ड्राप करत असत मग पाऊस आणि पावसात भिजण्याचा प्रश्न येतच नसायचा. पण चौथ्या आठवड्यात न जाणो काय झाले पावसाने आक्रमक पद्धतीने आगमन केले होते. एकतर जूनच्या सुरवातीच्या दिवसात थोडाच पाऊस झाल्याने आता मात्र काही करून हटायचे नाही असे ठरवल्यासारखे वाटत होते. मी मात्र काकांसोबत कारने वेळेवर घरातून निघायचे आणि वेळेतच घरी येत होते. एकदा अशाच पावसात आम्ही सायंकाळी मस्त गरमागरम चहा आणि भजीचा बेत आखला. अभिची आई चहा करत असतानाच मी मस्त कांदाभजी तळत होते. चव घेण्याच्या घाईत अभिने तर पाच सहा गरम भज्या चक्क फस्त केल्या होत्या. त्यात अनघाने गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. माझा या घरातील वावर यामुळे हे घर खूपच आनंदी झाले होते असे कितीतरी वेळा अनघा व काकू मला सांगत होत्या. आम्ही पाचजण होतो. अनघाने मला व अभिच्या बाबांना घेऊन टीम बनवली. बिचाऱ्या अभिला मी त्याच्या विरुद्ध असल्याने थोडे वाईट वाटले. अभि आणि काकू अशी टीम झाली. खर तर काकूंना गाणी पाठ असल्याने अभिची टीम जिंकणार असे आधीच निश्चित झाले होते. भजी खात आम्ही वेगवेगळी आणि विविध सुरात गाणी बोलत होतो. छान दीड तास असाच गेला. शेवट एका सुंदर गाण्याने करायचा म्हणून जेव्हा अभिनवला "म" अक्षर मिळाले तेव्हा त्याने " साजन" चित्रपटात असलेले " मेरा दिल भी कितना पागल है" हे गाणे गायला सुरुवात केली. काकांनी आपला हात पुढे करून काकूंना नाचायला बोलवले. मी आणि अनघा पण छान नाचत होतो तोच तिने नकळत माझा हात अभिच्या हातात दिला व आम्ही दोघेही एकत्र कपल डांस करू लागलो. गाणं संपले तरीही आम्ही नाचत होतो आणि हे पाहून काका-काकू व अनघा आम्हाला बघून हसत होते. मी अभिनवकडून वेगळी होऊन खोलीत गेले. त्याचे गाणं हे नकळत मला त्याच्या प्रेमाची कबुली देऊन गेले होते. 

    सकाळी मी ऑफिसमध्ये जाऊन माझी नेहमीची कामे पूर्ण करत बसले होते. काही दिवसांनी माझे मुंबईत असलेले काम पूर्ण होणार होते आणि मला पुन्हा नाशिकला जायचे असल्याने मी केलेल्या कामांवर एक नजर टाकत होते. सायंकाळी काकांना काही काम आल्याने अभिनव मला घ्यायला आला होता. आज अनघा पण होती आमच्या सोबत. अनघाला कधीतरीच हॉस्पिटलमधून लवकर निघायला मिळत असल्याने आमच्या दोघींना खूप कमी वेळ बोलायला मिळायचा. ती आज पण मागच्या सीटवर मुद्यामच बसली होती. अभिनवने कारचे दार उघडून मला बसायला सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. मी पण हसूनच बसले. बाहेर छान ढग आकाशात दाटून आले होते. पक्षी आपापल्या घरी जात होते. त्यांना पाहतच एक विचार माझ्या मनात आला. " मी पण असेच एकदा माझ्या घरी निघून जाईन. काका-काकूंना, अनघा सारख्या गोड मुलीला आणि अभिनवला या सर्वांना सोडून मी माझ्या घरी परतणार होते पण खूप साऱ्या आठवणी आणि गोड क्षण हे माझ्या सोबत असणार होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असूनही अभिनवने कधी माझ्या जवळ येण्याचा विचार केला नव्हता अगदी कधी अशी अपेक्षासुद्धा ठेवली नव्हती. मग मी इथून गेल्यानंतर काय होईल अभिचे?" माझ्या मनात एवढे सगळे प्रश्न निर्माण झाले होते पण एकाचेही उत्तर मला सापडत नव्हते. वातावरण थंड होते म्हणून अभिनवने एसी बंद ठेवून कारची काच थोडी खाली केली होती. मंद वारा वाहत होता आणि एका नव्या नात्याची,भावनेची जाणीव मला करून देत होता. अभिनवने गाडी एका बाजूला थांबवली आणि बाहेर गेला. अनघा माझ्या कडे पाहून फक्त हसतच होती. बऱ्याच वेळाने अभिनव आला ते पण मस्त भाजलेले तिखट-आंबट मक्याचे कणीस घेऊन. अभिनवने आधी कणीस खाल्ले आणि नंतर आम्ही घरी जायच्या रस्त्याला वळलो. मी आणि अनघा गप्पा मारत कणीस खात असताना खूप विनोद करत होतो. मी हसत असताना मला ठसका लागला आणि इथे अभिने गाडी थांबवली. मला त्याने त्याच्या जवळची पाण्याची बाटली काढून दिली. मी हळूहळू पाणी प्यायले. मी पूर्णपणे ठीक झाल्याची खात्री करून झाली व अभिने गाडी सुरू केली. आता मी आणि अनघा काही न बोलता गप्प कणीस खात होतो. अनघाने अभिला चिडवायला मुद्याम खोकण्याचे नाटक केले. मी तिला पाणी दिले तोच अभि म्हणाला," काय ग अनघा, लक्ष कुठे तुझे? नीट बघून खा कणीस. एवढी घाई का करतेस? तुझे कणीस कोणी खाणार नाही." आतापर्यंत शांत बसलेली मी तोंड फिरवून हसत होते.घर आले तसे आम्ही दोघी बाहेर पडलो. अभिला गाडी पार्क करायची होती म्हणून अनघा माझी पर्स घेऊन घरात गेली. अभिची हातात असलेले त्याचे सामान मी हातात धरून एका बाजूला उभी होते. अभिने कार लावली आणि माझ्या जवळ येताच पाऊस सुरू झाला. माझ्या हातात खूप सामान होते आणि त्यात तो पाऊस. अनघा माझी पर्स घेऊन आधीच गेली असल्याने छत्रीसुद्धा त्यातच राहिली होती. अभिनवने त्याचा ब्लेझर काढला व माझ्या अंगावर घातला. माझ्या खांद्याला अलगदपणे धरून आम्ही घरात शिरलो. जसे आम्ही घरात गेलो सगळे जण आम्हाला बघतच बसले. अभिनव फ्रेश व्हायला आत गेला आणि सोबत माझ्या हातात असलेले सामान त्याने एका टेबलावर ठेवले. मी सुद्धा आत जाणार होते पण अभि खोलीत होता म्हणून मी अनघाच्या खोलीत जाऊन फ्रेश झाले. आजच्या पावसाने अभिच्या कुटुंबाला आमच्या नात्याची नव्याने ओळख करून दिली होती. रात्री जेवताना मी आणि अभिनव अजिबात एकमेकांना पाहत नव्हतो. वातावरण बरेच थंड झाले होते. एसी जरी बंद असला तरीही हवेत गारवा होताच. आम्ही अजूनही दार उघडे ठेवूनच झोपत होतो. अभिनव जमिनीवर झोपला असल्याने त्याला थोडी थंडी वाजत होती. मी उठून कपाट उघडले आणि माझ्या जवळ असलेली जाड चादर अभिच्या अंगावर पांघरली. आता कुठे तो शांत झोपला होता. 

    जून महिन्याचे फक्त सहा दिवस राहिले होते, त्यानंतर मी माझ्या घरी जाणार होते. मी दुपारी ऑफिसचे काम संपवून जेवत बसले होते. सहजच फोन हातात घेऊन मी बघत असताना काही फोटो पाहिले. अभिनव व त्याच्या आईबाबांसोबत काढलेले फोटो होते ते. सुट्टी असताना आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा प्रत्येक वेळी ठराविक ठिकाणी उभे राहून विविध तर्हेने काढलेले ते सगळे फोटो पाहून मला हसू आले. या गोड आठवणी मला माझ्या आयुष्यात कायम जपून ठेवायच्या होत्या. सायंकाळी मी बाहेर आले असतानाच काकूने फोन केला. त्या बोलल्या की, " आज अभिनव लवकर घरी आला आहे. काका तिथे थोड्याच वेळात येतील." मी नुसते "हो" बोलले. मी फोन ठेवला आणि समोर काका कार घेऊन आले होते. आम्ही दोघेही बसलो. अनघाला आज नाईट शिफ्ट असल्याने ती हॉस्पिटलमध्ये थांबली होती. मी घरी गेले तर घरात एक भयाण शांतता पसरली होती. अभिनवच्या आईने मला फ्रेश व्हायला सांगितले. मी जशी फ्रेश झाले काकूंनी मला अभिनवशी बोलायला सांगितले. कारण दुपारी घरी आल्यापासून तो कोणाशीही काहीच बोलला नव्हता. मी सुद्धा अनघाच्या खोलीत जाऊन फ्रेश झाले होते. मी खोलीच्या बंद उभे राहून अभिला आवाज दिली पण तो काहीही बोलला नाही. मी थोडा वेळ थांबून जेव्हा मागे फिरले तेव्हा अभिच्या खोलीचे दार उघडण्याचा आवाज आला. अभिनवने मला पाहिले आणि खोलीत जाऊन बसला. मी सुद्धा खोलीत गेले तर अभिनवने एक मोठी सुटकेस बाजूला काढून ठेवली होती सोबतच त्याच्या ऑफिसमधले काही सामान व एक लेटर पलंगावर ठेवले होते. ते लेटर त्याने माझ्या हातात दिले व तो खिडकीतून बाहेर बघू लागला. मी ते लेटर पाहिले. युएसएमध्ये असलेल्या एका नवीन प्रोजेक्टचे लेटर होते. त्यात असे लिहिले होते की," अभिनवला तिथे काही दिवस राहायला लागणार होते. तिथे राहूनच प्रेझेंटेशन देऊन त्याला ते प्रोजेक्ट मिळवायचे होते". ही तर आनंदाची बातमी होती. मी अभिला शुभेच्छा देऊन ही बातमी घरात सांगितली. एवढी मोठी संधी त्याला मिळाली होती. पण अभिच्या चेहऱ्यावर काहीच आनंदाचे भाव नव्हते कारण त्याला दुसऱ्याच दिवशी निघायचे होते. अभिनवने या प्रोजेक्ट साठी खूप मेहनत घेतली होती आणि आज तो क्षण त्याच्या आयुष्यात येऊन थांबला होता. ऑफिसमध्ये त्याने या प्रोजेक्टसाठी काही दिवस मुदत मागितली अगदी त्याच्या असिस्टंटला पाठवण्याचीही तयारी केली पण शेवटी अभिनवला जाणेच भाग होते. अभिने त्याचे सामान रात्री जेवून झाल्यावर सुटकेसमध्ये भरले होते. प्रोजेक्टची सगळी माहिती, काही फाईल्स तो आजच घरी घेऊन आला होता. काही दिवसांचा जरी प्रश्न असला तरीही त्या दिवसांत अभिनवला कोणाची तरी कमतरता खूप भासणार होती. पहाटेची फ्लाईट असल्याने अभिनव लवकर झोपला होता. मी खोलीत झोपायला जात असताना काकू आणि काका अभिनवबद्यल बोलत होते. काकू बोलल्या," अभि याच प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत होता पण आज मात्र तो आनंदाऐवजी दुःखी दिसला मला. का बरे?. " अगं मनस्वी, अचानक एवढी जबाबदारी मिळाली म्हणून तो विचारात असेल. दुःखी कसा काय असणार?," असे बोलून काकांनी त्यांना समजावले. सोळा तासाचा प्रवास असल्याने अभिला दुसऱ्या दिवशी तिथे कंपनीत हजर व्हायचे होते. पाच-सहा दिवसाचा अंदाज आम्ही बांधला होता. पहाटे अभिनव निघून गेला. मी मात्र घरात अनघा नसल्याने तिच्याच खोलीत झोपले होते जेणेकरुन अभिनवला तयार व्हायला त्रास नको. तरीही निघताना अभिने मला झोपेत पाहिले व मला न उठवता निघून गेला. तो तिथे दुपारी साडे बारा वाजता पोहोचला व तेव्हा इथे रात्रीचे दहा वाजत होते. त्याने काकांना फोन करून सुखरूप पोहोचल्याचे कळविले. आज पंचवीस तारीख होती. अजून पाच दिवस शिल्लक होते. अनघा आज सकाळी आल्यानंतर घरी आली तेव्हा तिला अभिनवबद्यल समजले होते. आमचा नित्यक्रम सुरू होता. घर ते ऑफिस आणि एकदा बाहेर जेवणे हे एवढेच. अभिनव पण न चुकता रात्री अकरा- बारा वाजता फोन करायचा कारण तिथे त्यावेळी दिवस असायचा. बघता-बघता पाच दिवस निघून गेले आणि अभिला तिथे अजून काही दिवस थांबायला सांगण्यात आले ते त्याचे उत्तम आणि प्रशंसनीय काम पाहून. आज तीस तारीख होती. मी रात्रीच माझे सामान व सुटकेस तयार करून ठेवले होते. सायंकाळी घरी येऊन मी सगळ्यांचा निरोप घेऊन माझ्या घरी परतले. आईने कार पाठवली असल्याने मला जास्त उशीर झाला नाही. मी घरात जात असताना एका लहान मुलाच्या धक्क्याने माझी पर्स खाली पडली. तो मुलगा आधीच लहान होता आणि चुकून असे झाल्याने तो घाबरला होता. मी त्याला काही न बोलता माझ्या घरी आले. घरी येऊन फ्रेश झाले आणि अनघाला फोन करायचा म्हणून जेव्हा माझा फोन पर्समधून काढला तेव्हा समजले की, माझा फोन बिघडला. कदाचित पर्स पडल्याने असे झाले असणार. मग काय रात्री जेवून आईबाबांसोबत बोलून झोपले मी. जोपर्यंत माझा फोन ठीक होत नाही तोपर्यंत मला कोणाशीही बोलता येणार नव्हते. मी घरात आईला सांगून तो फोन रिपेअरसाठी गैलैरीमध्ये पाठवून दिला. पण तिथे ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी तिकडचाच एक फोन मला तात्पुरती वापरायला घेतला. मला येऊन दोनच दिवस झाले आणि माझा एका ऑफिसच्या मैत्रिणीच्या लग्नाचे निमंत्रण मला आले. मी छान अशी जाळीदार नायलॉन बेबी पिंक रंगाची साडी नेसून गेले. दुपारी जेवून आणि प्रेझेंट देऊन आम्ही सगळे आपापल्या घरी आलो. मी घरी जशी आले तिथून एक मुलगी माझ्या दिशेने धावत आली. ती दुसरी कोणी नसून अनघाच होती. फक्त तीच नाहीतर काक आणि काकू पण आले होते. ते माझ्या आईबाबांसोबत बोलत बसले होते. मी खोलीत जाऊन माझ्या हातातली छोटी पर्स ठेवली आणि बाहेर हॉलमध्ये आले. अनघाला मी बसायला बोलणार तोच ती मला माझ्या घराच्या अंगणात नेऊन गेली. तिथे कोणीतरी उभे होते. मी जरा जवळ गेले तर छान रॉयल ब्लू रंगाचा ब्लेझर घालून अभिनव उभा होता. मी अनघाला बघायला मागे फिरले तर ती केव्हाची आत गेली होती. अभिनवने मला निरखून पाहिले व छान अलगद मिठी मारली. खूप वेळ आम्ही तसेच होतो कदाचित ही शांतता आमच्यासाठीच होती. काही वेळानंतर मी थोडी बाजूला झाले तर अभिने माझा हात धरला आणि सरळ मला घेऊन घरात गेला. आम्ही आता आमच्या आईबाबांसमोर उभे होतो. आम्हा दोघांचे आईवडील आणि अनघा असे आम्हाला बघत होते. अभिने मला माझ्या आईबाबांजवळ उभे केले आणि तो गुडघ्यावर बसला व एक छोट्या डबीतील अंगठी माझ्यासमोर धरून मला लग्नाची मागणी घातली. हा फक्त माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता कारण बाकीचे सगळ्यांना याची पूर्वसूचना आधीच होती. मी पण अभिनवला होकार दिला आणि त्याने ती अंगठी माझ्या रिंग फिंगरमध्ये घातली.मी त्या रात्री जेवून झाल्यावर अभिला माझ्या घरी येण्याचे कारण मुद्यामच विचारले, एक तर मी इथे येण्याच्या दोन दिवसांनी तो आला होता ते पण सहकुटुंब.तेव्हा अभि बोलला की," मी त्याच्या घरातून निघाली तेव्हा त्याने रात्रीच्या दहा वाजता फोन केला पण जेव्हा मी तिथे नाही हे समजले तेव्हा त्याला मी न कळवता गेले म्हणून वाईट वाटले. त्यानंतर मला फोन केला पण माझा फोन बंद होता. त्याचवेळी सगळे काम संपवून तो तिथून निघत होता. तिकडच्या हवामानातील बदलामुळे दोन तारखेला तो तिथून निघाला.सलग तीन दिवस माझ्याशी बोलता न आल्याने तो अस्वस्थ झाला होता. घरी आल्यावर त्याने जेव्हा त्याच्या आईवडिलांना हे सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या आईबाबांकडून माझी खुशाली व माझा फोन बंद असल्याचे सांगितले. त्याच दिवशी त्यांनी माझ्या घरी येण्याचे ठरविले." शेवटी अभिनवला माझा होकार मिळालाच होता. एकमताने व योग्य तारीख पाहून आमच्या साखरपुड्याची तारीख ठरवली गेली. काही दिवसांनी मग मुहूर्त काढून आमचे लग्न सुद्धा झाले. अशा पद्धतीने अभिनवच्या लग्नाची वरात माझ्या घरी आली व मला त्याच्या घरी कायमस्वरूपी राहण्यासाठी वाजतगाजत आणि शुभाशीर्वादासह घेऊन गेली. एका नवख्या आणि सुखी कुटुंबाची सुरुवात आता झाली होती.Rate this content
Log in

Similar marathi story from Drama