शागिर्द भाग - 3
शागिर्द भाग - 3


व्यंकट मांत्रिक होता. दिवाकरमध्ये त्याला काहीतरी विशेष जाणवलं असलं पाहिजे - नाहीतर त्याची प्रथमच गाठ पडल्यापडल्या तो या अनोळखी माणसाला कशाला बोलावील? त्याचे ठोकताळेचं वेगळे होते; चारचौघांसारखे नव्हते. त्याच्या काही काही कृत्यांना कारणं नसत-वरवर पाहता ती कृत्यं अट्टाहासी माणसासारखी किंवा अविचारी माणसासारखी वाटत; पण त्याच्या मनात आत कुठेतरी एखादा आडाखा असायचा. दोन अधिक दोन म्हणजे चार हा आपला साधा हिशेब झाला. व्यंकटचे हिशेब काही वेगळेच होते. कदाचित त्याच्याकडे असलेल्या मंत्रशक्तीच्या वापरामुळे त्याला काही अधिकार प्राप्त झाला असावा!
असा हा व्यंकट जंगलाच्या अगदी आतमध्ये एका झोपडीत राहत होता. लोकांचा त्याला त्रास नको होता आणि लोकही तो दूर राहतो यातच खूष होते. तसं पाहता त्याचा एका ठिकाणी कधीच थारा नसे! कधी या गावाला तर कधी त्या गावाला त्याची भ्रमंती सुरु असे. करणी, भारणी, चेटूक, भानामती, अंगारे, धुपारे, मंत्र, तंत्र, अघोरी विधी यासाठी अनेक जण त्याच्याकडे येत... तोही आपल्या जवळच्या ठोकताळ्याने त्यांचं काम करुन देई! कोणत्या मंत्राने आणि कोणत्या विधीने नेमकं काय होतं? हे त्याला ठाऊक होतं. मात्र कसं होतं? यामागील कार्यकारण भाव त्याला माहित नव्हता. आणि, माहीत करून घेण्याची जरुरीही नव्हती. त्याचे विधी ठरलेले होते, त्यासाठीचे मंत्र उच्चार त्याला तोंडपाठ होते. त्याच्या गुरुने त्याला शिकवलेल्या या विधींचा विशिष्ट ठिकाणी ट्रिगरसारखा उपयोग व्हायचा, आणि त्याचं काम पूर्ण व्हायचं!
कशाने काय, आणि का? या फंदात तो कधी पडला नाही. कारण, एक तर ती बाब दुसऱ्याला समजून देता येणारी नव्हती. आणि त्याला स्वतःला समजून घेण्याची कधी गरजही पडली नव्हती! त्याला त्याच्या गुरुचे सूचक शब्द पक्के ध्यानात होते. त्यामुळेच त्याने आजवर कशाचाही अतिरेक केला नाही आणि काहीही वर्ज्य केलं नाही. शरीराच्या अनेक भुका असतात. पण, त्यासाठी त्याला कधी तरसावं लागलं नाही. स्त्रियांच्या सहवासाचीही त्याला कधी उणीव भासली नाही. गोऱ्या चामडीच्या स्त्रियांनी त्याला फाइव्हस्टार हॉटेलच्या आलिशान शयनगृहात नेलं होतं आणि दुसऱ्या सकाळी थकल्या शरीराने त्याला निरोप देताना त्याचे खिसे नोटांनी भरले होते. शालीन, सुसंस्कृत, प्रतिष्ठित घराण्यातल्या स्त्रियांनीही त्याच्याबरोबर रात्री काढल्या होत्या-तसाच तो झोपडपट्टीतही गेला होता.
व्यंकटचं आयुष्य एका चाकोरीत व्यवस्थित सुरू होतं. पण, गेल्या काही दिवसापासून या चाकोरीतून बाहेर पडावं, असं त्याला वाटू लागलं होतं! तंत्र-मंत्र शक्तीतील पुढचा टप्पा गाठण्याची त्याला आस लागली होती. पण हा प्रवास एकट्याने शक्य नव्हता. त्यासाठी त्याला एका सहाय्यकाची गरज होती. त्यांच्या जगात त्याला 'शागिर्द' अर्थात चेला म्हटले जाई! त्याचा शोध काही दिवसापासून व्यंकट घेत होता. अर्थात, हा शोध इतका सहज सोपा नव्हता. कारण, या विद्येचा शागिर्द होण्याचेही काही नियम होते, काही ठोकताळे होते. सगळ्याच विद्या शिकवल्या जात नसतात. काही विशिष्ट विद्या शिकण्यासाठी माणसाच्या अंगात काही अंतर्भूत लक्षणं असणं गरजेचं होतं. अशीच काही लक्षणं त्याला दिवाकरमध्ये जाणवली होती. दिवाकरला पाण्याबाहेर काढताच त्याच्या प्रशिक्षित नजरेला त्याच्यामधील वेगळेपण जाणवलं होतं. दिवाकर अर्ध-बेशुद्धवस्थेत असताना व्यंकटने मोहिनीच्या साह्याने त्याच्या मनात प्रवेश केला होता. दिवकरने बँकेत केलेला गफला, त्याला झालेली शिक्षा, हे सगळं त्याला कळलं होतं. शिवाय ज्याचा तो शोध घेत होता तेही त्याला त्याच्या मनाच्या तळात बघायला मिळालं. म्हणूनच व्यंकटने त्याला आपल्यासोबत येण्याचं सांगितलं होतं..!
क्रमशः