ती, मी आणि आमची स्टोरी - भाग 4
ती, मी आणि आमची स्टोरी - भाग 4


बारावीची परीक्षा झाली आणि मी लगेचच पुण्याला धनकवडी येथे जॉब वर रुजू झालो होतो. नुकतंच 18 वय लागलं होतं. एक महिन्याभराच्या काळातच कंपनीच्या काही कामानिमित्ताने मला माझ्या सिनिअर बरोबर नागपूरला पाठवलं होतं. साधारण 20-25 दिवस लागणार होते. तिथे जाऊन एका ठिकाणी आमची रहाण्याची व्यवस्था झाली होती. साधारण संध्याकाळी आम्ही तिथे पोहचलो होतो. माझ्यासाठी तर हे सगळंच नवीन होतं. दुसऱ्यादिवशी काम उरकून आम्ही दोघे फेरफटका मारावा म्हणून रस्त्याने जाताना मला समोरच्या गल्लीत एका घरासमोर एक मुलगी दिसली आणि मी स्तब्ध झालो. खरं तर तिचं सोंदर्य शब्दात लिहिता येईल असं नाही वाटत मला पण त्यावेळी इतक्या गर्मीतही ती किती थंडावा देऊन गेली होती. गोरीपान, नाकी -डोळी नीटस, गालातल्या खळीत जेंव्हा हसायची तेंव्हा अख्ख नागपुर थांबल्यासारखच भासायच. नागपुर थांबू आगर न थांबु मी मात्र तिला पाहताना कित्येकदा स्तब्ध व्हायचो. तिच्याशी खुप बोलावसं वाटायचं पण हिंमतच व्हायची नाही. रोज तिला पाहण्यासाठी मी माझ्या सिनिअरला विनवण्या करून तिच्या दरवाज्यावरून चकरा मारायचो. यात कसलाही खंड पडत नव्हता.
माझं तिच्याकडे पाहणं, तिच्या दारातून चकरा मारणं हे तिच्याही केंव्हाचंच लक्षात आलं असेल पण आत्ताच्या इतक्या त्या वेळी मुली मुलांशी एवढ्या बोलत नव्हत्या. आत्ताच्या इतक्या सुविधाही नव्हत्याच तेंव्हा. मग काय चकरा मारणं चोरून पाहणं हे चालु होतं.
तिच्याकडे एक सायकल होती रोज शाळेतून येताना जाताना तिच्या सोबत ती सायकल असायची. बहुतेक वेळा तर ती सायकल असूनही सायकल हातात धरुन चालायची काही दिवसांनी कळलं की ती मोठ्या गाड्यांना घाबरायची. (कसं कळलं ते आम्हा दोघांनाच माहिती आहे. खटाटोप करावा लागला तेव्हढा) तिच्या अशा बऱ्याचशा गोष्टी मला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडायच्या. हे रोजचंच झालं होतं पण काम आणि दि
वस कधी संपले ते कळलंच नाही. म्हणून तिला सांगणं गरजेचं होतं. मनातल्या भावनाही आता ओठांवर धडका मारू लागल्या होत्या. मग ठरवलं तिला सगळं सांगून टाकायचं. तिला सांगायचं की माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर. नाही म्हंटली तरी चालेल पण मन तर मोकळं होईल.
आम्ही परत पुण्याकडे निघणार त्याच्या दोन दिवस आधी मी शब्द आठवून-आठवुन एक चिठ्ठी लिहिली आणि पुन्हा पुन्हा वाचली. चिठ्ठीच्या शेवटी माझ्या सिनिअरचाच मोबाईल क्रमांक लिहिला कारण त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता. ती लिहिलेली चिट्ठी मी परत परत वाचली. चिठ्ठी वाचताना मी स्वतःशीच मनोमन कित्येकदा हसलो असेल. दुसरे दिवशी संध्याकाळ झाल्यावर मनात धडधड घेऊन निघालो तिच्या घराकडे, भीती होतीच त्या बरोबर ती हो म्हणेल की नाही की घरी सांगेल अशी काळजी सुध्दा होती. माझा सिनिअरही होता माझ्या बरोबर. त्याच्याही डोळ्यात भीतीचं सावट स्पष्ट दिसत होतं.
तिचं घर जवळ येत होतं आणि माझ्या मनाची धडधड वाढत होती. आम्ही तिच्या घराजवळ गेलो तर तिथे मला खुप गर्दी दिसली थोडं पुढे गेलो तर लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोडे पुढे गेलो आणि माझ्या पाया खालची जमीनच सरकली वाढलेली काळजाची धडधड क्षणात थांबली. एकदम सुन्न झालं. मनातल्या भीतीची जागा क्षणात आसवांनी घेतली. खिशातल्या चिठ्ठीचा बोळा करत मी तसाच मागे फिरलो आणि रूमकडे चालु लागलो. तो हसरा चेहरा आता कधीच हसणार नव्हता, मनाला सुखावणारा तोच चेहरा आता कधीच दिसणार नव्हता. अगदी खास पुण्याहून परत एकदा नागपूरकडे तिला पहाण्यासाठी धाव घेतली तरीही दिसणार नव्हता.
त्या दिवशी ती क्लासवरून सायकलवर येताना एका ट्रकने तिला धडक दिली होती. आणि त्यातच ती गेली होती. आजही जेंव्हा ती आठवते तेंव्हा हाच विचार मनात येतो की यार उगाचच गेलो आपण तिथे, नसतो गेलो तर कदाचित तो हसरा चेहरा आठवणीतच का होईना पण किमान हसताना तरी दिसला असता.