सरप्राईज
सरप्राईज
•• सरप्राइज ••
सकाळची वेळ होती. विजया तयार झाली. नोकरीवर जाता जाता तिने शयनगृहात डोकावले. विजय ढाराढूर झोपला होता. गाढ झोपलेल्या नवऱ्याला उठवावे की नको या द्विधा मनस्थितीत तिने आवाज दिला,
"विजय, अहो, विजयराव..." परंतु विजयने झोपेचे सोंग घेतले होते. तो मनाशीच म्हणाला,
'विजया डार्लिंग, झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते. मी जागाच आहे. मला तू काय उठवणार? बाप रे! मॅडम, तुमचा आवाज बराच खोल गेलाय की. हां. आले लक्षात. नाराज आहात माझ्यावर. आज विशेष दिन आहे. मी अजून तुम्हाला विश केलेले नाही. पण बाईसाहेब, हम भी कुछ कम नही।दुपारी बारा वाजता घरी याल ना, तेव्हा खुश होऊन जाल आणि आनंदाने मला...'
"विज्या, मी चालले. ओट्यावर नाष्टा आणि डबा ठेवलाय. आठवणीने नाष्टा करून डबा घेऊन जा.." असे म्हणत विजया निघून गेली. तिने दार लावून घेतल्याचा आवाज आला आणि विजयने अंगावरील पांघरूण झटक्यात दूर फेकले. गडबडीने तो बाहेर आला.दिवाणखान्याच्या खिडकीचा पडदा त्याने थोडासा बाजूला केला. बाहेर पाहिले. विजयाने चेहऱ्यावर घट्ट रुमाल बांधला होता. ती स्कुटी चालू करीत होती. तिच्या नकळत त्याने 'उडते चुंबन' तिच्या दिशेने फेकले आणि म्हणाला,
'विजयाबाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपल्या लग्नानंतरचा तुझा आज पहिलाच वाढदिवस परंतु काल रात्री आणि आता तू जाताना तुला मुद्दामच विश केले नाही. कारण आज तुला मला सरप्राइज द्यायचे आहे. जाताना तू नाराज होऊन, रागारागाने गेलीस पण परत आल्यावर आनंदाने थुईथुई नाचशील आणि... आणि... जाऊ देत.तुझ्या आनंदाचा अनुभव घेणे काही औरच असते त्यात जी मजा असते ती मजा स्वप्नांची इमले रचून अनुभवता येत नाही.' असे म्हणत विजय बाहेर गेला. कारची डिक्की उघडून कागदात गुंडाळलेली तसबीर त्याने आत आणली. पुन्हा दार लावून घेतले. फोटोवरील कागदाचे आवरण टराटरा फाडले. आतला फोटो स्वतःच्याच चेहऱ्यासमोर धरला. खूप वेळ तो विजयाच्या त्या सुंदर, मनमोहक चेहऱ्याकडे बघत राहिला. काही क्षणात सावरला आणि तो फोटो कुठे लावावा या विचाराने त्याने दिवाणखान्यात सर्वत्र नजर फिरवली. परंतु त्याचे समाधान होत नव्हते. शेवटी त्याचे लक्ष दिवाणखान्याच्या समोर असलेल्या भिंतीने वेधले. दाराच्या समोरची जागा त्याला आवडली.
'हां...ही जागा एकदम परफेक्ट आहे. कसे आहे, आपण देणार असलेले सरप्राइज तिला घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर दिसले पाहिजे. त्याचा इफेक्ट वेगळाच होतो. अरे, इथे तर आयताच खिळा आहे की.....' असे पुटपुटत विजयने तो फोटो त्या खिळ्यावर व्यवस्थित लावला. तिथून काही पावले मागे गेला. इकडून तिकडे मान वळवून, दिवाणखान्यात जागोजागी उभे राहून फोटोकडे पाहून मनाशीच म्हणाला, 'वा! विजयराव, बढिया! काय मस्त जागा मिळालीय. मान गये! महत्त्वाचे म्हणजे माझी विज्जू आहेच तशी...अष्टपैलू! कुठेही बसणारी, शोभणारी आणि कुणाबरोबरही मिसळणारी! विजयाराणी, माझ्याकडे एवढेही निरखून पाहू नका. कुठूनही तुझ्याकडे पाहिले तरी तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष माझ्यावर रोखलेला असतो. तुझ्या नजरेच्या क्षेत्रात म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर मिडऑफ ते मिडऑन या बाजूने कुठूनही तू माझ्याकडेच पाहतेस असेच वाटते. हा भास आहे, तुझे प्रेम आहे की, तुझा माझ्यावर असलेला अविश्वास आहे ते समजत नाही. जाऊ दे. मला तयारी करायची आहे..' असे स्वतःशीच बोलत विजय सारे पटापट आटोपत असताना दारावरची घंटी वाजली.
"अरे, बाप रे! आता कोण आले? विजूच्या फोटोवर पडदा टाकू तरी कसा? विजया तर एवढ्या लवकर येऊच शकणार नाही. कोण असेल? अरे, हां... नेहमी 'कबाब मे हड्डी बनकर पधारनेवाली होगी साली...' असे बडबडत त्याने दाराच्या विशेष छिद्रातून पाहिले. त्याचा अंदाज खरा ठरला. दारात त्याची एकुलती एक मेहुणी आणि विजयाची बहीण उभी होती. दार उघडताच ती म्हणाली,
"हे काय जिज्जू अजून घरीच? ताईपण घरीच आहे का? मी रंगाचा भंग तर केला नाही ना?...." असे बडबडत असताना तिचे लक्ष समोरच्या भिंतीवर गेले आणि तिने हंबरडा फोडला.
"त....त...त..ताई, कुठे आहे?"
"त..त...ती दवाखान्यात...."
"क..क..काय झाले हो? असे कसे झाले? ताई अशी सोडून कशी गेली हो..." म्हणत तिने हातातल्या भ्रमणध्वनीवर एक क्रमांक जुळवला. फोन लागताच जोरजोराने रडत म्हणाली,"बाबा, अहो, बाबा, त..त..तुम्हाला काही समजले का?"
"क..क..काय झाले? सारे ठिक आहे ना, सुलभा?"
"बाबा, काहीही ठिक नाही हो..."
"अग, झाले तरी काय ते सांग. सुरेशराव..."
"त..त..तो ठिक आहे. आ..आपली त..त.ताई गेली हो..."
"काय? विजया कुठे गेली?"
"ब...ब..बाबा, ताई द..द..देवा घरी गेली हो..."
"सुले, पांचटपणा करु नको. अशी चेष्टा करू नये. काल रात्रीच बारा वाजता तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा चांगली हसत बोलली. खूप आनंदी होती आणि थ...थांब. तिथे विजय, सुरेश कुणी आहेत का?"
"बाबा, वेळ घालवू नका. लवकर या. आल्यावर बोला...." म्हणत सुलभाने फोन बंद केला. विजयकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत तिने नवऱ्याला... सुरेशला आणि इतर बऱ्याच लोकांना भ्रमणध्वनी करून ताबडतोब यायला सांगितले. विजय तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु सुलभा त्याचे काहीही ऐकायला तयार नव्हती. फोन करण्याचा तिचा सपाटा पाहून घाबरलेला, गोंधळलेला, गांगरलेला विजय सोफ्यावर बसून राहिला. सुलभाचे रडणे, आक्रोश पाहून
नकळत त्याचे डोळे भरून आले. सुलभाचा आवाज ऐकून शेजारीपाजारी, बायका धावत आल्या. तिथले वातावरण, विजयाचा फोटो पाहून काय घडले ते सर्वांच्या लक्षात येत असले तरी त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
"असे अचानक? चालता बोलता? हसत खेळत?अहो, काल सायंकाळी मला चांगली बोलली हो. चांगली ठणठणीत होती.." असे म्हणत त्या बाईने गळा काढला.
"तुम्ही संध्याकाळचे काय सांगता? अहो, नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता तिने मला फोन केला. रोज रात्री माझ्याशी गप्पा मारल्याशिवाय तिला झोपच येत नसे हो. म्हणायची सुद्धा की, एक वेळ नवऱ्याशी बोलले नाही तरी चालेल पण तुमचा म्हणजे माझा कोकिळेसारखा गोड आवाज ऐकल्या-शिवाय झोपच येत नाही हो...." असे म्हणत तिने हंबरडा फोडला. रडणे हा एक संसर्गजन्य रोग! काय झाले, कसे झाले, केव्हा झाले असा कोणताही प्रश्न मनात येण्यापूर्वी समोरची बाई रडतेय म्हणल्यावर प्रत्येकीच्या डोळ्यात हमखास पाणी येते. अश्रू वाहण्याचे, रडण्याचे प्रमाण कमीअधिक असेल पण डोळ्यात आसवं येणारच. विजयकडेही तसेच झाले. सुलभाने पेरलेल्या आक्रोशाचा वेलू जणू गगनाला गवसणी घालत होता. पेटलेला भुईनळा जसा वरवर जातो आणि त्यातले स्फोटक साहित्य संपले की, लगेच खाली येतो. तसा प्रकार तिथे घडत होता. अगोदरच्या बायकांचा आवाज कमी होत असताना नवीन कुणी स्त्री आली की, रडणे पुन्हा उच्चतम पातळीवर जाई आणि लगेच पुन्हा खाली येई......
विजयाचे आईवडील त्याच शहरात राहात होते. लगोलग ते विजयच्या घरी पोहोचले. गावातील बरेचसे पाहुणेही यायला सुरुवात झाली. काय झाले ते कुणालाही समजत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे कुणी विजयला काही बोलत नव्हते, काही विचारत नव्हते, काय झाले ते कुणालाही माहिती नव्हते. विजया कुठे आहे, हेही कुणी समजून घेत नव्हते. सुलभाने सांगितलेली बातमी 'ताई गेली...' एवढेच सर्वांना माहिती होते.
"बघा ना, लग्नाला वर्षही झाले नाही आणि बिचारी..."
"पण मला एक समजत नाही, तरुण स्त्री, कोणताही आजार नाही, काही नाही आणि अशी तडकाफडकी जाते म्हणजे... दाल मे कुछ काला है...."
"बरोबर आहे. अहो, तसे म्हणावे तर कधी दोघांचा भांडल्याचा, वाद झाल्याचा आवाजही येत नव्हता हो. हसतखेळत संसार चालू..."
"ते काही सांगू नका. दाखवायचे दात असू शकतात. नवऱ्यानेच काही केले नसेल कशावरून? बघा. बसलाय कसा मान टाकून..."
"अहो, असेच खालमाने इप्सित साधून घेतात."
"परवा असेच झाले,आमच्या शेजारी एक तरुण जोडपे असेच हसतखेळत रहायचे.काही दिवसांपूर्वी सिनेमाला गेले. नंतर हॉटेलमध्ये जेवण केले आणि मग लाँग ड्राईव्हची हुक्की आली तीही कशावर तर स्कुटीवर. गेले मग काय. एका पुलावर थांबले. गोड गोड बोलता बोलता बायकोला चक्क ढकलून दिले की हो...."
"मला काय वाटते, अशा वायफळ गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. पोलिसांनी कळवायला हवे. मग पोलिसच शोधून काढतील..."
"पोलीस कशाला? उचला आणि घ्या आतल्या खोलीत. चार रट्टे दिले की, सांगेल सर्व..." कुणीतरी विजयकडे पाहून म्हणाले.
"नको. नको. आधीच तब्येतीने हडकुळा आहे. आपल्या माराने गचकला तर आपण पकडले जाऊ.."दुसरी व्यक्ती म्हणाली. चार माणसे जमली की दहा मतं, सूचना समोर येतात. घरच्या लोकांना बोलताही येत नाही आणि कुणी ऐकतही नाही.
"चॅनलवाल्यांना बोलवा. कळू देत साऱ्या जगाला याची करतुत.."
"बोलावलय मी. पोलीस आणि मीडिया दोघांनाही कळवलं आहे." तिथे उपस्थित असलेला एक नेताटाइप माणूस म्हणाला.
"अहो, मी आज सकाळीच विजयाला ....चेहरा रुमालाने झाकलेला, बांधलेला होता. पण ती विजयाच होती...."
"रुमाल बांधलेला होता ना? मग ती विजयावहिनीच कशावरुन? राहता राहिला स्कुटीचा प्रश्न तर तुम्हाला त्या स्कुटीचा क्रमांक किंवा वहिनींच्या गाडीचा नंबर माहिती आहे का?"
"न..न..नाही बुवा...." तो गृहस्थ ओशाळून म्हणाला.
"झाले तर मग. मिटला प्रश्न. दुसऱ्याच कुणालातरी पाहिले असणार आणि म्हणे विजया..."
तितक्यात विजयच्या घरासमोर एक रुग्णवाहिका येऊन थांबली. पाठोपाठ आतून चार-पाच माणसे स्ट्रेचर घेऊन उतरली. ती माणसे घाईघाईने विजयच्या घरात शिरत असताना कुणीतरी विचारले, "काय झाले? कुणीकडे?"
"म्हणजे? तुम्हाला माहिती नाही? इथे मर्डर झालाय ना? पोलिसांनी आम्हाला बोलावलय. पोलीस येत आहेत."
"अहो, पण लाश कुठे आहे?" एका व्यक्तीने विचारले.
"म्हणजे? बॉडी घरात नाही? मग आम्हाला कशाला बोलावले? चला रे चला. दुसरे चार मुडदे वेटिंगवर ठेवून आम्ही इकडे आलो होतो. इथे अजून बराच वेळ आहे...." म्हणत चालकाने गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी सुरु होत नाही हे पाहून तो आतूनच ओरडला,
"ये ढकला रे या मड्याला..." त्या चौघांनी स्ट्रेचर खाली टाकले आणि ढकलायला सुरुवात केली. ढकलता-ढकलता गाडी चार पावले पुढे गेली आणि काळाभोर धूर सोडत, खडखडाट करीत सुरू झाली, वेगाने धावत सुटली. तसा चालकाने करकचून ब्रेक लावला. पुन्हा जोराचा आवाज करीत गाडी जागेवर थांबली. गाडी ढकलत असलेली माणसे पटकन उड्या मारत गाडीत शिरली.त्यांना खाली पडलेल्या स्ट्रेचरची आठवण राहिली नाही. कुणी काही बोलणार तितक्यात एक स्कुटी विजयच्या घराच्या दिशेने येत होती. स्कुटी चालवणाऱ्या बाईने स्वतःचा चेहरा रूमालाने घट्ट आवळलेला असला तरीही अनेकांनी स्कुटीवर कोण येत होते त्याचा अंदाज बांधला. कुणाच्या तोंडातून आश्चर्याचे, कुणाच्या मुखातून आनंदाचे तर अनेकांच्या मुखातून भीतीचे उद्गार बाहेर पडले. मात्र प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला...'व...व..विजया..'
झाले. ते ऐकताच तितका वेळ एखाद्या प्रेताच्या शरीरात आत्म्याने प्रवेश करावा त्याप्रमाणे बऱ्याच वेळेपासून निःशब्द अवस्थेत, तोंड बांधून बसलेल्या अवस्थेत असलेला विजय वाऱ्याच्या वेगाने धावत निघाला. दुसरीकडे घरी येणाऱ्या विजयाला प्रश्न पडला की,'काय झाले? घरासमोर एवढी गर्दी कशाची? सर्वांचे चेहरे असे सुतकी का? म्हणजे विजयला तर काही ...' अशा विचारात असलेल्या विजयाने स्कुटीचा कचकन ब्रेक मारला. स्कुटी थांबायची वाट न पाहता तशीच उडी मारून घराच्या दिशेने धावत सुटली. धावताना तोंडावर बांधलेला रुमाल तिने काढून फेकला. समोरून विजय धावत बाहेर आला. दोघेही समोरासमोर येताच थांबले. एकमेकांना बघत स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवत विजयाने विचारले,
"व..व..विजू, हे..हे...काय? ह... ही माणसं.."
"अ..अ..अग, हे सेलिब्रेशन आहे..."
"सेलिब्रेशन? कशाचे?"
"डार्लिंग, आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून हे सरप्राइज..."
"सरप्राईज? हे..हे.. असे?..." असे विचारत विजया आणि पाठोपाठ विजय आत आले. आतली गर्दी आणि भिंतीवर स्वतःचे मोठे छायाचित्र असमंजस अवस्थेत विजयाने विचारले,
"विजय, हे..हे..काय? हा माझा फोटो आणि त्याला हा हार का घातलास? उदबत्त्या का लावल्यास? हा तेलाचा दिवाही लावलास?"
"अग, तुझा वाढदिवस आहे ना, मग तो असा एकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केल्याप्रमाणे साजरा करावयाचा नव्हता..."
"म्हणून हा असा बिझनेस क्लास निवडलास?" विजयाने आश्चर्याने विचारले.
"ऐक तर लग्नानंतरचा तुझा हा पहिलाच वाढदिवस आहे तो जरा हटके, कायम स्मरणात राहील असा साजरा करायचा होता ग म्हणून तुला रात्री आणि सकाळी विश केले नाही ग. सरप्राईज द्यायचे होते म्हणून...."
"वा! छान! आयुष्यभर स्मरणात राहील हो तुझे सरप्राईज..."
"हे...हे...हा जो काही गोंधळ झाला ना, त्याचे सारे क्रेडिट या...या..कबाब मे हड्डीला..." असे म्हणत विजयने रडून चेहरा लालभडक झालेल्या, डोळे सुजलेल्या परंतु विजयाला पाहताच पुन्हा आनंदाश्रू गाळणाऱ्या सुलभाकडे बोट दाखवले.
"ह..ह...हिने काय केले?" विजयाने विचारले.
"त्याचे असे झाले,आज तुझा वाढदिवस कसा साजरा करायचा ही योजना मी पाच दिवसांपूर्वीच तयार केली होती. सारे व्यवस्थित ठरवले. हा तुझा फोटो तयार केला. काल सायंकाळी घरी आणला. तुझ्या नजरेस पडू नये म्हणून रात्री कारमध्येच ठेवला. सकाळी तू जाताना झोपेचे सोंग घेऊन पडून राहिलो. तू जाताच उठलो. बाहेर आलो. फोटो लावला. स्नान केले. फोटोची पूजा केली. फोटोला हार घालून..."
"विजय, ही अशी पूजा, हार केव्हा घालतात तुला माहिती आहे? "
"अग, उत्साहाच्या भरात आणि काही तरी वेगळे करण्याच्या नादात ते लक्षातच आले नाही ग. खरे सांगतो, शुद्ध अंतःकरणाने हे सारे केले ग. आणि ही सारे होत नाही तोच ही 'साली' टपकली ग. काहीही न विचारता, न बोलता हिने भोकाड पसरले आणि फोनाफोनी करून सर्वांना जमवले...." विजय सारे तपशीलवार ऐकवत असताना सुरेश मध्येच म्हणाला,
"म्हणजे झाले असे, 'करायचे होते बारसे पण झाले तेरसे'...." ते ऐकून जमलेली सारी मंडळी हसत हसत विजयाला शुभेच्छा देऊन निघाली..