ती, मी आणि आमची स्टोरी - 1
ती, मी आणि आमची स्टोरी - 1


पाऊस आला की पळून जाणारे आणि पावसात मनसोक्त भिजणारे लोकही पाहीलेत मी.. पावसाचा पहिला थेंब चेहऱ्यावर घ्यायचा मोह मला तरी नाही आवरत. पाऊस म्हणजे आठवणींची सांगड. अशीच एक गोष्ट तिच्या आणि माझ्या पावसाची. खरंतर ही ती म्हणजे माझी प्रेयसीच काय अगदी मैत्रिणही नव्हती.
"आयुष्यात एक तरी मैत्रिण असावी" या म्हणीप्रमाणे मी आजतागायत २०-२२ मुलींशी मैत्री केलीय (स्वच्छ, निर्मळ, आणि पारदर्शक) यात कसलाही वाईट हेतू नव्हता. आणि आपली प्रेयसी किंवा पत्नी ही आपली चांगली मैत्रिण असावी असंच मला वाटतं (म्हणजे प्रेयसी अथवा होणाऱ्या बायकोशी मैत्री करावी. उगाच मैत्रिणीशी लग्न करण्याचा हट्ट धरु नये.) नातं सहज सुंदर होण्यास मदत होईल.
असो विषय भरकटण्या अगोदर मुद्द्यावर येतो.
मी नांदेड फाटा, खडकवासला, पुणे येथे जॉब करत होतो तेेव्हाची गोष्ट. आमच्या कंपनीसमोरील कंपनीमध्ये एक मुलगी होती, अकाऊंटंट म्हणून असावी कदाचीत. दिसायला म्हणाल तर देखणी, स्मार्ट असं काही नव्हतं म्हणा पण समोरच्याला आकर्षित करेल अशी नक्कीच होती. गुपचूप ती मला पाहात असायची. तिचं तसं पाहून हसणं आजही माझ्या लक्षात आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल कधी तसं काहीच नव्हतं... मी काय शेवटी निळ्या कपड्यातला साधा workar होतो. कधीतरी चुकून नजरा नजर व्हायची इतकंच. ही नजरा नजर मात्र कंपनीतल्या पोरांच्या नजरेतून सुटली नाही आणि व्हायचा तो विषय झालाच. नंतर हे सारं एवढं टोकाला गेलं की पोरं तिला माझ्या नावाने चिडवायला लागलीत. हळूहळू हे तिलाही कळालंच. आता मात्र तिच्या नजरेचा दृष्टीकोन बदलला होता. त्यात राग दिसत होता. पण तिचं रोज माझ्याकडं पाहणं बंद नव्हतं झालं...
पोरांच्यात असल्यावर. किंवा दरवाज्यात आल्यावर ती माझ्यासमोर थांबत नव्हती. आणि एक दिवस तिच्याशी बोलण्याचा योग आलाच. त्या दिवशी खूप पाऊस होता म्हणून मग मी over time ला थांबलो नाही. मी गाडीची वाट पाहण्यासाठी stop वर गेलो तर हीसुद्धा होतीच तिथे. पावसात भिजणे माझ्या आवडीची गोष्ट. कवी मनाच्या मला पाऊस भावणारच अगदी धो-धो असो की रिमझीम.. मी एकदाच तिच्याकडे पाहून तसाच उभा होतो. निळ्या छत्रीत ५.३० च्या वेळी ती जरा छानच दिसत होती. पावसाबरोबर वाराही अंगाला झोंबत होता. मी तसाच उभा होतो आणि अचानक मागून कानावर धडकलेल्या आवाजाने रोमांचित झालो.
"भिजतोस काय असा छत्रीत ये" मी शांतच उभा क्षणभर काही कळतच नव्हतं ना..?
"तुम्ही मुलं पण ना, छत्री आणायला काय होतं रे...?" मी मानेनेच मुंडी हलवून प्रतिसाद देत होतो. "हा पाऊस पण कसा अवेळीच येतो ना." (हे जरी ती म्हणत होती तरीही हा अवेळी आलेला पाऊस माझ्यासाठी सुखावणाराच होता) ती पहिल्यांदाच माझ्याशी बोलत होती. तिच्या त्या हळूवार बोलण्यात क्षणासाठी का होईना मी हरवून गेलो होतो. बोलताना ती कंपनीतल्या मुलांबद्दलच जास्त बोलली, त्यांचं तिला चिडवणं आवडत नव्हतं. इकडचं तिकडचं बोलून ती मुद्यावर येणारच होती पण तितक्यात तिथे माझा एक मित्र आला. थोडंसं बोलणं टाळत ती बाजूला उभी राहिली. हा नेमका आत्ताच का कलमडला मनोमन असा विचार करत होतोच तेवढ्यात तिची बस आली बाय म्हणत ती निघून गेली. (तिच्या मनातला खरा मुद्दाही बसमध्ये निघून गेला).
त्या दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर smile आली होती. तिचं मन हलकं झालं असावं. पुन्हा एकदा तिचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. लाजऱ्या स्वभावाचा मी, मी मात्र स्वतःला लपवत होतो. परत कधी समोरा-समोर बोलायचा योगही नाही आला. काही दिवसात मी तो जॉब सोडला. कधी तरी दिसायची ती, मी मात्र कधी समोर गेलोच नाही. तिचं नाव काय असेल हेही मला माहीत नाही.. मात्र ती कायम लक्षात राहील चांगली मैत्रिण म्हणून... आणि तेही without guilt...