Sarita Sawant Bhosale

Drama

3  

Sarita Sawant Bhosale

Drama

तिची मैत्री त्याचे प्रेम

तिची मैत्री त्याचे प्रेम

4 mins
12.3K


आज जवळ जवळ दोन वर्षांनी तो दिसला... अचानक. समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभा, तोही तिच्याकडे बघत होता.. तिने मात्र बघून न बघितल्यासारखं केलं आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसलं. पण मन अस्वस्थ झालेलं.. त्याला पाहून भूतकाळ सरसर डोळ्यासमोर उभा राहिला.


इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षाला एका डान्सच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. डान्समध्ये तो तिचा पार्टनर होता.. हे त्याच्या लक्षात राहिलं, पण ती आठ दिवसांच्या डान्स प्रॅक्टिस आणि डान्स शो नंतर विसरूनही गेली. दोघे एकाच क्लासमध्ये.. त्याची नजर रोज तिच्यावर खिळायची... रोज तिचं बोलणं, चालणं, हसणं नजरेत सामावून घ्यायचा. त्याच्या नकळतही ती त्याला कधी आवडू लागली कळलंच नाही. ती मात्र सगळ्यापासूनच अनभिज्ञ. एका प्रोजेक्ट ग्रुपमुळे दोघे पुन्हा एकत्र आले...


मी तुझा डान्स पार्टनर म्हणून त्याने तिला नव्याने ओळख करून दिली. तिचीही गाडी, ओके तोच का तू म्हणत मैत्रीवर आली. एकच प्रोजेक्ट ग्रुप.. तो खूप मेहनती, प्रामाणिकपणे काम करणारा.. तिचाही स्वभाव प्रत्येक कामात स्वतःला झोकून देणारा, यशाला स्वतःकडे खेचून आणणारा आणि मनमोकळं बोलणं, समजून उमजून वागणं.. याने hi hello ची मैत्री स्वतःची सुख-दुःख वाटून घेणाऱ्या घट्ट मैत्रीपर्यंत पोहोचली.


तिच्याकडून फक्त निर्मळ मैत्रीच होती पण त्याची मैत्री ती आवडण्या पलीकडेही गेली होती. हळूहळू त्याचं बदललेलं वागणं, तिची जास्तच काळजी घेणं, तिचं इतर कोणाशी बोलणं त्याला खटकणं तिला बरंच काही सांगून गेलं. हळूहळू त्याच्याशी बोलणं कमी करू लागली..एक दिवस त्याने तिला प्रपोजच केलं.. जवळच्या मित्राकडून हे अनपेक्षित होतं तिला. तिने सरळ नकार दिला. पण मैत्री ठेवून तुझ्या खोट्या आशाही मला वाढवायच्या नाहीत असं सांगून मैत्रीही नाकारली. तो बैचेन.. ती सहज हो बोलणार नव्हती माहीत होतं त्याला.. पुन्हा असं होणार नाही बोलून परत मैत्रीचा हात पुढे केला.. खूप विनंती नंतर आणि विचार करून तिने मैत्री स्वीकारली. पण त्याच्या मनात तिच्यावर असलेलं प्रेम शांत बसू देत नव्हतं.. पुन्हा तोच प्रश्न आणि तिचं पुन्हा नकार देणं.


आता तो होकार मिळवण्याच्या हट्टासच पेटला. प्रेमाचं रूपांतर फक्त तिला मिळवण्याच्या हट्टात झालं होतं. जाणून बुजून तिला सारखे फोन करणे, मेसेज करणे, जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करणं, प्रोजेक्टमध्ये त्रास देणे.. कोणत्या ना कोणत्याप्रकारे हो वदवूनच घ्यायचं त्याने ठरवलेलंच. ती मात्र आतून तुटलेली.. मित्र म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवला.. हक्काने प्रत्येक गोष्ट सांगितली.. संकटकाळी एकमेकांना मदत केली, आज तो मात्र तिला फक्त मिळवण्याच्या हेतूने तिचाच शत्रू झालेला. एक मैत्रीण म्हणून खूपदा त्याला समजावायचा तिने प्रयत्न केला पण सारं निष्फळ ठरलं. एक दिवस याच हट्टापायी त्याने तिचा हात जबरदस्ती पकडण्याचा प्रयत्न केला.. तिचा स्वतःवरचा ताबा सुटून तोच हात त्याच्या गालावर पडला. तो चांगलाच चिडला. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सगळं प्रकरण तिने घरी कळवलं.


जे नको व्हायला हवं होतं तेच झालं... घरच्यांनीही मुलाशी मैत्री का ठेवलीस म्हणून आधी तिला ऐकवलं. वेळ बघून त्यालाही समज दिली, पण या सगळ्यात ती पुरती हादरली. मैत्रीसारख्या पवित्र नात्यावरुन विश्वासच उडाला. केवळ त्याच्या हट्टामुळे आज ती तिच्या घरच्यांच्या नजरेत दोषी ठरली होती. तिचा दोष फक्त तिने प्रामाणिकपणे मैत्री केली होती पण सर्वांच्या नजरा तिने कोणतं पाप केल्यासारखं खायच्या तिला. काही दिवस कॉलेज बंद केलं.... स्वतःला सावरत ती पुन्हा उभी राहिली... त्यानंतर तिने त्याचं कधीही तोंड पाहिलं नाही. तितक्याच अतूट विश्वासाने कोणाशी मैत्रीही करू शकली नाही.


एव्हाना तो भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा ठाकला होता.. प्लीज कॉलेजमध्ये जे काही घडलं त्याबद्दल मला माफ कर.. त्यावेळी तुझ्याकडून प्रेमाची जबरदस्ती कबुली करून घेणं चुकीचं होतं.. तुझ्या मैत्रीचा मी आदर करायला हवा होता.. मी विनाकारण तुला खूप त्रास दिला.. त्या दिवसापासून ते आतापर्यंत मी तुझी माफी मागायची एक संधी मिळावी म्हणून देवाकडे रोज प्रार्थना करतोय.. तो आहेच कुठेतरी म्हणून आज इतक्या वर्षांनी अशी अचानक तुझी भेट घडवून आणली. माफ कर मला.


हवं तेव्हा तू मैत्री कर, हवं तेव्हा तू प्रेम कर, हवं तेव्हा तू ते मिळवण्यासाठी मला त्रास दे आणि आता हवं तेव्हा तुला वाटलं म्हणून तू माफी मागायला आलास. पण तुझ्या एका चुकीमुळे मी माझ्या घरी, माझ्या वैयक्तिक आयुष्यात किती अन काय काय भोगलंय याची कल्पना तुला नाही आणि तुझ्या एका माफीमुळे आता ते सगळं परत येणारही नाही आणि "खऱ्या मैत्री"वर असणारा माझा गेलेला विश्वासही परत येणार नाही. प्रेम मिळवायचं, नाव नाही द्यायचं, नाव आहे... तसं मैत्रीही निरपेक्ष निभवायची असते. इतकं बोलून ती समोरच्या ट्रेनमध्ये बसून निघून जाते... तो त्याच्या माफीसकट माघारी फिरतो.


कथा सत्य अनुभवावरून कथन केली आहे. निर्मळ मनाने केलेल्या मैत्रीकडून प्रेमाची अपेक्षा करणं.. नकार ऐकून अहंकार दुखावला जाणं आणि त्यातूनच प्रेम करणाऱ्या व्यक्तीस इजा पोहचवण हे घडतच आलंय.. घडतंय. मैत्री, प्रेम मनातून आलेल्या निर्भेळ भावना असतात त्यांचा अपमान न होता, आरोप/प्रत्यारोप न होता एकमेकांकडून आदर होणं खूप महत्वाचं असतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama