शागीर्द
शागीर्द


दिवाकर त्या अनोळखी माणसाच्या मागे चालला होता..त्याच्यामागे गेलंच पाहिजे, अशी त्याच्यावर कुठलीचं सक्ती नव्हती. आता कुठेही जाण्यास तो मोकळा होता. परंतु परिस्थितीचं इतकी अपवादात्मक होती की, काहीसं गूढ आणि भीतीदायक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या त्या व्यक्तीच्या पाठीमागे जाण्याशिवाय गत्यंतर उरलं नव्हतं.. दुसरा एखादा पर्याय त्याला सुचतही नव्हता..! मुळात, एकाद्या पर्यायावर तर्कशुद्ध विचार करावा इतकीही क्षमता त्याच्या मेंदूत उरली नव्हती. गेल्या दिवसभरात त्याच्या आयुष्यात इतक्या चमत्कारिक घटना घडल्या होत्या की, त्यामुळे तो पूर्णपणे चक्रावून गेला होता. अवघ्या चोवीस तासात त्याच्या जीवनाला एकदा नव्हे तर दोनदा अशी वळणं आली होती की त्याच्या जीवनाचे सगळे संदर्भ बदलून गेले होते. एखाद्या सिनेमाच्या पटकथेलाही लाजवेल असा विस्मयकारी खेळ नियतीने दिवाकरसोबत खेळला होता. हे सर्वच इतकं अनपेक्षित आणि भयानक होतं की, त्याचं डोकं बंद पडलं होतं.. कुठलाच विचार त्याला सुचत नव्हता. आताही तो ज्या गूढ व्यक्तीच्या पाठीमागे निघाला होता त्याची भेटही काही साध्या परिस्थितीत झाली नव्हती..! नाका-तोंडात पाणी जाऊन अगदी मृत्यू समोर उभा दिसत असतांना त्याने दिवाकरचं मानगूट धरुन त्याला बाहेर काढलं होतं. त्याचं एकवार लक्षपूर्वक निरीक्षण करुन त्या व्यक्तीने दिवाकरला आपल्या पाठोपाठ येण्याचे सांगितले होते, तेही अत्यंत गूढ शब्दांत!
‘‘तुला योग्य वाटेल तो मार्ग निवडायचं स्वातंत्र्य तुला आहे, तुला उत्तेजन देणं किंवा परावृत्त करणं- त्यातलं काहीही मी करणार नाही; पण, माझा तर्क आहे की तू एक उत्तम साधक होऊ शकतोस! तुझ्यात ते गुण आहेत.. माझी इच्छा आहे की तू माझ्यासोबत चालावं! बाकी निर्णय तुझा..!”
दाट काळ्या पांढऱ्या भुवया... ओठांवर फंगलेल्या जाड मिश्या...लंबकार चेहरा, अंगात जागोजागी काळेभोर विकृत गोंदण, मोठे वटारलेले लालभडक घारे डोळे. कंबरेपासून खाली पांढरे धोतर खोवलेल, माथ्यावर एकही केस नाही पण मागे एक जट गाठ मारून सोडलेली..असं काहीसं भीतीदायक रूप असलेला तो व्यंकट नामक व्यक्ती दिवाकरला गूढ भाषेत सोबत येण्याचे सांगत होता. एरवी, आशा माणसाजवळ दिवाकर एक क्षणही थांबला नसता. मात्र ही परिस्थितीचं मोठी विचित्र होती. त्याचं काय तर्कशास्त्र होतं? तो कोणत्या साधनेबाबत बोलत होता? याची दिवाकरला कुठलीच कल्पना नव्हती. त्याचं एकूण रूप पाहून त्याचा मार्ग जगरहाटीला छेदून काटकोनात जाणारा असल्याचंही दिवाकरला जाणवलं होतं. अर्थात, त्या मार्गावर जाण्याचं त्याला काही बंधन नव्हतं! मात्र, तरीही तो त्याच्या पाठीमागे निघाला होता..काळ्या कुट्ट अंधारातून, रानावनांच्या वाटांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवर लक्ष केंद्रित करुन तो नुसता चालत होता..खाली पायवाटसुद्धा नव्हती. झाडांच्या रांगा होत्या, मध्येमध्ये उंचवटे होते, काही घळी होत्या. त्या ओलांडताना त्याला त्रास होत होता; पण त्या सर्वांतून तो सपाट्याने समोर चालला होता. ही वाट कुठं जाणार? याची कुठलीही माहिती नसतांना तो त्या वाटेवर निघाला होता. कारण,परिस्थितीने त्याला दुसरा मार्गच ठेवला नव्हता..!
(क्रमशः)