तेजू मला माफ कर
तेजू मला माफ कर


ऑफीसातल्या दिवसभराच्या कामाच्या व्यापानं प्रेमंच डोकं नुसतं भणभणायला लागलं होतं. त्यातल्या त्यात आणखी भर ट्रॅफिक जाम गर्दीतुन वाट काढीत तो कसा बसा एकदाचा घरी पोह्चला, हेलमेट उतरवून बाईक शेडमध्ये पार्क करून जड पावलांनी जिना चढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला . सर्व दिवे लावताच दिवाणावर आडवा होणार तेंव्हा अचानक त्याची नजर दरवाजाच्या फटीतून टाकलेल्या पाकीटावर गेली. त्याने क्षणार्धात ते पाकीट फोडून पत्रातला मजकुर वाचत तो दिवाणावर आड्वा झाला.
'प्राणप्रिय सखा प्रेम,
मला फार फार अस्वस्थ वाट्तंय रे. खरं सांगु प्रेम तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही रे. मी इकडे माहेरी असले तरी माझं मन सारखं तुझ्यातच गुंतलेलं असतं. सारखी तुझीच आठवण येते. तुझी खाण्यापिण्याची अबाळ होत असेल ना? त्यातल्या त्यात तु असा वेंधळा अनं धांदरट. सकाळी ऑफीसला निघतांना तुला मोबाईल, रुमाल, घड्याळ, गॉगल , बॅग, हेलमेट सगळं सगळ अगदी हातात ह्वं असतं. आग्रहानंतर थोडंस काहीतरी पोटात ढकलणं. मी दोन दिवस नसले की तुझी किती तारांबळ उडायची. तु म्हणायचास 'तेजु तू दिसली नाही ना मी अगदी वेडापिसा होतो बघ. तु लवकर ये गं.फारच एकटं एकटं वाट्तय. अगं तू स्मीतहास्य वदनान माझी वाट पहात दारात उभी दिसली की अनं तू दिलेला कपभर चहानं माझा दिवससभराचा थकवा दूर कुठल्या कुठं पळून जातो बघं' असं म्हणायचासं. प्रेम आपल्या भरल्या घराला कुणाची नजर लागली रे? अनं क्षणांत होत्याच नव्हतं झालं. बघं तू किती किती बदललासं रे. प्रेम ,माझं काय चुकलं रे? माझ्यासाठी नाही तर निदान विशाखासाठी तरी एखादा फोन करायचास. सारखं विचारात असते आई आपल्याला पप्पांकडे आपल्या घरी कधी जायचं? पप्पा कधी येणार न्यायला? माला पप्पांना फोन लावून दे म्हणून सारखा हट्ट करते. प्रेम मी आता आई बाबांनाही जडं झालेय रे, आईचं तर सारखं चालू असतं. अगं पोरी स्त्री म्हट्लं की भोगणं आलंच, मग ती शिकलेली असो की अशिक्षीत. बाईचा जन्मच मुळी भोगण्यासाठी असं पुरुषांना वाट्तं. इथून तिथून सारे पुरुष सारखेच. काहीही झालं तरी आपापल्या घरीच निभवावं लागतं पोरी. बाबांचही कमी जास्त फरकानं तेचं चालु असतं. प्रेमबीम सगळं खोटं असतं पोरी ते फक्त सिनेमात व कथा, कादंबर्यामध्ये दिसुन येतं पोरी. तुच एखादा फोन करायचास जावईबापुंना घ्यायला या म्हणून. आम्ही नाही का समजून घेतलं एकमेकांना संसार असाच असतो पोरी.
प्रेम ,मला कल्पना आहे तुझं प्रमोशन झाल्यापासून तुझा कामाचा व्याप वाढलाय्, त्याचं टेंशन, सासूबाई मामंजींही माझ्यावर नाराज आहेत दुसरीही मुलगी झाली म्हणून. ते माझा फोनही घेत नाहीत. प्रेम, तू तरी मला समजून घेशील असं वाट्लं होतं. पण तूही निघालास त्याच विकृत मनोवृतीचा, पितृसत्ताक कुटुंबपध्दतीचा सच्चा वारसदार. पुरुषांना हवं तेंव्हा कठोर होता येतं रे पणं आम्हा बायकांना नाही जमत म्हणुन तर तुम्हा पुरुषांच फावत. तुमच्यालेखी आम्ही असतो फक्त तुमच्या इशार्यावर नाचणारी कटपुतली.. सर्व इ्च्छापुर्ती करणारी. वासना शमविणारी फक्त एक मादी. नाव गाव सोडून समर्पण करणारी प्रसंगी आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करून मन मारुन जगणारी, हाडाच काडं करुन जिवापाड जपणारी आई, सावरणारी ताई, झाडलोट करणारी, रांधा वाढा उष्टी काढा व चूल आणि मूल या मध्येच अडकणारी पत्
नी पाहिजे असते. स्त्री पुरुष समानतेच्या फक्त गप्पा मारणारे तुम्ही; भाषणं गाजवता, स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते म्हणून मिरवता, पुरस्कार स्वीकारता, टाळ्या मिळवता. मात्र वास्तव जीवनात जगतांना स्वर्थासाठी पुन्हा मौनरूप धारण करता. नाहीतर समाज काय म्हणेल, रीतभात, समाजरुढींवर खापर फोडून मोकळे तरी होता. आणी तुम्हाला जसं हवं तसं वागण्यास भाग पाडता. आम्ही बापड्या जाऊन जाऊन जाणार तरी कुठे. स्त्रीयांवर अन्याय करताना, स्त्रीयांनाही सहभागी करून घेता. सर्व करून सवरून नामानिराळे होता.
खरं सांगू प्रेम, केवढा विश्वास होता माझा तुझ्यावर. आठवतं तुला आई बाबांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न केलं. पण काय करणार आपलंच नाणं खोटं निघालं. प्रेम, मी तुला तुझ्या गुणदोषांसकट स्विकारलं होतं. तू मात्र नाही समजून घेतलंस मला. मी समजू शकले नाही तुला शेवट पर्यंत. तुझं दुटप्पी, अनाकलनीय वागणं. नावाप्रमाणेच मी खंबीर झाले. तसा तू का नाही झालास रे हाच का तो प्रेम? गरीबीवर मात करून कष्टानं शिकणारा. अन्यायाला वाचा फोडणारा. आपल्या लग्नाच्यावेळी दाखवलेले धाडस. परिस्थितीशी दोन हात करणारा, तो प्रेम मला मनापासून भावला होता. पण तूही निघालास शेवटी त्याच विकृत मानसिकतेचा अंध वारकरी; का हतबल झालेला षंढ, डोळे झाकून चालणारा. नियतीच्या भरवश्यावर प्रेमाची माणसं दुरावली. भरल्या संसारात तू उघड्या डोळ्यांनी केवळ तमाशा पहात बसलास. प्रेम, तुला काय वाटलं मी नाक घासत येईन तुझ्याकडे आणि घ्यायला ये म्हणुून याचना करीन. तू तुझ्या तेजूला नाही ओळखलेस का रे. इतकी वर्षे सोबत राहून सुध्दा आपल्या तेजूला नाही ओळखलंस तू! प्रेम आता खुप उशीर झालाय. हे पत्र तुझ्या हाती पडेल तेंव्हा मी या जगात नसेन. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम केलं अगदी मनापासून. मी स्वत॓ःवर विश्वास ठेवला नाही तेवढा माझा तुझ्यावर विश्वास होता. स्त्री कितीही सोशिक असली तरी तीही एक माणूसच असते ना रे. तिलाही भावना असतात याचा तुला का विसर पडला आहे. प्रेम या लाचारीच्या, उधारीच्या आयुष्याला मी कंटाळलेय. म्हणून मी आत्महत्या करीत नाही, तर तुला अन् पर्यायाने समाजालाही पश्चात्ताप काय असतो हे दाखवून देणार आहे. अन् हो प्रेम, माणसाची एखादी चूकही किती घातक असते हे तुला समजणार आहे. मला दाखवुन द्यायचय समाजाला, मामंजी, सासूबाईंना आणि तुलासुध्दा. माझ्या आहुतीतून उद्याची क्रांती, उद्याचे निखारे पेटतील. माझी आत्महत्या वाया जाणार नाही. मला व माझ्या चिमुकलीचा जन्म नाकारणा-या सर्वांना डोळे उघडायला प्रेरक ठरणार आहे.
प्रेम, मला माहिती आहे; तुला ही शिक्षा जास्त होतेय पण माझा नाईलाज आहे. माझ्या चिमुरडीसाठी मला जायला हवं. आपलं छोटंसं गोकुळ ज्या दिवशी उध्वस्त झालं ना त्याच दिवशी मी ख-या अर्थाने मेले होते पण मला तू समजून घेशील अशी वेडी आशा होती म्हणून मी जगत होते रे! आपला भरला संसार सोडून जावसं वाटत नाही रे. माझ्या विशाखाला सांभाळ. तिच्यातच मला शोध. चल मला आता निघायला हवं. माझी चिमुरडी मला बोलावते आहे आणि विशाखाला सोडून जावं वाटतच नाही रे, तरीही मला निघायला हवं.
तुझीच तेजू.'
तेजू, तेजू तू हे काय केलंस. तू हवी होतीस मला. मला एकटं सोडून नाही जाऊ शकत तेजू. मला माफ कर. असे म्हणतं त्याने हंबरडा फोडला.