Sharad Kawathekar

Action Inspirational Others

4.0  

Sharad Kawathekar

Action Inspirational Others

सण

सण

3 mins
143


बसवणी/ बसवनी पौर्णिमा 


   काही सण हे विशिष्ट भागातच साजरे केले जातात कारण विशिष्ट भागातच त्याचं महत्त्व असतं. इतर भागात त्याचं नाव सुद्धा माहीत नसतं.

   असाच हा सण आहे, त्याचं नाव -- बसवणी पौर्णिमा. हा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. प्रामुख्याने उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, लातूर व कर्नाटक प्रांतात हा सण साजरा केला जातो. सोलापूर लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवर कर्नाटक राज्यातील बिदर , गुलबर्गा ( कलबुर्गी) विजापूर ( विजयपूर) तर कोल्हापूर सीमेवर बेळगाव या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे भाषा,सण, संस्कृती यांची परस्पर देवाणघेवाण होत असते.

   बसवणा म्हणजे काय ?

बसवणा ही एक मंदिराची प्रतिकृती असते. मंदिर, कळस त्यावर बसलेले पक्षी. याची या दिवशी पूजा करतात. बाजारात बसवणा हा विक्रीसाठी ठेवला जातो. बसवणा हा दोन प्रकारचा असतो. एक बसवणा हा साखरेचा तर दुसरा बसवणा हा मातीचा बनवलेला असतो. मातीचे बसवणे हे गणपतीच्या मूर्तीप्रमाणे विविध रंगी असतात. साखरेचे बसवणे हे सुद्धा खाण्याचा शुद्ध रंग वापरून विविध रंगी बनविलेले असतात. या बसवण्याचा आकार हा लहान - मोठा असतो. लहान अर्धा फूट तर मोठा एक ते दीड फूट उंच असतो. वर शिखर , त्यावर बसलेले पक्षी, चिमण्या. खालच्या बाजूला चार दिशांना चार कमानी असा हा बसवणा असतो. दुसऱ्या दिवशी मातीचा बसवणा हा अंगणातच ठेवतात. यथावकाश त्याचे विसर्जन करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार कुणी साखरेचा बसवणा आणतं तर कुणी मातीचा बसवणा आणतं. साखरेचा बसवणा मात्र घरातच ठेवतात व स्वयंपाक घरात वापरतात, ते खाण्यासाठी.

   बसवण्याची पूजा करण्याची पद्धत ---

   बसवणा हा दुपारीच घरी आणून ठेवला जातो. जसं घरोघर गणेश मूर्ती आणतात अगदी तसं. या बसवण्याची पूजा ही खासकरून महिलावर्गाकडेच असते. अंगणात तुळशीवृंदावनापाशी पाट मांडला जातो. रांगोळ्या काढल्या जातात. पाट फुलांनी सजवला जातो. पाटावर मधोमध बसवणा ठेवतात. त्यास फुलांनी सजवितात. पुष्पहार घालून त्याची पूजा करतात. घरामध्ये लहान थोर जेवढ्या अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका असतील त्यांना नवीन कपडे परिधान करवून सजवले जाते. तसेच त्यांच्या डोई-कपाळी फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जातात. केसांत वेणीत सुगंधी फुलांच्या वेण्या माळल्या जातात. दोन्ही हातांच्या मनगटांवर फुलांचे गजरे गुंडाळून गोल कंकणाकृती बांधले जातात. मग घरातील सजलेल्या सर्व महिला व कुमारिका तुळशीवृंदावनापाशी एकत्र येतात व तुळशीची आणि बसवण्याची मनोभावे, यथासांग पूजा करतात. पूजा चालू असताना त्या घरातील मुले ही फटाके उडवण्यात दंग झालेली असतात. आपल्याकडे तुलसी विवाहाच्या दिवशी जसे वातावरण असते अगदी तसेच वातावरण बसवणी पौर्णिमेच्या दिवशी असते. इकडे अगोदर तुलसी विवाह प्रारंभीच उरकून घेतला जातो, म्हणजे पौर्णिमेपूर्वीच . अन् पौर्णिमेच्या दिवशी फक्त बसवण्याची पूजा असते.

   बसवण्याची यथासांग पूजा झाल्यानंतर मग घरातील सर्वचजण तुलसी वृंदावनासमोर व बसवण्यासमोर अंगणात अर्धगोलाकार बसतात, ते भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी. पौर्णिमेच्या दुधाळ, शीतल, शांत, शुभ्र, सुगंधी वातावरणात प्रसन्न मनाने सुग्रास व मधुर भोजनाचा जो स्वर्गीय अनुभव मिळतो, त्याचा आनंद तो काय वर्णावा! शब्द थिटे पडतील.

   भोजन उरकल्यावर मग कुमारिका आपला फुलांचा साज मुंडावळ्या, गजरे वगैरे उतरवून ठेवतात. तेव्हा मग त्या पृथ्वीतलावरील सामान्य लेकी ,मुली बाळी वाटतात. पण त्या अगोदर जेव्हा त्या फुलांच्या आभूषणांनी सजलेल्या असायच्या तेव्हा त्या देवकन्या, राजकन्या भासायच्या !

   या बसवणी पौर्णिमेलाच कॅलेंडर, पंचांगात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. म्हणजेच कार्तिक शुद्ध पौर्णिमा. पण कॅलेंडर, पंचांगात मात्र बसवणी पौर्णिमा हा उल्लेख मात्र कुठेच आढळत नाही.

   तसंच जी आश्विन महिन्यात पौर्णिमा येते तिला किती नावे आहेत पहा -- (१) आश्विन शुद्ध पौर्णिमा (२) शरद पौर्णिमा (३) नवान्न पौर्णिमा (४) कोजागरी पौर्णिमा (५) पनगी/ पणगी पौर्णिमा.

   एका पौर्णिमेला इतकी पांच नावे आहेत. यापैकी पनगी/पणगी पौर्णिमा हे आगळं वेगळं नाव आहे. हे नाव मला तुळजापुरातच ऐकायला मिळालं. ते ही जुन्या काळातील लोकांकडून १९७५-१९८० या दरम्यान. पणगीचा अर्थ माझ्या मते , पलंगाशी संबंधित असावा. पलंगी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पणगी हा शब्द बनला असावा. याचा पलंगाशी संबंध म्हणजे विजयादशमीला तुळजाभवानी माता मंदिरात सीमोल्लंघन करून/ खेळून मग पाच दिवस मंचकी निद्रा घेऊन मग पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सिंहासनावर आरूढ होते. निद्राकाळ संपतो, तुळजाभवानी माता पलंग सोडते , ती पौर्णिमेच्या दिवशी म्हणूनच पलंगी म्हणजेच पनगी पौर्णिमा म्हणत असावेत. हा माझा तर्क अंदाज आहे, कदाचित तो चुकीचाही असू शकतो. किंवा पनगी/ पणगी या शब्दाचा संबंध हा कन्नड भाषेशीही असू शकतो. या बाबतीत माझा कसलाच अभ्यास नाही, त्या बद्दल क्षमस्व ! हे मी प्रांजळपणे कबूल करतो. या बाबतीत तुळजापूर नगरीतील जाणकार मंडळी सांगू शकतील. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action