The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Preeti Sawant

Inspirational Tragedy Others

3  

Preeti Sawant

Inspirational Tragedy Others

शोध अस्तित्वाचा

शोध अस्तित्वाचा

14 mins
820


'आई झाली का ग तुझी तयारी?? चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली.


'हो ग बेटा, झाली माझी तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले..


आज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..

आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते..

त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस..


नंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले.. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या..तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले..

समिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..


इतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी स्थानापन्न व्हावे.'

त्या आवाजाने समिधा भानावर आली..


कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने केली गेली..त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले..

श्रीमती वैशाली देव, पीएचडी होल्डर, समाजसेविका, तसेच 'निवारा' या सामाजिक संस्थेच्या सर्वेसर्वा. त्यांनी कितीतरी महिलांना शून्यातून प्रगतीकडे जाण्यासाठी मदत केली होती. 

म्हणूनच समाजात त्यांना मानाचे स्थान होते..आणि ह्या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या..


"वैशाली ताई!!" समिधा स्वतःशीच पुटपुटली.

इतक्या वर्षांनी त्यांना पाहून समिधा खूपच खुश झाली होती..पण एकाएकी तिचा सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला..


समिधा (सॅम), उच्चभ्रू राहणीमानात वाढलेली, अत्यंत हुशार, कलात्मक व्यक्तिमत्व असलेली मुलगी.. ती आई-वडिलांची एकुलती एक..वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे ते नेहमीच परदेश दौऱ्यावर असत..तिची आई ही एक उत्तम गृहिणी होती. 


सॅम ला संगीताची प्रचंड आवड..आणि तिने तिच्या शिक्षणाबरोबर तिची आवड ही जोपासली होती..तिच्या आवडीला आई- वडिलांचा ही पाठींबा होता..पण सॅम ला त्यातच तिचे करिअर करायचे होते..ह्याला मात्र तिच्या वडिलांचा विरोध होता..

त्याचे कारण असे की, सॅम हे त्यांचं एकच अपत्य. त्यामुळे सॅमने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी अशी तिच्या बाबांची अपेक्षा होती..त्यावरून दोघांत खूप वादावादी ही होत असतं..


अखेर सॅमच शिक्षण पूर्ण झाले..पण तिला संगीता मध्ये रस असल्यामुळे तिला पुढचं शिक्षण त्यातच करायचं होतं..पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते..त्यांना तो छंद म्हणून ठीक वाटायाचा पण व्यावसायिक दृष्टया नाही..सॅम ने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही..


याचा परिणाम असा झाला की, तिच्या वडिलांनी तिला गृहीत न धरता तिचे लग्न त्यांच्या जीवलग मित्राच्या मुलाशी जमवले..त्याचे नाव सुयश. तो ही एकुलता एक होता..तसेच ह्या संबंधांमुळे त्यांच्या दोघांच्या व्यवसायाला ही फायदा होणार होता..सॅम च तिच्या वडिलांपुढे काहीही चालत नव्हते..म्हणून तिला होकार द्यावाच लागला..आणि काही महिन्यातच लग्न सुरळीत पणे पार पडले..


'नव्याचे नवीन दिवस' म्हणतात ना ते संपले..म्हणता म्हणता सॅम ची समिधा झाली..म्हणजेच गृहिणी..तिच्या नवऱ्याचे तिच्यावर वर्चस्व असल्यामुळे तिला त्याचे सर्व म्हणने ऐकावे लागे.. वडिलांना काही तक्रार करायची सोयच नव्हती..त्यांनी जावयाला मुलगाच मानले होते..तो तर घरजावाईच झाला होता..पण त्यांना काय माहीत होते की हाच मुलगा त्यांचा एक दिवस विश्वासघात करेल..


समिधाला ह्याची पूर्वकल्पना होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती..कारण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही हे तिला माहीत होते..

अशातच समिधाला दिवस गेले..तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तिचे नाव नंदिनी ठेवले..दोन्ही परिवार खूपच आनंदी होते..समिधाच्या बाबांना काय करू काय नको असे झाले होते..


नंदिनी मध्ये सगळे गुंतत चाललेले..आणि इथे सुयश ने सासर्यांच्या कोणत्या न कोणत्या कारणाने सह्या घेऊन सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली..आणि एक दिवस अचानक जेव्हा ही बाब समिधाच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा ते हे सहनच करू शकले नाही..त्यातच ते मरण पावले..समिधाला ही सुयश ने नंदिनी सकट घराच्या बाहेर काढले..हा धक्का समिधाची आई नाही पचवू शकली ती ही हे जग सोडून गेली..


समिधा साठी सगळे संपले होते..सुयश इतका कठोर आणि क्रूर वागेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते..तिने खूप गयावया केली..नंदिनी ला ही समोर ठेवले पण सुयश ला पैशाची इतकी गुर्मी होती की त्याने नको नको ते आरोप समिधा वर करायला सुरुवात केली..तिच्यासाठी तिच्या घराचे दरवाजे पूर्ण बंद झाले..


तिच्याकडे पैसेही नव्हते ना फोन की ती कोणाची मदत घेईल..तिला काहीच सुचत नव्हते की काय करावे..तिला त्या परिसरात थांबायची ही लाज वाटत होती..ती तिथून निघाली. पण पुढे काय? 


नंदिनी ३ वर्षांची होती..नुकतीच बोलायला लागलेली,

ती समिधाला विचारू लागली, "मम्मा आपण कुते जातोय? आजा कुते आहे? पप्पा ने आपल्याला बाहेल का काढले?? मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, असे म्हणून ती रडू लागली"..


समिधाला काय करावे हे सुचत नव्हते..ती निवाऱ्यासाठी तिथे जवळच असलेल्या शेड खाली बसून राहिली..नंदिनी ही रडून रडून थकून झोपली होती..असाच दिवस निघून गेला..संध्याकाळ होत चाललेली..तिला मनात वाटत होते, सुयश रागात असेल म्हणून असा बोलला असेल, तो तर माझ्या आणि नंदिनी शिवाय राहूच शकत नाही..म्हणून तिने पुन्हा घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला..


पण चौकीदाराने आत जाऊच दिले नाही..तो म्हणाला, "साब ने आपको अंदर छोडनेसे मना किया है। और अगर फिरभी मैने छोडा, तो मेरी नौकरी चली जायेगी। माफ कर दीजीएगा मॅडम।" असे म्हणून त्याने हातच जोडले.


समिधा तिथून निघून गेली..एक शेवटचे तिने घराकडे बघितले..तिला रडूच कोसळले..पण तरीही प्रश्न हा होता की जायचे कुठे?


समिधाचे कोणीही मित्र-मैत्रीण नव्हते..आणि नातेवाईकांशी सुयश ने स्वतःच बोलणे कमी केलेले..आणि तिच्या वडिलांनाही काहीबाही सांगून सर्वांपासून तोडले होते..त्यामुळे समिधाच्या कुटूंबाला भावकीतून वाळीत टाकले होते..समिधाच्या वडीलांचा सुयश वर इतका विश्वास होता..की तो कधी खोटे बोलणारच नाही ह्यावर त्याचे ठाम मत होते..त्यामुळे त्यांनी स्वतः नातेवाईकांना अंतर दिले..


एव्हाना, नंदिनी भुकेने व्याकुळ झालेली..ती रडत होती, "मम्मा भूक लागलीये,पाणी पाहिजे".

समिधाला जवळच एक पाणपोई दिसली..त्यातले ग्लासभर पाणी तिने नंदिनी ला पाजले.. आणि स्वतः ही प्यायली..

जवळच तिला एक बस स्टॉप दिसले..आजची रात्र इथेच काढावी, असे तिने मनाशी ठरवले..तिला जे काय होतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता..तिला एकसारखे रडू येत होते..आणि नंदिनी ची काळजी पण वाटत होती..


इतक्यात सुदैवाने रात्रीच्या राऊंडउप साठी पोलिसांची गाडी आली..त्यांनी ह्या दोघींना तिथे बसलेले पाहिले..

इन्स्पेक्टर माने, सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली इथे करण्यात आली होती..रोज रात्री २ ते ३ चकरा ते त्यांना दिलेल्या भागाच्या मारत..जेणेकरून त्याच्या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल..


इतक्यात त्यांना बस स्टॉप खाली कोणीतरी बाई बसल्याचे दिसले..मांडीवर ३ ते ४ वर्षांची मुलगी ही दिसली..एकंदरीत कपड्यावरुन त्या दोघी चांगल्या घरातल्या वाटल्या..

त्यांनी समिधाला विचारले, "इतक्या रात्री इथे का बसलात?" 

समिधा कडे काहीच उत्तर नव्हते..ती खूपच घाबरलेली होती..

त्यांनी पुन्हा विचारले,"तुम्ही इथे काय करताय? इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही, तुमचे घर कुठेय? जर तुम्ही काही नाही बोललात तर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीत यावे लागेल."


समिधा कडे काहीच उत्तर नव्हते..म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोघींना गाडीत बसवले..आणि ते पोलीस स्टेशन ला घेऊन आले.

इतक्यात नंदिनी बोलली,"मम्मा भूक लागलीये, माम पाहिजे"

समिधाला रडूच कोसळले..

मानेंना नंदिनी ची दया आली..त्यांनी तिला खायला दिले.. पण तरीही ह्या दोघी कोण? हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.

म्हणून मग त्यांनी समिधाला पुन्हा विचारले, "तेव्हा समिधाने सगळी कर्म-कहाणी त्यांना ऐकवली.." 

मानेंना सुयश चा खूपच राग आला..पण पुराव्या अभावी ते सुयशला अटक करू शकत नव्हते.. तरीही वॉर्निंग देऊन ते समिधाला घरी पाठवू शकत होते..पण नंतर जर त्या दोघींना काही झाले तर? तसेच सुयश हा मोठा व्यावसायिक होता..त्यामुळे त्याच्या ओळखी ही तितक्याच वरपर्यंत होत्या. म्हणजे ही लढाई मोठी होती..हे मानेंना कळले होते..


पण यासाठी समिधाला तयार होणे जरुरी होते..ते ही स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी..त्यांनी समिधाला मदत करण्याचे आश्वासन दिले..त्यांनी सकाळी सकाळी एक नंबर डायल केला..तो होता श्रीमती वैशाली देव यांचा..

त्यांना मानेंनी समिधाची सर्व माहिती दिली..आणि कॉन्स्टेबल हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन थेट समिधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले.


"निवारा", एक दुमजली इमारत.. इथेच समिधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती..


कॉन्स्टेबल समिधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेला..समिधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली..तिने समिधाला आत यायची खूण केली..तिला बसायला सांगितले..तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली..


त्या बाईने बोलायला सुरुवात केली, "समिधा नाव न तुझे, ही तुझी मुलगी ना? किती गोड आहे ग!!"


समिधा एकटक तिच्याकडे बघत होती..


ती पुढे म्हणाली," अरे!!मी माझा परिचय तुला दिलाच नाही..माझे नाव वैशाली देव, 'निवारा' ही माझीच संस्था आहे..तू मला ताई बोललीस तरी चालेल..इथे सर्व मला ह्याच नावाने हाक मारतात..मला मगाशी माने सरांनी फोन वर तुझ्याबद्दल सांगितले..मीच म्हणाली त्यांना की,तुम्ही योग्य जागी फोन केलात..तिला आणि तिच्या मुलीला तडक इथे पाठवा. मी बघते पुढे काय करायचे ते.."


त्या पुढे म्हणाल्या, " समिधा आता अजिबात भूतकाळाचा विचार करायचा नाही..तू इथे निवांत रहा.. इथे तुला काही धोका नाही..२-३ दिवस जाऊ देत..आधी तू व्यवस्थित स्थिर हो इथे..मग बघू पुढे काय करायचे ते..तोपर्यंत तू हा परिसर पहा, इथल्या दुसऱ्या मुलींशी भेट, त्यांच्याशी बोल..तुला नक्की इथे छान वाटेल..इथे कोणीही कोणत्याही गोष्टी तुझ्यावर लादनार नाही.."


असे म्हणून त्यांनी सुमनला हाक मारली, 

सुमन ला इथे येऊन २-३ वर्षे झाली होती..ती आणि संस्थेमधल्या २-३ जणी मिळून कैटरीन चा व्यवसाय करत होत्या..आणि इथल्या स्वयंपाकाची जवाबदारी ही त्यांच्याकडे होती..अशा अनेक महिलांना या संस्थेत येऊन जगण्याची नवी उमेद मिळाली होती..

सुमन येताच वैशाली ताई म्हणाल्या,

"बाळ सुमन, ही समिधा आणि ही तिची मुलगी नंदिनी..(असे म्हणून त्यानी नंदिनीला ला जवळ घेतले)

जा, समिधाला वरची खोली दाखव आणि दोघींना कपडे ही दे बदलायला आणि काही खायला पण दे..मला १-२ मीटिंगला जायचंय, मी संध्याकाळ पर्यंत माघारी येईन."


"समिधा बाळ काहीतरी खा आणि छकुलीला ही खाऊ घाल..दोघी थोडा आराम करा..आपण नंतर बोलू सविस्तर." असे बोलून त्या निघून गेल्या..


सुमन समिधाला वरच्या मजल्यावर घेऊन आली..तिथल्या एका खोलीचा दरवाजा उघडला..सुमन ने समिधाला तिच्यासाठी आणि नंदिनी साठी घालायला कपडे दिले..आणि तिला फ्रेश व्हायला सांगून ती खाली असलेल्या स्वयंपाक घरात गेली..तिथून तिने त्या दोघांसाठी खायला आणले..


नंदिनी ला बघून तिला खूपच छान वाटले..

ती समिधाला म्हणाली, "तुझी मुलगी खूप गोड आहे ग..माझी पण अशीच मुलगी असती पण..आणि तिला रडू कोसळले.."


समिधा तिच्याकडे बघतच राहिली..पण तिला काय बोलावे हे सुचत नव्हते..

सुमनलाही ते उमजले, तिने स्वतःचे डोळे पुसले आणि समिधाला म्हणाली, 'तू आराम कर आणि छकुलीला पण झोपवं..मी तुला संध्याकाळी पूर्ण इमारत आणि परिसर दाखवते..' असे बोलून सुमन निघून गेली..


समिधाने नंदिनीला खाऊ घातले आणि तिला झोपवले..तिला स्वतःला काहीच खायची इच्छा नव्हती..ती कालपासून तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना आठवत होती..की कसे क्षणात तिचे जग बदलले होते..


पण म्हणतात ना तिच्या आई-वडिलांची पुण्याई म्हणून तिला माने साहेब आणि वैशाली ताईंसारखी चांगली माणसे भेटली होती..त्यामुळेच ती आणि नंदिनी दोघीही सुखरूप होत्या..तिने नंदिनला घट्ट मिठी मारली..कारण आता तीच तिच्या जगण्याची उमेद होती..


येथील परिसर खूपच मोठा होता..आणि मधोमध 'निवारा' ही इमारत उभी होती..वैशाली ताईंनी समिधासारख्या कैक महिलांना आधार दिला होता, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले होते..


आज समिधा आणि नंदिनीला इथे येऊन बरेच दिवस झाले होते..त्या दोघी बऱ्यापैकी इथे स्थिरावल्या होत्या आणि इकडच्या वातावरणात एकरूप ही झाल्या होत्या..


पण.......…......समिधाला एकच प्रश्न सारखा पडत होता की, पुढे काय??


ती या विचारातच होती, एवढ्यात तिथे वैशाली ताई आल्या. त्यांनी समिधाच्या खांद्यावर अलगद हात ठेवला..समिधा एकदम दचकली.

त्या समिधाला म्हणाल्या,"घाबरू नकोस मीच आहे..माफ कर, इतके दिवस तुझ्याशी बोलायला निवांत वेळ मिळाला नव्हता. रोज काही न काही काम निघायचे. म्हटले आज बोलूया तुझ्याशी. कशी आहेस बाळ? तुला करमतय ना इथे?"

"हो. खूपच छान आहे ही जागा, इथले लोक आणि इथला परिसर सुद्धा. इथले वातावरण खूप प्रेरणादायी आहे. मी खरच स्वतःला नशीबवान समजते की मी ह्या संस्थेचा एक भाग बनू शकली यासाठी मी माने साहेब आणि तुमची आयुष्यभर ऋणी राहीन" समिधा म्हणाली.


ती पुढे बोलू लागली," कसं असतं ना ताई, मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे..माझ्या आईवर माझ्या बाबांचे वर्चस्व होते. ती आयुष्यभर त्याच्यासाठी जगली, त्यांना हवे तेच तिने केले..ह्या सगळ्यात तिचे स्वतःचे अस्तित्व हरवूनच गेले कुठंतरी..वैशाली ताई मला संगीताची खूप आवड होती आणि मला त्यामध्येच करियर करायचे होते..पण बाबांची याला संमती नव्हती.. यावरून आमचे खूप वाद व्हायचे..पण त्यांना ती गोष्ट मान्यच नव्हती.

म्हणून त्यांनी लवकरच माझे लग्न करायचे ठरवले..आणि सुयश माझा नवरा माझ्या आयुष्यात आला..सुयश हळूहळू मुलगाच झाला आमच्या घरचा..बाबांनी डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला..त्यांनतर नंदिनी आली आमच्या आयुष्यात. बाबा तर किती खुश होते.तिला कुठे ठेवू कुठे नको असे व्हायचे त्यांना..त्याचाच फायदा सुयश ने घेतला आणि त्याने गोड बोलून बोलून बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांचा विश्वासघात केला. त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही..त्याला फक्त पैसा हवा होता मी नाही..पण नंदिनी.... ती तर त्याची मुलगी होती ना तिचा तरी विचार करायचा.. माझ्यासाठी सगळं संपलाय. पण नंदिनी साठी तरी मला जगायला हवे. ताई खरच कळत नाहीये की पुढे काय करू ते?" आणि ती रडू लागली.


वैशाली ताई म्हणाल्या, "समिधा डोळे पूस बघू. असे खचून जाऊ नये..असे समज की देवाने एक संधी दिलेय तुला तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची..ती अशी रडून वाया नको घालवुस. तुला नंदिनी ला मोठे करायचंय..आता तूच तिची आई आणि बाबा आहेस..मग तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुला तुझ्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध घ्यायचाय कायम लक्षात ठेव. नव्या जोमाने कामाला लागा. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील नक्कीच. तूला काहीही मदत लागली तरी मी तुझ्यासाठी नेहमीच असेन.."


समिधाला आता थांबायचे नव्हते..तिने एक पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर तीने वैशाली ताईच्या मदतीने संगीतात पुढचे शिक्षण सुरू ठेवले. 

ती इतकी कामात व्यस्त झाली होती की नंदिनी सोबत बोलायला, खेळायला तिच्याकडे पुरेसा वेळच नव्हता..तिला हे देखील माहीत होते की ती जे काही करतेय ते फक्त आणि फक्त नंदिनीच्या उज्वल भविष्यासाठी. कारण आता तिला नंदिनीची आई आणि वडील दोघांची भूमिका पार पडायची होती. नंदिनी एव्हाना संस्थेत सगळ्यांची लाडकी झाली होती. त्यामुळे समिधा नसताना ही नंदिनीच्या शाळेपासून, जेवणापासून तिला झोपवण्याची जवाबदारी संस्थेतल्या सगळ्यांनी बायकांनी घेतली होती. तरीही नंदिनी रोज रात्री समिधाची वाट पाहे..कोणी कितीही बोलले तरी ती वाट पाहत असे..

आणि समिधा आल्यावर, "आई आली!! आई आली!!" असे बोलून बिलगत असे..नंदिनी ला असे खुश पाहून समिधाचा थकवा कुठच्या कुठे पळे..


समिधाचा तिच्या कामात जम बसला होता. नंदिनी पण मोठी होत होती..त्यातच समिधाचे शिक्षणही पूर्ण झाले. आणि तिला चेन्नईमध्ये असलेल्या मोठ्या संगीत प्रशिक्षण केंद्रात शिक्षिकेची संधी सांगून आली. पण त्याबाबतची तिची पहिली मुलाखत मात्र ह्याच शहरात होती व शेवटची मुलाखत चेन्नई मध्ये होती. समिधा देवाच्या कृपेने पहिली मुलाखत पास झाली आता तिला शेवटच्या मुलाखतीसाठी चेन्नई ला जायचे होते..ह्या नोकरी वर तिचे भवितव्य अवलंबून होते. कारण हे प्रशिक्षण केंद्र जगातील प्रसिद्ध ५ संगीत केंद्रांपैकी एक होते. तिथे नोकरी मिळणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी 'सोने पे सुहागा' अशी बाब होती.


समिधा खूपच आनंदी होती. ह्या प्रशिक्षण केंद्राने संगीतातील अनेक विद्वानांना घडविले होते. समिधा चेन्नईला जायला निघाली. नंदिनी आणि वैशाली ताईंनी तिला बेस्ट ऑफ लक दिले👍.

तिच्या पूर्ण प्रवासाचा आणि एक दिवस राहण्याचा खर्च त्या प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात येईल असे तिला सांगण्यात आले होते. समिधा तेथे पोहोचली. तिथला परिसर पाहून ती भारावून गेली. तिने त्या केंद्राच्या दालनात प्रवेश केला. तिचे डोळे भरून आले. ह्याच संधीची ती कधीपासून वाट बघत होती. तिची मुलाखत सुरळीत पार पडली.. 


समीधाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.


एके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला. तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून होता. समिधाची तो उचलला.

समिधा : हॅलो, कोण बोलतंय.

समोरची व्यक्ती : नमस्कार, मी नीलिमा बोर. चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतेय.तुम्ही समिधा बोलताय का?

समिधा : हो. बोला ना मॅडम.

नीलिमा : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ५ उमेद्वारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे. तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल. आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल, तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल. बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलू. तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. 

असे बोलून तिने फोन ठेवला.

समिधा आनंदाने जोरात ओरडली. तिने नंदिनीला कडकडून मिठी मारली. तितक्यात तिथे वैशाली ताई आणि बाकीच्या सर्वजणी धावतच आल्या. सगळ्यांना वाटले काय झाले म्हणून.


समिधाने सगळ्यांना गोड बातमी दिली..सगळे जण खूप खुश होते. वैशाली ताईंना अगदी भरून आले..

सगळ्यांनी अगदी जड अंतःकरणाने समिधा आणि नंदिनी ला निरोप दिला. समिधाने शेवटचे इमारतीकडे बघितले. 'निवारा' ती स्वतःशीच पुटपुटली.


समिधा आणि नंदिनी चेन्नईला सुखरूप पोहचल्या. समिधाला 2 खोल्यांची प्रशस्त जागा, जीवनावश्यक सामानाबरोबर संगीत प्रशिक्षण केंद्राकडून राहायला मिळाली होती. ती जागा प्रशिक्षण केंद्रापासून १० मिनिटांवरच होती. समिधाने आणि नंदिनीने घरात आल्यावर पहिले सामान लावायला सुरवात केली. थोडी साफसफाई करून मग त्यांनी बरोबर आणलेले जेवण खाल्ले. प्रवासाने दोघीही फार दमल्या होत्या. दोघींना कधी झोप लागली कळलेच नाही. समिधाला कामावर रुजू व्हायला अजूनही ४ दिवसांचा कालावधी होता. त्यामध्येच तिला नंदिनीचे नवीन शाळेत ऍडमिशन आणि काही बारीक सारीक कामे उरकायची होती. आतापर्यंत त्या दोघींना भरपूर लोंकांमध्ये राहायची सवय झाली होती. निवारा संस्थेत राहात असताना कोण ना कोण बोलायला.... वेळ घालवायला हमखास असायचे. त्यामुळे त्या दोघींना एकटे राहायची सवयच नव्हती. म्हणूनच त्यांना चेन्नईला स्थिर व्हायला बराच वेळ लागणार होता. 


असेच काही दिवस निघून गेले. समिधा ही कामावर रुजू झाली. नंदिनीची ही शाळा सुरू झाली. समिधाचे काम छान चालले होते.तसेच तिला शिकवता शिकवता भरपूर काही नवीन गोष्टी शिकताही येत होत्या. दोघीही आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाल्या होत्या.


अशातच एके दिवशी इन्स्पेक्टर माने समिधाची भेट घ्यायला निवारा संस्थेत आले. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती म्हणून काही महत्वाचे काम असले तरच ते मुंबईत येत असत आणि आल्यावर आवर्जून समिधा आणि नंदिनी ची चौकशी करत. आज ते येताच त्यांना वैशाली ताईंनी समिधाच्या चेन्नईतल्या नवीन नोकरीबद्दल सांगितले हे ऐकून, माने साहेबांना अत्यंत आनंद झाला. त्यांच्या डोळ्यासमोर समिधा भेटल्यापासून ते आतापर्यंतचे सगळे चित्र उभं राहिले. 


माने साहेबांना आता त्यांनी समिधासाठी आणलेल्या बातमीच काहीच महत्त्व उरल नव्हतं. पण तरीही निदान वैशाली ताईंच्या कानावर घालायला हवे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, " वाह!!मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो पण इथे येताच ताई तुम्ही फारच छान बातमी दिलीत. देव करो समिधा आणि नंदिनी दोघी अशाच नेहमी आनंदी राहू देत." 


पुढे ते म्हणाले, " ताई खरं म्हणजे मी अशा करता इथे आलो होतो की, खूप दिवसांपासून माझी काही माणसे सुयशच्या म्हणजेच समिधाच्या नवऱ्याच्या पाळतीवर होती. मी या शोधात होतो की कधीतरी काहीतरी पुरावा मिळेल जेणेकरून मी समिधाला न्याय मिळवून देऊ शकेन. परंतु काही दिवसांपूर्वी सुयशचा फार मोठा अपघात झाला. तो इतका भीषण होता की त्याच्या मृतदेहाची ओळख पटने ही कठीण होते. त्याच्या गाडीचा चुराडा झाला. पण त्याच्याजवळच्या सामनामुळे त्याची ओळख पटली आणि या बाबतीत माझ्या सहकाऱ्यांनी त्याच्या मित्राची रणजितची थोडी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून असे कळले की, सुयशने त्याची सगळी प्रॉपर्टी आणि व्यवसाय सर्व काही समिधाचे वडील जिवंत असतानाच धोक्याने त्यांची सही घेऊन रणजितला विकून टाकले होते म्हणून.

तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून तो तिथेच राहत होता..खरं तर त्याचा परदेशात पळून जायचा प्लॅन होता पण समिधाच्या वडिलांना हे सत्य तो पळून जायच्या आधीच समजलं आणि तिथेच त्याचा प्लॅन फिस्कटला. तरीही सुयशचे नशीब चांगलच म्हणायला लागेल, समिधाचे वडिल तो विश्वासघाती धक्का सहन करू शकले नाहीत आणि त्यातच ते वारले आणि सुयश ला हवे ते करायला रान मोकळे झाले. त्याच्या वाटेवरचा मोठा काटा समिधा आणि नंदिनी होत्या. त्यांना त्याला मारायचे नव्हते. कारण जर कोणाला कळले तर उगाच भानगड होईल. म्हणून त्याने त्या दोघींना घराबाहेर काढले.


"असो, त्यानंतर काय झाले ते आपल्याला सर्व माहीतच आहे. कदाचित सुयशला वाटले असेल अन्न-पाण्याविना किती दिवस या दोघी जगतील. पण समिधाच्या नशिबात काहीतरी वेगळंच होते, ते तुम्हाला आणि मलाच माहीती. मी हे सगळें समिधाला सांगायला आलो होतो, पण आता मला याची काहीच गरज वाटत नाही कारण समिधाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि मला नाही वाटत आता तिच्या आयुष्यावर भूतकाळाची कोणतीच सावली पडायला नको. तिचा फोन आला तर माझ्याकडून तिला शुभेच्छा कळवा. येतो मी." असे बोलून ते निघून गेले.


अशीच काही वर्षे निघून गेली. समिधा फार हुशार आणि कर्तबगार होती. म्हणूनच काही वर्षातच तिला बढती मिळाली. आता ती एका संगीत शाखेची प्रमुख होती. समिधाने चेन्नईत स्वतःचे घर ही घेतले आणि त्या दोघी नवीन घारात स्थिरावल्या. नंदिनीला आईप्रमाणेच संगीतामध्ये करियर करायचे होते म्हणून तिने शाळा पूर्ण झाल्यावर समिधा नोकरी करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदविले. समिधा अगदी सुखात होती. तरीही ती निवारा ह्या संस्थेला विसरली नव्हती. ती दर वर्षाला न चुकता एक ठराविक देणगी निवारा ह्या संस्थेला पाठवत होती. 


याचबरोबर समिधाने चेन्नईमध्ये तिच्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःची 'आधार' नावाची संस्था स्थापन केली होती. ह्याचबरोबर संगीताचे विविध कार्यक्रम करून ती या संस्थेसाठी निधी गोळा करत होती. तसेच या कामामध्ये नंदिनीची ही समिधाला मोठी साथ मिळाली होती.


अशाप्रकारे ह्या संस्थेने इतक्या वर्षात अनेक महिलांचा उद्धार केला होता. त्यांना जगण्याची नवीन उमेद दिली होती. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला सक्षम बनविले होते आणि आज खऱ्या अर्थाने समिधाला तिच्या अस्तित्वाचा शोध लागला होता.


निवेदिकेने पुढील पुरस्कार "प्रेरणादायी व्यक्तिमत्व २०१९" जाहीर केला आणि त्या पुरस्काराची मानकरी म्हणून समिधाच्या नावाची घोषणा केली. स्वतःचे नाव ऐकताच समिधा अचानक भानावर आली. 


तिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवेदिकेने व्यासपीठावर येण्याची विनंती केली. नंदिनीने समिधाला गच्च मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण आतापर्यंतच्या समिधाच्या खडतर प्रवासाची खरी साक्षीदार नंदिनीच होती.


समिधाला उपस्थित प्रमुख अतिथी वैशाली देव म्हणजेच तिच्या लाडक्या वैशाली ताईच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैशाली ताईंना समिधाला इतक्या वर्षांनी समोर बघून ऊर भरून आला आणि तिचा खूप अभिमान ही वाटला. यानंतर समिधाने आतापर्यंतच्या केलेल्या कार्याची चित्रफीत ही मागील पडद्यावर दाखवण्यात आली. 

पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. 


(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत जरूर share करा. धन्यवाद🙏)


©preetisawantdalvi


Rate this content
Log in

More marathi story from Preeti Sawant

Similar marathi story from Inspirational