अनामिक नाते
अनामिक नाते
डांडीया रंगात आला होता. एका तालात ठेक्यावर तरुण तरुणींचे पाऊल थिरकत होती. श्रीकांत घामाने भिजला होता. तालासुरात त्याचेही पाऊले पडत होते. हळुहळु तालावर ठेक्यात सरकत टीपरावर टिपरं वाजवित तो पुढे सरकत होता. डांडीया रास चांगलाच रंगात आलेला, समोर स्टेजवर एक गायक व गायिका "ओढणी ओढे तो उडी उडी जाय" हे मदहोश होऊन गात होते. अचानक श्रीकांतच्या समोर एक आकर्षक आणि अंगापिंडाने भरलेली तरुणी आली. त्याने तिच्या डांडीयावर दांडी मारली आणि वळुन त्याने तिच्या डोळ्यात पाहील. ती ओळखीची भासली पण ती कोण आहे हे लवकर त्याच्या लक्षात येत नव्हत. तेवढ्यात ती पुढे सरकली होती.आता ती त्याच्यापर्यन्त पोहचण्यास वेळ लागणार होता.तो तिच्या विचारात गढला पण त्याला लवकर आठवेना .तेवढ्यात गाणे संपले तसा खेळ थांबला.तो भिरभिरत्या नजरेनं तिला शोधू लागला.कोप-यात एका वयस्कर व्यक्ती सोबत ती बोलत उभी असलेली त्याला दिसली. तो माणूस पंचावन्नच्या पुढील असावा. त्याचा गोरा रंग आणि सतेज कांती यावरुन तो श्रीमंत वाटत होता. त्याच्याशी बोलता बोलता तिची नजर श्रीकांतवर पडली तशी तिने त्या माणसाला सोडल व ती सरळ श्रीकांतकडे आली.त्याचा हातात हात घेत ती म्हणाली कीती दिवसानी दिसतोस ? कसा आहेस ?
मजेत ! तो म्हणाला. त्याने तिला न्याहळले
ती मद्य प्यायली होती. तीने महागडी साडी परीधान,केली होती.तिचे सौदंर्य आता आणखी खुलले होत.
कशी आहेस ?
ती हासली..कशी दिसते?
दिसतेस तर एकदम सुखी!
हो, आहेच सुखी ..सगळ काही आहे माझ्याकडे ..पैसा गाडी..माझा नवरा श्रीमंत आहे.
ते दिसतयच.
तुझं सांग?
माझं ठीकच चाललय.
तिच्या मुखातून मद्याचा गंध दरवळला तसा तो म्हणाला
ड्रीक करतेस वाटतं?
हो आता रोजच घ्यावी लागते.
खुप बदललीस.
काय करावे, नशिबाने बदलून टाकले.
तो थांबला ..त्याची नजर तीच्या सोबतच्या व्यक्तीवर गेली. तसा तो म्हणाला "जा, तुझी वाट पहातोय तो!
त्याची काळजी नको ...तो थांबेल हवे तेवढा वेळ माझ्यासाठी!
कोण आहे?
कोण असणार..ती हसली. माझा नवरा आहे.
आणि सदा ?
तो गेला मला कायमचा सोडून..हे जग सोडून!
तो थांबला ...कधी झाल हे ?
चार वर्ष झाली असतील.
मला कोणी सांगितल नाही.
तसा तु बरेच वर्ष झाली कोणाच्याच संपर्कात नव्हतास. मग कसे कळेल तुला ? आता तुझे जग आणि आमचे जग पुर्ण वेगळय!
हो ते ही खरय.
चल कुठेतरी हाँटेलमधे बसुया !
श्रीकांतने तीच्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यावर ती म्हणाली "काळजी करु नको, तु समजतोस तसा प्रोब्लेम नाहीय आता माझा!
ती त्या माणसाकडे वळुन बोलली मनिष, तु जा घरी! ये मेरा रिस्तेदार है उसके साथ आज मै डीनर करके आती हुं!
श्रीकांतला जाणवले तीची भाषा वागणं सारच बदलल होत. पैसा सर्व काही बदल घडवितो हेच खरं.
ते एका चांगल्या हाँटेलमधे बसले. जेवणाची तिने ऑर्डर दिली. आणि ते बोलायला लागले .
ती म्हणाली तु गेल्यावर मला खुप काही सहन कराव लागलं.
हो..तसंही माझ्या समोर तु खुप काही सहन करीत होतीसच.
हं..ती म्हणाली ..तो विचारात गढून गेला ,हळुहळू तो भुतकाळाच्या गर्तेत शिरत राहीला.
श्रीकांत गावाहुन मुंबईत आला होता. तो मुंबईत झोपडपट्टीत आपल्या नातेवाईकाकडे राहत असे.त्याचे शिक्षण जेमतेमच होत परिणामी नोकरी मिळणे कठीण!
शेवटी काहीच काम मिळेना म्हणुन त्याला देवनारच्या कत्तल खाण्यात साफसफाई करण्याचे काम करावे लागले. ते काम खुप कष्ठाचे होते. पण तो ते प्रामाणिकपणे करायचा.
तिथेच त्याची ओळख सदाशिवाशी झालेली. ते दोघे एकाच वस्तीत जवळ जवळ राहत होते. हळुहळू सदाची आणि श्रीकांतची मैत्री खुपच घट्ट झाली होती. सदा मनमोकळा जीवाला जीव देणारा होता. तो श्रीकांतला खुप जपायचा. गरज पडल्यास पैसे द्यायचा. श्रीकांतही त्याच्या सुख दुखात सहभाग देत असे. एकच वाईट होत ते म्हणजे सदाला पिण्याच खुप वेड लागलेल. श्रीकांत त्याला समजावण्याचा प्रयत्न करी पण सदा नेहमी सोडतो असे म्हणे पण जडलेले व्यसन सोडणे सोपे नव्हते. त्याच व्यसन सुटत नव्हत. तशात सदाच घरच्यांनी त्याचे जबरदस्तीने लग्न ठरविले होते. एक दिवस तो गावाहुन एका नाजूक नववधूला घेवूनच त्या वस्तीत आला. तेव्हा वस्तीतील सर्व तरुण मुल सदाच्या बायकोला न्याहळत होती. सदा त्यांना खुपच नशिबवान वाटायला लागला होता. सदाला गोरीगोमटी नाजूक सुंदर बायको मिळालेली!
सदा आणि श्रीकांत याच्या मैत्रीत लग्नानंतरही खंड पडला नव्हता. श्रीकांत नेहमी सदाच्या घरी येत जात असे. सदाच्या बायकोला तो ताई म्हणत असे. त्यामुळे त्याच्या नात्यात मोकळेपणा आला होता. सदा घरी असो नसो तो घरी जात असे व पारुलशी तो मनमोकळ्या गप्पा मारीत असे. ती ही त्याच्यापुढे आपले मन मोकळे करी. सदाने दारु सोडावी लवकर घरी येत जावे यासाठी तुम्ही आपल्या मित्राशी बोला असे पारुल त्याला विनवायची. श्रीकांत प्रयत्न करायचा आणि हतबल होत होता.
एकदा रात्री दहाच्या सुमारास ती श्रीकांतकडे आली व म्हणाली ते अजून घरी आले नाही मला भिती वाटतेय .
पण कामात असताना तो काही बोलला नव्हता. श्रीकांत म्हणाला
किती वाजतील घरी यायला. तिच्या शब्दात काळजी होती.
काहीच कल्पना नाही..तो म्हणाला
एक विनंती करु का ?ती थरथरत्या आवाजात बोलली
विनंती काय करतेस ..तु सांग काय करायच.
आज माझ्या घरी रात्रीच थांबाल का?
त्यावर तिच्या डोळ्यात पाहत श्रीकांत म्हणाला ताई, तु काळजी करु नको. मी येतो.
त्या रात्री तो तिच्या घरी राहायला गेला. त्या रात्री खुप पाऊस पडत होता.त्यालाही झोप येत नव्हती. तो काँटवर झोपलेला आणि ती खाली.. काही वेळाने त्याला झोप लागली.
पारुलला झोप येत नव्हती. लग्न होऊन वर्ष होत आले होते. तिला हवे तसे सुख सदा देऊ शकला नव्हता.आज तिच्या शरीरात वेगळ्याच संवेदना पाझरत होत्या. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.अशा पाऊसात कुणीतरी आपल्याला घट्ट मिठीत ओढावे असे तिला वाटत होते. तिच्या जवळच काँटवर झोपलेल्या श्रीकांतवर तिची नजर गेली तशी ती शहारली. तिला श्रीकांत पहिल्या दिवसापासून आवडला होता. पण श्रीकांत तिला ताई म्हणायला लागला हे तिला आवडले नव्हते. पण ती तसे त्याला स्पष्ट सांगू शकत नव्हती. हवेतला गारवा आणि कोसळणारा पाऊस तिच्या मनात वासना ज्वर पेटवित राहीला. या आगीत नाते संबधाच्या संकल्पना जळून खाक होत राहिल्या.
रात्री दोनच्या सुमारास त्याला जाग आली तर त्याने पाहिलं पारुल त्याला बिलगून त्याच्या शेजारी झोपली होती. ती त्याच्या शरीरावरुन हात फिरवीत होती हे त्याला जाणवताच तो गडबडला. तो झटकन उठला तशी ती बोलायला लागली श्रीकांत, तुम्ही मला वाईट समजू नका. मला खाली झोप येत नव्हती म्हणुन मी तुमच्या शेजारी आले. मला भीती वाटतेय.
तो काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. काय बोलाव हे त्याला सुचेना. त्याचे ह्दय धडधडत होते. तीच हळुवारपणे बोलायला लागली..श्रीकांत ..प्लिज रागावू नकोस.आता ती त्याला एकेरी संबोधायला लागली हे सार आपसुक घडतय अस तिला जाणवत होतं. मला...मला तुमच्या आधाराची गरज आहे, प्लीज नाही म्हणु नका असे म्हणून तिने आपला हात त्याच्या हातावर, ठेवला. क्षणभर तो गांगरुन गेला मात्र लगेच स्वतःवर नियंत्रण मिळवित तो म्हणाला ..पारु मी तुला ताई म्हणतो तेव्हा हे आपण अस काही करण बरोबर नाही.
ती त्याच्या डोळ्यात पाहुन म्हणाली. काही होत नाही ..आणि हे फक्त तुझ्यात अन माझ्यात राहील. एकमेकांची गरज पुर्ण करण यात कुठे पाप आहे. असं म्हणुन ती त्याच्या आणखी जवळ आली तिचा उष्ण स्पर्श त्याला जाणवला. क्षणभर त्याचे नियंत्रण सुटतय असे त्याला वाटत असताना झटकन तो बाजूला झाला व बाहेर निघून गेला.
ती रात्रभर जागीच होती .तिच्या डोळ्यातून पाणी येत राहीले.
दुस-या दिवशी सदा आला. तो नेहमी प्रमाणे हलत डुलतच! ती चिडली. तिने त्याला शिव्या घालायला सुरवात केली. तो निर्लज्जप
णे हसत म्हणाला. अग दे शिव्या,तुला जेवढ्या द्यायच्या असतील तेवढ्या दे! मला काही फरक नाही पडत!
तिचा पारा वाढलेला. ती म्हणाली असच पिवून, रात्रभर कुठेही पडायच होत तर मग लग्न का केलत ?तसच राहायच होत.
त्यावर तो स्पष्टीकरण द्यायला लागला अग, मित्राच्या घरी पार्टी होती. जास्त झाली मग तिथेच झोपलो.
ती रडायला लागली.रात्रभर मला झोप नाही ..एकटीला भीती वाटते
मग श्रीकांतला बोलायच..ये श्रीकांत... त्याच्या घराकडे पाहुन, त्याने आवाज दिला.नेमकाच अंघोळ करुन बसलेल्या श्रीकांत त्याचा आवाज ऐकुन त्याच्याकडे गेला.
श्रीकांत घाबरला. त्याला वाटले रात्री घडलेला प्रकार पारुलने सांगितला की काय ?तो भेदरलेल्या नजरेने सदाकडे पाहत राहीला.
सदा पुढे बोलला ते जावू दे अरे मी नव्हतो तर तु तुझ्या ताईकडे लक्ष द्यायला हवं होतं .पण काय कामाचा तु मित्र ?
श्रीकांतचा जीव भांड्यात पडला. आपण समजतो तसे काही झाले नव्हते. रात्री काहीच घडलं नाही अस समजून तो बोलायला लागला. अरे माझं लक्ष आहे रे! पण तुझ काही कर्तव्ये आहे की नाही ?अस बायकोला एकटा सोडून रात्री अपरात्री भटकन शोभत का तुला ?श्रीकांत चिडलेला पाहुन सदा थंड झाला. तो सारवा सारवीची भाषा करीत बोलू लागला.सोड ते सार आता जे झाल ते झालं. चल ये पारुल ...चल चहा कर श्रीकांतला!
श्रीकांत घरात आला तशी ती गुपचुप चहा करायला आत गेली. त्याच्यातील शांतता बरीच बोलकी होती. तिने चहा आणला ते दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिडवित नव्हते.
तितक्यात डब्बा पाण्याने भरुन सदा सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडला.
हीच संधी साधून पारुल नजर खाली झुकवून बोलली..श्रीकांत मला माफ करा ..रात्री मला काय झालं होत ते मलाच कळतच नव्हत. पण तुम्ही मला सांभाळलात..तिचे डोळे भरुन आले.
तो काहीसा गहिवरला ..जावू दे ताई! झालं गेलं विसरुन जा ..मी विसरलो.
असं म्हणताच दोघांच्या डोक्यावरील ताण निवळला.
दिवसामागून दिवस जात होते .हळुहळु सार काही सुरळीत चाललेल ! श्रीकांत आणि पारुल पुन्हा एकमेकांशी मनमोकळेपणे बोलत होते. झालेला प्रसंग आता मागे पडला असे श्रीकांतला वाटत होते. पण पारुल अजूनही कधीकधी श्रीकांतकडे आशाळभुत नजरेन पाहत असे.
इकडे सदाच पिण कमी न होता वाढतच गेलं होत. या सर्वाचा परिणाम पारुल वर होत होता. तिला हवं ते मिळत नव्हत तिला शरीर सुख हवं होतं ..ती ते शोधित होती. त्यात तिला श्रीकांत आवडायला लागलेला.आज नाही तर उद्या हा माझ्या मिठीत येईल अशी आशा ती ठेवून होती.
असच एकदा घरात कोणी नसताना तिने त्याला मिठीत ओढलं आणि ती बोलायला लागली ..तु मला खुप आवडतोस श्रीकांत ! .मला वचन दे तु माझ्यापासुन दुर कधीच जाणार नाहीस.
त्याला काय बोलाव हे सुचत नव्हत. त्यालाही आता तिचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटायला लागलेला! या नात्याला काय म्हणावे हे त्याला कळत नव्हत ..अशीच स्थिती राहीली तर एक दिवस दिव्याच्या जवळ आल्यावर वितळलेल्या लोण्यासारख त्याच होईल. अशी भीती त्याला वाटत होती. एका बाजूला मित्र दुस-या बाजूला मानलेली ताई ..तिची गरज मानसिकता या जाळ्यात तो अडकत चाललाय. असे त्याला वाटायला लागेल. त्याच्या मनात विचाराचे काहुर माजलेल. काय करावे त्याला सुचत नव्हते. जे काही होतय ते त्याच्या मनाला पटत नव्हते. तो धार्मिक वातावरणात वाढलेला पाप पुण्याच्या कल्पनांना मानणारा होता. खुप विचार करुन शेवटी
यावर एक सरळ मार्ग त्याने काढला. तो म्हणजे दोघांपासुन अंतर ठेवणे आणि हे तेव्हाच शक्य होत जेव्हा तो ती वस्ती सोडून दूर दुसरीकडे राहायला जाईल. अतिशय कठीण मनाने त्याने निर्णय घेवून ती वस्ती सोडली.
आता त्याचा संपर्क सदा आणि त्याची वस्तीशी जास्त राहीला नव्हता. तो आता नविन व्यवसायात शिरला होता. ब-यापैकी त्याचा जम बसला होता. धंद्यात त्याला पैसाही चांगला मिळत होता.
मध्यंतरी असाच गाडीतून फिरत असतना त्या वस्तीतला रामु त्याला भेटला. रामु श्रीकांतचे ऐटबाज राहणे पाहुन प्रभावित झाला होता. तो श्रीकांतची स्तुती करायला लागला तसा श्रीकांत सुखावला रामुला तो एका चांगल्या हाँटेलात चहा पियाला घेवून गेला. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर शेवटी विषय सदावर आला. रामु काहीसा दुखी होऊन सांगायला लागला. तो उध्वस्त झाला यार! त्याच काही खर नाही खुप पितो आणि कुठेही पडतो.
आणि पारुल ?
तिच्या बद्दल नाही विचारलस तर बरय..!
काय झाल?
तिने वस्तीतला एकही तरुण मुलगा सोडला नाही. आता ती त्या मुन्ना सोबत आहे.
श्रीकांत दुःखी झाला..दोष कोणाला द्यावा हे त्याला कळेना ?शेवटी भुक ही महत्वाची असते. ती पुर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धावत असतो हेच खरं..हे सार विचार चालले असताना वेटर आला तसा त्याची विचाराची तंद्री तुटली.
कसला विचार करतोस ? तिने विचारलं.
काही नाही जरा भुतकाळात हरवलो होतो.
त्याने पारुलला न्याहळीले, तिने त्याच्या डोळ्यात पाहुन विचारले
लग्न केलस?
हो केलं. चांगलय!..मग कसं चाललंय तुझ ? कशी आहे तुझी बायको ?
ठीक आहे, असे म्हणुन त्याने, दीर्घ श्वास सोडला.
तिला बहुदा कळले असावे..ती एवढीच म्हणाली आपण लोकांना सुखी आहोत असे दाखवतो पण याचा अर्थ आपण सुखी असतोच असे नसते.
हं... तो हुंकारला..हलक्या आवाजात त्याने विचारल..सदाचं काय झालं होत ?
सदा खुपच प्यायला लागला होता. त्याला होश नसायचा त्याच स्थितीतच तो गेला. पुढे माझ्या वाटेला भयंकर दिवस आले.
जगायचं कस हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहीलेला. वस्तीतील लोक वखवखलेल्या नजरेन मला पाहत. नवरा नसलेली बाई म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असेच लोक समजतात. माझ्या सौंदर्यावर भुलून काही लोकांनी मला उदर निर्वाहाला पैसे दिले पण त्याची किमंत त्यांनी पुरेपुर वसुल केली. माझ्या शरीराला हवे तसे त्यांनी भोगले. मग मी विचार केला हेच जर माझ्या वाटेला येणार असेल तर मग मी वेगळ्या पध्दतीने का करु नये असा विचार माझ्या मनात आला आणि मी तब्बसुमला भेटले. तुला माहीत असेल आपल्या वस्तीलील तब्बसुम ही डान्सबारमधे जात असे आपण तिला नावे ठेवायचो शेवटी तीच मदतीला आली. तिच्या मदतीने मी डान्सबार मधे जावू लागले. तिथे मला हा मनिष भेटला. घरचा श्रीमंत आहे बायको मुल सार आहे. मुले अमेरीकेत असतात. माझ्यावर त्याच प्रेम आहे. वयस्कर आहे पण मला काही फरक नाही पडत. आणि तोही माझ्या सोबत खूश असतो. मला हव ते देतो आता मी डान्सबार सोडलाय. आपल्या मनाप्रमाणे जगतेय.
चांगलय..! श्रीकांत म्हणाला.
तु मनात मला शिव्या देत असशील ? ती
नाही यात तुझी चुकी नाही परीस्थिती वाईट होती त्याला तु काय करणार ? तो.
मला समजून घेईल माझा असा मला कोणतरी एक माणुस हवा होता. पण तो मला कधीच भेटलाच नाही. तु मला आवडायचास. पण तुला माझ्या बद्दल ते वाटत नव्हत जे मला तुझ्याबद्दल नेहमी वाटायचं..पण तु मला अजूनही तितकाच आवडतोस!
तिने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहीलं. तिच्या डोळ्यात आर्जवे होती.
तो थांबला..मला वाटत आपण निघायला हवे.
हो...निघूया! ती म्हणाली आणि तिने पर्समधून पैसे काढून वेटरकडे दिले. उरलेले पैसे टीप म्हणून ठेवले.
ती आणि तो बाहेर आले. बाहेर थंड हवा सुटली होती. त्याने टँक्सीला आवाज दिला तशी टँक्सी समोर येवून उभी राहीली.
तो तिच्याकडे वळला अन हातात हात घेत म्हणाला .चल.. सुखी रहा ..आणि कधीही तुला काही अडचण आली की मला फोन कर मी तुझ्या मदतीला नक्कीच येईन
तिने त्याच्या डोळ्यात पाहीले. तिचे डोळे भरून आले होते. काही न बोलता ती टँक्सीत बसली आणि टँक्सी भरधाव वेगाने निघून गेली.
तो जागीच उभा राहीला. तिने उच्चारलेले वाक्य त्याच्या कानात गुंजत राहीले आपण लोकांना सुखी दिसतो पण आपण सुखी असतोच असे नाही.तो विचारात पडला..आपण कोण बरोबर आणि कोण चूक हे कस ठरविणार शेवटी परीस्थिती आणि गरजा याच माणसाला वागायला शिकवत असतात.तो चालत राहीला.