Raju Rote

Drama

2  

Raju Rote

Drama

स्वप्न की वास्तव

स्वप्न की वास्तव

5 mins
1.2K


पावसाळल्या रातीत तो एकटाच निघालेला

पाय ओढतील तिकडे...

त्याचंं त्याच्यावरचं नियंत्रण हरवत चाललेलं

समोर डोकावतोय धुक्यातून उगवणारा

पडका वाडा

वाड्यासभोवताली दाटलंय गुढतेचं वलय

स्वर्गीय संगीताचे सूर ओढतात मनाला

अदृश्य शक्तीचा वावर रेंगाळतोय सभोवताली

भयाण अंधारलेल्या रात्रीत

मिणमिणता कंदिल हातात घेऊन फिरणारी

शापित रुपगर्विता

कित्येक शतकांपासून वाट पाहतेय

कोणाची तरी

बहुतेक त्याचीच!


वाड्याच्या दिवाणखान्यात

राजसिंहासनावर विराजमान प्रतिमा

त्या प्रतिमेत त्याला तोच दिसतोय

हे असं का होतंय

हे सारं का वेडावतंय

सभोवतालचं वातावरण भारलेलं

तो तंद्रीत वाड्यात शिरताच

डौलदार चालीनं हळुवार संथ पावलांनी

ती जिना उतरुन खाली येते

त्याच्यासमोर डोळ्यात खोलवर पाहाते

लाघवी शब्दांसह

आदबीनं बोलायला लागते

यावं तुमचीच वाट पहातेय मी कित्येक शतकांपासून,

कुठे होतात?


त्याचा हात हातात घेऊन ती हलकेच बोलायला लागलेली

तिचा स्पर्श तरल मुलायम वस्र घसरावे

तसा त्याच्या शरीरभर पसरतोय

ढगांचा गडगडाट विजांचा थयथयाट

कोसळणारा पाऊस

आजची रात्र बहुदा इथेच थांबावं लागेल!

न जाणो कसे पण तिने त्याच्या मनातले ओळखले होते

ती हलकेच उत्तरली

इथे ना रात्र ना दिवस

असतात फक्त क्षण

ते जगायचे अन क्षणभंगुर जीवनाचे सोने करायचे

ती कानात कुजबुजावं तस्सं बोलत राहिली...


चला, माझे गाणे ऐकायला... आवडेल तुम्हाला!

तुझं नुसत बोलणंही गाण्याहून गोड भासतंय

गाणं कस असावं? तो हरखून म्हणाला

ती हलकेच उठली अगदी जवळ आली

अन् त्याच्या डोळ्यात पाहून मंद हसली

हळुवार हात सोडवून पुढे चालायला लागली

तिच्या पाठमोऱ्या चालण्यात ताल संगीत होतं

मोहीत होऊन तो यांत्रिकपणे

तिच्यामागे चालत राहिलेला


लखलखता दिवाणखाना

त्यात आता मैफील सजलेली

तिने मोहकतेन त्याला पुढे विराजमान होण्याचा इशारा केला

तिच्या इशाऱ्यात आज्ञा होती की याचना

आसक्ती होती की प्रेम

काही कळतंच नव्हतं


आता ती समोर बसली अन् वीणा हातात घेऊन

तिने सूर लावला... सूर छेडला

अन् क्षणांत आसमंत भारुन गेला

भान विरल्याचं त्याला हळूहळू जाणवलं

राग... बंदिश... सगळं सगळं होतं

शेवटच्या भैरवीला सुरवात झाली

अन् स्वर्गीय सुखाची प्राप्ती त्याला होत गेली

मैफिल संपण्याआधीच तो तिच्याजवळ आला

हळुवार हाताचा विळखा टाकून

तिला तो शयनगृहात घेऊन गेला

तिच्या सुरांत सूर मिसळण्याची त्याला आता घाई झाली


त्याचा देह आता आतूर झाला होता

त्याचं काही उरलं नव्हतं तो संपूर्ण तिचा झाला होता

ती हळुवार म्हणाली "घाई नको... सगळं तुमचंच आहे!

तो थांबला सभोवताली त्याचं लक्ष गेलं

तर क्षणापूर्वीची मैफिल संपली होती.

तिथे कोणीच नव्हते...

उरली होती निःशब्द सळसळणारी शांतता

रसरसलेला प्रणय

ती आणि तो

एकमेकांत हरवलेले

शयनगृहाकडे तिने तर्जनी केली

तसा तो तिच्या मागोमाग चाललेला

हळूहळू पानाच्या विड्यासारखी

रात्र रंगत चाललेली

रुद्ररुपी पाऊस आता हळुवार झालेला

लयबद्ध होऊन निसर्गाशी एकरुप होत गेला

जमिनीत ओलावा पाझरत राहिला

सगळा निसर्गच एकमेकांत मिसळत गेला

समाधानाचा क्षण आता समीप आलेला


तेवढ्यात...

उठा... आज कामाला जायच नाही वाटतं?

हा बायकोचा तप्त सुरांतला आवाज आला

अन् स्वप्नमहल उध्वस्त झाला

रात्रभर चित्रपट कशाला पाहता?


त्याला आठवलं रात्री "मधुमती" पाहतापाहताच

त्याला झोप लागलेली


तो मिश्किलतेनं हसला

कारण जे पाहिलं ते स्वप्नं होतं

वास्तव नव्हतं


स्वप्न, वास्तव

मन अन् शरीर

विचार अन् भावना...


वाहणारे नदी-नाले जेव्हा तुडुंब भरतात

तेव्हा वाट मिळेल तिकडून पाणी बाहेर पडते

वास्तवातील जगात जगताना

स्वप्नातल्या जगात वावरताना

आपल्या इच्छेची पूर्तता

इथे नाही तर तिथे होतेच

आणि हेच मानसिक, शारीरिक

आरोग्य नीट ठेवतात... जपतात

म्हणून...


स्वप्नं पहा... मग ते कसेही असू द्या

चागले किंवा वाईट

काही हरकत नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama