Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

अक्षय काळमेघ

Drama

5.0  

अक्षय काळमेघ

Drama

सरु...

सरु...

4 mins
454


सूर्य डोक्यावर आला होता... काही दिवस मुक्काम गावाशेजारी होता... रमी उठून घर सारवत होती. घर कसलं ताडपत्रीने उभारलेले होतं. ऊन-पाऊस लागू नये म्हणून.

सारवता सारवता... रमीने आवाज दिला.


ये सरे... उठ की सकाळ झालिया बघ... नुसती झोपूनच राहती की काय... आईचा आवाज ऐकताच सरीने तसचं पांघरूण फेकलं आणि ताडकन उठली...


आये खरचं की गं... आज की नाय लय झोप लागली...


वं माय... बरं बरं जा बा ले सांग दूध काढा म्हणून...

सरीने हातात राखळ घेतली आणि तिच्या बा जवळ गेली...


दात घासत घासत सरी म्हणाली...

बा आईने मेंढीचं दूध काढाया सांगितलं...दे की काढून मला चाय घ्याचा आहे...


तेवढ्यात बा (मायप्पा) म्हणाला...

अगं काय गं सरे...जरा काढून बघत जा की... पुढं जाऊन अशीच कर्शिन का... दे आन देतो काढून..


सरी दात घासत घासत...

तिला रस्त्यावर मुलं शाळेत जाताना दिसली...


सरी म्हणाली...बा हे पोरं कुठं चालली रे... आणि त्यांच्या पाठीवर ते काय आहे बा...


मयप्पाने उठून बघितलं तर तो म्हणाला...

अरे ती शायेत चालली हाय... तू लक्ष नको देऊ, हे घे दूध घेऊन जा...


पण तरी सरू म्हणाली,

बा ते शाया म्हणजे काय रे... आणि ते जातात तर म्या का नाय जात... सांग ना बा... म्या का नाय जात...


अगं सांगतो तू जा पाहिले तोंड धून घे आणि मग सांगतो जा... सरी तशीच गेली आणि दूध ठेऊन तोंड धुतलं... आणि चाय घेता घेता तिने मायला विचारलं...


आयव ते पोरं शाळेत जातात तं म्या का नाय जात वं... रमी सरीकडे बघतच राहिली...


सरे काय झालं तुले... काय बोलून राहिली तू... अगं... ते शाळा गिळा आपल्यासाठी नाय... म्हणून तूले नाय घातलं शाळेत... अगं आज आपण इथं हाय... तं उद्या तिथं... म्हणून आणि सरे आपल्यात कुणी शिकत नाही...धनगर आहोत जातीनं... भटकत राहावं लागतं मग का शिकणार तूच सांग...


सरू हे सारं ऐकत होती...

पण आय मले शिकायचं आहे... मले शाळेत जायचं हाय... सरीनं रमीच्या मागं गाऱ्हाणं लावलं होतं...

पण ते शक्य नव्हतं म्हणून रमी सरीवर रागात ओरडली... सरे मार खाशील आता तुले सांगितलं ना एकदा नाय म्हणून... चल माया सोबत मेंढरं घेऊन...


सरी पण रागात म्हणाली जाय मी नाय येत... मी चालले बाहेर...रमी आणि मायप्पा आणि बेल्यावरचे सगळेच मेंढर घेऊन गेले होते...

सरी एकटीच होती... सरीला शाळेत जायचं होतं...


मग काय ती निघाली... गावाकडं एकटीच... दुपारची वेळ होती... ऊन तापलं होतं... अनवाणी पायाने सरी चालत होती... गावाच्या वेशीजवळ येऊन थांबली... आणि दुरूनच तिला शाळा दिसली...


तिला शाळा बघूनच खूप आनंद झाला... ती भित भित शाळेजवळ आली. मुलं एका झाडाखाली बसून शिकत होती... ती शाळेच्या गेटजवळ येऊन उभी राहिली आणि त्या मुलांकडे बघू लागली... आणि हसत होती तिला काही कळत नव्हतं पण तिला छान वाटत होतं... गेटला डोकं टेकून बघत असताना एका शिक्षिकेचं लक्ष तिच्याकडे गेलं...

आणि त्या उठून सरी जवळ आल्या...


काय गं पोरी... तिथून काय बघतेय...


हे ऐकून सरी जरा घाबरली...

बाई म्हणाल्या... अगं घाबरु नको... मला सांग नाव काय तुझं?


त्यावर सरी म्हणाली... सरू...


आणि बाबाचं?


मायप्पा...


आणि राहते कुठे?


सरी जरा घाबरत म्हणाली...मले न गाव नाय... मी त्या गावाजवळच्या शेतात राहते... तिथंच आमचं बेळ आहे...


हो का मग तू इथं काय करतेय...


बाई मी न शाळा बघायला आले... माई आय म्हणते शाळा आपल्यासाठी नाय म्हणून... पण मले शाळेत जायचं हाय... म्हणून आले...


अरे वा ये इकडे ये... बाईने हसत सरुला शाळेत घेऊन आल्या आणि सरुही मस्त शाळेत रमू लागली...

हसत हसत खेळत होती...


इकडं रमी घरी आली होती... आणि येताच सरीला आवाज देत होती... सरे ये सरे... कुठं गेलीय ही पोरगी काय माई त...ये सरे...


येवढे आवाज देऊन सरी काही तिला दिसत नव्हती...

बेल्यावरच्या सर्व बाया आल्या होत्या. रमीने त्यांना विचारलं पण कुणालाच सरी कुठं आहे माहित नव्हतं...


दुपारचे ४ वाजले होते... सरी घरी आली नव्हती आता तर रमी खुपच घाबरली होती. सकाळी रागवलं म्हणून कुठं गेली तर नसेल ना असे विचार तिला येऊ लागले... तोपर्यंत मायप्पा घरी आला होता...


अावं बरं झालं तुम्ही आलात सरी कुठं दिसत नाय हाय...

कुठं गेली काय कळत नाय हाय... रमी जरा रडत म्हणाली...


मायप्पा तिला सावरत म्हणाला... थांब मी बघून येतूया गेली असेल गावाशेजारी... तू रडू नको...


आवं मी बी येते थांबा... रमी आणि मायप्पा दोघेही निघाले गावाकडे... गावात येऊन लोकांना विचारू लागले पण कुणालाच माहीत नव्हतं...


शेवटी रमीला काय जाणे का सुचलं... आवं ती सकाळी शाळेत जायचं म्हणत होती तिथं तं नसन गेली न...


असं म्हणताच दोघेही शाळेजवळ गेले... तर सरी शाळेत मुलांसोबत खेळत होती...


रमीने दुरूनच आवाज दिला... अगं ये सरे... इथं काय कर्तिया चल घरला...


सरीने तिच्या आईचा आवाज ऐकला आणि घाबरली... तसाच मायप्पा सरीजवळ गेला आणि तिचा हात धरून तिला परत घेऊन आला...


सरी रडत होती... पण शेवटी मायप्पा पण काय करणार... सरीला बेळ्यावर आणताच रमीने सरीला जवळ घेतलं आणि समजावलं... तेव्हा कुठे सरीचं रडणं थांबलं... रात्र अशीच गेली...


सकाळी रमी मायप्पा आणि सारं बेळ दुसऱ्या गावाकडं निघालं... सरी बैलगाडीत बसून बैलांना हाकलत होती... शाळेजवळ येताच ती शाळेकडे बघू लागली...

आणि पुढे दुसऱ्या गावाला निघाली....


समाप्त...


Rate this content
Log in

More marathi story from अक्षय काळमेघ

Similar marathi story from Drama