Jyoti gosavi

Comedy

4.5  

Jyoti gosavi

Comedy

थ्रिलिंग मॅरेज

थ्रिलिंग मॅरेज

8 mins
445


तो एक शुभमंगल कार्यक्रम होता खरा! परंतु अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले.

खरे तर हे लग्न लव्ह मॅरेज कम अरेंज मॅरेज होते.


आरुषी आणि धनंजय हे गेल्या पाच वर्षापासून एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते.आधी ओळख झाली फेसबुक वरून, मग त्याचे रूपांतर भेटीत झाले, मग गाठीभेटी होऊ लागल्या, नंतर प्रेमात पडले, आणि त्यांच्या प्रेमाची गाडी लग्नाच्या स्टेशन पर्यंत येऊन पोहोचली.


बरं !दोन्हीकडची मंडळी राजी होती. 

 कोणी अडकाठी करण्याचा काही प्रश्न आला नाही. जर मुलाला मुलगी, मुलीला मुलगा पसंत आहे! तर आपण कशाला आडवा? असा विचार आजकालचे सुज्ञ पालक मंडळी करतात. 


शिवाय नुसती पसंती नव्हे तर एकमेकाच्या तोलामोलाचे होते, इतकेच काय एकमेकाच्या जातीचे पण होते. त्यामुळे कोण कशाला अडवणूक करेल? सारंच काही छान छान चालू होतं.

आणि अचानक लग्नामध्ये धनंजयने असा पवित्रा घेतला कि, त्याला बुलेट गाडी पाहिजे .

त्याबरोबर सगळ्यांची खळबळ उडाली, 


"अहो एवढा शिकलेला सुशिक्षित मुलगा, शिवाय चांगली नोकरी आहे आणि कशासाठी हा सासरवाडी च्या लोकांकडून काहीतरी लुबाडण्याचा प्रयत्न करतो आहे"

 खरे तर सर्वांना रागच आला होता. पण आता ऐन लग्नाच्या प्रसंगी काहीतरी गालबोट नको म्हणून तिचे वडील बुलेट द्यायला कबूल झाले. कारण काय शेवटी एकुलती एक मुलगी आहे, आज ना उद्या सारं काही तिचंच आहे, मग कशाला आता आडवा? 

असे म्हणून त्यांनी अडीच लाखाची कॅश पाकिटामध्ये घालून ते जावयाला सुपूर्त केली. 

परत मंगल वाद्ये वाजू लागली. सनई वाजू लागली. सगळीकडे लगबग सुरू झाली. 

 करवल्या आपले नवे कपडे, मेकअप, गेट अप् इकडे तिकडे दाखवत मिरवायला लागल्या. ब्युटीशियन पुन्हा आपले हात सफाईने नवरीच्या चेहऱ्यावरून ,नवऱ्याच्या चेहऱ्यावरून फिरवत त्यांचे मेकअप करू लागल्या. 


स्टार्टर, कोल्ड्रिंक ,वेलकम ड्रिंक घेऊन फिरणाऱ्या वेटर ची लगबग सुरू झाली. मगाशी स्टेजवरचे लायटिंग बंद केले होते ते पुन्हा सुरू झाले.


काही जणांना अचानक लाईट गेल्यावर तशी शांतता पसरते, तशी शांतता का झाली होती? याचे कारण माहित होते. 

त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्यांना कारण माहीत नव्हते त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. असेल काहीतरी आपल्याला काय करायचे? झालं ना आता सुरळीत, बस झालं .


नाहीतरी नवरा येतो नवरी साठी आणि  वर्हाडी येतात जेवणासाठी. 


"कन्या वरेते रुपम! 

माता वितम्

 पिताश्री श्रुतम् 

आप्तेष्ट बांधवा

मिष्टान्न भोजना


 म्हणजे लग्नामध्ये कन्या मुलाचे रूप बघते. 

आई सांपत्तिक स्थिती बघते, पिता कुळ बघतो, आणि आप्तेष्ट बांधव मात्र मिष्टान्नाचा भोजनासाठी आलेले असतात. 

*****************

 रुखवताची ताटं मांडली गेली .भोजनासाठी वराकडील मंडळी येऊन बसली. अगदी जुन्या नव्या पद्धतीने रुखवताचे ताट शृंगारले होते. 

शेवया, नकुल्या, मालत्या, बोटव याच्या पंचखिरी पासून ,ते साबुदाणा पापड, उडीद पापड, तांदळाचे पापड, सुत्तर फेण्या, आणि आधुनिक पद्धतीचे चायनीज पकोडे, आळू वड्या, लाडू, करंज्या, चकल्या, शिरा, केशरभात, अशा अनेक अनेक सुगंध सुटलेली पकवान्ने ताटात भरलेली होती. 

जावईबापू येऊन बसले, सासूबाईंनी हासत हातावरती आपोषन घातले. आपोषण म्हणजे तुपाचा भरलेला चमचा हातावरती ठेवणे. त्याचे चाटण करून भोजनाला सुरुवात करतात.

 

हसत खेळत जेवण झाले, मुलगा नवरदेव श्रीवंदना ला जाऊन आला. 

वाजत गाजत घोड्यावरुन गेला, दोन्हीकडची वर्‍हाडी मंडळी धुमशान नाचू लागली. जसे मगाशी काही घडलेच नाही, अशा थाटात नवरदेव श्री वंदनाला जाऊन आला. 

अडीच लाखाचे गलेलठ्ठ पाकीट खिशामध्ये उब देत होते .त्यामुळे धनंजयने घोड्याला जास्त नाचवण्यास नकार दिला. कारण खिशातल्या नोटा बाहेर पडतील, अशी त्याला भीती वाटत होती. 

बर! ते पाकीट जवळ कोणाच्या ठेवावे, तर तसे त्याला समोर कोणीच दिसत नव्हते .

आई-वडील तर त्याच्यावर रागावलेले होते. ऐन वेळी आपल्या मुलाने, आपल्या सुसंस्कृत मुलाने ,बुलेट गाडी मागून आणि अडीच लाखाचे पाकीट घेऊन आपल्या तोंडाला एक प्रकारे काळ फासल आहे. असे आई बापाला वाटत होते. 

ते त्याच्यावर रागावले होते. त्याच्या स्वभावानुसार त्याचे मित्र देखील आश्चर्यचकित झाले .त्यांनादेखील धनंजयच्या या विचित्र वागण्याचा धक्काच बसला. कारण आपला मित्र कधीही कोणाची अडवणूक करणार नाही. उलट मदत करणारा आहे. अशा वेळी तो असे कसे काय वागू शकतो? त्यामुळे ते देखील त्याची निर्भत्सना करणारे होते. त्यामुळे त्यांच्या हातात त्याने पाकीट दिले नाही. शिवाय एवढी क्याश आहे कोणाचा विश्वास द्यायचा? म्हणून त्याने आपल्या खिशातच ते पाकीट एका हाताने दाबून धरले होते. आणि तो दुसऱ्या हाताने लगाम धरून घोड्यावर मांड टाकून बसला होता. 

जवळच श्री रामाचे देऊळ होते .

नवरदेव तिथे जाऊन देवाचे दर्शन घेऊन सुखी संसारासाठी प्रार्थना करून मांडवात आला. 

पण मांडवात आल्यावरती, तो आपल्या घोड्यावरून खाली उतरायला तयार होईना .

आता जावईबापूंच काय राहिलं?

 आता आणखीन काय पाहिजे? 

असा विचार करत आरुषीचे वडील जवळ गेले. 

चला जावई! लग्नाची वेळ जवळ आली आहे, घटिका भरली आहे. तिकडे भटजी वारंवार आवाहन करीत आहेत. तुम्ही घोड्यावरुन का उतरत नाही? आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक मांडवात न्यायला आलो आहोत. 


त्यावर धनंजय एकच वाक्य म्हणाला" मला हे लग्न मान्य नाही" मला हे लग्न करायचं नाही .

त्यावर मात्र एकदम शांतता पसरली. 

पिन ड्रॉप सायलेन्स, 

वाजंत्री थांबली. 


का काय झालं? 


काही नाही? 


"मला नाही करायचं लग्न"


 आता मात्र मुलीकडचे भडकले. 


"अहो हा काय पोरखेळ आहे? का एवढा खर्च केला आहे. आणि लग्नाची वेळ आल्यानंतर तुम्ही असे म्हणता? 

बर कारण तरी काय? मगाशी तुमच्या मनासारखं केलं! 


"तुम्ही बुलेट मागितली, तुम्हाला बुलेट एवढी कॅश आणून दिली. 

अजूनही तुम्ही काहीतरी अडवणूक करता? 

बर! काही वस्तू हवी असेल तर सांगा, आमच्याने शक्य असेल तर आणून देऊ. नाही मला तुमची कोणती वस्तू नको, मला ही कॅश पण नको. 

मला तुमची मुलगी पसंत नाही. मला करायची नाही. 


 आता मात्र सगळ्यांच तोंड सुटल

" अहो तुम्ही पाच वर्षे एकमेकांना ओळखता ना? एकमेकाच्या रिलेशनमध्ये आहात ,तुमच्या दोघांच्या पसंतीनेच हे लग्न करत आहे. असे असताना तुम्ही आता हे काय बोलता? 


काय नाही! साला माजला आहे. 

धरा! 

 "घोड्यावरून खाली ओढा! आणि चांगलं फटकावून काढा" मग मेंदू ताळ्यावर येईल. 


तिकडे पोराचे आई बाप देखील भडकले, 

'"अरे धनंजय तू काय चालवलं आहेस? तुला काही कळतंय का? 

का, काल रात्री मित्रांबरोबर पार्टी केली, काल रात्री भांग वगैरे प्याला आहेस का? 

तुला कोणी भरवल आहे का? 

तू काय बडबडतो आहेस तुला कळत आहे का? 


तुझ्यामुळे आमच्या देखील नावाला बट्टा लागतोय! आमचं तर काहीच म्हणणं नाही. 

आम्हाला सुनबाई तेव्हाही पसंत होती , आणि आजही पसंत आहे. 

पण तु हा काय आरंभ केला आहेस? 


काही नाही! पोलीस स्टेशनला फोन करा. 

त्यांचे चार फटके पडले म्हणजे डोकं ताळ्यावर येईल. कोणीतरी म्हणाले. 


" नको! नको! त्यापेक्षा याच मुहूर्ताला, याच मांडवात, मुलीला दुसरा वर शोधून लग्न लावून टाका "


काही लोक त्याला घोड्यावरुन खाली ओढायला धावले. मग मात्र तो म्हणाला. 


थांबा! तुम्ही जरा मुलीला माझ्यासमोर बोलावता का? 


तिला काय आधी पाहिलं नाही? 

तिच्याशी काय आधी बोलणं झालं नाही? 

आता नवीन काय बोलणार? 


नाही! नाही! तुम्ही माझ ऐका, आणि आरुषीला बाहेर बोलवा. 


तोपर्यंत ही बातमी आरुषी पर्यंत गेली होती. मगाची बुलेट साठी अडीच लाखाची कॅश घेतल्याची बातमी तिच्यापासून लपवलेली होती.

आता ती देखील तिला समजली, त्यावर प्रतिक्रिया म्हणून आरुषी तरातरा रागाने बाहेर आली. 


"ए धन्या उतरतोस की नाही खाली"

 का बघू आता तुला! 


 ही पाच फुटाची पोरगी, सहा फुटाच्या धनंजयला धमकी देत होती. 


"नाही उतरत! मला नाही लग्न करायचं तुझ्याशी" मुळीच नाही

 तू आयुष्यभर माझ्या डोक्यावर बसशील .


मग हे तुला आधी कळलं नाही का? 


आता मला तू आवडत नाहीस! 


हे तुला आधी दिसलं नव्हतं? पाच वर्षांत काय तुझे डोळे फुटले होते? 


उतर खाली! नाहीतर तमाशा करीन. 


आरुषी बेटा, त्याने आधी कमी तमाशा केलाय का? तो आता अजून तू काय करणार? आम्ही आई बाबा असून तो आमच देखील ऐकत नाही. 


अशी सगळी गरमागरमी चालू होती. 

सगळी माणसं वचावचा एकमेकांशी वाद घालत होती. 


शांत होते ते पोराचे आणि पोरीचे आईबाप, 

कारण त्यांना कोणी कोणाशी आणि का भांडायचं  तेच कळत नव्हतं . कारण त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीला नां नव्हती. 


आणि अचानक घोड्यावर बसलेला धनंजय हसायला लागला, आणि विचारतो कसा! 

आरुषी! एवढं थ्रील बास आहे का? का? अजून काहीतरी थ्रीलिंग  पाहिजे? असेल तर सांग, म्हणजे मी रात्रीपर्यंत असाच घोड्यावरती बसून राहतो. 


त्याबरोबर आरुषी हसायला लागली. 

आतापर्यंत ती रडत होती, तिच्या डोळ्यात गंगा-यमुना वाहत होत्या. आता मात्र रडता रडता ती खुदकन हसली, आणि जमिनीवरचा दगड उचलला

"ए धन्या! लवकर घोड्यावरून खाली उतर, लवकर! नाही तर माझा नेम चांगला आहे. मी तुझे डोके फोडीन. 


"उतर खाली !चल लवकर लग्नाला"

 असे म्हटल्याबरोबर धनंजय तो टुणदीशी उडी मारून खाली उतरला, आणि आरुषी च्या हातात हात घालून लग्नमंडपात येऊन उभा राहिला.


पण बाकीच्या जमलेल्या पाहुण्यांना मात्र काही समजेना, 

हे काय चाललं आहे? 

एवढा वेळ हा नवरदेव हटून बसला होता. 

"मला ही नवरी मान्य नाही" म्हणत होता. 

मग ती बाहेर धावत आली. पुन्हा दोघांत भांडण झाले. ती रडत होती आणि हा अचानक हसायला लागला. आणि ती देखील त्याच्या हातात हात गुंफून बोहल्याकडे चालती झाली. 


हे नक्की काय गौडबंगाल आहे? सगळ्यांनाच आता उत्सुकता होती. 

मग मुलाचे आणि मुलीचे दोन्ही आई बाप एकत्र आले, आणि भटजींना थांबवले. 


गुरुजी थांबा! नाहीतर यांनी मुहूर्त चुकवलाच आहे अजून दहा मिनिटाने काही घडत नाही. 

हे नक्की दोघं एकमेकांशी लग्न करणार का? आणि सुखासमाधानाने एकत्र नांदणार का? हे आधी त्यांना खडसावून विचारून घेऊ देत,  मगच लग्नाचा विचार करू. 


काय हो धनंजय राव! आत्तापर्यंत तुम्ही कीती ताणलं होतं. 

आम्ही तर तुम्हाला फार सज्जन आणि चांगले समजत होतो. पण तुम्ही तर एकदम पैशाचे लोभी निघालात. 

आता लग्नाला तयार झालात खरे, पण उद्या लग्न झाल्यावर आमच्या मुलीला त्रास दिला तर, काय करायचं? 

ठीक आहे तुमची एकमेकाशी पाच वर्षे ओळख होती. तुम्ही एकमेकांशी पाच वर्ष रिलेशन मध्ये होतात. एकमेकांच्या आवडी-निवडी तुम्हाला माहीत होत्या, पण अस अचानक काय झालं?


 ते तुमच्या मुलीलाच विचारा. 


काय ग आरुषी! काय गं! काय झालं? 


अगं काही नाही आई हा उगाचच माझे नाव घेतो. 

मी काही म्हणाले का? 


मग तो तुझे नाव का घेतो? 


जावईबापू आधी काय ते खरं सांगा, तरच आम्ही लग्न लावून देऊ. 


 सांगतो! सांगतो! "पण आमचं लग्न मोडू नका"

अहो तुमच्या मुलीला असे मिळमिळीत लग्न नको होते. 

लग्नात काहीतरी  थ्रिलिंग  पाहिजे ,असे तिला वाटत होते. 

आता काय झाले! आम्ही एकमेकाला अनुरुप होतो. आमचं प्रेम जमलं नाती देखील जुळली. आणि दोन्हीकडच्या आई-वडिलांनी कोणतीही आडकाठी घेतली नाही. 


आडकाठी घेण्याचा प्रश्नच नव्हता ना! 

कोणत्याच गोष्टीला नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. मुलगा मुलगी दोघे चांगले होतात ,सुशिक्षित होतात, आर्थिकदृष्ट्या सेटल होतात, शिवाय जातीचे पण होतात, मग कशासाठी आम्ही अडवणूक करायची? 


मग तिथेच तर ते घोडं पेंड खाल्लं. ती मला म्हणाली एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा म्हणाली, 


अरे! धन्या


 बघा बघा तुमची मुलगी किती सोज्वळ आहे ,की मला कधी पुर्या नावाने धनंजय म्हणून सुद्धा बोलवत नाही. 


सारखी धन्या! धन्या! करत असते. 


अहो जावईबापू! आमच्या मुलीचे बरोबर आहे. 

नाहीतरी तुम्ही तिचे धनी आहात, म्हणून ती धन्या धन्या करते. बघा किती संस्कारित मुलगी आहे. याबरोबर हास्याचा फवारा फुटला . 


ती म्हणाली, काय धन्या! काय आपलं मिळमिळीत लव मॅरेज! 

लव मॅरेज मध्ये कसं थ्रिल पाहिजे .

उगाच दोन्हीकडचे आईबाप परमिशन देतात, लग्न करून द्यायला तयार होतात. हे काय मला पटत नाही. 

आपण पळून जाऊ या का? बघ! किती सिनेमांमध्ये हिरो-हिरॉईन पळून जाऊन लग्न करतात. असं म्हणून ती माझ्यासमोर, 

"हम दोनो दो प्रेमी दूनिया छोड चले" हे गाणं म्हणायची .

नाहीतर ते सैराट मध्ये बघ, आर्ची कशी डॅशिंग आहे ,ती कशी परश्या ला घेऊन जाते त्याच्याशी हैदराबादला जाऊन लग्न करते ,संसार थाटते .

मला असं काहीतरी पाहिजे. 

आपण थोडे दिवस पत्राच्या घरात राहू, आपण पळून जाऊन लग्न करू, असे तिला भिकेचे डोहाळे लागले होते. 

 पण बाबा मी असल्या गोष्टीला तयार नव्हतो, मला तर व्यवस्थित दोन्हीकडचे आशीर्वाद घेऊन लग्न करायचं होतं. आणि हिला तर लग्नात काहीतरी थ्रिल पाहिजे होतं. मग अगदी ती पळून जायला पण तयार होती. 

म्हणून मग मी तुम्हा सर्वांना थ्रील फील केलं .


आरुषी एकदम खाली मान घालून चिडी चुप, चोरीछुपे उभी होती. 


वा!ग वा! शहाणे, तुझ्यामुळे आम्ही आतापर्यंत जावईबापूंना शिव्या देत होतो. 

तुझ थ्रिल चांगलंच आमच्या पण अंगाशी आलं होतं .

बरं! ते जाऊ द्या, तिला आता कोणी ओरडू नका. 


लग्नघटिका जवळ आली आहे. जे काय झालं ते सोडून द्या, दुसऱ्या मुहूर्तावर का होईना आमचं लग्न लावून द्या. धन्या बोलला


 पण थांबा त्याआधी आहे एक गोष्ट करायची आहे. तुम्ही जे बुलेट साठी म्हणून अडीच लाख मला दिले होते, ते मला मुळीच नकोत. ते तुमचे तुम्हाला परत. 

मला फक्त तिला थ्रिलिंग मॅरेज दाखवायचं होतं. 


"आता सर्वांनाच मिळाली थ्रिलिंग मॅरेजची मजा" त्याचे बाबा म्हणाले. 


जाऊ द्या, सोडून द्या, जावईबापू ते पैसे तुमच्याकडेच राहू द्या .

असा आहे, तुम्ही एक रुपया देखील हुंडा म्हणून, वर दक्षिणा म्हणून  घेतला नाही. 

आता या पैशाने आमच्याच मुलीला स्विझरलँड दाखवून आणा


 झालं का मग मनासारखं? 


बघ! बघ! माझ्या थ्रिलिंग मॅरेज च्या संकल्पनेमुळे, तुझा किती फायदा झाला. तुझा हनिमून चा खर्च वाचला. 

नाही! नाही! तो माझ्या माहेरच्या दिला .


अहो बाई साहेब मी एकटा हनिमूनला जाणार नाही ना? तुम्हाला पण घेऊन जाणार आहे त्यामुळे खर्च दोघांचा आहे. 


नको! नको! मी नाही येत, तू एकटा जा. ती म्हणाली


आता परत वाद नको, चला चला भटजींनी अंतरपाट ताणला आणि दोघांना दोन बाजूला उभे करून शुभमंगल सावधान अशी आरोळी दिली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy