Jyoti gosavi

Drama Thriller

3  

Jyoti gosavi

Drama Thriller

तीन इंचाचा माणूस

तीन इंचाचा माणूस

10 mins
281


साधारणपणे जून जुलै चे दिवस होते जुलै महिन्यातला एक पावसाळी रविवारी घरात मी एकटाच होतो साल 2012 . बाहेर रिमझिम पाऊस पडत होता हवेत बर्‍यापैकी गारवा होता पत्नी तिचे लांबचे काका वारले म्हणून गावी गेलेली होती. आणि मुले पावसाळी पिकनिकला गेलेली होती. खूप दिवसांनी असा एकांत मिळाला होता. खरे तर माणूस हा कळपाने राहणारा प्राणी, त्यातूनच पुढे वसाहती, गावे ,शहरे ,व कुटुंबव्यवस्था निर्माण झाली. पण कधीकधी सर्वांपासून वेगळे राहून एकांत देखील एन्जॉय केला पाहिजे आत्मनिवेदन झाले पाहिजे आज संपूर्ण रविवार माझा होता कामवालीला देखील मी कालच सुट्टी जाहीर केली. अचानक सुट्टी मिळाल्याच्या आनंदात ती कालच सर्व कामे उरकून गेली.


दुपारी एक-दीड ची वेळ मी सकाळी आरामात उठलो, सर्व गोष्टी आरामात उरकल्या, माझ्या नेहमीच्या हॉटेलमधून चिकन बिर्याणी मागवली .समोर गरमागरम चिकन बिर्याणी व आवडीचे ड्रिंक असा सर्व सरंजाम मी एका टेबलवर मांडला व आरामात व्हिस्कीचे घोट घेत घेत डाव्या हाताने काजू पापड असा चकणा मी अधून मधून तोंडात कोंबत होतो हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन मी खिडकीत उभा राहिलो आणि एक एक घोट घेत मी बाहेरचा पाऊस आणि नीरव शांतता निवांतपणे अनुभवत होतो .रविवार, त्यातच पाऊस ,दुपारी दीड दोनची वेळ असेल, तर बऱ्याच फॅमिली पावसाळी सहलीला गेलेल्या किंवा घरात आरामात टीव्ही बघत पहुडलेल्या अचानक एक मोठा काळा भुंगा येऊन माझ्या खिडकित भिरभिरु लागला .तो चांगला माझ्या मुठी एवढा असावा .एवढा मोठा भुंगा मी पण आयुष्यात बघितलाच नव्हता. आणि हे काय त्या भुंग्याच्या डोक्यावर हेलिकॅप्टर सारखा पंखा गोल गोल फिरत होता. हेलिकॅप्टर होते ,साधारण चार-पाच इंचाचे आणि त्यातून एक तीन इंचाचा माणूस खाली उतरला. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना अरे एवढ्यात मला चढली की काय? मी स्वतःला चिमटा काढला, नाही मी शुद्धीवर होतो आणि खरंच माझ्या खिडकीत एक हेलिकॅप्टर उतरून, त्यातून एक तीन इंचाचा माणूस बाहेर पडला होता. अरे मी स्वप्नात तर नाही ना? मी मनात प्रश्न केला आणि" नाही तू स्वप्नात नसून तुझ्यासमोर मी उभा आहे"

हे सत्य आहे मला टेलीपथी प्रमाणे मनातल्या मनात त्याचे उत्तर मिळाले. समोरचा माणूस माझ्याकडे बघत होता पण त्याचे होठ मात्र हलत नव्हते .तू कोण आहेस? व कुठून आलास?

मी नक्कीच पृथ्वीवासी नाही मी पाचव्या आकाश मालेतील झिंप्रॉन नावाच्या ग्रहावरून आलो आहे. मला हे खरं वाटत नाही. मग पृथ्वीवर इतक्या लहान आकाराचं हेलिकॅप्टर कधी पाहिल आहेस का? व इतका लहान माणूस कधी पाहिला आहेस का?

नाही कधीच नाही

मग जे समोर आहे त्याच्या वरती विश्वास ठेव पण तू माझ्या खिडकीतच कसा उतरलास, व तुला माझी भाषा कशी येते ?

तुझीच काय पण मी कोणत्याही भागात जाऊन तिथली भाषा बोलू शकतो भाषा ट्रान्सलेट करण्याचा भाग जन्मताच आमच्या मेंदुत असतो . मी संपूर्ण जगात फ्रान्समध्ये फ्रेंच ,जर्मनी जर्मन ,तामिळनाडूत तामिळ, अशी कोणतीही भाषा बोलू शकतो ते पण एकही शब्द न उच्चारता. पण इथे मुंबईत तू माझ्या खिडकित कसा उतरलास?

तुझ्यावर आमचे खूप दिवसांपासून लक्ष होते पण योग्य वेळ मिळत नव्हती .आज तू घरात एकटाच सापडला आणि मी उतरलो आम्हाला पृथ्वीवासीयांना संदेश द्यायचा आहे तो तुझ्या रूपाने आम्हाला सापडला.

तू संदेशवहनाचा गूड कण्डक्टर आहेस जसे तुम्ही पृथ्वीवासी सतत आपल्यासारखेच कोणीही या ब्रह्मांडात आहे का म्हणून दुसऱ्या वसुंधरेचा शोध घेत असता ,तसेच आम्ही देखील अजून कोठे जीवसृष्टी सापडते का म्हणून शोध घेत असतो आणि एक दिवस तुमची पृथ्वी आम्हाला सापडली.

" केवढे वैभव आहे तिच्यावर" पृथ्वीपेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आमच्या ग्रहावर आहे गुरुत्वाकर्षण कमी, नजर फिरेल तिथपर्यंत वाळवंट, पाणी कमी तरी पण आम्ही एवढ्या बिकट परिस्थिती मधून एवढी प्रगती केलेली आहे ,

पण मग आता आमच्या ग्रहावर का उतरलात? कारण आम्हाला पृथ्वीचा ताबा पाहिजे इथल्या एवढ्या सुजलाम-सुफलाम वातावरणात आम्ही अजून खूप प्रगती करू .

अरे पण मग आम्ही जायचे कुठे ?

तुम्हाला पृथ्वीवासीयांना इथल्या साधनसंपत्तीचा चांगला उपयोग करता आला नाही .पृथ्वीचे पूर्ण वाटोळे व्हायच्या आत तुम्हा सर्वांना खलास करून आम्ही तिचा ताबा घेणार.

त्याच्या बोलण्याचे मला हसू आले हा अंगुष्ठ मात्र उंचीचा प्राणी केव्हढ्या मोठ्या बाता करतोय .मी याला पकडून आत्ताच्या आत्ता याच्या हेलिकॅप्टर सकट एखाद्या पिंजऱ्यात बंद करू शकतो .असा मी मनात विचार केला


हा !हा !थांब. असा विचारदेखील मनात आणू नकोस .तू माझ्या छोट्या रूपावर जाऊ नकोस तुला बघायचीय माझी करामत असे म्हणून त्याने दाणकन हॉलमध्ये उडी मारली. तसा तो हातभर उंचीचा झाला जशा जशा तो उड्या मारत राहिला तसा तसा तो छताला जाउन भिडला. आता तो छत फोडून वरच्या मजल्यात घुसतो की काय अशी मला भीती वाटू लागली व मी त्याला हातानेच थांब थांब अशी विनंती केली, तेव्हा कुठे तो थांबला .तरी मी माझ्या परीने बचावाचा पवित्रा घेत होतो ,याला अजून कोणत्या प्रकारे नष्ट करता येईल का याचा मी विचार करत होतो .त्याचं हेलिकॅप्टर नष्ट केलं तर हा कुठे जाईल असा विचार माझ्या मनात आला

" त्याला हातदेखील लावू नकोस" त्याने मला जवळजवळ धमकीच दिली. भिंतीवरची पाल उचलून त्याने हेलिकॅप्टर वरती फेकले ,त्याने क्षणात आपला आकार बदलला व त्या पाली ला गट्टम् केले मी अवाक् होऊन बघतच राहिलो

" आमचे हेलिकॅप्टर देखील बायो जेनेटिक आहे! हे असे सहजासहजी नष्ट होणार नाही.

आता काय करावे? ही बला पृथ्वीवरून कशी घालवावी? मी आता विचार करत होतो

"आम्ही येथे कायमचे वास्तव्य करण्यास येणार आहोत त्यामुळे तू आम्हाला कसे घालवू याचा विचार करू नकोस! आम्ही येथे कायमचे वास्तव्य करण्यास येण्याचा विचार करतोय तर तू आम्हाला एक असे घालून द्यावे याचा विचार करतोय

म्हणजे माझ्या मनातले विचार त्याला समजत होते मनात वेगळे विचार ओठावर मात्र दुसरे असे काही केले तर कदाचित हा जीव माझ्या कृतीला फसेल? पण ते इतके सोपे नव्हते ,ओठावर एक आणि पोटात एक असायला मी काही राजकारणी नव्हतो. मग मी मनातल्या मनात च ची भाषा बोलायला सुरुवात केली "

"चयका ,चरावक, चला त्या चलवायलाघा "आणि माझी ही युक्ती लागू पडली ही भाषा त्याला कळत नव्हती त्यामुळे मला मध्ये विचार करायला गॅप मिळाला प्रथम त्याची शक्तिस्थाने कोणती आहेत त्याला काय खायला प्यायला आवडते याचे मर्म स्थळे कोणती याबाबत विचार करू लागलो

जर का उड्या मारून मारून हा मोठा होतोय त्याचा अर्थ हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा पासून ऊर्जा घेत असावा

आता याला अधांतरी कसं ठेवायचं ?

मी त्याला मुंबई लोकल ची सफर करायची असे ठरवले त्याप्रमाणे माझ्या शर्टाच्या खिशात ठेवले आणि सकाळी गर्दीच्या वेळेत वेस्टर्न रेल्वेची सफर मी त्याला करवली

मी पार घामाने आंघोळ केली पण तो मात्र माझ्या खिशात मजेत होता

मी त्याचे टिंकू असे माझ्यापुरते नामकरण केले

.टिंकू;$$ मी आवाज दिला बघितलं पृथ्वी किती वाईट आहे अशा खचाखच गर्दीत तुमचा टिकाव लागेल का?

" त्याची काही जरूरी नाही" त्याने उत्तर दिले एक तर पृथ्वीवरची पूर्ण मानवजात नष्ट झाल्याशिवाय आम्ही इकडे येणारच नाही दुसरे म्हणजे आमची प्रत्येकाची वैयक्तिक हेलिकॅप्टर आहेत

आम्ही पृथ्वीवरून चालणारच नाही त्यानंतर मी त्याला धारावीची झोपडपट्टी दाखवली, माझ्या अल्पमतीप्रमाणे पृथ्वीवर जेवढे काही वाईट दाखवता येईल तेवढे मी दाखवत होतो पण त्याला पृथ्वीवर राहणे कसे कठीण आहे ते पटवत होतो .पण तो मात्र पृथ्वी कशी चांगली आहे व तुम्ही माणसांनी तिचे कसे वाटोळे केले हेच मला सांगत होता.

आता मी त्याच्या पुढे हात टेकले पण काही करून पृथ्वीवर येणारे हे संकट थोपवले पाहिजे असा विचार मी करत होतो . त्याचे अस्तित्व फक्त मलाच जाणवत होते त्याचे हेलिकॅप्टर स्वतःला गोल गोल चेंडूत परावर्तित करून मोठ्या मजेत माळ्यावर पडले होते. गेले दोन दिवस तो माझ्या घरात ठाण मांडून बसलेला होता मात्र एक फायदा नक्कीच झाला होता त्याचे हेलिकॅप्टर भूक लागली खाली येऊन माझ्या घरातले डास , माशा ,पाली ,झुरळे यांना फस्त करत होते. कोणत्याही माणसाला मोहात पाडण्यासाठी थ्री डब्ल्यू चा उपयोग होतो वाईन, वेल्थ ,वुमन म्हणजे थ्री डब्ल्यू. पण त्यापैकी पृथ्वीवरच्या वुमनचा त्याला काही फायदा नव्हता अगदी आलिया भट, ऐश्वर्या, करीना, कॅटरीना ,माधुरी, अँजोलीना त्याच्या पुढे आणून उभ्या केल्या तरी, तीन इंचाच्या माणसाला त्या उपयोगाच्या नव्हत्या. दुसऱ्या डब्ल्यू चा विचार म्हणजे वेल्थ, पण त्याचा उपयोग कितपत होणार होता हे माहीत नव्हते अगदी लाखो-करोडो ची संपत्ती त्याला दिली तरी त्याच्या एवढ्याशा हेलिकॅप्टर मधून त्याला किती वाहून नेता येईल हे माहीत नव्हते .शिवाय त्याच्या ग्रहावर कोणती करन्सी चालते ते पण मला माहीत नव्हते .

उद्या पर्यंत माझी बायको घरी येणार होती व त्याच्या आत या माणसाला मला कटवायचे होते व काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता आता तिसरा डब्ल्यू म्हणजे वाइन तेवढाच एक उपयोग बाकी होता त्याने काही फरक पडेल का? काही उपयोग होईल का? हे मला बघायचे होते त्याला देखील इथल्या प्रत्येक गोष्टीचा वापर समजून घ्यायचा होता .माझ्या प्रत्येक कृतीकडे तो कुतूहलाने पाहत असे व मला प्रश्न विचारत असे. पण एकंदरीत प्रकरण डेंजर होते भविष्यात पृथ्वीवासीयांना ते महाग पडणार होते त्यांना पडेल तेव्हा पडेल पण मला ते उद्यापासूनच महाग पडणार होते उद्या माझी पत्नी घरी येणार होती, व गेल्या चार दिवसाच्या विरहाचा वचपा ती काढणार होती .पण हा टिकू मात्र माझ्याच बेडरूममध्ये ठाण मांडून बसलेला होता .माझा मोठाच प्रॉब्लेम होणार होता तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या घरातून त्याला आज बाहेर पाठवायचा होता.हा माणूस खातो काय? पितो काय ?याचा शोध घेणे मला गरजेचे वाटले विचार कर करून मी माझ्या पेय पानाचा सरंजाम मांडला व अचानक एक कल्पना माझ्या मेंदूत आली अर्थात मी च च्या भाषेत विचार करायला शिकलो होतो "बस मी कल्पना अमलात आणण्याचे ठरवले !"त्याप्रमाणे त्याला खाण्यापिण्याची ऑफर दिली

मित्रा बस !"आमच्या भारतीय संस्कृती प्रमाणे तू आमचा पाहुणा आहेस तेव्हा तुला खायला प्यायला देणे हे माझे कर्तव्य आहे. मी त्याला म्हणालो त्याने आढेवेढे घेत, कटकट करत का होईना पण माझी ऑफर स्वीकारली

आता त्या तीन इंची माणसाला खायला तरी कसे द्यायचे? मी त्याला तळहातावर घेतला मोठ्या प्रेमाने माझ्या चेहऱ्यावर जवळ हात घेऊन एक फुंकर मारली माझ्या विस्की भरल्या फुंकरीने तो थोडासा डगमगल्या सारखा वाटला. पण त्याला बहुदा ते आवडले असावे, अजून एकदा तसेच कर मला काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय व आवडतय देखील तो म्हणाला मी पुन्हा फुंकर मारली तो पुन्हा डगमगला मात्र यावेळी त्याने खुश होऊन माझ्या तळहातावरच उडी मारली जर तुला ते आवडलंय तर मग तू माझ्या हातातील पेयच का ?पीत नाहीस ?मी सरळ त्याला व्हिस्कीच्या ग्लासात सोडून दिला मरूदे त्यातच बुडून फार फार तर काय होईल एक ग्लास दारू वाया जाईल पण त्याने जर माझ्या पृथ्वीवरील संकट कळत असेल तर मला चालेल पण तो बेटा माझ्यापेक्षा हुशार निघाला तो आत मध्ये मजेत पोहत पोहत विस्की पिऊ लागला आता मला त्याची असूया वाटू लागली. कधीतरी टब भरून दारूत अंघोळ करायची हे माझे स्वप्न तो अनुभवत होता जरा वेळाने तो टुणकन उडी मारून बाहेर आला आता त्याचे हेलिकॅप्टर देखील लपलपत्या जिव्हेने ग्लास कडे येऊ लागले. मी मात्र त्याला मनाशी घाबरलो होतो ,त्याने एखाद्या सरड्यासारखी जीभ लांब केली उरलेले पेय पिऊन टाकले. त्यानंतर दोघेही भिरभिरल्या सारखे घरात फिरू लागले आणि माझा प्लान यशस्वी होणार याची मला खात्री पटली .मी पुन्हा दारूचे दोन ग्लास भरले व दोघांना देखील ऑफर केली दोघांनी एका मिनिटात दोन्ही ग्लास खाली केले .पुन्हा ग्लास भरले त्यांनी पुन्हा खाली केले मी अचंबित होऊन पाहतच राहिलो या तीन इंच माणसाच्या पोटात दीड लिटर दारू कशी काय मावली हे मात्र कोडेच होते.

आमच्या ग्रहावर असल काही मिळत नाही! याचं नाव काय? त्याने विचारले याला मदिरा म्हणतात व याची विविध नावे, विविध प्रकार, आहेत कोणी रम म्हणतात, कोणी व्हिस्की म्हणतात ,कोणी शाम्पेन म्हणतात, कोणी बियर म्हणतात एकंदरीत हे दारू पुराण खूप मोठे आहे .

हे कसं तयार करायचं ते मला सांगशील?

हो जरूर सांगेन पण त्याआधी मला तुझी माहिती सांगशील?

मी त्याला प्रेमाने गोंजारल. तोपर्यंत तो चांगला टुन्न झाला होता त्याने मला स्वतःच्या ग्रहाबद्दल व स्वतः बद्दल देखील बरीच माहिती पुरवली त्याच्या माहितीप्रमाणे तो झिप्रॉन परग्रहावरचा जरूर होता पण त्यांचा ताफा वगैरे अजून पृथ्वीवर आला नव्हता .तर जसा योगायोगाने कोलंबसला अमेरिकेचा शोध लागला तसाच हा प्राणी योगायोगाने पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात सापडून भरकटत इथे आला होता व त्याला पृथ्वी बद्दल माहिती मिळाली .मात्र तो इथून परत गेला तर, तो पृथ्वीवर जरूर आक्रमण करणार होता कारण सुरुवातीलाच वर्णन केल्याप्रमाणे खरोखर त्यांच्या ग्रहावरची परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती .तरी त्यातून ते मार्ग काढत होते जर त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतून चुंबकीय तत्त्वाचा मारा पृथ्वीवर केला तर मात्र पृथ्वीवर हिमयुगात उतरून मानवजात नष्ट करण्यात ते यशस्वी होणार होते व भविष्यात ते पृथ्वीवर येऊ शकत होते एवढी माहिती देऊन तो ढेर झाला त्याच्या हेलिकॉप्टरची देखील हीच अवस्था होती. मी घाईगडबडीने दोन सेम  मापाचे दोन डबे काढले व त्यात त्यांना कोंबले त्यानंतर दोन लेदर पाऊच मध्ये घालून व्यवस्थित पँकींग करून त्यांना रात्रभर अधांतरी ठेवले कारण त्यांची शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात होती जर त्यांना अधांतरी ठेवले तर ते काहीच करू शकत नव्हते मी रात्रभर दोन्ही डबे झोपाळ्याच्या कडीला टांगून ठेवले व रात्रभर त्यावर पहारा करत बसलो सकाळ झाल्याबरोबर निर्माल्याच्या पिशवीत घालून सकाळी सकाळी दादर ला जाऊन खोल समुद्रात त्यांचे विसर्जन करून आलो केवढ्या मोठ्या संकटातून मी पृथ्वीवासीयांना सोडवले होते घरी येऊन मी निश्चिंत मनाने दोन दिवसाची झोप पूर्ण करण्याचा विचार केला व मी कधी झोपेच्या आधीन गेलो ते मला कळलेच नाही किती काळ झोपलो माहित नाही

खरे तर मला जागतिक शांततेचे नोबेल पारितोषक मिळावयास पाहिजे होते किंवा भारत सरकारने भारतरत्न ही पदवी द्यावयास पाहिजे होती नाहीतर माझ्या पराक्रमाची दखल घेऊन गेला बाजार पद्मभूषण पद्मविभूषण द्यायला पाहिजे .सैफ सारख्या माणसाला पद्मविभूषण मिळते ते मला का मिळू नये ? आणि जागतिक पातळीवर माझ्या या पराक्रमाची खरोखरी दखल घेतली गेली मला जागतिक शांततेचे बद्दल नोबेल पारितोषक मिळाले होते व मी ते मानपत्र घेण्यासाठी स्टेजवर चाललो होतो माझ्या सन्मानाप्रीत्यर्थ अनेक वाद्ये वाजत होती व त्यात मध्येच घराची बेल वाजल्यासारखा टन टन टन असा आवाज वारंवार येत होता हे कसले वाद्य आहे असा विचार मी करत असताना मी जागा झालो तर, माझ्या घराची बेल तर कर्कश्श पणे सतत वाजत होती .क्षणभर मला काही समजेना आतापर्यंत मी जागा होतो, का स्वप्नात होतो? मी स्वतःला चिमटा काढला, खरोखरच दरवाज्याची बेल वाजत होती. मी जाऊन दार उघडले दरवाजा साक्षात बायको उभी!

" हे काय? किती वेळ झाला? मी बेल बडवतेय झोप म्हणता का? झोपेचं सोंग?  ती दाणकन आत आली, घरात घरभर व्हिस्कीचा वास पसरलेला त्यात दोन दिवस झोप न मिळाल्याने डोळे तांबूस झालेले, व तारवटलेले डोळे बघून तिने त्याचा वेगळा अर्थ काढला व तोंडाचा तोफखाना सुरु झाला .

आता खरेच परग्रहवासी, ते यान ,खरे होते ?की माझ्यावरचा दारूचा अंमल होता कोणास ठाऊक ?मनात बरेच काही खदखदत होते पण सांगणार कोणाला? असेच दोन दिवस गेले आणि घरातले स्टीलचे एका मापाचे दोन डब्बे गायब असल्याचा तिला साक्षात्कार झाला .तीने बडबड करायला सुरुवात केली" मेले दारू ढोसून पडले असाल ,आणि कामवालीने तुमचे लक्ष नाही असे बघून एका मापाचे स्टील चे दोन डबे हातोहात लंपास केले तिच्या या वक्तव्यावरुन मला खरोखर आनंद झाला व मला निश्चिंतपणे एवढे कळले जे घडले ते खरेच होते पृथ्वीवरच्या संकट सध्यातरी टळलेले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama