सोनेरी अक्षर
सोनेरी अक्षर


सोनेरी अक्षरंं
लेखक: मिखाइल जोशेन्का
भाषांतर : आ. चारुमति रामदास
मी लहान होतो, तेव्हां मला मोठ्यांबरोबर बसून डिनर करायला फार आवडायचं. आणि माझ्या बहिणीला, ल्योयालापण ह्या पार्ट्या खूप आवडंत होत्या. ह्याचं पहिलं कारण तर हे होतं की टेबलवर वेगवेगळ्या प्रकाराचे पदार्थ ठेवलेले असायचे. पार्ट्यांची ही गोष्ट खासकरून आम्हांला आकर्षित करायची. दुसरी गोष्ट, की प्रत्येक वेळेस मोठे लोक आपल्या जीवनातले मनोरंजक किस्से सांगायचे. ही गोष्टसुद्धां मला आणि ल्योल्याला खूप मजेदार वाटायची. स्पष्ट आहे, की सुरुवातीला तर आम्हीं टेबलाशी चुपचाप बसायचो. पण मग हळू हळू आमचं धाडस वाढूं लागलं. ल्योल्याने गोष्टींत आपलं नाक खुपसणं सुरू केलं. न थांबता बोलत राहायची. आणि मीपण कधी कधी आपले कमेन्ट्स घुसवायचो. आमचे कमेन्ट्स पाहुण्यांना हसवायचे. आणि मम्मा आणि पापासुद्धां सुरुवातीलातर खूशंच होते, की पाहुणे आमची बुद्धिमत्ता आणि प्रगती बघताहेत.
पण मग एका पार्टींत बघा, काय झालं:
पप्पांच्या डाइरेक्टर ने एक किस्सा सांगायला सुरुवात केली ज्यावर कोणाचाही विश्वास बसूंच शकंत नव्हता. किस्सा ह्याबद्दल होता की त्याने कसं आग विझवणा-याला वाचवलं. ह्या आग विझवणा-याचा आगींतच श्वास कोंडला होता, पण पप्पांच्या डाइरेक्टरने त्याला आगींतून बाहेर खेचलं. कदाचित असं झालंही असेल, पण बस, मला आणि ल्योल्याला ही गोष्ट आवडली नाही.
आणि ल्योल्यातर जणु काट्यांवर बसली होती. वरून तिला अश्याच प्रकारची एक गोष्ट आठवली, जी खूप मजेदार होती. तिला खूप वाटंत होतं, की पट्कन ती गोष्ट सांगून टाकावी, म्हणजे ती विसरणार नाही. पण पप्पांचे डाइरेक्टर, जणु काही मुद्दामंच आपला किस्सा सांगत होते. ल्योल्याला आणखी सहन नाही झालं. त्यांच्या दिशेने हात झटकून ती म्हणाली : “त्यांत काय आहे! आमच्या कम्पाऊण्डमधे एक मुलगी...”
ल्योल्या आपलं म्हणणं पूर्ण करूं शकली नाही, कारण की मम्मीने तिला ‘श् श्!’ केलं. आणि पप्पांनीपण रागीट नजरेने तिच्याकडे बघितलं.
पप्पांच्या डाइरेक्टरचं तोंड रागाने लाल झालं. त्यांना आवडलं नाही की त्यांच्या गोष्टीबद्दल ल्योल्याने म्हटलं, ‘ह्यांत काय आहे!’
मम्मी-पप्पांकडे बघंत त्यांनी म्हटलं, “मला समजंत नाही, की तुम्हीं मुलांना मोठ्यांबरोबर कां बसवता. ते मधेच मला टोकतात. आणि आता मी आपल्या गोष्टीचा तारंच हरवून बसलो. मी कुठे थांबलो होतो?
ल्योल्याने परिस्थिति सांभाळण्यासाठी म्हटलं : “तुम्हीं तिथे थांबले होते, जेव्हां श्वास कोंडलेल्या माणसाने तुम्हांला म्हटलं होतं, ‘थैन्क्यू’. पण कित्ती अजब आहे न, की तो काही तरी म्हणू तरी शकला, जेव्हां की त्याचा श्वास कोंडला होता, आणि तो बेशुद्ध होता...आमच्या कम्पाऊण्डमधे एक मुलगी...”
ल्योल्या आपली आठवण पूर्ण नाही करू शकली, कारण की तिला मम्मीकडून एक झापड मिळाला.
पाहुणे मंद-मंद हसू लागले. पण पप्पांच्या डाइरेक्टरचं तोंड रागाने आणखीनंच लाल झालं. हे बघून की परिस्थिति अगदीच विकट आहे, मी सांभाळून घ्यायचं ठरवलं. मी ल्योल्याला म्हटलं : “पप्पांच्या डाइरेक्टरने जे म्हटले त्यांत काहीही विचित्र नाहीये. हे त्यावर अवलंबून आहे, की श्वास कोंडलेले माणसं कसे आहेत, ल्योल्या. दुसरे आग विझवणारे, ज्यांचासुद्धां आगींत श्वास कोंडतो, जरी बेशुद्ध पडले असतांत, तरीही ते बोलूं शकतात. ते बडबड करतात. आणि त्यांना स्वतःलाच समजंत नाही की ते काय म्हणताहेत...जसं की ह्याने म्हटलं – ‘थैन्क्यू’. आणि, असंही असूं शकतं, की त्याला म्हणायचं होतं – ‘सेक्यूरिटी!’ पाहुणे हसले. आणि पप्पांचे डाइरेक्टर, रागाने थरथरंत माझ्या मम्मी-पप्पाला म्हणाले:
“तुम्हीं आपल्या मुलांना फार वाईट शिकवण देताय. ते मला बोलूंच देत नाहीयेत – नेहमी आपल्या वेडपट शे-यांनी माझं बोलणं मधेच तोडताहेत. आजी, जी टेबलाच्या शेवटी समोवारजवळ बसली होती, ल्योल्याकडे पाहून रागाने म्हणाली, “बघा, आपल्या वागण्याबद्दल क्षमा मागायच्या ऐवजी – ही पोट्टी पुन्हां जेवणावर तुटून पडलीये, हिची भूखसुद्धां नाही मेलीये – दोन माणसांचं जेवण फस्त करतेय...” आजीला उलट उत्तर द्यायची ल्योल्याची हिंमत नाही झाली. पण ती हळूच कुजबुजली: “आगींत तेल ओतताहेत.”
आजीने हे शब्द नाही ऐकले, पण पप्पांच्या डाइरेक्टरने, जे ल्योल्याच्या शेजारीच बसले होते, विचार केला, की हे त्यांच्याबद्दल म्हटलं आहे, जेव्हां त्यांनी हे ऐकलं, तर आश्चर्याने त्यांचं तोंड उघडंच राहिलं. आमच्या मम्मी-पप्पाकडे बघत ते म्हणाले : "दर वेळेस, जेव्हां मी तुमच्याकडे येण्याची तयारी करतो, आणि मला तुमच्या मुलांची आठवण येते, तर, विश्वास करा, तुमच्याकडे यायची इच्छांच नाही होत.”
पप्पांनी म्हटलं : “ह्या गोष्टीकडे लक्ष देतां, की मुलांने खरोखरंच खूप बेशिस्तपणा केला आहे आणि ते आमच्या अपेक्षांवर खरे नाही उतरलेत, मी आज पासून त्यांना मोठ्यांबरोबर डिनर करण्याची बंदी करतो. त्यांनी आपला चहा संपवून आपल्या खोलीत जावे. सार्डीन संपवून मी आणि ल्योल्या पाहुण्यांच्या हास्याच्या गडगडाटांत आणि चुटकुल्यांत तिथून निघून गेलो. आणि तेव्हांपासून सम्पूर्ण दोन महीने आम्हीं मोठ्यांच्या मधे नाही बसलो. आणि दोन महिने झाल्यावर मी आणि ल्योल्या पप्पांना मनवूं लागलो की आम्हांला पुन्हां मोठ्यांबरोबर डिनर करायची परवानगी द्यावी. आणि आमचे पप्पा, जे त्यादिवशी चांगल्या ‘मूड’मधे होते, म्हणाले:
“ठीक आहे, मी परवानगी देईन, पण ह्या अटीवर की तुम्हीं टेबलावर एकही शब्द नाही बोलणार. जर एकही शब्द उच्चारला, तर पुन्हां कधीही मोठ्यांबरोबर टेबलाशी नाही बसणार.”
आणि एका सुरेख दिवशी आम्ही पुन्हां टेबलाशी आहोत – मोठ्यांबरोबर डिनर करतोय. त्यादिवशी आम्ही शांत आणि चुपचाप बसलो होतो. आम्हांला आमच्या पप्पांचा स्वभाव माहीत आहे. आम्हांला माहीत आहे, की आम्हीं अर्धा शब्द जरी बोललो, तर आमचे पप्पा आम्हांला पुन्हां कधीही मोठ्यांबरोबर नाही बसू देणार.
पण बोलण्यावर लावलेल्या ह्या प्रतिबंधामुळे सध्यांतरी मला आणि ल्योल्याला काहीही फरक पडंत नाहीये. मी आणि ल्योल्या मिळून चार माणसांचं जेवण फस्त करतोय आणि एकमेकांकडे बघून मंद मंद हसंतपण आहोत. आम्हांला असं वाटतंय की आम्हांला बोलण्याची परवानगी न देऊन मोठ्यांने फार मोठी चूक केली आहे. मी आणि ल्योल्याने जे शक्य होतं, ते सगळं फस्त केलं आणि मग आम्हीं स्वीट-डिशकडे आपला मोर्चा वळवला. स्वीट-डिश खाऊन आणि चहा पिऊन झाल्यावर मी आणि ल्योल्याने ठरवलं की दुस-या सर्विंगवरपण हात साफ करावा – सुरुवातीपासून सगळ्या वस्तू पुन्हां खायचं ठरवलं, ह्यासाठीपण की आमच्या मम्मीने हे बघून की टेबल जवळ-जवळ रिकामं झालंय, नवीन पदार्थ आणून ठेवले. मी ‘बन’ उचलला आणि लोण्याचा तुकडा कापला. पण लोणीतर घट्ट जमलेलं होतं – ते आत्तांच फ्रिजमधून काढलं होतं. हे घट्ट लोणी मला ‘बन’वर लावायचं होतं, पण ते मला जमंत नव्हतं. ते दगडासारखं जमलं होतं. आणि मग, मी लोणी चाकूच्या टोकावर ठेवलं आणि त्याला चहाच्या ग्लासवर धरून गरम करू लागलो. पण चहातर मी आधीच पिऊन टाकला होता, म्हणून मी हा लोण्याचा तुकडा पप्पांच्या डाइरेक्टरच्या ग्लासवर धरून गरम करू लागलो, जे माझ्याच शेजारी बसले होते. पप्पांचे डाइरेक्टर काहीतरी सांगंत होते आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही गेलं. येवढ्यांत चहाच्यावरती धरलेला चाकू गरम झाला. लोणी थोडंसं विरघळलं आणि मी ग्लासवरून आपला हात काढंतंच होतो, तेवढ्यांत लोण्याचा तुकडा अचानक चाकूवरून घसरला आणि थेट चहांत पडला. भीतीमुळे मी जणु थिजून गेलो. डोळे विस्फारून मी लोण्याकडे बघंत होतो, जे गरम चहाच्या आत घुसलं होतं. मग मी डावी-उजवीकडे बघितलं. पण पाहुण्यांपैकी कोणाचंही लक्ष ह्या दुर्घटनेकडे गेलेलं नव्हतं. फक्त ल्योल्याने बघितलं होतं, की काय झालंय. कधी माझ्याकडे तर कधी चहाच्या ग्लासकडे बघंत ती हसू लागली. जेव्हां पप्पांचे डाइरेक्टर काहीतरी सांगत चमचाने आपला चहा हलवूं लागले, तेव्हां तर ती आणखीनंच जोराने हसू लागली. ते बरांच वेळ हलवंत होते, ज्याने लोणी पूर्णपणे विरघळून गेलं, त्याचा काही मागमूस नाही उरला. आणि आता चहा कोंबडीच्या रश्श्यासारखा झाला होता. पप्पांच्या डाइरेक्टरने ग्लास हातांत घेतला आणि तोंडाकडे नेऊं लागले. आणि जरी ल्योल्याला हे बघण्यांत गंमत वाटंत होती, की पुढे काय होणारेय आणि जेव्हां पप्पांचे डाइरेक्टर ह्या भयंकर वस्तूला तोंडात घालतील तेव्हां ते काय करतील, पण तरीही ती थोडीशी घाबरलीच होती. ती तोंड उघडून पप्पांच्या डाइरेक्टरला सांगणारंच होती : “नका पिऊं!” पण पप्पांकडे बघितल्यावर, आणि हे आठवून, की बोलण्याची परवानगी नाहीये, चुपचाप बसली.
आणि मीसुद्धां काही नाही म्हटलं. मी बस हात झटकले आणि एकटक पप्पांच्या डाइरेक्टरच्या चेह-याकडे बघू लागलो. येवढ्यांत पप्पांच्या डाइरेक्टरने ग्लास तोंडाला लावून एक मोठा घोट घेतला होता. पण तेवढ्यांत त्यांचे डोळे आश्चर्याने गोल-गोल झाले. ते ‘आह, आह’ करूं लागले, आपल्याच खुर्चीवर उसळूं लागले, तोंड उघडलं, पट्कन नैपकिन उचलला आणि खोकूं लागले आणि थुंकू लागले.
आमच्या मम्मी-पप्पाने त्यांना विचारलं, “तुम्हांला काय झालंय?”
भीतीमुळे पप्पांचे डाइरेक्टर एकही शब्द बोलूं शकंत नव्हते. त्यांने बोटांनी आपल्या तोंडाकडे खूण केली, काहीतरी कुजबुजले आणि भीतीने आपल्या ग्लासकडे बघूं लागले.
आता तिथे असलेले सगळे लोक मोठ्या उत्सुकतेने ग्लासमधे शिल्लक उरलेल्या चहाकडे बघूं लागले.
मम्मा चहा बघून म्हणाली, “घाबरू नका, हे लोणी तरंगतंय चहांत, जे गरम चहामुळे विरघळलंय.
पप्पाने म्हटलं, “पण माहीत तर झालं पाहिजे, की ते चहांत पडलं कसं. तर, मुलांनो, आपल्या निरीक्षणांबद्दल आम्हांला सांगा.”
बोलण्याची परवानगी मिळाल्यावर ल्योल्या म्हणाली, “मीन्का ग्लासच्या वरती चाकूवर ठेवलेलं लोणी गरम करंत होता, आणि ते चहांत पडलं.” आता ल्योल्या स्वतःवर ताबा ठेवूं शकली नाही आणि खो-खो करंत हसत सुटली. काही पाहुणेसुद्धां हसू लागले. पण काही लोक गंभीर होऊन आणि काळजीपूर्वक आपले-आपले ग्लास बघूं लागले.
पप्पांचे डाइरेक्टर म्हणाले, “ही तर मेहेरबानीच झाली, की त्यांनी माझ्या चहांत लोणीच टाकलंय. ते कोलतारसुद्धां टाकू शकंत होते. जर हे कोलतार असतं, तर माझं काय झालं असतं! ओह, ही मुलं तर मला पागल करून टाकतील.”
एक पाहुणा म्हणाला, “मला तर दुस-याच गोष्टीचं नवल वाटतंय. मुलांनी पाहिलं की लोणी चहांत पडलंय. पण त्यांनी ह्याबद्दल कुणालाच नाही सांगितलं. आणि तसांच चहा पिऊं दिला. हाच त्यांचा मोठा गुन्हा आहे.”
येवढं ऐकून पप्पांचे डाइरेक्टर उद्गारले:
“आह, खरंच, व्रात्य मुलांनो – तुम्हीं मला काहीचं का नाही सांगितलं. मी तो चहा प्यायलोच नसतो...”
ल्योल्याने हसणं थांबवून सांगितलं : “पप्पांनी आम्हांला टेबलवर बोलण्यास नाही सांगितलंय. म्हणूनंच आम्ही काहींच नाही बोललो.”
मी डोळे पुसून म्हणालो : “एकही शब्द बोलायला नाही म्हटलंय पप्पांनी. नाहीतर आम्ही नक्कीच सांगितलं असतं.”
पप्पा हसून म्हणाले : “ही मुलं व्रात्य नाहींत, तर मूर्ख आहेत. खरंच, एकीकडे ही चांगली गोष्ट आहे, की ते काहीही वाद न घालतां आदेशांचं पालन करतात. पुढेपण असंच करायचं – आदेशांचं पालन करायलांच हवं आणि प्रचलित नियमांप्रमाणे काम केलं पाहिजे. पण हे करंत असताना आपली अक्कलसुद्धां वापरली पाहिजे. जर काही नसतं झालं – तर चूप राहणं तुमचं कर्तव्य होतं. पण जर लोणी चहांत पडलं, किंवा आजी समोवारची तोटी बंद करायला विसरली – तर तुम्हांला ओरडायला पाहिजे. तेव्हां शिक्षेच्याऐवजी तुम्हांला सगळे ‘थैन्क्यू!’ म्हणाले असते. आणि ही गोष्ट सोनेरी अक्षरांत आपल्या हृदयावर कोरून ठेवायला पाहिजे. नाहीतर सगळं उलट-सुलट होऊन जाईल.”