Sharad Kawathekar

Abstract Inspirational Others

4.0  

Sharad Kawathekar

Abstract Inspirational Others

किनारा

किनारा

2 mins
203


काळसर निळ्या यमुनेच्या किनाऱ्यावर डोलत होतं ते कदंबाचे वृक्ष. तू बसलास तिथं लपून. आम्ही आमची वस्त्र ठेवली होती त्या त्या झाडाच्या कट्ट्याच्या किनाऱ्यावर.

रमणीय नजारा आणि मैत्रीणींची सोबत...अहाहा! समीर खेळत होता प्रत्येक फांदीशी, फुलांशी आणि आमच्या सुरेखश्या साड्यांच्या किनारींशी.

फडफडत होते प्रत्येक साडीचे काठ अन् यमुना खळाळून हसत होती. आम्ही पडलो तिच्या प्रेमात. बघता बघता अनावर झाल्या भावना आणि आम्ही शिरलो त्या यमुनेच्या कुशीत...

तिच्या किनाऱ्यावर थंड जलधारांनी तनुवर स्पर्श करताच देहभान विसरलो. त्याच किनाऱ्यांचा आधार घेत आम्ही एकमेकांवर पाण्याचे तुषार उधळत होतो. प्रत्येक सखी चिंबचिंब होती आणि आनंदाच्या पीयूष धारांना खांद्यावर खेळवत संसाराच्या तापाला खोल त्या यमुनेला स्वा:हा करत होती.

पण तू खट्याळ....... तिन्ही लोक गाजवलेला........ आमची परीक्षा घेण्यास आतुर होता. आम्हाला वाटत होतं संसारातून आम्ही अलिप्त होऊन भवसागराच्या किनाऱ्यावर पदचाप करत आहोत........

पण त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी स्वतःला सिध्द करावं लागेल हा तुझा म्हणजे यशोदेच्या कानुड्याचा आग्रह........

तू युगंधर... योगेश्वर....नटवर....

मनात आलं आणि केलं नाही असं कुठं होणार होतं? या संसार सागराचा काठ तू, जिथे सगळ्या व्याधींपासून मुक्त करतो तू तुझ्या प्रियजनांना.......

झाडावर बसून त्या कट्ट्याच्या किनाऱ्यावरची वस्त्रे पळवली.......... आणि भोळ्याचा आव आणत बासरीला तुझ्या त्या कोमल अधरांवर ठेवत प्रेमाची फुंकर मारत आम्हा सगळ्यांना जागते केलेस.

क्षणार्धात आम्ही भवसागराच्या किनाऱ्यावर आहोत..... आमचीच भक्ती श्रेष्ठ....हा अभिमान गळून त्या यमुनेच्या किनाऱ्यावर विसावला.......

आमचे डोळे उघडले आणि गर्वाचे काठ असलेल्या मनाच्या डोहात तू क्षणभर थांबत नाही हे उमगले.

   मनाच्या सागराला

   भक्तीचा हवा काठ

   होते दर्शन माधवाचे

   रिक्त असावे माठ

 किती विनवण्या केल्या आम्ही ती वस्त्रे परत मागण्यासाठी...... पण तू मुळात हट्टी.... एकदा का तू मनात आणलेस की तुझ्या चाहत्यांना किनाऱ्यावरून पलिकडे न्यायचं की मग तू नेतोच.....

आम्ही कबुल केलं की अजून संसारातील विकार आमच्यात आहेत. आम्ही काम, मोह, वासना पासून अजून अलिप्त नाही. पण राधेने विनवलं तुला की, आम्हाला त्या काठाच्या पलिकडे नेण्यास तूच मदत करू शकतो.....

राधेचे शब्द होते ते.....तू तिचं मन कसं बरं तोडू शकला असता..... असशील तीन्ही जगाचा जगद्वेता......पण तुझ्या व्यक्तिमत्वाला राधा नामाची किनार असल्याशिवाय तू पूर्ण होत नाहीस......

तू भक्तीची शक्ती त्या वस्त्रात ठेवून आमच्या हवाली केली...... आणि कोण आश्चर्य! तेव्हापासून प्रत्येक गोपसखी भवसागराच्या किनाऱ्यावर सहज पोहचली..... 

आम्ही त्याच भक्तीला मनात रूजवून त्या किनाऱ्यावर येत आहोत.....ए कान्हा! ती बासरी कमरेच्या शेल्यात खोवून तुझा कोमल हात जरा पुढे कर ना! किनाऱ्यावर येण्यास मदत कर ना रे!



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract