Hari Das

Horror Crime Thriller

4.0  

Hari Das

Horror Crime Thriller

षड्यंत्र

षड्यंत्र

11 mins
12.8K


“सरला आता वैद्यकीय मदतीच्या पलीकडे गेली आहे.. या दवाखान्यात तरी तिला काहीच मदत होण्यासारखी नाही!”


सरलाबाबत डॉक्टरांनी केलेलं हे निदान ऐकून रामदासला आपला चेहरा गंभीर आणि दुःखी ठेवणं फार जड गेलं! मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असताना चेहऱ्यावर दुःखाचे भाव ठेवणं, हे एखाद्या कलाकारालाच जमू शकतं! पण, रामदास काही कलाकार नव्हता. म्हणजे, नाटकात, चित्रपटात किंव्हा एखाद्या शोमध्ये अभिनय करण्याचा त्याला कोणताच अनुभव नव्हता. परंतु, आयुष्याच्या रंगमंचावर त्याने अनेक भूमिका अगदी बेमालूमपणे साकारल्या होत्या.


सरलाला आपल्या प्रेमात गुंतवण्यासाठीची निरागस, निष्पाप आणि काहीशा स्वप्नाळू प्रेमिकाची भूमिका, सरलाशी लग्न झाल्यावर तिच्या घरात घरजावई बनून गेला तेव्हा बायकोवर भरभरून प्रेम करणाऱ्या नवऱ्याची भूमिका, तिच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी आदर्श जावयाची भूमिका. आणि आता सरलाला अनाकलनीय व्याधी जडल्यावर तिची हरघडी काळजी घेणाऱ्या जोडीदाराची भूमिकाही तो अतिशय उत्तमोत्तमपणे वठवीत होता. पण डॉक्टरांच्या वाक्याने त्याच्या मनात आसुरी आनंदाची अशी लाट आली की, त्याला मनातल्या भावना लपविणे मुश्कील झाले.. एक क्षण त्याच्या डोळ्यात आनंदाचे भाव तरळले.. मात्र चेहऱ्यावरच्या रेषा बदलण्याआधी त्याने स्वतःवर काबू मिळवला आणि चेहरा अत्यंत कष्टी करत दाटून आलेल्या कंठाने त्याने डॉक्टरांना विचारलं,

   

“फॉर गॉडस सेक! मला काहीतरी सुचवा की! किमान तिचा त्रास कमी होईल यासाठी तरी काही उपाय असेल ना!!”


जणूकाही रामदास आपल्या उद्वेगावर नियंत्रण ठेवू शकला नाही! त्याचे डोळे चुरचुरत असल्याचाही भास डॉक्टरांना झाला.. केवढा उत्कृष्ट अभिनय!


डॉक्टरांच्या हाताचा खांद्याला स्पर्श झाला, तेव्हा तर त्याची प्रतिक्रिया निसंशय कौतुकास्पद होती. स्वतःला सावरत, “आय अ‍ॅम सॉरी.” तो पुटपुटला.


“सॉरी का म्हणून?” डॉक्टर म्हणाले. 


“केवळ पंचविसाव्या वर्षी एखाद्याचं वैवाहीक जीवन अशा अवस्थेत सापडणं ही काय साधी गोष्ट आहे? पण माझा खरोखरच नाईलाज आहे! खरं सांगायचं झालं तर सरलामध्ये शारीरिक दोष काही दिसत नाही. काही शॉक वगैरे बसला असावा.. किंवा हा त्याहीपेक्षा काही वेगळा प्रकार असावा! पण तो प्रांत माझा नाही. तुम्ही त्यातल्याच कोणाकडे तरी न्यायला हवं!’’


नंतर त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक नजरेने पाहत डॉक्टर म्हणाले, “रामदास, फार काळजी करू नकोस! एक दिवसाआड किंवा जसं शक्य होईल तसं मी तुझ्या घरी येऊन सरलाची तब्येत बघणार आहेच!”


डॉक्टरांनी रितसर डिस्चार्ज दिल्यानंतर रामदासने सरलाला घरी आणली. दुमजली आलिशान बंगल्याच्या खोलीतल्या एका पलंगावर पडलेल्या असाहाय्य आणि जर्जर झालेल्या सरलाला पाहून तो स्वतःशी खदखदून हसला.


'एक शेवटचा प्रहार! फक्त एक कळ फिरवली की, सरलाचा मृत्यू! आणि मग सगळ्या भानगडीतून आपण मुक्त होऊ..!'


आजवर कोणालाही संशय आला नव्हता.. यापुढेही संशय घ्यायला जागा उरणार नव्हती! 


'अडीच कोटीच्या मालमत्तेचे मग आपण एकटे धनी!'


हा विचार रामदासच्या मनात आला त्याक्षणी त्याचा चेहरा भयानक दिसत होता. मानवतेऐवजी तेथे निर्घृण, कृतघ्न, पाशवी लालसा होती. आपल्याच तंद्रीत त्याने दार लावून घेतलं आणि तो बाहेर आला. मनात आसुरी आनंदाची भरती आली होती.. 

नेहमीप्रमाणे रामदासची पावलं बारकडे वळली. दोन पेग पोटात जाताच मनावर एक प्रकारची धुंदी चढली. त्याच धुंदीत तो घरी आला. घरी आल्यावर सरलाची असाहाय्यता पाहण्याची त्याला उत्कट इच्छा झाली. पलंगावर पडलेल्या सरलाचे असाहाय्यतेचे, वैफल्याचे अश्रू बघितले की त्याला एक प्रकारचं समाधान मिळत होतं. एक एक पाऊल करत तो जिना चढून सरलाच्या खोलीजवळ आला. एका उद्दाम बेफिकिरीने त्याने जोरात दार उघडलं..


रामदासला बसलेला धक्का अनपेक्षित होता.. आतलं दृश्य पाहून तो त्याच पवित्र्यात थिजून उभा राहिला.. सरला पलंगावर उठून बसली होती.. तिचं ते कृश झालेलं शरीर एखाद्या सांगड्यासारखं दिसत होतं.. तिचं तोंड उघडं होतं. उघड्या तोंडातून श्‍वास घरघरत होता. ओठांच्या फटीतून लाळ गळत होती. आणि तिचे डोळे! भयंकर!! मोठे मोठे वटारलेले लालभडक डोळे.. त्या डोळ्यात क्रौर्य होतं, खुनशीपणा होता; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं..! लकाकणारे डोळे रोखून ती त्याच्याकडेच बघत होती. भीतीची थंड जाणीव सरसर करत तळपायापासून निघाली ती पूर्ण शरीरभर पसरली. त्याचं सर्वांग थरथरू लागलं; पण भीतीने का थंडीने, हे त्याचं त्यालाच कळेना.


रामदासची सारी नशा एका सेकंदात उतरली होती. तो समोर जे पाहत होता त्याचा अर्थ त्याला पुरेपूर लक्षात येत नव्हता. सरलाच्या त्या विदारक दर्शनानं तो पूर्णपणे हबकला होता. खोलीत जाण्याची त्याची हिंमत झाली नाही. दार लावून घेत थरथरत्या पावलांनी आणि धडधडत्या हृदयाने तो खाली आला. नंतर सावरलेल्या मेंदूत विचाराचं चक्र फिरू लागलं!


'सरलामध्ये तर हालचाल करण्याचंही त्राण नव्हतं; मग ती उठून बसली कशी? आणि तिच्या डोळ्यांकडे पाहून आपल्याला इतकी भीती का वाटली?'


तिच्या डोळ्यातले नुसते भाव आठवून आताही त्याचं सर्वांग थरारलं.. त्या आलिशान बंगल्यात त्याला एकाएकी कोंडल्यासारखे वाटू लागले. आताच्या आता आपण बाहेर गेलो नाही तर जीव गुदमरून जाईल असे वाटू लागले. घराचे मोठे दार उघडून तो बाहेर आला; तेव्हा कुठे त्याला जरा बरं वाटलं!


रस्त्यावरून चालता चालता रामदासच्या डोक्यातील विचार विजेच्या वेगाने धावत होते. बारमध्ये घुसून पुन्हा दोन पॅक पोटात रीचवल्यानंतर त्याला खरा शहाणपणा सुचला!   


'आपण उगाच इतके घाबरलो! सरला उठून बसली तर त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे?' 


आतातर त्याला आपल्या वेडपट, निरर्थक मूर्खपणाच्या वर्तणुकीचा आणि भित्रेपणाचा संतापही यायला लागला. आजवर तो स्वतःला फार निडर समजत होता; पण वास्तविकता तशी नव्हती. त्याचा बेडरपणा निधड्या छातीचा नव्हता; तर त्याचं शौर्य कोल्ह्याच्या जातीचं होतं.. असाहाय्य जीवावर हुकूमत गाजवणारं! 


म्हणून तर त्याने सरलाच्या विरोधात हा कुटील डाव रचला होता!


होय! हे एक षड्यंत्रच होतं. सरलाला त्यानेच भुलावणी दाखवून फसवले होते. सुरुवातीला त्याची नजर सरलावर पडली तेव्हा तिच्या रूपाने आणि प्रमाणबद्ध मादक शरीराने त्याला भुरळ घातली. तिच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी तो वेडापिसा झाला. मग त्याने सरलाभोवती प्रेमाचं जाळं विणलं. अल्लड बुद्धीची सरला त्या जाळ्यात अलगद फसली. रामदासचं खरं रूप तिच्या कधी ध्यानातच आलं नाही. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वात आणि गोड बोलण्यात ती इतकी गुरफटून गेली की, तिने आपलं सर्वस्व रामदासला अर्पण केलं.


जी अवस्था सरलाची तीच तिचे वडील गोविंदराव आणि आई कमलबाईची झाली. त्यांना रामदास हा आपल्या एकुलत्या एक कन्येसाठी योग्य वर वाटला. घरी इतकी गडगंज संपत्ती होती की रामदासला त्यांनी लग्नानंतर तिच्याच घरी राहण्याची ऑफर दिली.


मुळातच कफल्लक असलेल्या रामदाससाठी ही लॉटरीच होती. त्याने अभिनयाचा असा कस लावला की अगदी थोड्याच दिवसात तो सगळ्यांचा आवडता झाला. वर्ष-दोन वर्ष तर वाऱ्यावर उडावे तसे भुरकून उडून गेले. नंतर मात्र रामदासच्या मनातली आसुरी महत्वाकांक्षा जागी झाली. मधूनमधून मिळणाऱ्या हजार दोन हजार रुपयांनी त्यांची भूक भागत नव्हती. एखाद्या रक्तपिपासू जनावरासारखा तो चटावला होता. त्याला अजून पैसा हवा होता; नव्हे तर सगळी संपत्ती त्याला आपल्या घशात घालायची होती. पण त्याच्या वाटेत दोन अडचणी उभ्या होत्या. सरलाचे आई-वडील आणि सरला.


आधी रामदासने त्यांची हत्या करण्याचा विचार केला. मात्र तितकं धैर्य त्याच्या अंगात नव्हतं. त्याची जात मुळातच विश्वासघातक्याची होती. आधीपासूनच ही अमानवी, राक्षसी विकृती त्याच्यात दडलेली असावी! ती आता बाहेर आली आणि त्याने एक अघोरी बेत मनाशी आखला. त्याला तिघांचाही काटा काढायचा होता आणि स्वतःची कातडीही वाचवायची होती. 

रामदासने नागराज नावाच्या एका अघोरी मांत्रिकाची मदत घेतली. त्याच्याकरवी त्याने सरलाचे आई-वडील गोविंदराव आणि कमलबाईवर चेटूक प्रयोग केला. नागराजने नेमकं काय केलं? हे रामदासला कधी उमजलं नाही. परंतु त्याने वेळोवेळी दिलेल्या वस्तू आणि पदार्थ त्याने त्या दोघांना लपून खाऊ घातले. परिणाम लवकरच समोर आला. सुरुवातीला कमलबाई आणि नंतर गोविंदराव यांच्यावर एकामागून एक मृत्यूने अकाली घाला घातला.


सगळं अगदी बिनबोभाट सुरू होतं.. रामदासवर कोणालाही संशय घेण्याची गरज भासली नाही. परंतु आई-वडिलांच्या आकस्मिक आणि जराशा अनैसर्गिक मृत्यूने सरलाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिच्या डोळ्यात अविश्वासाचे भाव दिसताच वेळ जाण्याआधी रामदासने तिच्यावरही तोच प्रयोग आरंभला. पण सरला जराशी सावध झाल्याने रामदासला मर्यादा पडू लागल्या होत्या. अर्थात माणूस कितीही सावध असला तरी तो कधी ना कधी जरासा सैल होतोच! त्याचाच फायदा रामदासने उचलला आणि सरलाच्या शरीरावर करणीचे परिणाम दिसू लागले. आणि आता तर ती अगदी मरणासन्न अवस्थेत जाऊन पोहोचली होती.. डॉक्टरांनाही तिच्या आजाराचं निदान करता आलं नव्हतं.. गोविंदराव आणि कमलाबाई यांच्याही मृत्यूचं कोडं डॉक्टरांना सोडवता आलं नव्हतं.. दोन-चार दिवस किंवा जास्तीत जास्त आठवडाभरात सरलाचाही निकाल लागणार होता.. आणि कुणीही रामदासकडे बोट दाखवणार नव्हतं!


'किमान एक आठवडाभर तरी हे नाटक सुरू ठेवलं पाहिजे!'


रामदासने स्वतःशीच विचार केला आणि तो बंगल्यावर परत जायला निघाला. मगाशी आलेला भीतीदायक अनुभव दारूच्या अंमलाखाली आता तो पुर्णपणे विसरला होता. निश्‍चिंत मनाने बंगल्यात आला आणि खालच्याच एका सोफ्यावर झोपी गेला.

सकाळी त्याला जाग आली तेव्हा आठ वाजुन गेले होते.. त्याच्या लक्षात आलं की नऊ वाजता डॉक्टर सरलाच्या व्हिजिटसाठी येणार होते. अगदी नाईलाज म्हणून का होईना त्याला तितक्यापुरती तरी सरलाची काळजी घ्यावी लागणार होती. तो गडबडीत सर्व आटोपयला लागला. पण त्याची अंघोळ होत नाही तोच डॉक्टर दारात हजर झाले. त्यांना घेऊन तो सरलाच्या वरच्या रूममध्ये गेला.


सरलाच्या रुमचा दरवाजा उघडताच डॉक्टरांच्या चेहऱ्यात बदल व्हायला लागला.. खिशातला रुमाल नाकाला लावत डॉक्टर सरलाच्या कॉटकडे गेले. एव्हाना काहीतरी सडल्याचा वास रामदासलाही जाणवला होता. कशाचा? ते समजत नव्हतं! पण वास येत होता. डॉक्टरांनी सरलाच्या शरीराला हात लावला आणि चमत्कारिक नजरेने ते रामदासकडे बघायला लागले. रामदासला त्यांच्या नजरेचा अर्थ समजला नाही. पण डॉक्टरांचे शब्द आले तेव्हा मात्र तो मुळापासून हादरला.


“रामदास, सरलाचा काल दुपारीच मृत्यू झाला आहे!”


डॉक्टरांच्या आवाजात आता संशय स्पष्टपणे जाणवत होता.


“याचा अर्थ तू कालपासून सरलाकडे बघितलंच नाहीस? तुझ्याकडून अशा वर्तूणुकीची अपेक्षा मी कधी केली नव्हती! सरलाचा मृत्यू होऊन तिचं शरीर सडायला सुरुवात झाली तरी तुझं तिच्याकडे लक्ष गेलं नाही!”


डॉक्टरांचा आवाज बराच चढला होता! पण रामदासला त्यांचा पुढचा आवाज ऐकूच आला नाही. रात्री पलंगावर उठून बसलेली सरला त्याच्या डोळ्यासमोर येत होती.


'सरलाचा दुपारीच मृत्यू झाला तर रात्री पलंगावर उठून बसलेलं काय होतं?' 


हा प्रश्न त्याच्या डोक्यात घनासारखे घाव घालत होता..


“ते दोन लाल लुकलुकते डोळे!” 

 

नुसत्या विचाराने त्याच्या शरीरातलं रक्त गोठलं. छातीतला श्वास छातीतच रुकला. शरीर लाकडासारखं ताठ झालं. त्याला बोलायचं होतं, पण जीभ टाळूला चिकटली होती. सगळ्या अंगात ताप भरला होता. हातपाय लटलट कापू लागले होते. चेहरा पांढराफटक पडला होता. खरी भीती काय? हे आजवर त्याला समजलंच नव्हतं. तो अनुभव आता येत होता.


डॉक्टर जर हजर नसते तर तेव्हाच त्याचं हृदय बंद पडलं असतं! पण डॉक्टरांनी त्याला सावरलं आणि खोलीच्या बाहेर आणलं. डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं तेव्हा तो जरा सावरला.


दुपारी चार वाजेपर्यंत तो सरलाच्या उत्तरकार्यात बिझी होता. वास्तविक पाहता त्याच्या रस्त्यातील शेवटचा अडसर दूर झाल्यावर त्याला आनंद व्हायला हवा होता! आता त्याचा तो स्वतंत्र होता. करोडोच्या संपत्तीचा एकटा मालक होता. चैन आणि ऐश्वर्यात तो आपल्या सगळ्या इच्छा आता पूर्ण करु शकत होता. त्याला अडवणारं कुणीही उरलं नव्हतं! पण त्याला समाधान वाटत नव्हतं. मनाला कशाचीतरी टोचणी लागली होती. भल्या-बुऱ्याची त्याने आजवर कधी चिंता केली नव्हती. आताही त्याला त्याची फिकीर नव्हती. परंतु काल रात्री मनाला भीतीचा दाहक स्पर्श झाला होता. सरलाचा मृत्यू दुपारीच झाला तर रात्री दिसलं ते काय होतं? हा प्रश्न मनात सतत रुंजी घालत होता. त्याचे उत्तर नागराजकडे मिळण्याची शक्यता होती. आपसुकच त्याची पावलं नागराजच्या घराकडे वळाली.


रामदास नागराजच्या घराजवळ पोहोचला तेव्हा सगळीकडे शांत शांत वातावरण होतं. 'यावेळी तर नागराजला लोकांचा गराडा पडलेला असायचा! मग आज येथे कुणीच कसं नाही?' रामदासला नवल वाटलं. तो जरा वेळ तेथेच घुटमळला. नागराजचा शिष्य म्हणवणारा एकजण त्या रस्त्याने येताना रामदासला दिसला. रामदासनेही त्याला गाठला आणि नागराजबद्दल विचारलं. त्याची हकीकत ऐकून रामदासच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा हादरली.


काल रात्रीच नागराजचा मृत्यू झाला होता. त्याला अतिशय भयंकर मरण आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास केव्हातरी नागराज मृत्युमुखी पडला असावा! सकाळी ज्याने त्याला पाहिले त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचा चेहरा विकृत झाला होता. त्यावर मृत्यूची शांती नव्हती. शेवटच्या क्षणी तो आत्यंतिक भीतीच्या अमलाखाली असावा, असे वाटत होते. चेहऱ्यावर रक्त साकळल्यामुळे एक गडद छाया आली होती; दातखीळ बसलेली होती. मृत्यूआधी त्याला काहीतरी भयानक दिसलं होतं; किंवा काहीतरी अमानवी त्याचा मृत्यू बनून आलं होतं! 


त्याने सांगितलेली अजून एक विलक्षण बाब म्हणजे नागराजच्या डोक्याजवळ लाल साडी नेसवलेली एक बाहुली होती. रामदासला आठवलं, लाल साडी सरलाची अगदी आवडती होती... सरलावर चेटूक करायचं त्या बाहुलीला त्याचमुळे नागराजने लाल साडी नेसवली होती!


कालपासून मन आधीच गोंधळले होते, त्यात हा आणखी एक धक्का. त्याची बेशुद्ध पडायचीच वेळ आली.


'नागराजच्या मृत शरीराजवळ सरलाची प्रतीकात्मक बाहुली आढळणे, हा निव्वळ योगायोग होता का? काल रात्री त्याला आलेला अनुभव आणि नागराजचा मृत्यू यात काही संबंध होता का? आणि संबंध असला तर यामागे कोण होतं?'  


“सरला!”

 

भीतीची एक थंड लहर रामदासाच्या शरीरात उठली.


'नाही हे शक्य नाही! हा निव्वळ एक योगायोग आहे!'


रामदासने स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.. पण त्याचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. त्याला भीती वाटत होती आणि मनाच्या या कमकुवतपणाबद्दल स्वत:चा रागही येत होता. स्वत:च्या भेकडपणाला एक शिवी हासडून तो तेथून निघाला आणि बारमध्ये घुसला. त्या रात्री त्याने प्रमाणापेक्षा थोडी जास्तच घेतली. बार बंद करण्याची वेळ झाली तेव्हा नाइलाजाने त्याला बंगल्याकडे जावं लागलं.


तो बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आला तेव्हा दरवाजा उघडण्यासाठी त्याला मनाचा हिय्या करावा लागला. रामदास आत आला आणि त्याच्या बेडरूमच्या रोखाने निघाला. त्याच्या मागोमाग काहीतरी त्याच्या पावलावर पाऊल टाकून आत येत असल्याचा त्याला भास झाला. त्याने एकवार मागे वळून बघितलंही पण त्याच्यामागे काहीच नव्हतं. 


एकाएकी घरातले सर्व वातावरणच भारल्यासारखं झालं होतं. कोणाच्या तरी इच्छेविरुद्ध आपण येथे आलो असल्याची प्रखर भावना त्याला जाणवत होती. आता त्याला अंधाराची, बंद खोल्यांची, रात्रीच्या त्या काळोखाचीचं भीती वाटायला लागली. 

भीतीचा अमल मनावर चढत असतानाच वरच्या मजल्यावरून दाण दाण पावलं टाकल्याचा आवाज आला. इतक्या वेळची घरातली शांतता एकाएकी भंग पावली होती. वरच्या मजल्यावरून आवाज येत होते. दारं दणादण उघडली जात होती. आणि त्या मागोमाग जिन्यावरून पावलांचे आवाज यायला लागले.. रामदासचं सर्वांग भीतीने थरथरत होतं.. घराबाहेर धूम ठोकण्याचा त्याचा विचार होता. पण पाऊल उचलत नव्हतं. त्याने सगळी शक्ती एकवटून दाराकडे पाऊल टाकलं.. पण दुसरं पाऊल उचलण्याची त्याची हिंमत झाली नाही. कारण दारात ते उभे होते.. गोविंदराव, कमलाबाई आणि सरला. त्यांचे चेहरे हिडीस झाले होते. खोलीतली हवा आता अधिकच कुंद झाली.. सोबतच खोलीत एक विलक्षण दुर्गंधी पसरली.. सडल्या-कुजल्यासारखी दुर्गंधी. त्याला गोविंदरावचे ओठ हलल्यासारखे दिसले..


“त्याला पैसा हवाये!” 


एक घोगरा, खर्जातला, उद्दाम आवाज आला.


“त्याला माझं शरीर पाहिजे!” 


दुसरा किनारी आवाज.. 


नंतर कोणीतरी हसलं. खालच्या, घाणेरड्या खर्जातल्या खदखदत्या आवाजात हसलं.


रामदासची अवस्था कठीण झाली होती. भीतीने त्याच्या पोटात गोळा आला होता, काळीज छातीच्या पिंजऱ्यात तडफड तडफड करीत होतं... हातापायांना झटके येत होते.. काहीतरी ओरडण्यासाठी त्याने तोंड उघडलं; पण घशातून केवळ कोरडी घरघरच आली.. भयातिरेकाने त्याची शुद्ध क्षणात हरपली.


तासभराने रामदासची शुद्ध परत आली. आधी त्याला आपण कोठे आहोत, हे काही समजेनाच. खाली टणक फरशी होती, ती गार होती. शरीर विलक्षण अवघडलं होतं. सर्व अवयव दुखत होते. सर्व शरीर घामाने ओलं चिंब झालं होतं. मग त्याची जाणीव परत आली. सर्व भयंकर-आठवणी धडाधडा समोर आल्या. शरीरावर सरसरता काटा आला. भयभीत नजरेने इकडे तिकडे पाहत त्याने उघड्या दारातून बाहेर धूम ठोकली.


घराबाहेर पडल्यावर तो किती वेळचा वाट फुटेल तसा धावत होता. काहीही करुन त्याला बंगल्याच्या दूर जायचं होतं.. शक्य तितक्या जास्त दूर! बंगल्याच्या, या शहराच्या सगळ्यांच्या दूर जायचं होतं.. शरीरातल्या सगळ्या शक्तीनिशी तो धावत होता.. ओळखी-अनोळखी रस्ते मागे पडत होते. पळता पळता तो किंचाळत होता.. ठेच लागून पडला तरी उठून पुन्हा पळत होता.. पायात त्राण नव्हते तरीही तो पळत होता.. शेवटी शेवटी त्याला पाऊल टाकणं कठीण झालं. तेव्हा तो एका ठिकाणी बसला.. मागच्या भिंतीला पाठ टेकून त्याने आपली मान सैल सोडली. चार-पाच मिनिटांत त्याचा श्वास नियंत्रित झाला.. डोकं ताळ्यावर आलं.. दृष्टी साफ झाली.. त्याने आजूबाजूला बघितलं-आणि त्याला धक्का बसला. तो त्याच बंगल्याच्या दाराला टेकून बसला होता.. आणि, दारात ते तिघे उभे होते.. गोविंदराव, कमलाबाई आणि सरला. सर्वजण वखवखल्या नजरांनी त्याच्याकडे पाहत होते. त्या नजरा भुकेल्या हिंस्र पशूंच्या होत्या.. त्यांच्या चेहऱ्यावर काळीज गोठवून टाकणारं भेसूर हास्य होतं..


सत्याच्या प्रचितीचा क्षण शेवटी आला होता.. रामदासला त्या बंगल्यातून सुटका नव्हती... त्याने जसा हळूहळू करत त्यांचा जीव घेतला होता! अगदी तसंच त्यालाही हळूहळू करत आपल्या षड्यंत्री पापाचा हिशोब त्याच बंगल्यात चुकता करावा लागणार होता....!


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror