सहवास
सहवास


अक्षरा आज घरात खूप धावपळ करत होती. पंधरा वर्षांची ती गोड मुलगी आज पुन्हा दरवर्षी प्रमाणे आजीच्या घरी सुट्टी घालवायचा बेत करून आली होती. अक्षरा ही राम आणि राधाची एकुलती एक मुलगी होती. पण तरीही ती इतर मुलींप्रमाणे अजिबात हट्टी नव्हती. अक्षराचे आईवडील दोघेही उच्च पदावर कार्यरत होते परंतु अक्षराने कधीच तिच्या परिस्थितीचा देखावा केला नव्हता. अक्षराला तिच्या गोड आणि मनमिळाऊ स्वभावात एक भर म्हणून पक्षांचे बोलणे समजायची देणगी मिळाली होती. ही गोष्ट तिने कित्येकदा आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला होता पण ती मस्करी करत असणार असे समजून ते नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. आजीच्या घरी येऊन ती छान रमली होती. सकाळी खाऊन, तयार होऊन ती घराबाहेर असणाऱ्या बागेत बसून तिच्या जवळ येणाऱ्या पक्ष्यांसोबत खूप गप्पा मारायची. कदाचित यामुळे तिला कधीच एकटेपणा जाणवला नसावा. अक्षराची एक गोड आणि सुंदर दिसणारी मैत्रीण तिला भेटायला आली होती. ती एवढी सुंदर होती की, तिच्या मागे अक्षरा आज घरात सगळीकडे धावपळ करत होती. ती मैत्रीण अजून कोणी नसून एक फुलपाखरू होते. ते फुलपाखरू तिच्या घराजवळच्या बागेत बागडायचे. इतर बागेत होणाऱ्या गंमतीजंमती, फळांची झाडे, फुले अशा कितीतरी गोष्टी ते फुलपाखरू तिला सांगत असे. त्या फुलपाखराला अक्षरा " स्वर्णा" अशी हाक मारायची.
आज ती मैत्रीण खूप आनंदात असल्याने घरात फिरत होती.शेवटी अक्षराने दमछाक तिला एका ठिकाणी बसायला सांगितले. पण ती ऐकेल तर ना ! अक्षरा शांत बसली आणि स्वर्णा मग तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर विसावली. अक्षराने तिला आनंदी असण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली की, एक सुंदर फुलपाखरू तिला शोधत इथे बागेत आले होते आणि त्यांची छान मैत्री झाली. फुलांमध्ये फिरणे, इतर सुरवंटांना पाहणे अशा खूप गमतीशीर गोष्टी त्या दोघांनी केल्या होत्या. आजही ते फुलपाखरू तिला भेटायला येणार होते आणि म्हणून स्वर्णा खूप बागडत होती. थोड्या वेळाने ते एक सुंदर फुलपाखरू तिथे आले. स्वर्णा लगेच उडून बाहेर गेली आणि तिच्या मागोमाग दबक्या पावलाने अक्षराही गेली.
काही वेळाने स्वर्णा आणि ते फुलपाखरू एकत्र उडून गेले. अक्षराला थोडे वाईट वाटले पण तिची मैत्रीण आनंदी असल्याने तिने एवढा काही विचार केला नाही. दोन दिवसांनी स्वर्णा बागेत आली तेव्हा अक्षरा एका पोपटासोबत स्वर्णा बद्यल बोलत होती, तिची विचारपूस करत होती. पोपट बोलणार आणि स्वर्णा तिच्या समोर आली. तिने दोन दिवसांची सगळी माहिती अक्षराला दिली. अक्षरा तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहून खूप खूश झाली. असे हा नित्यक्रम काही दिवस सुरळीत पार पडत होता. अचानक एक दिवस स्वर्णा काळजीने अक्षराकडे आली. आपली मैत्रीण दुःखी आहे हे तिला समजले. तीन दिवस स्वर्णाला ते फुलपाखरू भेटायला आले नव्हते. अक्षराने तिला एका मोठ्या माणसाप्रमाणे समजावून सांगितले पण शेवटी होते ते एक फुलपाखरुच. जशी माया- ममता अक्षराने तिला लावली होती तशीच स्वर्णाला त्या फुलपाखराची सवय झाली होती. तीन दिवस कसेबसे निघून गेले. स्वर्णा आता आधीसारखी अक्षरासोबत येऊन बसू लागली पण तिला सारखी तिच्या मित्राची आठवण येत होती. अक्षराने तिच्या सगळ्या पक्षीमित्रांना त्या फुलपाखराची माहिती काढायला पाठवले.
सायंकाळी काहीजण अक्षराजवळ आले पण एक दुःखद बातमी घेऊन. तेव्हा अक्षरा चित्र काढत खिडकीजवळ बसली होती. तिची मैत्रीण पण तिथेच होती. आपल्या मऊ आणि पारदर्शी पंखांच्या साहाय्याने स्वर्णादेखील काहीतरी रेखाटत तिथे फिरत होती. जसे कावळा, पोपट,चिमणी आणि इतर सगळे आले अक्षराने तिच्या हातातील ब्रश बाजूला ठेवला. ते निरागस फुलपाखरू आशेचा किरण लाभावा त्या उद्देशाने तिथे रंगांजवळ बसले होते. पोपटाने निराश चेहऱ्याने सांगितले की, स्वर्णा ज्या फुलपाखरासोबत बागेत फिरायची, फुलांबरोबर खेळायची त्या फुलपाखराने काही दिवसांपूर्वी हे जग सोडले. एका लहान मुलासोबत वाऱ्याशी खेळत असताना चुकुन त्या मुलाने त्या पाखरास हातात धरले आणि ते फुलपाखरू मरण पावले. चिमणीने अक्षराला स्वर्णा तिथे नसल्याचे सांगितले. तिची मैत्रीण अचानक कुठे गेली काही कळलेच नाही. अक्षरा आणि बाकीचे पक्षी तिला घरात शोधू लागले. घरात सगळीकडे शोधून झाले पण अक्षराची मैत्रीण काही सापडेना. मागून आजीने अक्षराला आवाज दिला आणि देवघरात यायला सांगितले. ती लगेचच तिथे गेली. आजी देवाजवळ असलेला दिवा नीट करताना अक्षराची नजर एका ठिकाणी गेली. त्या दिव्याजवळ रंगांचे काही थेंब दिसले तिला. अक्षराला मोठा धक्का बसला आणि ती हुंदका देत रडू लागली. खिडकीतून तिच्या पक्षीमित्र-मैत्रिणींना तिचे रडणे ऐकू आले आणि ते पण तिथून नंतर आपल्याला घरी निघून गेले.
एक आठवडा अक्षरा कोणासोबत बोलत नव्हती. पण तिचे पक्षीमित्र तिला नेहमी बघून जात असत. अखेरीस अक्षरा यातून सावरली आणि पूर्वीप्रमाणे पक्ष्यांशी बोलू, हसू लागली. पण ती अजून सुद्धा तिच्या मैत्रिणीला विसरली नव्हती. तिची एक गोड आठवण म्हणून अक्षराने तिचे एक सुंदर चित्र काढून स्वतःच्या खोलीत लावले.