Nilesh Jadhav

Drama Romance Tragedy

3  

Nilesh Jadhav

Drama Romance Tragedy

शेवट...

शेवट...

9 mins
564


अंगावर आलेल्या परीक्षा देऊन एकदाचा मी गावाकडचा रस्ता धरला. गाव म्हणजे माझ्या आयुष्यातील मंतरलेलं पान. लहानपणी केलेल्या कितीतरी गोष्टी आता अशा डोळ्यासमोर तरंगत होत्या. दहावीपर्यंत शिक्षण गावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी पुण्याला आलो होतो. गेले पाच वर्षे मी इकडेच पुण्यात होस्टेलवर रहायचो. सुट्टी असली की मी जायचो गावाला पण या वेळी मी जरा जास्तच खुश होतो. कारण या वेळी मी बऱ्याच दिवस रहाणार होतो. पुढे परीक्षा पास झल्यावर मग नोकरीसाठी बस्तान कुठल्यातरी शहरातच करावं लागणार याची कल्पना होती मला. आमचं गाव म्हणजे पुण्याच्या घाट माथ्यावर वसलेलं आहे. तुम्ही कधी स्वर्ग पाहिलाय..? हो स्वर्गालाही लाजवेल असं सौंदर्य आहे आमच्या गावाकडे.


माझी गाडी तालुक्याच्या गावाला येऊन थांबली. मी गाडीतून उतरलो आज तालुक्याला म्हणावी अशी गर्दी नव्हती त्यामुळे इथून पुढे गावाला जायला पुढची गाडी मिळेल याची अपेक्षाच नव्हती. दुपार होऊन गेलेली चैत्रातलं रणरणतं ऊन अंगाला भाजत होतं. समोरचा तोरणा किल्ला अभिमानाने आजही तसाच छाती फुलवून उभा होता. पावसाळ्यात त्याच्या अंगा-खांद्यावरून कोसळणारा कडा आता उन्हाळ्यात काळाशार दिसत होता. बसथांब्यावर काही म्हातारी लोकं सुपारी खाण्यात व्यस्त होते. समोर रस्त्यावर आंब्याच्या सावलीत भटकी कुत्री लोळण घेत होती. जेवढे प्रवासी होते ते कधीच परतीच्या गाडीत जाऊन बसले होते. मी पण माझी बॅग पाठीवर टांगून जास्त वाट न पाहता चालू लागलो. तालुक्याच्या गावापासून मला तीन-चार मैल चालावं लागणार होतं. रस्त्यावरच्या तापलेल्या डांबराच्या झळा पलटून चेहऱ्यावर येऊन धडकत होत्या. पण मधूनच येणारी झुळझुळती हवा दिलासा देत होती. पानगळ होऊन गेली असली तरी चैत्रपालवी बहरात आलेली दिसत होती. लांब वर धरणाचं पाणी खाली गेलेलं असलं तरी उन्हाने चमकत होतं. मी माझ्याच तंद्रीत चाललो होतो. मुख्य डांबरी रस्ता सोडून मी आता गावात शिरणाऱ्या लाल मातीच्या पांदणीवर येऊन थांबलो. आणि मला हायसं वाटलं. आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या बऱ्याच मोठया झालेल्या दिसत होत्या. तिथेच काही मुली कैऱ्या पाडायला आलेल्या दिसल्या. मला पाहताच कदाचित त्यांना ओशाळल्यागत झालं असेल.


त्यात एक मुलगी होती. असं सौंदर्य मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या मावळी घाटाची त्या रांगड्या सह्याद्रीची सुंदरता तिच्या पूर्ण नखशिखान्त शरीरात उतरून यावी. इतकी सुंदर होती ती. एखादी तिखट मिर्ची खावी आणि जीवघेणी उचकी लागावी. अगदी पार मरणाच्या दारावर धडक देऊन काळजाने माघारी फिरावं आणि हायसं वाटावं अगदी असंच त्या क्षणाला मला वाटलं. क्षणभर मी तिच्याकडेच पाहात राहिलो होतो. वाऱ्यावर उडणारे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर ये-जा करत होते. नेहमीच्या उन्हाने तिचा चेहरा रापलेला दिसत होता. पण त्या उन्हाने तिच्या सौंदर्याला धक्का लावला नव्हता. हरणाच्या चपळाईने ती लगेच झाडाच्या मागे लपून बसली. मी थोडासा गालातल्या गालात हसत घराकडची वाट धरली. आत घरात शिरलो तर आई मागल्यादारच्या परड्यात काही तरी करत होती. आजीसुद्धा तिथेच फणसाच्या झाडाखाली सावलीला बसली होती. मला आलेलं पाहताच दोघीही सुखावल्या. मला कुठं ठेऊ आणि कुठे नाही असं त्यांना झालं होतं. वडील घरात नव्हतेच म्हणा आईला विचारल्यावर तिने सांगितलं की ते गेलेत पाटलाच्या तालीचं काम करायला. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर मी जेवायला बसलो जेवल्यावर तिथेच माझा कधी डोळा लागला कळलेच नाही.


साधारण संध्याकाळी मी उठलो तोंडावर पाणी मारून मी तसाच गण्याच्या घरी गेलो. गण्या माझा बालमित्र दहावीपर्यंत आम्ही एकत्रच होतो. नंतर गण्या पुढे शिकायला आलाच नाही. त्याला या गावाची, रानाची, शेताची भारी आवड होती. तो सारखा म्हणायचा आपला गावच बरा. दिवसभर शेतात राबल्यावर त्याला बरं वाटायचं. मी त्याच्या दारात जाऊन उभा राहिलो मी त्याला आवाज दिल्यावर गण्याची बायको बाहेर आली. मागच्याच वर्षी हात पिवळे करून मोकळा झाला होता पठ्ठ्या. मी थोडं कचरतच बोललो, "वहिनी गणेश कुठंय..."


त्यावर ती म्हणाली, "असतील पारावर बसलेले..."


यावर मी फक्त मान हलवून वाटेला लागलो.


पारावर आणखीसुद्धा पोरं होतीच बऱ्याच दिवसातून मी त्यांना भेटलो होतो. थोडा वेळ तिथे गप्पा मारून मी गण्याला म्हणालो, "ये चल रानातून फिरून येऊ..."


गण्याला फिरायचा कंटाळा नव्हता कधी तो लगेच तयार झाला. आणि तसंही हे फिरणं, हुंदडणं आमच्यासाठी नवीन नव्हतं रान अन रान सगळे ओढे नाले आम्ही पायाखालून काढले होते. अगदी कुठल्या आंब्याला पहिल्यांदा पाड लागतो इथपासून पहिल्यांदा कुठली चिंच पिकते इथपर्यंत सर्वकाही आम्हाला माहीत असायचं.

 

गावच्या वरच्या अंगाला गेल्यावर आम्ही खडवीला लागलो. गप्पा मारत मारत आम्ही कधी इकडे पोहोचलो कळलेच नाही. बऱ्याच दिवसांनी चाललो होतो म्हणून माझी दमछाक होत होती. गण्या आपला पटपट पावलं टाकत होता खडवीचा टप्पा वर चढून गेल्यावर आम्ही थोडावेळ तिथे एका दगडावर बसलो. संध्याकाळच्या वेळेला मस्त वारा सुटला होता. बऱ्याच जुन्या आठवणी काढून आम्ही हसत होतो. बोलत होतो. बराच वेळ गेल्यानंतर आम्ही पुन्हा गावची वाट धरली. जाता जाता गण्याने मला बजावलं होतं घरी गेला की लगेच माघारी ये दूध घालायला जायचंय. मी हो म्हणत घरी गेलो. एव्हाना अप्पा घरी आलेले होते. दिवसभर कष्ट करून दमलेले अप्पा टीव्ही पहाण्यात रमले होते. मी माझ्या वडिलांशी जास्त बोलायचो नाही. पण आज खुप दिवसांनी मला पाहून ते सुखावलेले दिसत होते.


मी आईला सांगून परत माघारी फिरलो. बाहेर अंगणात आलो तर गण्या माझी वाटच पहात होता. गावी संध्याकाळी गवळी मुख्य रस्त्यावर येऊन थांबायचा तिथेच दुधगाडी सर्वांचे दूध घेऊन पुण्याला रवाना व्हायची. म्हणून दूध घालायला मुख्य रस्त्यावर जावं लागायचं. गण्या आणि मी तिथे पोहोचलो तर तिथे ती मघाशी दिसलेली मुलगीसुद्धा होती. मी मनातून खुश होत एकटक तिच्याकडे पाहातच राहिलो. आतापर्यंत अंधार पडून गेला होता. चांदण्याच्या सौम्य प्रकाशात ती उठून दिसत होती. तिथे आणखी मुलीसुद्धा होत्याच पण तिचं दिसणं काळजावर वार करणारं होतं. मैत्रिणीशी बोलताना ती किती हळुवार बोलत होती. तिच्या लुकलूकणाऱ्या डोळ्यात खोल बुडून गेलेलो असतानाच तिने माझ्याकडे पहिलं. आणि काळजात चर्रर्र झालं. माझं तिच्याकडे पाहणं तिला कळलं होतं आणि तितक्यात गण्या माझ्या जवळ येऊन बोलला..


"नको बघुस तिच्याकडं.. काय फायदा नाय.."


सावध होऊन मी म्हणालो, "का रे.."


त्यावर गण्या म्हणाला, "आजवर लय आले गेले कुणालाच ती पटली नाय ते आपलं काम नाय.."

 

अजून काहीतरी जाणून घेण्याच्या हेतूने मी गण्याला खोदून खोदून विचारलं तेव्हा मला कळलं की ती गावच्या चेअरमनची मुलगी होती. मग लक्षात आलं की ही तर मधुरा. मी पुण्याला गेलो तेव्हा लहान होती. तिचा बाप खूप आकडू होता. लहानपणी मलाही त्याचा राग यायचा. केवढी भारी दिसतेय यार ही..!

 

डोळ्यांत चमक आणून मी गण्याला म्हणालो, "गण्या बोलायचंय मला तिच्याशी.."

 

त्यावर स्वतःलाच सावरत गण्या म्हणाला, "बावळा आहेस का कशाला उगाच लफडं घेतोय अंगावर.."


"काही नाही होत रे.." मीच गण्याला धीर देत म्हणालो. 


त्यावर गण्या म्हणाला, "बाबा तुझं तू बघ मला काय सांगू नको.."

 

आमचं बोलणं होईपर्यंत दुधवाल्या गवळ्याने दूध घ्यायला सुरुवात केली होती. त्या मुलींनी दूध घालून घराची वाट केव्हाच धरली. आम्ही पण हळूहळू घराच्या दिशेने चालू लागलो. संध्याकाळी जेवण आटोपून मी चुलत भावाबरोबर अंगणातच अंथरूण टाकलं. अंथरुणावर पडलो असलो तरी झोप काही लागत नव्हती. मधुराचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर थैमान घालत होता.


शेतात रखडलेली कामं, तिची एखादी नजरभेट, हुंदडणं, पोहायला जाणं या सर्व गोष्टी अगदी रोज आहे तशाच घडत होत्या. या सर्वात तिच्याबद्दल असलेली ओढ आणि आसक्ती तसूभरही कमी झाली नव्हती. एव्हाना चैत्र महिना संपून वैशाख लागला होता. लोकांनी भात खाचरे रिकामी करून लख करून ठेवली होती. दिवसभर कोणी पत्ते खेळत होते तर कोणी झोपा काढत होते. संध्याकाळी मात्र अंगणात आट्या-पट्याच्या खेळाला रंग चढत होता. तिला पहिल्यापासून माझं मात्र कुठेच लक्ष लागत नव्हतं. आणि एक दिवस मात्र मी गण्याला चुकवून ती दूध घालून येताना तिच्या वाटेवर जाऊन थांबलो. मनात तर चलबिचल चालू होती. भीती दाटून आली होती. पण मला तिला सांगायचं होतं. तिच्याशी बोलायचं होतं. समोरून ती एकटीच येताना पाहून थोडा दिलासा तर आला पण भीतीने मात्र दरदरीत घाम फुटला होता. ती जवळ आल्यावर हिम्मत करून मी तिला आवाज दिला..


"मधुरा..."


"काय..?" ती.


"मला बोलायचंय तुझ्याशी.." मी.


"मला माहितेय तुला काय बोलायचंय.." तिच्या तोंडून उमटलेले हे शब्द ऐकून माझ्या नजरेत एक चमक आली. मी मनातून खुश होत तिला म्हणालो,

"तरीही मला सांगायचंय.."

 

यावर ती इकडे तिकडे पाहात म्हणाली, "बोल पटकन कोणीतरी येईल.."


"मला तू आवडतेस" माझ्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून ती थोडीशी लाजली. लाजेनेच मान खाली घालून ती तशीच उभी राहिली. मी परत तिला म्हणालो, "अगं सांग तरी तुला मी आवडतो का ते.."

 

"उद्या सांगू..?" एवढं म्हणत ती झपाझप चालू लागली जाताना ती एवढंच म्हणाली, "उद्या इथेच भेट.."


मला खूप आनंद झाला होता. किती दिवसांची प्रतीक्षा संपणार होती. मी तसाच तिथून निघालो आणि गण्याला जाऊन सगळं सांगितलं. पण गण्याने मात्र मला घाबरून सोडलं. गण्या म्हणाला उद्या जर ती कोणाला सोबत घेऊन आली तर... त्याच्या या बोलण्यावर मात्र मी पूर्ण हादरून गेलो. आनंदाच्या भरात हा विचार मी केलाच नव्हता.


दुसरे दिवशी मी गण्याचं बोलणं फारसं मनावर न घेता हिम्मत करून मधुराला भेटायचं ठरवलं. अंधार पडून गेल्यावर मी कालच्या जागेवर जाऊन उभा राहिलो. ती एकटीच येताना दिसली तेव्हा मनाला दिलासा वाटला. तिला थांबवत मी म्हणालो, "काय उत्तर आहे तुझं..."

 

त्यावर ती म्हणाली, "जे तुझ्या मनात आहे तेच उत्तर आहे माझं" खरंतर तर तिच्या या उत्तरानंतर मला झालेला आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. किती बरं वाटत होतं मला. तापलेल्या जमिनीवर अलगद एखादी बरसात पडून जावी. त्या मातीच्या सुगंधाने संपुर्ण धरती मंत्रमुग्ध होऊन जावी. इतकी सुंदर आणि नितळ भावना होती ती. 


या प्रसंगानंतर आता आमचं बोलणं आणि भेटणं रोजच होऊ लागलं. स्वप्न सजू लागली. तिच्या डोळ्यात अखंड बुडून गेल्यावर कधीकधी माझं मलाच शोधणं अवघड होऊ लागलं. सर्व मस्त चालू होतं पण हे जास्त दिवस टिकणारं नव्हतं. आणि झालंही तसं काही गोष्टी इतक्या अचानक घडल्या की तिलाच काय मलाही काहीच करता आलं नाही. कुठल्यातरी पुढाऱ्याच्या मुलाचं मागणं तिला चालून आलं होतं. तिच्या बापाने क्षणाचाही विचार न करता त्याला होकार दिला. आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या दिवशी कितीतरी वेळ आम्ही त्या नेहमीच्या जागेवर बसून रडत राहिलो होतो. माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. घरची परिस्थिती थोडीशी हलाखीचीच त्यात माझ्या नोकरीचा अजून तपास नाही. म्हणून मलाही काहीच करता नाही आलं. तिला कसंतरी समजावून सांगून या दुःखाच्या डोहात मी स्वतःला बुडवून घेतलं.


महिन्याभराच्या आत तिचं लग्न पार पडलं. तिच्या दारात सजलेल्या त्या मांडवाकडे पाहुन मनात झालेली कोलाहल आणि त्यावर झालेल्या असंख्य जखमा मी कोणालाच सांगू शकत नव्हतो. त्यातल्या त्यात फक्त गण्या मला सावरत होता. मोठ्याने रडावं वाटायचं पण टाहो फुटायचाच नाही. येणारा प्रत्येक दिवस सारखाच जात होता. एक दिवस मी न राहवून गण्याची सायकल घेऊन मधुराला दिली त्या गावी निघालो. मला तिला एक नजर पहायचं होतं. काळजात साठवायचं होतं. तीस-चाळीस किलोमीटर अंतर तोडून मी तिथे पोहचलो. मला लांबूनच पाहून ती पुरती हादरून गेली होती. नजरेनेच ती सांगत होती की नाही रे मी नाही होणार आता तुझी.... तू जा इथून.


या नंतर मीही तिला हळूहळू विसरायचं ठरवलं. मग मी माझं मन कवितेत. आणि कथा लिहिण्यात रमवू लागलो. कॉलेजात होतो तेव्हापासूनच मी लिहीत होतो. मान्सून कधीच घाटावर येऊन धडकला होता. रापलेली धरती हिरवाईने नटलेली होती. गण्याबरोबर म्हशी घेऊन मीही रानात जाऊ लागलो. पांढरी शुभ्र रानफुले फुलुन त्यांचं अस्तित्व टिकवून ताठ उभी होती. या फुलांना आमच्या मावळात रानमोगरा असंही म्हणतात. या सर्व निसर्ग सौंदर्यात, लिहिलेल्या कवितेत मनाला धीर मिळत होता. 


आषाढ महिन्यातील पावसाला चांगलंच उधाण आलं होतं. आणि एक दिवस मधुरा माहेरी आली आहे ही बातमी उडत उडत कानावर आली. या गोष्टीकडे मी फारसं लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे गण्या आणि मी रानात म्हशीकडे गेलो होतो. भर पावसात अंगावरचा कागद सांभाळून एका दगडावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात समोरून मधुरा येताना दिसली. तिला आलेली पाहून कसला तरी बहाणा करत गण्या तिथून निघून गेला. मधुरा जवळ येऊन बसली आणि म्हणाली, "कसा आहेस..?"


"जसं तू मला पाहिलं होतंस तसाच.." मी बोललो.


"एक सांगू?" ती म्हणाली.


"हो बोल ना.." मी.


"तुला धड नीट खोटं पण बोलता नाही येत रे..." तिच्या या वाक्यावर मी शांतच झालो. 


बराच काळ शांततेत गेला. काहीतरी बोलावं या उद्देशाने ती म्हणाली ,"बघ ना या रानफुलांचा बहर किती छान आहे ना.."


आता मात्र माझा बांध फुटला होता न राहवून मी बोलायला सुरुवात केली...

 

अगं आता सुकून चालली आहेत ती फुलं. त्यांचा बहर हा पहिल्या पावसातच छान वाटतो. नीट बघ कशी हिरमुसून गेली आहेत ती. आता त्यांचा बहर हा पुढच्या वर्षी पाहावयास मिळेल. त्यासाठी थंडी सोसावी लागेल. उन्हाचा ताप सोसावा लागेल. मग पाऊस पडेल आणि मग कुठं हे सौंदर्य नजरेच्या टापूत नव्याने दिसेल. आयुष्य अगदी असंच तर आहे. फक्त जगता आलं पाहिजे. बघ ना तुझं नाव काय मधुरा म्हणजे गोडी पण ही गोडी जीभेवर अगदी कायमस्वरूपी तशीच राहते का नाहीच ना... आणि माझं नाव काय निलेश म्हणजे निळा देव थोडक्यात काय तर कृष्ण. पण कृष्णाला राधेची सोबत कायम मिळाली का नाहीच ना... लोकं जरी कृष्णाबरोबर राधेला पूजत असले तरी राधेला रुक्मिणीची जागा कधीच मिळाली नाही. हे त्याहून खरं आहे. मी बोलतच होतो आणि ती रडत होती. का कोणास ठाऊक तिला काहीतरी वाटलं आणि ती तिथून निघून गेली. 


थोड्या वेळाने गण्या तिथे आला. थोडंस कचरत तो बोलला. "निल्या तू लिहिलेल्या कथेचा शेवट नेहमी रडका का असतो रे.."


त्यावर मी मिश्किल पणे हसत म्हणालो, "जाऊदे तुला नाही कळणार....."


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama