Hari Das

Horror Romance Thriller

3  

Hari Das

Horror Romance Thriller

शागिर्द - भाग 4

शागिर्द - भाग 4

4 mins
539


दिवाकर कधीपासून व्यंकटच्या पाठीमागे चालत होता. सरळ रस्ता संपला, सतल भाग संपून चढ लागला होता; हा चढ नितळ नव्हता. झाडाझुडपांच्या गर्दीतून वाट शोधत पावलं पुढे टाकावी लागत होती. हळूहळू ही झाडंझुडपं अधिकाधिक गर्द होत गेली. हळूहळू ते दोघेही घनदाट जंगलात येऊन पोहोचले. रस्तात कुणीच कुणाशी काही बोललं नव्हतं! दिवाकरला तर व्यंकटची पाठ सोडून दुसरं काही दिसतंचं नव्हतं. अखेर त्यांचा प्रवास संपला. व्यंकटची झोपडी जवळ आली होती. झोपडीत पाऊल ठेवल्या ठेवल्या दिवाकरच्या अंगावर काटा उभा राहिला. व्यंकटची झोपडी निरनिराळ्या, लहान-मोठ्या मानवी कवट्या आणि हाडांनी सजली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या सुकलेल्या फुलांच्या माळा झोपडीत तोरण बांधलेल्या अवस्थेत लोंबकळत होत्या.


‘बैस !’ व्यंकटने त्याच्याकडे न पाहता दिवाकरला आदेश सोडला. दिवाकर गुपचुप बसला. अर्थातच जमिनीवर ! व्यंकट ने झोपडीच्या एका कोपऱ्यात हात घातला आणि दोन देशी दारूच्या बाटल्या काढल्या एकीला स्वतः तोंड लावत दुसरी दिवाकरच्या हातात दिली. एका दमात सगळी बाटली खाली केल्यावर त्याने दिवाकरकडे बघितलं!

“तू नामर्द नाहीस !, मी तुझं अंतरंग बघितलं आहे..वासना, विकृती, निर्भयता तुझ्यात भरली आहे! असा भेकडासारखा काय बघतोस! तू आता माझा शागिर्द होणार आहेस! जरा स्वतःला ओळख! तुझ्यातल्या सगळ्या विकृती जाग्या कर! वासना बाहेर उफाळून येऊ दे!! तेंव्हाच त्याच्या खाली लपलेली ती शक्ती मोकळी होईल!


व्यंकटच्या शब्दाने दिवाकरला आपल्या आतल्या आत काहीतरी वेगळं होत असल्याची जाणीव झाली. भीतीचा पदर विरळ झाला. हातातली बाटली तोंडाला लावून त्याने दोन मोठे घोट घशात ओतले. जळजळीत दारु पोटात जातच त्याला जरा बरे वाटले. आता तो व्यंकटकडे नजर रोखून पाहू शकत होता. तो काय बोलतोय, याकडे आता तो लक्ष देऊन ऐकू लागला..! व्यंकट सांगत होता…!


“माझ्याकडे खूप माणसे येतात ...’ आपली चिलीम पेटवत तो म्हणाला...’ पण त्यातली बहुसंख्य मला न घाबरता सरळ आत येतात. त्यांना माझा अवतार घाबरवत नाही किंवा माझ्या या झोपडीतले विचित्र वातावरण त्यांच्या मनात धास्ती निर्माण करीत नाही... कारण इथं येणाऱ्या व्यक्तीच्या घरी असे काही घडलेले असते की, ते इतर गोष्टींनी घाबरून जाण्याच्या पलीकडे गेलेली असते. त्यांना केवळ माझी मदत हवी असते..!”

चिलमीचा जोरदार दम घेऊन नाकातोंडातून धूर सोडत व्यंकटने दिवाकरपुढे चिलीम धरली. पहिल्या दमात त्याला ठसका लागला पण दुसरा जोरदार झुरका घेऊन चिलम परत देत त्याने प्रथमच बोलायला सुरुवात केली..!

“पण, व्यंकट माझ्यात तुला असं काय दिसलं की तू मला इथं आणलं आहे. मी स्वतःला जितकं ओळखतो त्यावरून तर माझ्यात असा एकदा गुण किंव्हा लक्षण मला कधी जाणवलं नाही.. उलट हर प्रकारच्या वासना आणि इच्छा माझ्या मनात भरल्या आहेत..!”

व्यंकट खदाखदा हसला.

“तेच तर, ज्याच्या मनात अमर्याद इच्छा आकांक्षा असतात तोच त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो..त्याच्याच अंगात तर ती धमक असते..तोच आपल्या इच्छापूर्तीसाठी त्या अनामिक शक्तीला साद घालू शकतो…! एका चाकोरीत जागनारा आणि सर्वसामान्य इच्छा घेऊन मरणारा माणूस काय कामाचा?”

आणि अचानक व्यंकटचा स्वर गंभीर झाला…!


“एकादा अलंकार घडवण्यासाठी शुद्ध, बावनकशी सुवर्ण चालत नाही, त्यात काहीतरी हिणकस मिसळल्याशिवाय त्याला कठीणपणा येत नाही - नाहीतर ते झिजून जाईल- या शक्तीचंही तसंच आहे. मनात हिणकस वासना असल्याशिवाय त्याला आकार देता येत नाही..!”

पुन्हा पूर्वपदावर येत त्याचं बोलणं सुरू झालं..आता त्याचा स्वर समजावण्याचा होता..!

“तू त्याचा काहीच विचार करू नकोस..मी काय करतो, कसं करतो याकडे लक्ष देऊन पहा..ही विद्या शिकवल्या जात नाही तर स्वतः शिकावी लागते..! अनुभव हाच आपला मोठा गुरु आहे..आणि हो, आतापासून तुझं नाव 'नागराज' हे दिवाकर फिवाकर आपल्याकडे चालत नाहीत! उद्यापासून तुझा वेशही बदलला पाहिजे. नाहीतरी तू आता फरारी गुन्हेगार आहेस, तुला कुणी ओळखता कामा नये. आणि तसेही इथं हा वेष चालणार नाही..!”


पुढचा महिनाभर दिवाकर उर्फ नागराज व्यंकटच्या झोपडीवरच होता..कारण, त्याला इतक्यात बाहेर नेण्यात धोका असल्याचे व्यंकटला समजले होते. त्या रात्री झालेल्या अपघातात तीन जण बचावले तर दोन जण वाहून गेले होते. त्यांची प्रेते नदीच्या कडेला मिळून आली होती. मात्र गुन्हेगारापैकी एक जण बेपत्ता झाला होता. नदीच्या प्रवाहात तो दूरवर वाहत गेला असावा, असा अंदाज पोलीस बांधत होते. मात्र तो आरोपी पळून जाण्याची श्यक्यताही तपासल्या जात होती. त्या आरोपीचा जोवर मृतदेह मिळून येत नाही. किंव्हा तो पोलिसांच्या तावडीत गावत नाही तोवर हा तपास सुरु राहणार होता. त्यामुळे कुठलाही धोका नको म्हणून व्यंकटने दिवाकरला झोपडीतचं राहण्याचा सल्ला दिला होता.

दिवाकर दररोज व्यंकटचे विविध उपचार आणि विधी लक्षपूर्वक न्याहाळत असे. अंगावर फिरवायच्या फांद्या कोणत्या, धुनीत निखाऱ्यांवर टाकायचा पाला कोणता, वेळ आलीच तर पाठीवर आसुडासारख्या ओढायच्या बिनपानाच्या लांबच्या लांब डहाळ्या... शिवाय इतरही काही काही - आणि वेगवेगळ्या वेळी म्हणायचे मंत्र - आणि पछाडण्याचे प्रकार ओळखण्याच्या युक्ती - आणि उपचारास प्रतिसाद येतो का नाही हे पाहण्याच्या चाचण्या. हे सगळं त्याला व्यंकटने सांगितले होते. मात्र मुख्य तंत्र विद्या आणि सिद्धी याची साधी ओळखही त्याला झाली नव्हती. हे शिकवण्याचे नाही तर अनुभवातून शिकण्याचे प्रकार असल्याचे व्यंकटचे मत होते. आणि तो त्यावर ठाम होता. त्यामुळे, दिवाकरला प्रतीक्षा होती ती प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्याची..!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror