Raju Rote

Tragedy

2.5  

Raju Rote

Tragedy

जगावेगळे प्रेम -राजू रोटे

जगावेगळे प्रेम -राजू रोटे

10 mins
1.4K


मधुकांत दुःखाने पुरता घायाळ झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याची प्रेयसीवजा अर्धांगिनी असलेल्या लावण्याला पोलिसांनी पकडलं होतं. त्याला वाटल होतं नेहमीप्रमाणे एक-दोन दिवस ते तिला आत ठेवतील, समज देतील आणि सोडून देतील. पण तसं काही झालं नव्हतं. आज दहा दिवस झाले होते. ती आतच होती. ती आत कशी राहात असेल, तिची तिथे आबाळ तर होत नसेल ना? या विचाराने तो व्यथित होत होता. लावण्याची जमानत मंजूर करायला हवी असे अधिकाऱ्याने त्याला सांगितले होते. त्यासाठी दहा-पंधरा हजारांची जमवाजमव करणं गरजेचं होतं. मधुकांतकडे एवढे पैसे नव्हते. तो अनेकांपुढे हात पसरुन पैसे मागत होता. पण सारेजण त्याला आपल्याच अडचणी सांगत होते. हळूहळू तो निराशेकडे झुकला आणि शेवटी तो हतबल झाला. एकांतात तो तिच्या आठवणीने व्याकूळ होत होता.


फोरास रोडच्या एका लेनमध्ये लाकडी चाळीच्या पहिल्या मजल्यावर तो आणि लावण्या राहायचे. त्या चाळीत लहान- लहान कप्पे होते. त्या कप्प्यांना मळकट पडदे लावून प्रायव्हसी तयार केली होती. रेल्वेच्या बर्थसारखे बेडरुम होते. तिथे रात्री लावण्यासोबत मधुकांत झोपायचा आणि त्याअगोदर लावण्या अनेक गिऱ्हाईकं आपल्या शरीरावर घेत असे. रात्री उशीरा लावण्या आणि मधुकांत एकत्र जेवत. एखाद्या दिवशी चांगला धंदा झाला की ती देशी दारु घेऊन यायला त्याला सांगायची. मग पिणं आणि खाणं चालायचं.


ती तिला भेटलेल्या गिऱ्हाईकाच्या गमतीजमती त्याला सांगत असे...

तसंच ती आज त्याला सांगत होती... अरे मधू... त्याला लाडाने ती मधू म्हणायची.

अरे मधू... आज एक मजेदार लडका आया था.

अच्छा... तो हसला

अरे वो आया, काम किया और जाते वक्त घबराकर पटापट निकल गया!

पैसा दिया था ना उसने?

वो तो मै पहलेही निकालकर लेती हू... ती हसली... अरे आगे का सुन! 

बोल!

वो लडका चला गया और थोड देर के बाद रिटर्न आया... मैने पुछा, क्या हुवा?

तो उसने दिवार की तरफ ऊँगली दिखायी 

तो लक्षपूर्वक ऐकायला लागला... तो... आगे?

अरे आगे क्या? दीवारपर उसकी अंडरवेअर लटकी हुवी थी... घबराकर वो वही छोडकर भागा था!

हे ऐकून मधुकांत खळखळून हसला. तिनेही त्यात आपला हसण्याचा आवाज मिसळला.

मधुकांत त्या लाकडी इमारतीत साफसफाईची कामे करायचा. फावल्या वेळात तो निरोधचे पॅकेटस विकायचा. एड्स आणि गुप्तरोगाच्या दहशतीने अचानक त्या परिसरात निरोधची मागणी वाढली होती. तो त्यातून बऱ्यापैकी पैसा कमवायचा!आसपासच्या इमारतीत राहणारे शेठलोक मधुकांतला घरातील साफसफाई, पेंटींग व प्लंबरची कामे करायला घेवून जात असत. अशाप्रकारे त्याचे जगणे चाललेले.!


त्याच रस्त्यावर 'आरोग्य' नावाची संस्था देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंदर्भात काम करायची. त्या संस्थेत डॉक्टर आनंद मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते, डॉक्टर शांत स्वाभावाचे मनमिळावू होते. एकदा डॉ. आनंदकडे मधुकांत गेला होता. त्याला ताप आला होता. डॉ. आनंदने त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मधुकांतचं जीवन डॉक्टरला खूपच लक्षवेधी वाटत होतं. सेक्सवर्कर महिलेसोबत लग्न करुन राहणारा मधुकांत त्यांना वेगळा वाटत होता. दुसरं म्हणजे तो कोणत्याही कामाला नाही म्हणत नसे. मधुकांत तसा खूप बोलका होता. तो सतत काही ना काही सांगत असे. त्याच्या गोष्टी ऐकण्यात डॉ. आनंदना गंमत वाटायची.

एकदा क्लिनिकमधे पेशंट कोणीच नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. वातावरणात एक उदासीनता जाणवत होती. उदासीनता दूर करण्यासाठी डॉक्टरांनी मधुकांतला आत बोलावले व त्याच्याशी ते बोलायला लागले.

मधुकांत... तू इथे कसा आला?

नेहमीप्रमाणे मधुकांतने पॉज घेतला आणि तो बोलायला लागला. आता त्याला थांबवणं सोपं नव्हतं. डॉक्टर साहेब... मला पाच वर्षं झाली इथे येवून. गावाहून आलो तो फक्त काही पैसे आणि दोन जोडी कपडे घेवून. हमालीची कामे करायचो, सुलभ शौचालयात आंघोळ करायचो आणि मग दिवसभर भटकायचो. एका मित्रासोबत या रोडवर आलो, रात्रभर मजा केली आणि मग नेहमी येत गेलो. हळूहळू इथे ओळखी वाढल्या. लावण्याची ओळख झाली.

ती म्हणाली, मेरा मरद बनके रहेगा क्या? मी हो म्हणालो..

आणि आता मस्त चाललंय... ही माझी शॉर्टकट स्टोरी... तशी लय लंबी कथा आहे.

डॉक्टरांनी त्याला थांबवलं... चांगली कथा आहे तुझी!

आता काय करायचं... जे वाट्याला आलं तसं जगावं लागतं... मधुकांत म्हणाला.

हं..बरोबर..डॉक्टर म्हणाले.. 

तितक्यात बाहेरुन चहा घेवून जाणारा पोरगा दिसला तसा मधुकांतने त्याला आवाज दिला. मुन्ना दो स्पेशल कटींग इधर ला!

तो मुलगा चहा ठेवून गेला.

चहाचा घोट घेतघेत त्यांच्या गप्पा चालल्या. तितक्यात एक पेशंट आला. तसा मधुकांत बाहेर आला व पुन्हा भेटू असं म्हणून निघून गेला. तसा तो डॉक्टर आंनदना दिवसातून एकदा तरी भेटत असे. लावण्याला अटक झाल्यावर तो एकदाच डॉक्टरांना भेटला होता. मध्ये बरेच दिवस मधुकांत डॉक्टरांना दिसला किंवा भेटला नव्हता.


अचानक एका दिवशी तो क्लिनिकमधे आला तेव्हा तो चांगलाच आनंदात होता.

डॉक्टर साहेब... लावण्या सुटली, हे सांगतानाही त्याचा चेहरा खुलला होता.

डॉक्टरांनी त्याचे हसून अभिनंदन केले. वा.. छान चांगले झाले.

कसे जमवलेस. - डॉक्टर

विशेष काही नाही. कोर्टात तिला नेले, तिचे कागदपत्रे तपासले आणि सोडले. तो भोळेपणाने सांगत होता.

बरेच दिवस दिसला नाहीस?

काय सांगायचं डॉक्टर साहेब.. त्या रात्री रेड पडली आणि पोलिसांनी लावण्याला पकडले. पोलिस म्हणत होते ही सोळा-सतरा वर्षांची आहे. मी त्यांना सांगितले तिची तब्येत तशी आहे पण ती पंचवीस वर्षांची असावी. मग ते म्हणाले, तिचा जन्माचा दाखला आण... आता कुठून आणायचा दाखला?

मग काय केलेस.

तिच्याकडून तिच्या गावचा पत्ता घेतला आणि तिच्या गावी जावून आणला तिचा जन्माचा दाखला.

खूपच कष्ट करावे लागले तुला...

आपल्या माणसासाठी एवढं करावं लागतंय डॉक्टरसाहेब... मधुकांत सांगत होता.

मग आता पुढे काय? डॉक्टरांनी विचारले.

मी तिला सांगितले आहे. ये धंदा छोड... काहीतरी वेगळं कर, मी आहे तुझ्यासोबत मी पाहतो सारं.!

हो... बरोबर आहे तुझं...पण तिला पटतंय का?

नाही ना... तोच प्रॉब्लेम आहे.

डॉक्टरांनी त्याचा चेहरा न्याहळला. तो सुकलेला वाटत होता. त्याचे शरीर काहीसे कृश झालेले वाटत होते.

तुझी तब्येत ठीक दिसत नाही.

हो ! जरा थकल्यासारखं वाटतंय.. या लावण्याच्या चक्करमधे काही दिवस मला नीट झोप लागली नव्हती.

बरं ठीक आहे. या गोळ्या लिहून देतो. रोज एक घे बरे वाटेल.

गोळ्या आणि चिठ्ठी घेवून मधुकांत निघून गेला.

आता त्याचे दिवस मस्त चालले होते. लावण्या आणि ते दोघे एकत्र राहात होते. त्यांचे प्रेम आता चांगलेच फुलत चालले होते.

एखाद्या दिवशी ते तिथेच असलेल्या सिनेमागृहात चित्रपट पाहायला जात असत. त्या थिएटरला फक्त जुनेच पिच्चर लागत असत. कालच त्यांनी "एक दुजे के लिए" पाहिला होता. वासू आणि सपनाचे प्रेम पाहून ते भारावून गेले होते. रात्री झोपताना त्यांच्या गप्पा चाललेल्या!

ती म्हणाली..मधू..वो फिल्म मे वासू की जगह मुझे तुच दिख रहा था!

और मुझे सपना की जगह तू! तो कुजबुजत म्हणाला.

त्याने तिला जवळ ओढलं.. पण लावण्या.. वो पिच्चर का एन्ड मुझे बिल्कुल अच्छा नही लगा!

क्यो?

अरे, वो दोनों को जान देने की क्या जरुरत थी! वो डॉक्टर के पास जाके ठीक होके शादी भी कर सकते थे!

हां.. बरोबर बोलतोस तू, पण बाईची इज्जत लय महत्वाची असते मधू

हो.. पण ती इज्जत म्हणजी सेक्समधीच आसतीय असं थोडंच आहे.. मधुकांत दुसरी-तिसरी शिकलेला पण त्याला अनुभवाने खूप काही शिकवले होते. त्याच्या नकळत तो महत्त्वाच्या गोष्टी बोलत असे.

त्यावर ती म्हणाली, "बात तो तेरी सच है लेकिन दुनिया का यही रिवाज है!

त्याने तिला मूकसंमती दिली.

काही वेळ शांततेत गेला.

मग तीच म्हणाली.. जब मै अंदर थी तो तेरी बहुत याद आती थी!

मै तो ढंग से सो नही पाया वो दिनो मे! मधुकांत म्हणाला

ती थोडा वेळ थांबली मग म्हणाली.. चल आपण हे सारं सोडून कुठेतरी लांब जावू आणि मस्त जगू!

मलाही तसंच वाटतंय.. अशा ठिकाणी जावू जिथे आपल्याला कोणीही ओळखत नसेल.

हो मग आपण इज्जतीचे जीणं जगू.

हो.. त्याने तिला घट्ट मिठ्ठीत ओढले. आता त्याच्या मुखातून शब्द येत नसले तरी त्यांचा खूप संवाद चालला होता. हळूहळू ते स्वप्नाच्या प्रदेशात मुक्तपणे हिंडू लागले. त्यांना कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी त्याला उशिरा जाग आली होती. ती झोपलेलीच होती. त्याने तिला उठविण्यासाठी स्पर्श केला तर तिचे अंग तापले होते.

लावण्या... ऊठ... 

ती काही न बोलता तशीच पडून राहिली.

तोच म्हणाला.. बघ तुझं अंग तापलंय. चल दवाखान्यात जावून येवू!

नको.. मला कुठेच जावू वाटत नाही.

अगं, असं काय करतेस.. चल ऊठ.. दवागोळ्या खाल्ल्या नाहीस तर बरं कसं होईल.. आणि आज धंद्यावर जायचं नाहीस!

त्याने तिला उठवून बसविले. त्यानेच चहा बनविला. ते दोघे तयार होवून दवाखान्यात गेले.

डॉक्टरांनी तिला तपासले व काही दवागोळी लिहून दिली. तिला बाहेर बसवून डॉक्टरांनी सांगितले, आता काही दिवस तिला आराम करु दे.. धंदा वगैरे बिल्कुल बंद करायला सांग.

हो डॉक्टर साहेब, आता आम्ही यातून कायमचंच बाहेर पडायचं ठरवतोय...

गुड.. चांगला निर्णय आहे. आपल्याकडील काही दवागोळ्या देत डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले.

दुसऱ्या दिवशी तिला थोडं बरं वाटत होतं. ती उठली... फ्रेश होऊन तिने दोघांसाठी चहा केला.

चहा पिताना तो तिला म्हणाला... हे बघ अजूनही तुला ठीक वाटत नाही. बाहेर जावू नकोस. घरीच आराम कर.

त्याचं हे बोलणं तिला आवडलं होतं. आपलीही काळजी घेणारं कोणतरी आहे या भावनेनं ती सुखावली होती.

नाही जाणार कुठेच... घरातच राहीन, आणि आता तशीही मला घरात राहायची सवय करायची आहे.

हो ते तर आहेच.. तो मंद हसला. बरं चल, मी जातो आपल्या कामावर... असं म्हणून तो उठला.

तो निघून गेलेल्या वाटेकडे ती पाहत राहिली.


दुपारी जेवण झाल्यावर तिने चांगली झोप काढली. सायंकाळी तिला जाग आली. तिला आता ताजंतवानं झाल्यासारखं वाटत होतं. ती नेहमीच्या सवयीने नटूनथटून खिडकीत उभी राहिली. खाली रस्त्यावरची वर्दळ तिला दिसत होती. रस्त्यावर तिच्या ओळखीच्या भडक मेकअप करुन ग्राहकांना आकर्षित करीत होत्या.

हे जीवन दिसतं तस्सं सुंदर नाहीये याची तिला जाणीव होत होती. तिला आठवलं मागच्या आठवड्यात शमी रस्त्यावर मरुन पडली होती. तिला एड्स झाला होता... अशी नंतर हलक्या आवाजात लोकांची कुजबुज तिने ऐकली होती. देहविक्रय करणाऱ्या बाईचं म्हातारपण भयानक असतं, हे तिला कळत होतं आणि मधुकांतच्या रुपाने तिला एक प्रेमळ काळजी करणारा साथी भेटला होता. आता त्याच्यासोबत आपलं पुढील आयुष्य सुखी जगायचं स्वप्न ती पाहात होती. तितक्यात दरवाजाची कडी वाजली. तिला वाटलं मधुकांतच आलाय. ती झटकन उठून दरवाज्याकडे पळाली. तिने दरवाजा उघडला तर समोर लुक्का होता. लुक्का एक तगडा गडी होता. तो कधीतरी या वस्तीत यायचा. त्याला लावण्या आवडायची. तो तिला जास्त पैसे देवून खुश करायचा. ती तेव्हा त्याची वाट पाहायची. तो आला की तिला आनंद होत असे. पण आता चित्र बदललं होतं. तिला मधुकांत भेटला होता तेव्हापासून तिचं जग बदललं होतं.

लुक्का तिला पाहून खुश झाला. ती नटलेली होती. त्याला वाटलं ती आपल्याचसाठी नटलीय.

तिचा सावळा वर्ण त्याला आकर्षित करीत होता. तो तिची परवानगी न घेताच घरात शिरला...जानेमन, बोल कशी आहेस?

तिला काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. त्याच्या अचानक येण्यानं ती गडबडली होती. कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली.. मी ठीक आहे... तू दोन वर्षांनी दिसतोस. होतास कुठे?

लुक्का खळखळून हसला. अगं, मी सरकारी पाहुणा म्हणून आत होतो. एका रॉबरीच्या केसमधे अडकलो होतो. खरं सांगू जानेमन.. तुझी जेलमध्येही खूप आठवण यायची.

तो जवळ आला तशी ती लांब सरकली.

क्या हुवा.. सब ठीक तो है ना!

माझी तब्येत ठीक नाही लुक्का!

काय झालंय तुला.. ये जवळ ये तुला एकदम ठीक करतो. तो खळखळून हसला.

लुका.. आता मी बदललेय

म्हणजे?

मी हा धंदा सोडलाय!

काय?.. नाही.. पटत नाही.. अगं एकदा या धंद्यात आल्यावर परत फिरता येत नाही. हा नियम आता मी तुला सांगू का?

लुक्का.. मधुकांत हा माझा नवरा मला आता हे सारं सोडून दूर घेवून जाणार आहे.. तेव्हा माझ्यावर दया कर आणि निघून जा!

लुक्का थांबला... काही वेळ विचार करुन म्हणाला, ठीक आहे जातो मी.. पण एकदा शेवटचं मला तुझ्याकडून हवंय.

माझ्यात काही नाही रे... बाजूला तरुण मुली आहेत तू त्यांच्याकडे जा!

तुझ्यात काय आहे हे तुला नाही कळणार ते मला कळतं. मला तूच हवीस... हवं तर मी तुला भरपूर पैसे देतो.

तुला कळत कसं नाही आता मी हे सारं सोडलंय.

हे बघ.. आतापर्यंत तुला मी प्रेमानं बोलतोय. आता लुक्का चिडला होता. तुला मी भरपूर पैसे देतोय.. आणि हे जर तुला नको असेल ना तर मग तू ज्या नवऱ्यासाठी हे करतेस त्याला मी सोडणार नाही. लुक्काच्या डोळ्यात रक्त उतरले होते.

क्षणभर ती थबकली आणि मग विचार करायला लागली. एकदा करायला काय हरकत आहे. तस्संही लुक्काला तिने आपले शरीर अनेकदा सुपुर्द केले होते. मधुला हा काही त्रास तर देणार नाही ना... हा उलट्या काळजाचा आहे. आणि त्याचं जर ऐकलं तर भरपूर पैसेही मिळतील.. आणि हे सारं मधुला कळू द्यायचं नाही. एक पाप सगळ्यांच्या भल्यासाठी करु या, असे वास्तववादी विचार तिच्या मनात येवू लागले.


लुक्काने हे ओळखलं. त्याने हळूच दरवाजाला कडी घातली आणि तो तिच्याकडे वळला. ती प्राण नसल्यासारखी स्तब्ध उभी राहिली. तिच्या साडीचा पदर खाली पडला होता. आता फक्त तिच्या श्वासोछ्वासाने छाती वरखाली होत होती. लुक्काने तिला मिठीत ओढलं. आता तो बेभान झाला होता. त्याची धडपड बराच वेळ चालली. ती मात्र निपचित पडून होती.

तितक्यात दरवाजा वाजला.

तिचं काळीज धडधड उडायला लागलं होतं. लुक्का उठला. त्याने कपडे सावरले, तिच्या अंगावर पैशाचं बंडल भिरकावून तो दरवाजाकडे वळला. ती उठून बसली होती.

दरवाजा उघडला आणि समोर मधुकांत होता. लुक्का त्याच्याकडे पाहून मंद हसला व बाहेर पडला.

मधुकांतला ही अपेक्षा नव्हती. असा प्रसंग त्याच्या आयुष्यात अनेकदा आला होता. तेव्हा त्याला त्याचे काहीच वाटले नव्हते. आज मात्र त्याला खूप राग आला होता. लावण्या मला फसवू कसं शकते हेच त्याच्या मनाला लागलं होतं.

तो आत आला आणि गप्प बसून राहिला. त्याला तिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नव्हती.

तीच उठली आणि त्याच्याकडे आली.

मधू.. मला माफ कर.. पण हे मी मनापासून नाही केलं

तू कुछ बोल मत.. तुझे जो करना है वो कर.. मै तेरा कोई नही.. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं.

तिला काय बोलावं हे सुचेना.

फक्त एकदा मला माफ कर मधू... मी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. त्याने तुला दुखापत करायची धमकी दिली.. मग मी घाबरले.. खरं सांगते हे फक्त तुझ्याचसाठी केले.

तो थांबला. ती ओक्साबोक्सी रडत होती.

तिचे रडणे त्याला खरे आहे हे जाणवले. तो तिच्याजवळ सरकला आणि हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला. तशी ती वळली व त्याच्या गळ्यात पडली. डोळ्यातून वाहणारे पाणी थांबायचे नाव घेत नव्हते.


काही वेळाने ते एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले. तो उठला आणि आपली बॅग त्याने बाहेर काढली. तो कपडे भरायला लागला.

ती म्हणाली, काय करतोस?

आपण दोघे आजच रात्री हे शहर सोडतोय. तूही तयारी कर.

ती ही लगबगीने उठली आणि आपले साहित्य मोठ्या बॅगेत भरु लागली.

आता तिला नव्या स्वप्नाचे वेध लागले होते. कर्नाटकमधील एका छोट्या शहरात मधुकांतची बहीण राहात होती. तिकडे जावून ते आपला संसार नव्याने उभारणार होते.

रात्री उशिरा बांधाबाध केलेले आपले सामान घेवून ते दोघे बाहेर पडले. रस्त्यावरचे दिवे तेवढे त्यांना निरोप देण्यास जागे होते.

लावण्याच्या डोळ्यात त्याने पाहिले तर त्याला त्यात दोघांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न ठळक दिसत होते. ते गाडीत बसले. शहर सोडताना दोघांना खूप भरुन आले होते. गाडी धकली तसे हळूहळू शहरासोबत त्याचा भूतकाळ मागे पडत गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy