Hari Das

Drama Horror

4.2  

Hari Das

Drama Horror

शागिर्द भाग-2

शागिर्द भाग-2

7 mins
675


दिवाकर काळे, नावाप्रमाणेच त्याचं आयुष्यही सामान्य. एका खासगी बँकेत नोकरी, चार अंकी पगार आणि त्यात त्याचा संसार. असं त्याचं सर्वसामान्य आयुष्य शेवटपर्यंत सुरु राहिलं असतं! मात्र, शहाणे नावाचा एक मॅनेजर त्याच्या बँकेत रुजू झाला आणि त्याच्या ब्लॅक अँड व्हाईट सामान्य आयुष्याला गडद लाल रंग प्राप्त झाला. हा शहाणे बँकिंग क्षेत्रात जितका हुशार तितकाच उलट्या काळजाचा. त्याने दिवाकरसह इतर दोघांना आपल्या बाजूने करुन बँकेच्या पैश्यावरच डल्ला मारण्याचा प्लान रचला. त्यांची बँक खासगी असली तरी बरीच जुनी असल्याने बँकेत मोठमोठे खातेदार होते. त्यातील काहींच्या लाखोंच्या रकमा बचत खात्यात कित्येक वर्षांपासून तशाच पडून होत्या. मागील काही वर्षात त्या खातेदारांनी साधं अकाऊंट बॅलन्स तापसण्याचीही तसदी घेतली नव्हती. आशा खातेदारांच्या खात्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कम काढण्याची योजना त्यांनी रचली. सुरवातीला दिवाकर यात सहभागी होण्यास तयार नव्हता. पण कावेबाज शहानेने त्याला असं बौद्धिक दिलं की दिवाकर राजी झाला! सुरवातीला त्यांचा प्लॅन बऱ्याच अंशी यशस्वी झाला. जवळपास दहा लाखाची रक्कम त्यांनी काढली. आता दिवाकरच्या हातातही पैसा खुलखुळू लागला होता..त्यामुळे त्याच्या रात्री रंगीन झाल्या. आजवर मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे तो लागला. पण माणसाच्या इच्छा कधी संपतात का? दिवकरचेही तेच झाले. इच्छापूर्तीच्या नादात तो पूर्णपणे वाहवत गेला.


या जगात 'परफेक्ट क्राइम' नावाची गोष्टचं अस्तित्वात नाही! गुन्हेगार गुन्हा करतांना कितीही परफेक्ट नियोजन करत असला, तरी त्याच्या हातून एकादी चूक होतेच! अशीच एक चूक शहानेच्या हातूनही झाली आणि त्यांचं भांड फुटलं. जवळजवळ तीस लाखाच्या अपहार प्रकरणी सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले. सुदैवाने यात दिवाकरची भूमिका केवळ सहकार्याची असल्याचे तपासात समोर आल्याने त्याला दोन दिवसात जमीन मिळाला आणि त्याची नोकरीही कायम राहिली. आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हे दाखल होताच हवेत उडालेलं दिवाकरचं विमान झटक्यात जमिनीवर आलं. याप्रकरणात त्याची मोठी बदनामी झाली. पण, हेही दिवस निघून गेले. पुन्हा त्याचं सर्वसामान्य आयुष्य सुरु झालं. पण आता तो सामान्य राहिला नव्हता! त्याच्या जिभेला आणि शरीराला अनेक गोष्टींची चटक लागली होती. त्याच्या मनात विकृती निर्माण झाली होती. संध्याकाळी दारूच्या बाटल्या त्याला खुणावत असत. रात्र झाली की आजवर अंगाखाली घेतलेल्या नाजूक पोरींची आठवण त्याला बेचैन करत असे. पण, हाती पैसा नसल्याने त्याला यातील काहीच आता श्यक्य राहिले नव्हते. भविष्याचा विचार करुन पुन्हा आडमार्गाला जायचे नाही, हे त्याने ठरवले आणि मन मारुन तो आपल्या आयुष्यात रमण्याचा प्रयत्न करु लागला.

पुढे त्याच्यावरील दाखल गुन्ह्याचा खटला कोर्टात उभा राहिला तेंव्हा पुन्हा त्याच्या पोटात गोळा आला. पुन्हा बातम्या आणि चर्चांनी त्याची मान खाली गेली. 'एकदाची आत्महत्या करावी, आणि हा जाच संपवावा!' असं त्याला वाटलं.. तसा एकदा त्याने प्रयत्नही करुन बघितला; मात्र त्याची हिम्मत झाली नाही. झाल्या प्रकाराने तो प्रचंड अस्वस्थ झाला .. त्याला स्वतःचाच संताप येत होता. मग इतक्या दिवसांचं व्यवहारज्ञान मदतीस आलं. फासे उलटे पडतात कधीकधी... पण राग राग करण्यात काय अर्थ होता? मनाचा तोल मात्र जायचा! आणि मग हातून आणखीनच चुका व्हायच्या! मन ताळ्यावर आणलं पाहिजे, शांतपणे विचार केला पाहिजे...! या खटल्यात त्याच्याविरोधात कुठलाच सबळ पुरावा नसल्याने तो त्यातून सुटणार, हे अनेकांनी त्याला सांगितले होते. त्याचा वकील तर त्याला निर्दोषत्व बहाल करुन मोकळा झाला होता. त्यामुळे झाल्या गोष्टी नजरेआड करत हळूहळू तो निर्धास्त होत गेला.


गोष्टी नजरेआड केल्या म्हणजे काही त्या नाहीशा होत नाहीत..! कधी ना कधी आपलं कर्म त्याचा हिशोब घेऊन आपल्यासोमोर उभं राहतंचं!

दिवकरनेही गोष्टी नजरेआड केल्या, मात्र त्या संपल्या नाहीत. काळ आपल्या वेगाने पुढे जात राहिला. घटना त्यांच्या नेमाने घडत गेल्या..बघता बघता तीन वर्षांचा कालावधी उलटला..आणि दिवाकरचं कर्म त्याच्यासमोर उभं येऊन ठाकलं!


आज त्याच्या प्रकरणात निकाल सुनावला जाणार होता. सगळ्या आरोपींना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने काढले होते. या केसमध्ये दिवाकर निर्दोष सुटणार, याचा विश्वास त्याच्या वकीलाला होता. दिवाकरने इतरही अनेक वकिलांचे यावर सल्ले घेतले होते. 'तू सुटशील!' हेच प्रत्येकाने त्याला सांगितलं होतं. त्यामुळे बिनधास्तपणे दिवाकर न्यायालयात गेला. दुपारी चार वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरवात झाली. "नेमकं काय सुरू आहे?" हे सुरवातीला दिवाकरला कळलंचं नाही. पण जेव्हा न्यायाधीशांनी आपला आदेश वाचून दाखवला, तेव्हा मात्र दिवाकरच्या पायाखालून जमीन सरकली. आर्थिक अपहार प्रकरणात त्याचा थेट संबंध येत नसला तरी इतर आरोपींना साथ देण्याचा आणि सगळं ध्यानात येऊनही त्यांना सहकार्य करण्याचा ठपका न्यायालयाने त्याच्यावर ठेवला. इतरांना सात वर्ष तर दिवाकरला चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

एका क्षणात दिवाकरचं सगळे आयुष्य बदलून गेलं! न्यायाधीशांच्या अवघ्या दोन शब्दांनी त्याच्या सामान्य आयुष्याला सुरुंग लावला.. आजवर सर्वसामान्य माणूस असलेला दिवाकर काळे आता गुन्हेगार सिद्ध झाला होता.. आता या समाजात, त्याच्या स्वतःच्या कुटुंबात राहण्याचा त्याला अधिकार उरला नव्हता.. त्याचं आयुष्य आता चार भिंतीच्या आत बंदिस्त होणार होतं.. आयुष्याचं सोनेरी पान पुसल्या गेलं होतं.. त्याचा भविष्यकाळ अंधकारमय झाला होता.. यापुढे चार भिंती हेच त्याचं जग उरणार होतं. तिच्या अंगावर सरसरून काटा आला.. त्याला ते दोन दिवस आठवले! गुन्हा दाखल झाला तेव्हा एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यावर त्याला जमानत मिळेपर्यंत न्यायालयीन कोठडीत अर्थात जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. बंदिस्त जगातील ते दोन दिवस तू कधीही विसरू शकला नव्हता. आता तिथं चार वर्ष काढायचे म्हणजे? भीतीने त्याचे पाय लटलट कापू लागले. अंगाला थरकाप सुटला.


कोर्टाने आदेश सुनावताच दिवाकर आणि इतरांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्या हातात हातकड्या घालून त्यांना एका बेंचवर बसवण्यात आले.. सगळ्यांचीच अवस्था एकसारखी होती. मात्र त्यातल्या त्यात दिवाकर अधिकच खचला होता. त्याची बायको त्याला भेटायला आली तेव्हाही तो आपल्याच तंद्रीत होता. तिने आरडाओरड केली, रडारड केली शिव्याशाप दिले त्याचाही काही असर दिवाकरवर झाला नाही.. आयुष्यात झालेल्या उलथापालथीने जणू काही त्याची वाचाच बसली होती.


संध्याकाळ झाली तसे त्या सर्वांना पोलिस वाहनात बसवण्यात आले.. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता.. आपल्या स्वतंत्र आयुष्याचा अंत दिवाकर उदास नजरेने बघत होता. अर्ध अंतर संपलं... पावसाने अधिकच जोर पकडला.. त्या मुसळधार पावसात पोलिसांचा ते खटारा वाहन कसबस मार्गक्रमण करत होतं. आपल्या आयुष्यात झालेला हा बदल पचवण्याचा प्रयत्न दिवाकर करत होता.. एकाएकी त्याची विचारशृंखला तुटली. पोलीस वाहनाला करकचून ब्रेक मारला गेल्याचा आवाज कानावर आला.. काय होतंय?, हे कळण्याआधी आपण हवेत तरंगत असल्याचा भास दिवाकरला झाला.. दुसर्‍याच क्षणी अंगाला थंडगार पाण्याचा स्पर्श झाला आणि नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. “हा जीवनाचा अंत आहे!” एवढीच भावना त्याच्या मनात उमटली! नंतर काय होतंय समजण्याचं भान त्याला उरलं नाही..त्याची शुद्ध हरपली!


मुसळधार बरसणाऱ्या पावसात नदीचा पूल ओलांडताना पोलिस वाहन चालवणाऱ्या चालकाला समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज बांधता आला नाही! जेंव्हा अंदाज आला तेव्हा वेळ निघून गेली होती. त्याने करकचून ब्रेक मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती खटारा गाडी नियंत्रित झाली नाही. पुलाच्या एका कड्याला धक्का मारून पोलिस वाहन वाहत्या नदीच्या पाण्यात कोसळलं. सुदैवाने दिवाकर गाडीच्या सगळ्यात शेवटी बसला असल्याने गाडी नदीत पडण्याआधी तो पाण्यात पडला आणि नदीच्या प्रवाहात वाहून जायला लागला.. नाकातोंडात पाणी गेल्यावर प्रवाहाच्या पाण्यात आपण वाहून जातोय, इतपर्यंत त्याला शुद्ध होती. मात्र नंतर धक्क्याने त्याची शुद्ध हरपली..!

स्मशानातील आपला एक विधी आटोपून व्यंकट परत निघाला असताना नदीच्या पात्रात एक माणूस वाहून जात असल्याचे त्याला दिसले.. विद्युत गतीने तो पाण्यात शिरला आणि वाहून जाणाऱ्याला त्याने बाहेर काढलं. त्याच्या हातातल्या हातकड्या पाहून काय समजायचं ते व्यंकट समजला. त्याला एका मोठ्या दगडावर उताणे झोपून त्याच्या पोटातुन त्याने पाणी बाहेर काढलं, तेव्हा कुठे त्याला शुद्ध आली. तो दिवाकर होता!


दिवाकरला शुद्ध आली तेव्हा तो एका मोठ्या दगडावर पडला होता.. व्यंकट त्याच्यासमोर उभे राहून त्याचं निरीक्षण करत होता. क्षणभर दिवाकरला काहीच आठवलं नाही.. नंतर मात्र स्मृती जागी झाली आणि एक घटना त्याच्या नजरेसमोरून तरळून गेल्या. समोर उभ्या असलेल्या तो आश्चर्यचकित नजरेने पहात होता. “यानेचं आपल्याला नदीतून बाहेर काढलं असावं!” त्याच्या डोक्यात विचार तरळून गेला. आपल्या रक्षणकर्त्याकडे त्याने एकवार निरखून बघितलं. त्याचा अवतार पाहून त्याला थोडी भीतीच वाटली. "हा काही साधा माणूस नाही..!"मनाची पहिली प्रतिक्रिया उमटली! तो काही बोलणार होता, पण व्यंकटने त्याला थांबवलं.


“थोडावेळ तसाच पडून राहा, बुद्धीला जास्त त्रास देऊ नकोस! मला घाबरण्याचे काहीच कारण नाही!”

दहा पाच मिनिटात दिवाकरला थोडी हुशारी वाटू लागली, तसा तो उठून बसला. व्यंकट अजूनही त्याचं निरीक्षण करत होता!

“आपण माझे प्राण वाचवले त्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजे..!”

दिवाकरच्या तोंडातून स्वाभाविक शब्द बाहेर पडले. व्यंकटची कुठलीच प्रतिक्रिया उमटली नाही. तो अजूनही दिवाकरकडे नुसता पाहत होता. तो बोलायला लागला तेंव्हा दिवकरचे आभार त्याच्या ध्यानीही नव्हते.. त्याचे शब्दही मोजके आणि गूढ होते!

“तू कोण? कुठून आलास? याच्याशी मला काही कर्तव्य नाही..पण तू माझ्या कामाचा आहेस! माझ्याबरोबर येशील तर तुला कसलीही भीती नाही. तू यांवचं, हे मी म्हणणार नाही. फक्त एक सांगतो तुझ्यात ते गुण आहेत, तू एक उत्तम साधक होऊ शकतोस, मी तुला माझा शागिर्द बनवू शकतो!”

परत सांगतो, ‘‘तुला योग्य वाटेल तो मार्ग निवडायचं स्वातंत्र्य तुला आहे, तुला उत्तेजन देणं किंवा परावृत्त करणं- त्यातलं काहीही मी करणार नाही; पण, माझी इच्छा आहे की तू माझ्यासोबत चालावं! बाकी निर्णय तुझा..! तुला जर माझ्यासोबत यायचं असेल तरचं माझ्या पाठीमागे ये, नाहीतर तुझा मार्ग तुला खुला आहे.!”


व्यंकट त्याच्या जवळ आला त्याने हातकडीने बंदिस्त असलेले त्याचे हात हातात घेतले. एक जरासा झटका आणि दिवाकरच्या हातातल्या हातकड्या गळून पडल्या. आवक होऊन दिवाकर त्याच्या या कृतीकडे बघत होता. पण काहीही न बोलता व्यंकट माघारी फिरला आणि आपल्या रस्त्याने चालू लागला..!


एका दिवसात दिवाकरणे इतकी उलटापालट अनुभवली होती, की आता काही तर्कसंगत विचार करण्याची शक्तीच त्याच्यात उरली नव्हती! नियतीने एक नाही तर दोन वेळा त्याच्या आयुष्याला अशी कलाटणी दिली होती की तो भांबावून गेला होता. काही तासापूर्वी हातात हातकड्या घालून तुरुंगात निघालेला दिवाकर या क्षणी मोकळा झाला होता. अर्थात, त्याचं हे मोकळेपण निर्धोक नव्हतं. पोलीस केव्हाही त्याला पुन्हा अटक करुन तुरुंगात टाकू शकत होते. दिवाकरचं विचारचक्र जोरात फिरायला लागलं. "आपण कुठे जाऊ शकतो का?" यावर तो विचार करु लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की सभ्य समाजाचे सर्व दरवाजे आता त्याच्यासाठी बंद झाले आहेत. त्याने एकवार व्यंकटचा विचार केला. " हा माणूस काही साधा नाही, त्याचे धंदेही काही सभ्य वाटत नाहीत!" आपल्या या विचाराचं त्याचं त्यालाच नवल वाटलं! "आता आपण तरी कुठे सभ्य राहिलो आहोत?, चार वर्षाची शिक्षा झालेले आपण एक गुन्हेगार आहोत..!" दिवाकर उठला आणि व्यंकटच्या पाठीमागे निघाला. हा मार्ग कुठं जाणार?, आपलं काय होणार? याची त्याला आता भीती वाटत नव्हती. गेल्या काही तासात त्याने भयाचे इतके पदर पाहिले होते..इतकी रूपं अनुभवली होती की त्या एका दिवसानं त्याच्या संपूर्ण आयुष्यातल्या भीतीचा बॅकलॉग पूर्ण करून टाकला होता..!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama