Sharad Kawathekar

Abstract Inspirational Others

3.5  

Sharad Kawathekar

Abstract Inspirational Others

गस्त

गस्त

6 mins
55


गस्त

आत्ताच्या काळातली व जुन्या काळातली. 


   गावातील लोकांना मध्यरात्री जागतं ठेवण्यासाठी फार पूर्वीपासून गस्त घालणे हा प्रकार रूढ होता. फार अगोदर गस्त घालण्याचं काम ' जागल्या ' करीत असे. जागल्या म्हणजे रात्री गावाला जागतं ठेवणारा. साधारणपणे मध्यरात्री बारा ते तीन वाजेपर्यंतचा काळ हा गाढ झोप येण्याचा असतो. नेमकं याच सुमारास चोऱ्यामाऱ्या व खूनदरोडे पडत असत. हे घडू नये व यापासून गावाचे रक्षण व्हावे , या उदात्त हेतूने हे जागले, गस्तकरी आपले गस्त घालण्याचे काम इमानेइतबारे करीत असत. 

   सध्याच्या काळात आपण पाहतो , हे गस्त घालण्याचे काम गुरखा ( गोरखा ) लोक करीत असतात. हे मध्यरात्री एकच्या सुमारास आपला गुरख्याचा वेश परिधान करून, हातात काठी घेऊन , आपल्या ठरलेल्या इलाक्यात ते शिट्टी वाजवत गस्त घालत फिरत असतात. हे चित्र आपणास शहरात व नगरात पहावयास मिळते. यांची नेमणूक कोण करतं, हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण ते आपलं काम चोख बजावत असतात. दिवसा ते आपल्या समोर आले तर आपले त्यांच्याकडे लक्ष असो वा नसो, ते अत्यंत हळू आवाजात आपणास नमस्ते करून पुढे जातील. मग तुम्ही त्यांना प्रत्युत्तरादाखल नमस्ते म्हणा किंवा म्हणू नका. ते यासाठी तुमच्यापाशी थांबलेलेच नसतात. त्यांचं हे रूप मला निर्गुण निराकारी व निरपेक्ष भावनेचं वाटतं. अशी त्यांची निष्काम कर्मसेवा चालू असते. ते नमस्ते करण्याखेरीज दुसरं कांहीच तुमच्याशी बोलत नाहीत. एवढं माफक अन् मोजकंच ते बोलतात. ते ही मोठ्या अदबीनं, विनयानं, शालीनतेनं. त्यांचा हा मूळ पिंडच नसतो, तुमच्याशी अनाठायी गप्पा मारण्याचा किंवा बाष्कळ बडबड करण्याचा. पण ते हरेक व्यक्तीला खूपच मान देऊन फक्त एक - दोन शब्दच बोलतात. महिनाभर गस्त घातल्यावर शेवटी महिन्याकाठी ते दिवसा तुमच्या दारी येऊन मोठ्या अदबीने तुम्हाला नमस्ते करतील. यावेळी ते तुमच्याकडे आपला मेहनताना मागण्यासाठी आलेले असतात. मग तुम्ही त्यांना दहा रूपये द्या किंवा वीस रुपये द्या. तुम्ही जे द्याल ते मोठ्या नम्रतेने आपल्या कपाळास लावून त्याचा स्वीकार करत परत एकदा तुम्हांस नमस्ते करत हळुवारपणे मंद पावले टाकत निघून जाईल. हे त्याचं दर महिन्याला ठरलेलं असतं. दिवाळसणाला मात्र त्याचं थोड्याथोटक्या दहा - वीस रुपयांमध्ये भागत नसतं. किमान प्रत्येक घरागणिक त्याला शंभर किंवा पन्नास रुपये मिळणं अपेक्षित असतं. लोक सुद्धा कसलेही आढेवेढे न घेता, कसलाच वाद न घालता त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे रक्कम देतच असतात. तर अशी ही गस्त घालणाऱ्या गुरख्याची पद्धत.

    जुन्या , प्राचीन काळी गावचा पहारा करून गावाला जागतं ठेवण्यासाठी ' जागले ' असायचे. ते इमानेइतबारे रात्रीच्या वेळेस चोराचिलटांपासून गावची राखण करीत असत. ते स्वतः रात्रभर जागत राहून समद्या गावाला खडा पहारा देत असत. म्हणूनच तर त्यांना जागले असे म्हटले जात असे. या जागल्यांच्या बाबतीत आपल्या संतांनी त्यांच्या रचनेत लिहून ठेवलेले आहे. गावातील माणसांना या जागल्यानं रात्रीच्या वेळेस जर हाकाटी दिली म्हणजेच हाक मारली अन् झोपलेल्या माणसाने जर जागं होऊन त्याला प्रतिसाद नाहीच दिला तर तो म्हणत असे --

            " उठा की जी मायबाप

              अशी कशी लागली झोप ? "

   कालौघात ही जागल्याची प्रथा बंद झाली आणि त्याची जागा घेतली रामोशी पद्धतीने. 

   हे रामोशी किंवा गस्त घालणारे गस्तकरी रात्री एकच्या सुमारास गस्त घालण्यासाठी गावामध्ये आपापल्या नेमून दिलेल्या भागात फिरत असत. त्यांच्या हातात मोठी जाडजूड व डोक्याइतकी उंच काठी असे. ते ज्या भागात गस्त घालीत, त्या भागातल्या प्रत्येक घरातल्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्याला माहीत म्हणजे तोंडपाठच असे. गस्त घालताना तो प्रत्येक घराच्या दारावर काठी आपटत त्या घरातल्या प्रमुख व्यक्तीच्या नावाने पुकारा करीत असे. घरातल्या व्यक्तीने आपण जागे असल्याचा प्रतिसाद ( जोरात खोकून किंवा खाकरून ) दिला की, मग तो पुढच्या घराकडे सरकत असे. अशी ही गस्त घालण्याची पद्धत होती. तो गस्त घालत आमच्या दारापाशी आला की, माझ्या आज्ज्याच्या नावाचा पुकारा करीत असे -- " शिरपती आन्नाsss व ! ओ sss शिरपती आन्ना sss ! मग माझा आज्जा घरातूनच जोरात खोकून किंवा खाकरून आपण जागं असल्याची वर्दी द्यायचा तेव्हा तो हाssss ! असा प्रतिसाद देत पुढच्या घराकडं जायचा.

   या रामोशी लोकांना, गस्तकरी लोकांना ' येसकर ' पण म्हटलं जात असे. येस म्हणजे वेस येसकर म्हणजेच वेसकर. या लोकांना गावातले सर्वच लोक मान देत असत. त्यांना मानानं वागवलं जाई आणि यांचेही संबंध लोकांशी सलोख्याचे असत.

गस्तीच्या वेळी कुत्र्यांचा हैदोस, गदारोळ --

गावामध्ये गस्त सुरू झाली की, गल्लीतलीच नव्हे तर पूर्ण गावातली कुत्री जोरजोरात भुंकायला लागत. पूर्ण गावभर नुसता कुत्र्यांच्या भुंकण्याचा व केकाटण्याचा गदारोळ , उच्छाद माजलेला असे. ही कुत्री आपले शेपूट मागच्या दोन्ही पायात दाबत, आपले तोंड खूपच वर करून पोटाला व कंबरेला झटके देत खूपच पोटतिडकीने व इमानदारीने घसा फोडूफोडू कंठशोष करत भुंकत असत. मग रामोशी एखाद्या कुत्र्याला आपल्या हातातील काठीने जब्बर तडाखा मारत असे. मग त्या कुत्र्याचं विव्हळणं , श्वानरूदन बराच वेळ चालायचं. बसलेल्या तडाख्याच्या वेदना कमी झाल्या की,त्या कुत्र्याची गाडी पुन्हा विव्हळण्याच्या ट्रॅक वरून पुन्हा भुंकण्याच्या ट्रॅक वर येत असे. त्या सर्व कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज हे विविध प्रकारचे असत. कुणाचा जाडजूड , घोगरा अन् मनात धडकी भरवणारा भारदस्त आवाज तर कुणाचा पातळ , चिरका आवाज. हा पातळ चिरका आवाज त्या कुत्र्याचंच महत्त्व कमी करणारा वाटायचा. काही कुत्री ही एकदम नॉनस्टॉप ( म्हणजे एकदा भुंकायला लागली की , मध्ये कुठेही न थांबता ) लांsss ब लच्चक सूर लावून भुंकायची. ती एकदाच दीर्घ श्वास घेऊन आपल्या छातीच्या भात्यात हवा फुल्ल भरून घेऊन मग आधी जोरात टाहो फोडून नंतर दीर्घ सूर लावून भुंकायची. बहुतेक या कुत्र्यांना प्राणायाम ठाऊक असावा ! 

   या कुत्र्यांच्या मध्ये काही लहान लहान पिल्ले पण होती. ती पण यथाशक्ती ( ! ) भुंकण्याच्या या सामाजिक कार्यात आपला मोलाचा सहभाग नोंदवत होती. यात त्यांचा सिंहाचा वाटा नसला तरी खारीचा वाटा मात्र नक्कीच होता. ही पिल्ले काही हडकुळी, मरतुकडी तर काही मस्तपैकी बाळसेदार अन् गुबगुबीत होती. भुंकण्याच्या बाबतीत मात्र तितकीच कर्तबगार . आपली चिमुकली काया, तनु सांभाळीत जेव्हा ती भुंकायला लागायची तेव्हा असं वाटायचं की, त्यांच्या नरड्याला भुंकण्याचा भार हा सोसला जात नसावा. कारण ते पिल्ले दम खाऊ खाऊ, टप्प्याटप्प्याने भुंकत होती. तेव्हा त्यांचे कोवळे शरीर हे थरारत व शहारत होते.

   जाड्याभरड्या दमदार आवाजाचे भारदस्त कुत्रे हे आपले स्टेटस् सांभाळून गॅप घेऊ घेऊ राहून राहून आपल्या दमदार अन् प्रभावशाली आवाजात पण ऐटीत भुंकत होते. उगीचंच इतरांसारखं कसंही वेडंवाकडं केकाटून ते आपल्या प्रतिष्ठेला कसलीही बाधा आणू इच्छित नव्हते. काही कुत्री ही आपले खालचे व वरचे ओठ एकावर एक टेकवून आपल्या तोंडाचा चंबू करून दीर्घ सूर लावून भुंकण्यात तल्लीन होऊन जायची. तर काही कुत्री ही खालचे व वरचे ओठ विलग करीत आपले समोरचे स्वच्छ, सुंदर व शुभ्र चार दात दाखवत व गुरगुरत भुंकत होते. ते बहुतेक कुठल्यातरी दंतमंजनाची किंवा टुथपेस्टची फुकटच्या फाकट जाहिरात करत असावेत -- ' शुभ्र दॉंतों की चमक ', माझे दात पांढरे शुभ्र की तुझे दात पांढरे शुभ्र ? याची पैज त्यांच्यात लागलेली असावी !

   गस्त घालून रामोशी लोक एव्हाना आपापल्या घरी निघून गेलेले असले तरी कुत्र्यांचे भुंकणे व केकाटणे हे थांबलेले नसे. ढवळलेले गढूळ पाणी स्थिर होण्यास व गाळ खाली बसण्यास जसा बराच वेळ लागतो किंवा आग्या मोहळाच्या चवताळलेल्या, खवळलेल्या मधमाशा जसं बराच वेळ घोंगावतच राहतात, अगदी तस्संच. बऱ्याच वेळाने कुत्र्यांचे हे भुंकणे शांत झाल्यासारखे वाटते वाटते खरे पण ते काही केल्या शांत झालेले नसते. पाच दहा मिनिटांनी या गल्लीतला एखादा कुत्रा भुंकला की, दुसऱ्या गल्लीतले दोन चार कुत्रे भुंकतात. पुन्हा दुसऱ्या गल्लीतले एखादे कुत्रे भुंकले की, मग या गल्लीतली दोन तीन कुत्री भुंकायला लागतात. जणुकाही ती आपापसात कुठल्यातरी गहन विषयावर मत व्यक्त करत असावीत किंवा परिसंवाद करीत असावीत . त्यांना माणूस जातीशी काहीच देणंघेणं नसतं. म्हणून तर माणसांचा कुठलाही अन् कसचाही मुलाहिजा न ठेवता ती रात्र रात्रभर नुसती भुंकत असतात. आपल्या झोपेचं मात्र पुरतं खोबरं झालेलं असतं. ही कुत्री दिवसा कुठेही झोपा काढतात. आणि रात्री मात्र त्यांची ' नाईट शिफ्ट ' सुरू होते. मग ते आपल्या झोपेचे शत्रू बनतात.

   या कुत्र्यांच्या हलकल्लोळामुळेच रात्रभर झोप ती कसली येतच नाही. जणूकाही निद्रादेवी आपल्यावर रूष्ठ होते. मग डोळे लाल होतात, चुरचुर करू लागतात. अंग व डोके जड पडून दुखायला लागते. मुलखाचा आळस व सुस्ती यामुळे कुठल्याही कामात लक्ष धड लागत नाही. अंग, डोळे, डोके व पोट हे झोप न झाल्याने उष्णता वाढून गरम पडते. भल्या सकाळीच कडाक्याची भूक लागून पोट गुरगुर करायला लागते. अशावेळी गरम चहा घेतला तर आणखीनच त्रास वाढतो. यावर उपाय एकच -- दुपारी पोटभर जेवण करून दही अगर ताक पिऊन ताणून देणं. पुरेशी झोप झाली की, या सर्व त्रासातून मुक्तता मिळते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract