शिकवणे एक कला
शिकवणे एक कला


दामू एका आदिवासी पाड्यावरचा गोरा गोमटा मुलगा होता. जितका तो दिसायला सुंदर तितकाच अस्ताव्यस्त. जवळच असलेल्या एका जिल्हा परीषदच्या शाळेत पहिलीत शिकत होता. आज नवीन शिक्षिका शाळेत येणार होत्या म्हणून सर्व मुलांना खूप उत्सुकता होती. बाई वर्गात आल्या व मुलांना नवीन गोष्टी शिकवू लागल्या. परंतू याचा दामूला काहीच फरक पडणार नव्हता. परंतू बाईंचे दामूकडे लक्ष होते. आज शाळेच्या गावाचा बाजार होता. नेहमीप्रमाणे आजही दामूने अर्ध्या दिवसातून शाळेतून पळ काढला होता.
बाईंनी वर्गात विचारले की सकाळी वर्गात असलेला तो मुलगा कोठे गेला? या प्रश्नाचे वर्गातून जी उत्तरे आली त्याने बाईंचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. कुणी सांगत होतं , " बाई आज बाजार आहे ना! तो घुटका खायला गेलाय", तर दुसरा म्हणाला की, "तो बिडी ओढत असेल", तर तिसरा बोलला की, "बाई तो दारू पित असेल", बाई चिडल्या त्यात मधेच एक म्हटला," चिलू नका बाई हे सगलं खलं आहे." बाई सर्वांना रागवल्या कुणाबद्दल असे बोलू नये. एवढासा पोर त्याचा बद्दल एवढ्याश्या मुलांच्या मनात एवढी दुषीतं.
बाजूच्या वर्गातील शिक्षकांना बाई म्हणल्या," काय हे ही सर्व मुले त्या गरीब मुलाबद्दल काहीही बरडता आहेत. ही सारी मुले त्या मुलाला दोष देत आहेत. या मुलांना समजवायला हवे. अशाने गरीबाची मुले शाळेत कशी येतील?
इतकावेळ निमुटपणे ऐकणारे शिक्षक बाईंना समजावत म्हणाले की , वर्गातील मुलांनी जे तुम्हाला सांगितले आहे तेच बरोबर आहे. दामू खरचं खूप वातरट, आगाऊ मुलगा आहे. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत तर आई हातमजूरी करते. दोघेही दिवसभर दारूत असतात. ते स्वतःच शुद्धीत नसतात तर मुलाकडे कुणाचेही लक्ष नसते. व त्यामुळे दामू आई वडीलांचेच अनुकरण करतो. व तो ही नशेत असतो. " हे ऐकून जणू बाईंच्या पायाखालची जमीनच सरकली.
शिक्षक बोलू लागले, "आम्ही अनेक प्रयत्न केले, त्याच्या घरी जाऊन त्या दोहोंना समजावून आलो, तर कधी दटवून आलो की मुला कडे जरा लक्ष द्या. त्याला शाळेत यायची गोडी लागावी म्हणून नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा गणवेश दिला. त्याला वर्गात पुढे बसवले. " पण अजूनही त्याच्यात काहीच सुधारणा होत नाही.
शिक्षक हतबल झाले होते.
बाईंना काय बोलावे ते काहीच सुचत नव्हते डोळ्यासमोर येत होते ते फक्त त्या मुलाचा चेहरा. बाई वर्गात गेल्या खऱ्या, पण दामूच्या रिकाम्या जागेकडे बघून त्या अस्वस्थ होत्या. मागच्या सतरा वर्षाच्या सेवेत असे न कधी एकले, न कधी पाहिले. डोके सुन्न झाले होते. एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे होते. समस्या जणू वर डोके काढून विचारत होती आता पुढे काय?
घरी गेल्यावरही आज तोच विषय डोक्यात घोळत होता. बराच विचार केल्यावर बाईंना काहीतरी सुचले जे त्यांनी दुसऱ्या दिवशी वर्गात जाऊन नियोजन करायचे ठरवले. बाई अनुभवी शिक्षिका तर होत्याच त्यासोबत त्या प्रयोगशील शिक्षिका ही होत्या.
दुसरा दिवस उजाडला तो बाईंसाठी एक आशेचा किरण घेऊनच. खरे तर वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी दामूसहित सर्वांसाठी तो सामान्य दिवसच होता. बाई वर्गात आल्या व सर्व विद्यार्थ्यांवर त्यांनी नजर टाकली. आज बाईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. बाईंनी दामू वर्गात आहे हे एका दृष्टीक्षेपात हेरले होते. व दामूला ते न जाणवू देता त्यांनी वेगवेगळे खेळ वर्गात खेळवायला सुरवात केली. ज्यात हळूहळू वर्गातील सर्व विद्यार्थी सहभाग घेऊ लागले. ज्यात दामू ही हिरहिरीने सहभाग घेतोय हे बाईंचे लक्षात आले.
तिसऱ्या व चौथ्या दिवशी बाईंनी वर्गात खेळ चालूच ठेवले परंतू खेळातून आता हळूहळू त्या पाठ्यक्रम शिकवू लागल्या होत्या. मुलांना निटनेटके राहणे व संस्कारक्षम गोष्टी शिकवू लागल्या होत्या. असे काही दिवस चालले होते. मागच्या काही दिवसात जो बदल झाला होता. तो म्हणजे दामू या काही दिवसात एकदाही अर्धा दिवसाची शाळा सोडून गेला नव्हता.
त्याला
शाळेची गोडी लागू लागली होती.
आता खेळाच्या माध्यमातून बाईंनी दामूशी संवाद वाढवला होता. खेळा बरोबरच त्याचे कपडे, केस, वह्या, पुस्तके, दप्तर याकडे बाई लक्ष देत होत्या. ते ही कधी त्याच्या कळत तर कधी नकळत त्या त्याच्याशी संवादातून त्याची मनस्थिती समजून घेत होत्या घरची परिस्थितीची माहिती घेत होत्या.
या दरम्यान एक गोष्ट घडत होती दामू पाठ्यपुस्तकांचा आभ्यास करत होता तर बाई दामूच्या मनस्थिती, सामाजिक परिस्थितीचा आभ्यास करत होत्या. शाळेतील इतर शिक्षक वर्गात होऊ लागलेला बदल सहज निरखू शकत होते, ते सारे पारखत ही होते. होणारे बदल सहज जाणवणारे होते.
बाईंची घेतलेली मेहनत सगळ्यानाच दिसत होती.
फक्त दामूच नाही तर वर्गातील इतर मुलांची हजेरी आता चांगलीच वाढली होती.
आज वर्गात काहीतरी वेगळेच घडले, खरेतर काल रस्त्याने जातांना शाळेतील काही मुलांनी दामूला त्याच्या आई वरून शिवीगाळ केली होती. त्याने ही त्यांचे नाव घेतले होते. काल रस्त्यात झालेले भांडण
हे आजच्या घटणेचे कारण होते. बाई वर्गात आल्यावर बाईंना जे दिसले ते पाहून बाई अवाक झाल्या. वर्गात गोंधळ माजला होता. आरडाओरडा चालू होता. दामूच्या हातात सेलवर चालणारे मोबाईलचे चार्जर होते ज्याचे आँपरेशन झालेले दिसत होते. बाहेर आलेल्या दोन वायर्स एकमेकांना जोडून मुलांना चटका देऊ का? शाँक लावू का?असे म्हणतजवळ जात होता. धमकवत होता. मुले घाबरत होते. हे सारे बघून बाई चिडल्या दामूवर खूप रागवल्या. खरेतर बाईंना काल घडलेले काहीच माहिती नव्हते. बाईंनी दामूला रागात वर्गाच्या बाहेर काढले. दामूनेही दप्तरातून पुस्तके काढून बाईंच्या दिशेने भिरकवत म्हणाला " ही घ्या तुमची पुस्तकं, मला नाही शिकायचं इथं." तो रडत वर्गाबाहेर पडला. बाई हताश झाल्या होत्या. आतापर्यंत आपण घेतलेली मेहनत वाया गेली की काय असे त्यांना वाटू लागले होते. डोळ्यासमोर फक्त अंधार होता. बाई चिडलेल्या बघून सर्व वर्ग शांत होता व दामू वर्गा बाहेर गेल्याने त्यांना सुरक्षित वाटत होते.
सुन्न अवस्थेत बाई वर्गाबाहेर निघाल्या. तेवढ्या वेळात बाईंच्या मनात बऱ्याच विचारांचा गोंधळ माजला होता. दामू शाळेच्या पटांगणातील एका झाडामागे लपून बाईंकडे बघत होता. बाईंना हे लक्षात आले. बाई झाडाच्या दिशेने जाऊ लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज त्या गावाचा बाजाराचा दिवस होता. बाई आपल्या दिशेने येतांना पाहून दामू स्वतःला झाडाच्या मागे लपत होता. बाई जसजश्या जवळ जात होत्या तसतसा त्यांना दामूचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. दामू घाबरला होता. बाई मारतील याची त्याला भिती वाटत असावी. पण तो नेहमी प्रमाणे पळून जाऊ शकत होता. बाईंना वाटले की आज कारण मिळाल्यावरही दामू का गेला नाही.
बाईंनी आवाज दिला,"दामू" घाबरत दामू बाईंकडे बघू लागला व रडू लागला. थोड्या वेळापूर्वी चिडलेल्या बाईंनी दामूला जवळ घेतले. आता तर बाईंना देखील रडू लागल्या होत्या. रडत रडत दामूने काल घडलेल्या घटणेचा बाईंकडे खुलासा केला. व घडलेल्या गोष्टी बद्दल माफी मागितली. व बाईंना सांगितले की मी असे परत कधीच करणार नाही. बाई मला शिकायचे आहे. तुमच्या सारखेच शिक्षक व्हायचे आहे. तुम्ही शिकवायला आल्यापासून मी सर्व व्यसनांपासून लांब राहतो. या सगळ्यांची कबुली दिली. व हे सारे ऐकत बाईंना खूप बरे वाटले. वाईट या गोष्टीचे वाटले की आपण कारण समजून न घेता दामूवर चिडलो. या गोष्टीच्या मागे असलेले कारण समजून घेऊन आपण निर्णय घ्यायला हवा होता.
हे सारे होत असतांना वर्गातील सर्व विद्यार्थी व इतर शिक्षक दोघांच्या अवतीभोवती केव्हा गोळा झाले, ते बाईंना कळले देखील नाही. तेव्हा मोठ्याबाईंनी बाईंच्या खांद्यावर हात ठेवत थोपटत बाईंना शाबासकी दिली. हे बाईंच्या मेहनतीचे यश होते. दामूच्या मनात शिकण्याची इच्छा जागृत करण्यात व व्यसनांपासून लांब ठेवण्यात बाई यशस्वी झाल्या होत्या. शाळेची व शिकण्याची त्याला ओढ लागली होती. हाच त्याचा खरा पुरावा होता.