स्त्री - कालची आणि आजची
स्त्री - कालची आणि आजची


स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अगदी ऋषी - मुनींच्या काळात स्त्रिया फार स्वतंत्र जीवन जगत होत्या. गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा यां स्त्रिया त्याकाळीही साक्षर होत्या. त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य होते पण पुढच्या काळात सुलतानी आक्रमणामुळे आपल्या देशातील स्त्रिया पुन्हां पडद्याआड गेल्या. यवन सैनिक स्रियांच्या अब्रूवर हात उचलत. याचाच परिणाम त्यांना शिक्षण किंवा व्यवहारी जगापासून वंचित रहावे लागले.
व्यक्तिगत स्वातंत्र्याला मुकल्या 'चूल नि मूल' यातच त्यांचे विश्व् गुरफटले गेलें. बाहेरील जगाशी संपर्क बंद झाला. पुढे शिवाजी महाराजांनी त्यांना आदराची वागणूक दिली. शत्रूस्त्रियांनाही मातेसमान मानुन त्यांचा साडीचोळी देऊन आदरसत्कार केला. इतकेच नाही तर मग्रूर पाटलाने स्त्रीवर हात टाकल्याचे समजताच हातांची खांडोळी करण्याचा हुकूम सोडला. पुढे राजस्त्रिया गादीवर बसून राज्यकारभारही करू लागल्या. ताराराणी येसूबाई अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धकौशल्य आत्मसात करून गनिमाला इंगा दाखवला. पेशवाईतही स्त्रियांना मानाची वागणूक मिळाली गेली.
पुढे समाजसुधारकांनी स्त्रिशिक्षण आणि त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर चांगलाच प्रकाश टाकला. त्यांना साक्षर करण्याचा विडाच उचलला. ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर बनवून स्त्रियांना शिकविण्यासाठी ठेवले. पहिल्या स्त्रीशिक्षिका सावित्रीबाईंना खूप त्रास सहन करावा लागला पण त्यांनी न डगमगता आपले कार्य चालूच ठेवले. स्वातंत्र्यपूर्व काळातील आनंदीबाई जोशी रमाबाई टिळक ताराबाई शिंदे सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई यांनी साक्षरतेचे धडे घेऊन देशाच्या स्वातंत्र्याला हातभार लावला. घराच्या चार भिंतीत अडकलेली स्त्री पडद्याबाहेरच्या जगात प्रवेशली तिची वैचारिक क्षमताही सुधारली. तरीही मनाला खटकत रहाते की स्त्री खरोखऱच स्वतंत्र झालीय कां? मुठ्भर लोकांनी आपापल्या पत्नींना साक्षर केले तर समाजातल्या सगळ्या स्त्रिया स्वतंत्र झाल्यात कां? यां प्रश्नाचे उत्तर आज एकविसाव्या शतक संपण्याच्या काळातही नाही असेच म्हणावे लागेल.
याला कारणीभूत आहे पुरुषांची दंडेलशाही वृत्ती. प्रत्येक घरातील कुटुंबातील कारणे वेगळी असतीलही पण प्रत्येक घरातील पुरुष आजही पत्नीला बरोबरीचे मानत नाही. तिच्या विचारांच्या पंखांना छाटले जाते. उंच आकाशात भरारी मारणाऱ्या बाईला तुझी जागा पायताणाजवळ म्हणून हिणवले जाते तिच्या विचारांना भले तें योग्यही असतील पण दुधातल्या माशीप्रमाणे लांब फेकले जाते. तिचा सल्ला ग्राह्य न मानता तु स्वयंपाकघराचे पहा. बाहेरच्या व्यवहारात नाक खुपसू नकोस असे बोलून तिचे खच्चीकरण केले जाते. हिला किंमत दिली तर ही डोईजड होईल ही वृत्ती जोपासली जाते.
पण आज संगणक युगातल्या मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हर क्षेत्रांत काम करतांना दिसत आहेत. 'आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे' यां उक्तीप्रमाणे त्यांच्या पंखात आता खूप बळ एकवटलेय. दडपशाहीला न जुमानता ती 'हम भी कुछ कम नही' हें सिद्ध करू पाहतेय. आज सगळ्या क्षेत्रात त्या हिरीरीने भाग घेतेच पण पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही भाग घेतेय....... नाही जिंकतेय. स्वतःची जीवनाची जबाबदारीची लढाई स्वतःच लढतेय. पण मागे हटत नाही. कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांनी तरी गगनाला हात टेकवण्याचे साहस केलेय. विज्ञान क्षेत्राने यां युगातल्या मुलींच्या जीवनवाटा उंचावल्यात. पायलट किंवा मोटरवूमन त्या बनल्यातच. संशोधिका लेखिका कवयित्री बनून आपल्या तलवाररुपी लेखणीने शब्दांचे वार करतात. याही पुढे सांगायचे तर पुलवामा मध्ये निष्पाप जवानांवर बॉम्बस्फोट करणारे आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात अग्रेसर असणारी धडाडीची एअरक्राफ्ट पायलटने शौर्याची कमाल करून पुरुषांच्या मक्तेदारीला छेद दिला.
शहरात नि सुशिक्षित कुटुंबात मुलीच्या पंखांना विशेष बळ दिले जाते. माणसाला सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग नाही करता येत. खेड्यात आजही कित्येक कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. इच्छा असूनही परिस्थितीने गांजलेली ही कुटुंबे मुलींच्या शिक्षणाकडे कानाडोळा करतात. एकापेक्षा अनेक मुले असतील तर मुलगा हा 'वंशाचा दिवा' 'म्हातारपणची काठी' मानून मुलाला शिक्षण देतात तो मुलीपेक्षा अभ्यासात कच्चा असूनही पण मुलीच्या प्रगतीचे दोर कापले जातात. अशीही धारणा असते की जास्त शिकलेली मुलगी डोईजड होईल किंवा तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही. सर्वांगाने विचार करता मुलीच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यापेक्षा तिला कमीपणा देण्याचेच प्रयोजन अधिक असते. त्यातून बंड करणारी मुलगी आगाऊ म्हणून गणली जाते. तिची समाजात बदनामी केली जाते. तिने आपल्या हेतूपासून ढळण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. काही घरांत मुलगी स्वतंत्र विचारांची असेल तर तिला ठार मारण्यासही कमी केले जात नाही. काही वेळेस तिला कोंडून ठेवणे मारहाण करणे असले अमानुष प्रकार केले जातात. मग ती मुलगी असू की पत्नी. आज संगणक युगात मुली खूप आघाडीवर आहेत. त्या पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे अत्याचार सहन करत नाहीत तर त्या विरोधात आवाज उठवतात पुरुषप्रधान संस्कृतीत त्या स्वतःचे स्थान पक्के करू पहात आहेत. त्यांच्या यां साहसाला कायद्याचीही साथ आहे. त्या स्वतःवरील अन्यायाला स्वतःच वाचा फोडतात.
गरीब गायीप्रमाणे असणारी नारी वेळेला नागीण बनून डसायलाही मागेपुढे पहात नाही. हुंडाबळी असो की पतीकडून शोषण असो त्या अन्यायाविरोधात ठाम उभ्या राहातात. एकेकाळी खाली मान घालून शेळीसारखी वावरणारी मुलगी वाघिणीचे रूप कधी घेईल सांगता येत नाही. आज पहिली बेटी धनाची पेटी म्हणून स्वीकारण्यातच धन्यता आहे. मुलगी म्हणून गर्भात हत्या करणाऱ्या पुरुषाला मुलींच्या कार्यकर्तृत्वाने चांगलीच चपराक बसवली आहे. तिच्या यशाची भरारी हिमालयाहून उंच सागराएवढी विस्तीर्ण नि गगनाला गवसणी घालणारी आहे. गर्भातून येणारी तिची हाक तिच्या यशोशिखराची नांदी आहे. वात्सल्यतेचा झरा असणारी ही स्त्री स्वाभिमानाला धक्का लागताच वाघिणीप्रमाणं चवताळून उठणारआहे. कारण तिच्या रगारगात तुळजाभवानीच्या तलवारीची तळपती धार आहे. ती महिषासुरमर्दिनी नार आहे.