ती, मी आणि आमची स्टोरी - भाग 2
ती, मी आणि आमची स्टोरी - भाग 2


बऱ्याचदा कसं होतं ना की काही अपेक्षा नसतानाही आपल्याबरोबर बरंच काही घडून जातं. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन..? अहो पण हे नवीन नाही हे जुनंच आहे. राँग नंबरमुळे झालेली मैत्री ऐकली आहे का..? ऐकलेच असेल कारण होते अशी मैत्री... माझीही झाली होती.
कविता... माझी मैत्रीण. तशी आमची ओळख राँग नंबर मुळे झाली होती. सहाजीकच मैञीचा हात मीच पुढे केला होता. अहो त्या वयातली सवयच असते ती पण हा पहिलंच सांगतो की आमच्यातली मैत्री ही निखळ आणि निर्मळ अशीच होती. जितक्या सहजतेने तिने मैत्री साठी होकार दिला होता त्या वरून तर तिच्याशी मी फ्लर्ट करणं श्यक्यच नव्हतं. दिसायला कशी होती माहीत नाही पण स्वभावाने प्रेमळ होती हे नक्की. थोडीशी घाबरट होती यावरून एक संज्ञा मिच स्वतः तयार केली ती म्हणजे मैत्री ही घाबरटसुद्धा असते. ती डी एड च्या शेवटच्या वर्गात शिकत होती. कधी कधी बोलायला लागली तर खुप बोलायची. हळुवार आवाजातील तिचं बोलणं म्हणजे पावसाने यावं आवाज न करता बरसावं आणि वाटेवर प्रफुल्लित करून सोडणारा मातीचा सुगधं देऊन जावं असंच होतं. आणखी विशेष म्हणजे तिचं लग्न ठरलेलं असताना देखील तिने माझ्याशी मैत्री केली होती. याबाबतचा अंदाज मात्र मी कधीच लावला नव्हता आणि याबद्दल मी तिला कधी विचारलं सुद्धा नाही. हे कोडं मात्र न उलगडणारच ठरलं.
मी कधीतरी स्वतःचा आवाज रेकॉर्डिंग करून वगैरे ऐकला तर मलाच कसातरी वाटतो पण ही मात्र सारखी म्हणायची "तुझा आवाज काळजात घर करतो रे, तू खूप छान बोलतोस.."
अगदी साधी गोष्ट असली तरी फोन करून वि
चारायची सवय होती तिला. होणाऱ्या नवऱ्याबद्दल, ज्यांच्याकडे रहायची त्या काकांबद्दल बोलायची. आई वडील नव्हते तिला. आणि म्हणूनच कदाचित ती मनमिळाऊ असावी. दिवस सरत होते तस तशी आमची मैत्री अजून घट्ट होत गेली. आमच्यातली घट्ट झालेली मैत्री मात्र जास्त दिवस नाही टिकली.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी माझ्या प्रेयसीचा मिसकॉल आला आणि योगायोग असा की बरोबर दोन मिनिटांनी हिचासुद्धा मिसकॉल आला. काळच तो होता ना एक रुपया प्रतिमिनिट कॉल दर मग मिसकॉलच येणार ना..? नशिबसुद्धा माझ्यावर उदार नव्हतं मोबाईलमध्ये पाच रुपये बॅलन्स होता. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे मी प्रेयसीला प्रथम प्राधान्य दिलं आणि होता नव्हता तो बॅलन्स तिथेच संपून गेला. मी नंतर रिचार्ज केला खरा पण मला फोनवर ती कधीच भेटली नाही. दरवेळी तिचे काका रिसीव्ह करायचे आणि राँग नंबर म्हणून मी फोन ठेऊन द्यायचो. आयुष्यात कधी कुठला नंबर राँग लागेल हे कळतंही नाही. खरंतर त्या दिवशी तिला फोन न करता मी माझ्या प्रेयसीला फोन केला आणि खऱ्या अर्थाने तोच नंबर राँग लागला होता.
तिला त्या दिवशी नक्की काय सांगायचं असेल..? तिने नंबर तर बदलला नसेल ना..? लग्नाला ये असं तर सांगायचं असेल का तिला..? मग तिचा परत फोन का नाही आला..? साधा पाच रुपयांचा पेन घ्यायचा झाला तर फोन करून मला विचारणारी कविता परत कधी साधा एक फोनकॉल करू नाही शकली. असे कित्येक प्रश्न अगदी आजपर्यंत तसेच राहिलेत. त्यांची उत्तरं मात्र कधीच सापडली नाहीत. तेव्हा मात्र वाटलं की मुलींशी मैत्री..! नको रे बाबा. त्या आयुष्यभर छळतात आणि न सुटणारे प्रश्न आपल्या वाट्याला सोडून जातात.