Renuka Jadhav

Horror

3.2  

Renuka Jadhav

Horror

विध्वंस

विध्वंस

17 mins
802


"काय रे तुकोबा, कसा आहेस? अण्णाची हाक ऐकून पारावर बसलेला एक वयस्कर माणूस तडक उभा राहिला. गावात फिरत असताना सगळ्यांचे हालहवाल विचारण्याची ही अण्णाची नेहमीचीच सवय होती. तसे पण त्या ऐंशीच्या काळात कुठे फोन होते. अण्णा हे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांच्या घराचे दरवाजे हे सगळ्यांच्या मदतीसाठी उघडे असायचे. पूर्वजांची पुण्याई आणि ग्रामदेवता ही सदैव त्यांच्यावर प्रसन्न असायची. त्यांचा वाडादेखील कसा अगदी चिरेबंदी बांधून घेतला होता. गावातील माती म्हणजे कशी अगदी खणखणीत सोने होते. गोदावरी म्हणजे अण्णांच्या सौभाग्यवती. दोघांची जोडी म्हणजे साक्षात लक्ष्मी-नारायण.


त्यांना तीन पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या दोघांना तर मुलीची अपेक्षा होती पण ते काही शक्य झाले नाही. तिन्ही मुले अगदी वडिलांसारखीच. पुरुषोत्तम हा थोरला, अर्जुन दुसरा तर माधव हा धाकटा मुलगा होता. आपापली शिक्षणे पूर्ण करून अण्णा यांनी मुलांची लग्नदेखील योग्य वयात लावून दिली होती. घर कसे भरल्यासारखे वाटत होते. त्या घरात आपल्या मुलींना देऊन त्यांचे पालक तर धन्य झाले होते.


सकाळी गोदावरी सोबत श्लोक, गायत्री मंत्र बोलून त्या तिघीजणी आपल्या सासूची घरकामात मदत करत असत. सुनांचे निमित्त का असेना पण त्यांच्या मनात मुलगी नसल्याची जी उणीव होती ती भरून आली होती. घरी येऊन आता नेहमी ते सुनांसोबत गप्पा मारत असत. त्या मुलीदेखील अण्णा यांना आपले वडील मानू लागल्या. गावात जास्त सोयी नसल्याने पुरुषोत्तम शहरात आपल्या शिक्षणाच्या बळावर नोकरीच्या निमित्ताने गेला. आई-वडीलांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या बायकोला तिथेच ठेवून आला. योगायोग असा की, ज्या गाडीत तो बसला होता त्यातून एक उद्योगपतीदेखील प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्या दोघांची ओळख झाली आणि पुरूषोत्तमची नोकरी पक्की झाली. काही दिवस असेच निघून गेले आणि पुरूषोत्तमने तिथे सर्वांना खूश केले. आत्ताच कुठे नोकरी मिळाली असल्याने त्याने गावात पत्र पाठवून ही बातमी कळवली. मुलाची खुशाली समजताच गोदावरी यांनी देवाकडे साखर ठेवली. तिथे अर्जुन शिक्षक आणि माधव जवळच्या तालुक्यात नोकरी करू लागला. दिवाळीच्या दिवशी पुरूषोत्तम गावी परतला ते पण सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन. सगळे खूपच आनंदात होते. मालती ही पुरूषोत्तमची पत्नी होती. आता नोकरी लागल्याने त्याला सारखे ये-जा करणे शक्य नव्हते म्हणून अण्णा यांनी मालतीला त्याच्यासोबत राहायला पाठवायचा निर्णय घेतला. बिच्चारी मालती, तिला तर घर सोडवत नव्हते पण अण्णांनी तिला समजावून पाठवून दिले पुरुषोत्तमजवळ. मुंबईत त्यावेळी जास्त इमारती नसल्याने एका चाळीत पुरूषोत्तम राहत होता. जसजसा काळ बदलत गेला त्याला एका इमारतीत त्याला शोभेल अशी जागा मिळाली. सणाच्या निमित्ताने ते दोघेही गावी जात होते. लवकरच त्यांच्या घरात एक पाहुणा येणार होता. इथे गावीसुद्धा अर्जुन आणि माधव दोहोंना पुत्ररत्न लाभले होते. परंतु पहिल्यांदा पुरुषोत्तमला मुलगी झाली होती आणि नंतर इथे पुत्रप्राप्ती झाली होती याच्या मागे एक खूप मोठे कारण होते.


पुरूषोत्तमने मुलीचे बारसे शहरात करवून घेतले होते कारण त्यावेळी मुलीला व पत्नीला अचानक गावी घेऊन जाणे अशक्य होते. आईच्या शब्दाचा मान ठेवून शेवटी त्याने आपल्या सासु-सासऱ्यांना शहरात बोलावले आणि साध्या पद्धतीने आपल्या घरातील लक्ष्मीचे नामकरण ठेवले. ती दिसायला एवढी गोड आणि सुंदर होती की, तिचे नाव गोदावरीने 'ओजस्वी' ठेवायला सांगितले. त्याच वर्षी दिवाळीत मात्र पुरुषोत्तम न चुकता गावी आला. आपल्या लाडक्या पुतण्यांना बघून तो तर पार नाचू लागला होता. जरी पुरुषोत्तमने आपल्या मुलीची पत्रिका बनवली नसली तरीही त्याच्या आईने ती गावातील गुरुजींकडून बनवून घेतली होती. गुरुजींनी गोदावरी यांना घरात जन्मलेल्या बाळांच्या जन्माची रचना व त्या मागे दडलेले गुपित तोंडी सांगितले होते आणि एका कागदावर लिहूनदेखील दिले होते. बरीच वर्षे निघून गेली. गोदावरीच्या निधनानंतर अण्णा थोडे खचले होते परंतु नातवंडे, मुले आणि सुनांकडे पाहून त्यांचा दिवस जात होता. इथे पुरुषोत्तम, त्याची पत्नी आणि मुलगी असे तिघेच राहत होते. कधीतरी मालतीचे आई-वडील इथे येऊन जात. आईच्या निधनावेळी पुरुषोत्तम घरी येऊन गेला होता. त्यावेळी मुलगी लहान असल्याने त्याने दोघींना शहरातच ठेवले होते पण आईसारख्या असणाऱ्या सासूच्या अंत्यविधीला हजर न राहण्याची सल तिच्या मनात कायम राहिली होती. ओजस्वीने मात्र कधीच गाव पाहिला नव्हता. आई गेल्यानंतर पण पुरुषोत्तमने त्याच्या वडिलांना शहरात येण्यास सुचविले होते परंतु ते त्यांना पटले नाही. एकदा गावात एक नवे जोडपे आले. दोघेही दिसायला अगदी राजा-राणीसारखे होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील नदीतील खूप वेगाने वाहत होती. नवीन संसार सुरू करत असतानाच त्यांची या पावसाशी गाठ पडली होती. कसाबसा आसरा घेत ते अण्णाच्या वाड्याजवळ येऊन थांबले नाहीत. आनंद म्हणजे अर्जुनचा मुलगा तिथे जवळच बसून पावसाची मज्जा घेत असताना त्याने त्या जोडप्याला वाड्याजवळ पावसापासून वाचण्यासाठी उभे असलेले पाहिले आणि आत जाऊन हे अण्णांना सांगितले.


अण्णा तर साधेसरळ आणि निर्मळ असल्याने त्यांनी त्या दोघांना आत येण्याचे सुचविले. कसेतरी आढेवेढे घेत ते दोघे घरात आले खरे पण त्यांच्या सोबत आला एक विनाश. जसे ते घरात आले तिकडे देवाजवळचा दिवा विझून गेला. कदाचित वाऱ्याने विझला असेल असे समजून अर्जुनच्या बायकोने पुन्हा दिवा लावायचा प्रयत्न केला पण दिवा काही पेटेना. इथे अण्णा त्या जोडप्यासोबत गप्पा मारत होते. अण्णानी त्यांची माहिती विचारायला सुरुवात केली. त्याचे नाव एकनाथ होते. पाच गाव सोडून तो राहत होता. परंतु त्याच्या बायकोस तिथे करमत नसल्याने ते दोघे दुसऱ्या गावी जात होता असे बोलला. रूपा त्याची बायको जणू नक्षीकाम केलेली जिवंत मूर्तीच होती. नावासारखीच रूपवान होती ती. तीन वर्षांपासून होऊन गेली होती लग्नाला पण बाळ नव्हते त्यांना. सावित्री म्हणजे आनंदची आई बाहेर आली आणि पाहुण्यांना दोन घास खाण्यासाठी सांगितले. पावसाचा जोर काही थांबत नसल्याने एकनाथ आणि रुपाला अण्णांनी रात्र तिथेच वाड्यात थांबायला सांगितले. ते दोघेही घरात आल्यापासून सावित्रीच्या मनात घालमेल सुरू झाली होती. तिने ही बाब अर्जुनला बोलून दाखविली पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.


दुसरा दिवस उजाडला होता नवे संकट घेऊन. गावात कधी नव्हे तो एवढा पाऊस पडला होता की, सगळीकडे नासधूस झाली होती. गावातील माणसांच्या घरात पण पाणी शिरले होते. सगळेजण अण्णाकडे आले फर्याद घेऊन आणि त्यांनी पण सढळ हाताने सगळ्यांना हवी ती मदत केली. इथे एकनाथ आणि त्याची बायको घरातून निघायला लागले तोच अर्जुनने त्या दोघांना गावाची परिस्थिती समजावून सांगितली. अण्णांच्या सल्ल्याने ते दोघेही सगळे ठीक होईपर्यंत त्यांच्या वाड्याला लागून असलेल्या एका खोलीत राहू लागले. हळूहळू गावातील घरे, शेती आणि इतर व्यवसाय पूर्ववत झाले. एकनाथ पण आपल्या बायकोला घेऊन त्याच गावात दुसऱ्या एका छोट्या घरात राहू लागला होता. या सगळ्या गोष्टींमध्ये एक घटना अशी होती की, ज्या दिवशी ते जोडपे घरातून बाहेर पडले तेव्हाच कुठे वाड्यात दिवा पुन्हा आधीसारखा पेटू लागला. सावित्रीने हे कोणालाही सांगितले नाही. पाच-सहा महिने झाले असतील आणि गावातील लहान मुले अचानक बेपत्ता होऊ लागली. गावकऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध केली पण कोणत्याही मुलांचा शोध ते घेऊ शकले नाही. सगळे गावकरी शोकांतिका करू लागले. काहीजण तर देवांना गाऱ्हाणे घालू लागले. ही सगळी मुले बरोबर एक-एक महिन्याच्या अवकाशाने बेपत्ता झाल्याने इतर मुलांच्या आई मुलांना घरात बांधून ठेवू लागल्या होत्या. एक दिवस सावित्री तिची जाव कावेरी सोबत बाजारात गेली होती खरेदीसाठी. तिथे त्या दोघींनी रुपाला पाहिले. तिच्यात खूप बदल घडून आला होता. सात महिन्याची गरोदर होती ती. कावेरीने जाऊन तिची विचारपूस केली, परंतु सावित्रीला रुपाकडे पाहून काहीच वाटले नाही. वाड्यात असताना जे झाले होते ते अजूनही सावित्री विसरली नव्हती. तिच्याशी न बोलताच सावित्री पुढे निघाली व कावेरीलासुद्धा घेऊन गेली. रात्रभर सावित्रीला झोप येत नव्हती. अर्जुन व आनंद गाढ झोपेत होते. सावित्रीने तिच्या मनातील शंभर अण्णासमोर बोलून दाखवायचे ठरविले.


पहाटे नेहमीप्रमाणे उठून सावित्री आणि कावेरी आपापल्या कामाला लागल्या. अर्जुन, माधव कामाला आणि आनंद व त्याच्या चुलत भाऊ शाळेत गेले होते. दुपारी निवांत जेवून झाल्यावर सावित्री सहजपणे अण्णा सोबत बोलू लागली. बोलत असताना तिने गावातील मुलांच्या बेपत्ता होण्याबाबत विचारपूस केली. "अण्णा, एक विचारू तुम्हाला जर रागावणार नसाल तर?", सावित्री बोलली. "सावित्री, तू माझ्या पोरीसारखी आहेस. तुला का मी रागावू. मनात जे आहे ते बोल," अण्णा उत्तरले. धीर करून सावित्रीने विचारले, "अण्णा गावातील किती मुले हरवली आहेत?" थोडा विचार करून अण्णा बोलले, "आधी पाच होती व नंतर आणखी दोन म्हणजे एकूण सात."


"हे सगळे होऊन किती काळ झाला आहे?," सावित्रीने पुढचा प्रश्न विचारला. "सात महिने झाले बेटा. सगळी मुलं आपल्याच गावची. पोलिसांना पण बोलून झाले पण अजून काय पत्ता नाही त्या बिचाऱ्या मुलांचा. कोवळी मुलं आहे गं ती. देव जाणे कुठे असतील," असे बोलत अण्णांनी डोळे पुसले. सावित्रीचा चेहरा खुलला होता कारण तिने बांधलेला अंदाज अगदी खरा ठरला होता. परंतु त्या मुलांना रूपाने काय केले असणार याचा विचार करून सावित्री दुःखी झाली होती. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी ती स्वतः रूपा जिथे राहत तिथे गेली. छोटेसे टुमदार घर होते ते. आजूबाजूला आंब्याची झाडेसुद्धा होती. घराचा दरवाजा उघडा असल्याने तिने बाहेरून रूपाला आवाज दिला. काही वेळ वाट पाहून शेवटी सावित्री हताशपणे तिथून निघाली. जशी ती मागे वळली तिच्या कानावर एक आवाज आला. तो आवाज त्या घरामागून येत होता. सावित्रीने साडीचा पदर हातात घेतला आणि दबक्या पावलाने घराच्या मागे गेली. तिने हळूच पाहिले असता, तिथे दोन व्यक्ती होते. एक स्त्री आणि एक पुरुष. स्त्रीच्या हालचालीने ती ओळखीची वाटत होती. दोघांची पाठ असल्याने सावित्रीला फक्त आवाजाने ते दोघे नवरा-बायको असल्याचे समजले. ते पाहत असतानाच, सावित्रीची नजर बाजूला असलेल्या झाडाजवळ गेली. तिथे एका मुलाला बांधून ठेवले होते. सावित्रीने त्या मुलाला पाहिले, तो त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सावंतांचा नातू होता. सावित्री अजून थोडी पुढे गेली आणि तिने त्या स्त्री पाहिले आणि तिचे पाय तिथेच थंड पडले. ती स्त्री दुसरी कोणी नसून रूपा होती व तिच्या सोबत एकनाथ होता. रूपाने राखेचे रिंगण आखले होते आणि त्यात माणसाची कवटी, टोचलेले लिंबू, हाडे आणि बरेचसे काळीविद्या करताना वापरतात असे सामान होते. ती आणि एकनाथ डोळे मिटून काहीतरी बडबडत होते. झाडाला बांधलेला मुलगा अजूनही मुर्च्छित होता. काहीतरी भयानक होण्याआधी सावित्रीने प्राण एकवटून तिथून धूम ठोकली. धापा टाकत ती कशीबशी वाड्यात आली. समोर अर्जुन, माधव आणि अण्णा बोलत बसले होते. सावित्रीला असे पाहून तिघांनी तिला बसायला सांगितले पण तेवढा वेळ नव्हता. तिने त्या तिघांना तडक रूपाच्या घरामागे जायला विनवले. आतून कावेरी बाहेर आली व सावित्रीला आत घेऊन गेली.


अण्णा आपल्या मुलांसोबत सावित्रीने सांगितले तिथे गेले. त्या तिघांनी जे पाहिले ते बघून कोणीही घाबरला असता. रूपा काहीतरी अघोरी विद्या करत होती. एकनाथ पण तिला त्यात साहाय्य करत होता. जवळ असलेला सावंतांच्या नातवाला त्यांनी पाहिले आणि तिथून सोडवले. रूपा तिच्या विद्येत व्यस्त होती व एकनाथ पाठमोरा होऊन एका सुऱ्याला धार करत होता. प्रकरण समजायला काहीच विलंब झाला नसल्याने सावंतांचा नातू वाचला होता. अर्जुन पुढे गेला आणि त्याने एकनाथला धक्का मारून खाली पाडले. सुरा दुसरीकडे पडला होता. माधव त्या मुलाला घेऊन गावात गेला व सुखरूप घरी सोडून पोलिसांना घेऊन आला. तोपर्यंत अण्णा आणि अर्जुनने दोघा नवरा-बायकोला बांधून ठेवले होते. पोलिसांनी सगळे सामान फेकून दिले आणि त्या दोघांना ताब्यात घेतले. सावित्रीने आज एका मुलाला मरणाच्या दारातून वाचविले होते. काही दिवसांनी सगळ्या गावात ही बातमी पसरली. एकनाथ आणि रूपाची चांगली खडसावून विचारपूस करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गावात जी मुले बेपत्ता झाली होती त्या मागे रूपा आणि तिचा नवरा सहभागी होते. त्या दोघांनी नरबळी दिला होता व त्यांचे शरीर तिथे जवळच पुरले होते." सात निष्पाप मुले या अघोरीपणाला बळी गेली होती. पोलिसांच्या मदतीने त्या मुलांचे मृतदेह काढून त्यावर सोपस्कार करण्यात आले. रूपाने सांगितल्याप्रमाणे, "पुत्रप्राप्तीसाठी तिने हे कृत्य केले होते. अजून दोन मुलांना मारून तिला मुलगा होणार होता असे तिचे मत होते." कायद्याप्रमाणे त्या दोघांना कोठडीत ठेवून फासीशी शिक्षा सुनावली गेली. सावित्रीच्या मदतीने हे कोडे उलगडले असल्याने गावात तिला सत्कार समारंभ उत्साहात साजरा केला. 


रूपा आणि तिच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा नियमानुसार सुर्योदयापूर्वी होणार होती. दोन दिवस शिल्लक होते त्यांच्या फाशीला. गावकरी फक्त त्याच दिवसाची वाट पाहत होते. पण तिथे तुरुंगात काही विपरीत घडून गेले. रूपाने कोठडीत कोणी नसताना आत्महत्या केली. सायंकाळी ही बातमी गावात पसरली. तिचा नवराही तिथेच असल्याने पोलिसांनी तिचे अंत्यसंस्कार करायचे निश्चित केले. या सर्व गोष्टी होत असताना, एकनाथ कुठेतरी पसार झाला. एकतर रूपाचे दाहसंस्कार करायचे होते आणि आता तिचा नवरा जागेवर नव्हता. अर्धेजण तिच्या दाहसंस्कारात आणि काही जण त्या एकनाथला शोधायला गेले व बाकीचे चौकीत थांबले होते. जेव्हा रूपाचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला तेव्हा अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तीची बोबडीच वळून गेली. कारण रूपाच्या देहावर मानच नव्हती. धारदार शस्त्राने कापल्याचे चिन्ह दिसत होते. ही तर अजून पंचाईत झाली. शेवटी चौकीतून दोन जणांना या मोहीमेवर पाठवण्यात आले. परंतु, रूपाचे शरीर असे ठेवून काहीच उपयोग नसल्याने मानविरहीत देह जाळण्यात आला. पण ही गोष्ट बाहेर कुठेही न सांगण्याची ताकीद पोलिसांनी अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तीला दिली होती.


रात्रभर पोलीस गावात फिरत होते पण त्या एकनाथचा कुठेही मागमूस नव्हता. पोलिसांनी गावात जमिनीवर पडलेल्या नारळाच्या करंवट्या, चेंडू अगदी हवा नसलेले असे बरेच काही काठीने शोधले पण रुपाची मान सापडतच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकीतून घरी निघालेल्या एका हवालदाराला रस्त्याच्या एका कडेला एक माणूस दिसला. तो हवालदार थोडा जवळ गेला तर त्याची काहीच हालचाल होत नव्हती. चेहरा निरखून पाहिल्यावर समजले की, तो एकनाथच होता. पण त्याचासुद्धा मृत्यू झाला होता. हवालदार तसाच जाऊन चौकीत पोहोचला आणि ही खबर त्याने तिकडच्या साहेबांना दिली. खबर मिळताच पोलिसांनी आपल्याच जीपमधून त्याला नेले आणि त्याचा मृतदेह जिथे रूपाला जाळले तिथेच त्याचेही दाहसंस्कार केले. या सगळ्या गोष्टी एका मागोमाग एक झाल्याने संपूर्ण पोलीस खात्याची दमछाक झाली होती. फाशीच्या दिवशीच सकाळी पोलिसांनी त्या दोघांच्या आत्महत्येची बातमी कळवली. पण झालेल्या घटनांचा उलगडा अजिबात केला नाही. गावात सगळ्यांना आनंद झाला होता आणि त्या दोघांच्या मृत्यूने गाव येणाऱ्या संकटातून सुटले होते. आलेले वर्ष अगदी जसे आले तसे निघूनही गेले. तिथे शहरात ओजस्वी वीस वर्षांची झाली होती. गावी जरी तिला जाता येत नसले तरीही तिचे आजी-आजोबा म्हणजे मालतीचे आईवडील सगळ्यांच्या खुशाली कळवत असत. 


येणारे नवीन वर्ष एक मोठे संकट घेऊन आले होते. एकनाथ-रूपाच्या मृत्यूच्या घटनेला आता कुठे दोनच महिने लोटले होते तर गावात एका मागून एक सावल्यांचा खेळ सुरू झाला. रात्रीच्या अंधारात पोलिसांना कोणीतरी बाई दिसू लागली होती. शोधून पण ती सापडेना. ही गोष्ट पोलिसांनी सर्वप्रथम अण्णांच्या कानावर घातली कारण ते या गावात जाणती व्यक्ती होते. अण्णाची देवावर खूप श्रद्धा होती आणि कोणालाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गावातील महादेवाच्या मंदिरात एक भव्य पूजेचे आयोजन केले. गावातील राहत असलेली व्यक्ती, स्त्री-पुरुष, लहान-थोर, अधिकारी-चाकर सर्वांना उपस्थित राहायला बजावले. स्वतः अण्णादेखील तिथे सगळेजण आले की नाही याची शहानिशा करणार होते. सकाळीच पूजेचा मुहूर्त ठरवण्यात आला होता. गावातील सगळ्यांना परिचित आणि मोठी किर्ती लाभलेले सदानंद गुरुजी या पूजेला संपन्न करण्यासाठी आले होते. अण्णा, त्यांची मुले, सुना व दोन नातू पूजेसाठी वेळेआधी हजर होते. पुजेत नारळ आणून ठेवले होते. ते नारळ पूजेसाठी ठेवत असताना गुरुजींच्या साहाय्यकाला एक नारळ खराब असल्याचे दिसून आले. त्यांनी तसे एका गावकऱ्यास सांगितले. तो नारळ आणायला जात होता पण अर्जुनने त्याला पूजेत राहायला सांगितले व तो एकटाच निघाला. अण्णांनी ते पाहिजे व ते पण त्याच्यासोबतीला गेले. वाड्याजवळच नारळाची बाग होती आणि काही नारळ घरातच काढून ठेवले होते. मंदिर आणि वाड्यातील अंतर पण काही जास्त नसल्याने ते लगेच नारळ घेऊन जाऊ शकणार होते. अर्जुनने दार उघडून आतून नारळ आणला. अण्णा असेच बसले असताना त्यांना थोडा ठसका लागला म्हणून अर्जुनने स्वयंपाक घरात जाऊन त्यांना पाणी आणून दिले. पाणी पिऊन थोडा वेळ बसून ते दोघेही निघाले.


जशी त्यांनी वाड्याची पायरी उतरली एक वादळ उठले आणि सगळीकडे नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. अण्णांनी अर्जुनाला हाताने मागे खेचले आणि पुढे काय होणार ते पाहू लागले. हळूहळू आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले. आजूबाजूला किंचाळ्या, रडण्याचे आणि विक्षिप्त हसण्याचे आवाज ऐकू येत होते. समोरून अस्पष्ट आकृती चालत येत असताना अर्जुनच्या दृष्टीस पडली. अण्णांनी ती रूपा असल्याची खात्री करून घेतली. आधीची रूपा आणि आता दिसणारी रूपा खूप तफावत होती. त्यांच्यासमोर त्वचेची चामडी लोंबकळणारी, डोळ्यांच्या जागी फक्त दोन काळे खड्डे, हवेत उडणारे केस आणि शरीराच्या जागेवर हवेच्या झोतात डुलणारे काळी छाया अशी घाणेडी रूपा उभी होती, उभी कुठे तरंगत होती ती. वाड्याला देवीदेवतांचे रक्षण असल्याने ती आत येऊ शकणार नव्हती हे निश्चितच होते. रूपाने अण्णा, त्यांचे कुळ व या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जीव घेण्याची धमकी दिली आणि तिथून हवेत अदृश्य झाली. या सगळ्यात किती काळ लोटला काय माहिती पण अण्णा व अर्जुन तातडीने मंदिरात गेले. पूजा होईपर्यंत त्या दोघांनी काहीच सांगितले नाही. पूजा मनोभावे केल्याने अत्यंत कमी वेळात आणि सुंदर रितीने पार पडली होती. गावकरी पूजेचा प्रसाद घेऊन आपापल्या घरी गेले. अण्णांनी माधवला व इतरांना वाड्यात जायला बजावले. आता मंदिरात सदानंद गुरुजी, त्यांचे साहाय्याने, अण्णा आणि अर्जुन असे चौघेही उपस्थित होते. गुरुजींना अण्णाला जेव्हा परतायला अवकाश लागला होता त्याच क्षणी संकटाची चाहूल लागली होती. त्यांनी साहाय्यकांना घरी जायला सांगितले व ते तिघेही मंदिरात बसले. दुपार झाली असल्याने गावात सगळीकडे शांतता होती पण अण्णा मात्र आतल्या आत द्वंद्व अनुभवत होते. गुरुजींनी अर्जुनाला सांगून मंदिरात असणारी विभूती अण्णांच्या कपाळी लावली. गुरुजींनी बोलायला सुरुवात केली होती.


"तुम्ही जे झाले आहे त्याला काही काळासाठी विसरा परंतु दुर्लक्ष करू नका. तुमच्याशी संवाद साधण्याचा डाव होता त्या अवलक्षणीचा. कोणाचीही काळजी नसावी. संकट जेव्हा येते तेव्हा सोबतीला उपाय सुद्धा असतोच. तुमच्या घरात तर स्वतः देवीने जन्म घेतला आहे. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणी हानी पोहचवू शकत नाही. जर गावाचा विचार करत आहात तर मी आणि स्वतः महादेव आपल्या सोबत आहेत. काही अघटित होणार नाही." गुरूजींच्या बोलण्याने अण्णा व अर्जुन सावरले आणि चकितसुद्धा झाले.


"माफ करा गुरुजी, परंतु आमच्या घरात देवीने जन्म घेतला आहे? याचे नक्की तात्पर्य काय?," अर्जुनने उत्सुकतेने विचारले.


गुरुजी हसत उत्तरले, "तुझ्या मोठ्या भावाची कन्या.तिच्याच जन्मानंतर तुला व तुझ्या धाकट्या भावाला पुत्ररत्न झाले. तिने रोहिणी नक्षत्रात जन्म घेतला आहे त्यामुळेच तुझ्या मुलाचे आणि पुतण्याचे या भूतलावर व्यवस्थित आगमन झाले. शक्य होईल तितक्या लवकर तुझ्या थोरल्या भावास त्याची पत्नी व कन्येला घेऊन इथे येण्यास सांग. तीच कन्या आता या संकटातून तुमच्या कुळास वाचवेल." गुरूजींनी विधान पूर्ण केले आणि ते निघाले. आपली नात आपल्या रक्षकाच्या रूपात आली हे ऐकून तर अण्णा भरून पावले होते. ते दोघे वाड्यावर गेले. अर्जुनने माधवला सांगून पुरूषोत्तमला पत्र पाठविले. गुरुजी तिथे गावाच्या वेशीवर जाऊन तिकडून संपूर्ण गावाच्या रक्षणासाठी योग्य ती तरतूद केली. तीन दिवस तरी गावात काहीच अभद्र होणार नव्हते याची दक्षता घेण्यात आली होती. पुरूषोत्तम येईपर्यंत गावात काहीच विपरीत घडले नाही. दोन दिवसांनी पुरूषोत्तम, मालती आणि ओजस्वी वाड्यात पोहोचले. मालतीचे आई-वडीलदेखील तिथे हजर होते. अर्थातच तातडीने बोलावून घेण्याचे कारण व हेतू हा घरातील सगळयांना समजावण्यात आला होता. आता हे सगळं सोईस्कर पद्धतीने मालतीच्या वडीलांनी व अण्णा यांनी पुरुषोत्तम व मालतीला सांगितले होते. ओजस्वी तर आल्यानंतर तिच्या भावांना भेटायला घरात गेली होती. सायंकाळी सदानंद गुरुजीदेखील वाड्यात आले. मालती थोडी घाबरली होती. एकतर ओजस्वी त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे वयही या सर्व गोष्टी समजून घेण्याचे नव्हते. गुरुजींना मालतीची मनःस्थिती समजत होती परंतु काही उपाय म्हणून त्यांनी तिची पत्रिका पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पत्रिकेत सविस्तर माहिती लिहिलेली सापडली आणि एक उपायसुद्धा. तो उपाय करून ओजस्वीला तिच्या अंगी सुप्तावस्थेत असणाऱ्या शक्तिंची जाणीव करता येणे आवश्यक होते.


गुरुजींनी घरातील मंडळी सोबत बसून त्यांच्या मतानुसार हा उपाय अंमलात आणण्याची परवानगी घेतली. सात दिवस करावयाची ही विधी वाटते तितकी सोपी नव्हती. हा विधी करताना कोणत्याही पुरुषास तेथे थांबता येणार नसल्याने अण्णांनी तळघर साफ करून घरातील स्त्रियांना तिकडची जागा मोकळी करून दिली. सात दिवस मालती, सावित्री आणि कावेरी या विधीचा भाग होऊन ओजस्वीला तिच्या शक्तींची प्रचिती करवून द्यावयाची होती. प्रातःकाळी उठून अंगाला हळद लावून अंघोळ करणे, सुर्योदयाच्या वेळी मंत्रोच्चार करणे, दिवसभर ध्यानस्थ बसणे आणि सायंकाळी अंगावर चंदनाचा लेप लावून आंघोळ करणे ज्याने शरीर आणि मन एकाग्र राहील. जेवणाच्या वेळी तिन्ही सवाष्णींपैकी कोणीतरी एक तळघरातून बाहेर येऊन जेवण घेऊन जात असे. त्या सात दिवसांत वाड्यात फक्त पुरुष वावरत होते. अधूनमधून गुरुजी ये-जा करत होते. बघता बघता सात दिवस निघून गेले. सोमवारी सकाळी त्या चौघीजणी वाड्यात आल्या. गुरुजीसुद्धा तिथे ओजस्वीची वाट पाहत बसले होते. ओजस्वीच्या वावरण्यात, बोलण्यात बराच फरक जाणवत होता. गुरुजींनी सायंकाळी गावात दोन-तीन माणसांना पाठवून कोणीलाही घरातून बाहेर पडण्याची सक्त मनाई केली. हीच ती वेळ होती रूपाचा संहार करण्याची.


आज रात्रीचा काळोख हा भयानक स्वरूप धारण करणार होता. दहाच्या सुमारास गुरुजी एक होम करणार होते. त्याची सामग्री आणि पूर्वतयारी करण्यात आली होती. घराचे अंगण गंगाजलाने पवित्र करण्यात आले होते. घडीत नऊचा टोला वाजला असता, बाहेर सगळीकडे भीषण शांतता पसरली. घराजवळ फिरणारे पाळीव प्राणी दिसेनासे झाले. उन्हाळा असून गारवा जाणवू लागला. गुरुजींनी वाड्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर विभूती लावली होती आणि त्या सगळ्यांना घरात एकत्र बसायला लावले. अंगणाजवळ असणाऱ्या झाडाआडून कोणीतरी बघत असण्याचा भास होऊ लागला. गुरुजींनी आपल्या साहाय्यकांना पूजा आरंभ करावयाचे आवाहन केले आणि ओजस्वीसोबत ते वाड्याबाहेर पडले. सगळेजण आता पुढे काय होईल याचा विचार करत होते. आकाशात एक मोठा ध्वनी झाला आणि गुरुजींना रुपा दिसू लागली. ती हळूहळू त्यांच्या जवळ येत होती पण जशी अंगणात पाऊल ठेवणार ती मागेच ढकलली गेली. असे कितीतरी विफल प्रयत्न ती करत होती पण तिला आत प्रवेश करता येत नव्हता. इथे होम सुरू झाला होता आणि साहाय्याने देवीची आराधना करत होते. रूपा हताश होऊन अदृश्य झाली. गुरूजींनी तिला सगळीकडे पाहिले पण ती कुठेच दिसत नव्हती. अण्णा घरात बसले होते आणि त्यांच्या काळजात धस्स झाले कारण अर्जुनचा मुलगा आनंद तिथे दिसत नव्हता. पाणी प्यायला तो आत गेला होता पण अजूनही परतला नव्हता. सावित्री आणि मालती स्वयंपाक घरात गेल्या पण तो कुठेही सापडला नाही. मालती वळली आणि तिला स्वयंपाक घराच्या खिडकीबाहेर आनंद दिसला. तिने सावित्रीला बाहेर पाठवले आणि मागच्या दाराने ती बाहेर पडली आणि तिथेच तिची फसगत झाली. रुपाने आनंदचे रुप घेऊन तिला बाहेर पडायला भाग पाडले होते. इथे आनंद देवघरात येऊन झोपी गेला होता. तिथे रुपाने मालतीच्या शरीरात प्रवेश केला आणि ओजस्वीसमोर गेली. ओजस्वीला तिची आई बाहेर का आली ते समजलेच नाही.


तिने आईला विचारले, अगं, तू बाहेर का आली? घरात जा. इथे जीवाला धोका आहे तुझ्या. जा बघू तू आत. मालतीच्या शरीरातील रूपा आता हसू लागली. ओजस्वी गोंधळली पण गुरूजींनी संधी साधून ओजस्वीला हाताने मागे केले. आपल्या जवळ असणारी विभूती त्यांनी मालतीवर फेकली आणि रुपा तिच्या शरीरात असल्याची जाणीव तिला करून दिली. आपल्या आईच्या शरीरात रुपा आहे हे समजल्यावर ओजस्वी पूर्णपणे हादरून गेली. आपण आईवर वार कसा करायचा? जर आईला काही दुखापत झाली तर? रूपाने आईला काही केले तर? असे कितीतरी विचार तिच्या मनात आले. ओजस्वी वाड्याच्या पायरीवर बसली. गुरुजींनी आतून अण्णांना बाहेर बोलावले. समोरची परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. एका पाताळयंत्री बाईने आपल्या कुळावर केलेला आघात ही बाब कितीतरी दुःखद होती. परंतु यातून जिद्दीने बाहेर पडायचे होते. त्यांनी ओजस्वीला समजावले, तिला धीर दिला आणि तिच्या आईला काहीच होणार नाही याची शाश्वती दिली. सावित्रीने देवघरात जाऊन देवाची मूर्ती पाण्यात ठेवली. ओजस्वीने डोळे पुसले आणि गुरुजींना पूजेत बसायला सांगितले. आता जे काही करायचे होते ते तिलाच. ओजस्वीने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या शरीरात त्या सात दिवसांत जी ऊर्जा निर्माण झाली होती ती एकवटली. तिच्या हातात एक चमकणारे अस्त्र आले.


ओजस्वीने ते अस्त्र घेतले आणि मालतीच्या बेंबीत वार केला कारण तिची आई या नात्याने तिला नाळेवर प्रहार करून आपल्या आईस वाचवता येणार होते. तिची योजना अगदी उत्तम ठरली आणि तिने रूपाला आपल्या आईच्या शरीरातून बाहेर काढले. मालती ही ओजस्वीची आई असल्याने तिच्या शरीराला काहीच हानी झाली नव्हती पूर्णपणे सुखरूप होती ती. ओजस्वीने आईला मिठी मारली आणि वाड्यात पाठवले. रूपाला ते अस्त्र लागल्याने ती घायाळ झाली होती. गुरुजींनी या संधीचा फायदा घेतला आणि तिला बंदिस्त केले. तिच्या शरीरात वावरणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तिला शांत केले. आता तिथे फक्त रूपाची मान शिल्लक राहिली होती जिची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. गुरुजींनी तिची मान विधिवत अग्नी देवतेच्या हवाली करून तिला कायमचे या जगातून मुक्त केले. सावित्रीने घरातील देवांना पाण्यातून बाहेर काढले व देवघरात पुन्हा जागेवर ठेवले. ओजस्वी घरात गेली व आईला घट्ट धरून रडू लागली. पहाटेचे चार वाजत आले होते. सगळेजण झोपी गेले. सकाळी गावात अण्णांनी गाव आता सुरक्षित असल्याची बातमी गावकऱ्यांना दिली. पुरूषोत्तम तीन दिवसानंतर पुन्हा शहरात मालती व ओजस्वीला घेऊन गेला. गावात येणारे विध्वंसांचे वादळ ओजस्वीने मोठ्या हिमतीने परतवले होते. आता ते तिघेजण दरवर्षी गावी सुट्ट्यांमध्ये येऊ लागले.


.............................समाप्त..............................


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror