Nilesh Jadhav

Drama

3.8  

Nilesh Jadhav

Drama

शापित सौंदर्य..

शापित सौंदर्य..

6 mins
1.3K


सकाळी थोडं तिरप्या झालेल्या उन्हात घाईनेच कल्पी तालुक्याला निघाली होती. दिवाळी जवळ-जवळ आठवड्यावर आली होती म्हणून कालच तिने पाटलाकडून उसनवारी काही पैसे घेतले होते. म्हातारीला आणि तिला नवीन कपडे आणि घरात बाजार भरायचा असा तिचा बेत होता. कल्पीचं नाव कल्पना होतं पण सारा गाव तिला कल्पी अशीच हाक मारायचा. तिच्या सौंदर्याची तिच्या नावाप्रमाणे फक्त कल्पनाच केली जाऊ शकते, एवढी ती सुंदर होती. तिची छोटीशी हनुवटी, लाल डाळिंबाच्या दाण्यासारखे तिचे ओठ, तपकिरी रंगाचे तिचे पाणीदार डोळे खूपच बोलके होते. तिच्या रेशमी केसांची वेणी आज तिने घातलेल्या पंजाबी ड्रेसची आणखी शोभा वाढवत होती. एखादा मूर्तिकार आपल्या कलेमध्ये जीव ओतून काम करतो अगदी तसंच देवानेसुद्धा हिला घडवलं असावं असा भास कित्येक वेळा होऊन जायचा. शेतात राबून, कष्ट करून तिचं हाडपेर मजबूत झालं होतं. तिला पाहून कित्येक मनांची चाळण अगदी रोजच्या रोज होत होती.


डाव्या पायातल्या चपलीचा तुटलेला बंद तसाच ओढत कल्पी झपाझप चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खाचरातील पिवळसर झालेल्या भाताच्या रोपांनी डोकी वर काढली होती. त्यावर पडलेलं दव सकाळच्या उन्हात मोत्यासारखं चमकत होतं. पण त्या अस्सल नैसर्गिक सौंदर्याला लाजवेल असं सौंदर्य रस्त्याने चाललं होतं. आणि म्हणूनच कदाचित दोन्ही बाजूच्या बांधावरील रानफुलं थोडीशी खजील झाली होती. इतक्यात अचानक तिच्या जवळ एक मोटारसायकल येऊन थांबली. मोटरसायकलवर नुकताच पंचविशीत पाऊल टाकलेला पाटलाचा लेक युवराज होता. मध्यम बांधा, तरतरीत नाक, गोरा वर्ण सगळं कसं रुबाबदार होतं. पण त्याची नजर मात्र वासनेने भरलेली होती. गेले कित्येक दिवस युवराज कल्पीच्या मागावर होता. पण त्याच्या जाळ्यात सापडेल ती कल्पी कसली. परिस्थितीने जरी गरीब असली तरी कल्पी निडर होती. आणि तसंही पाटलाच्या पुढे जायची युवराजची काय बिशाद. पाटील भला माणूस होता. अन्यायाविरुद्ध कायम पुढे असायचा. गावात पाटलाला मानणारा वर्ग मोठा होता. दिसताना कठोर दिसणारा पाटील मनाने मात्र सौम्य होता. याउलट त्याचा हा लेक मात्र टारगट निघाला होता. कल्पी दिवसभर पाटलाच्या शेतात राबत असायची. कष्टाची भाकर खायची.


"काय मग कुठं..? आमच्याकडं पण लक्ष ठेवा थोडं..." कल्पीला काही समजायच्या आतच मोटरसायकलवर बसलेला युवराज बोलला.

 

"काय नाय तालुक्याला चालले..." खाली मान घालून कल्पी उद्गारली. कल्पीला त्याच्या नजरेचा ठाव माहीत होता. पण काय करणार तो पडला पाटलाचा लेक त्याच्या विरोधात काही बोलावं तर काम जायची भिती तिला वाटायची.


"येऊ का मग सोडवायला..?" थोडासा मिश्किलपणे युवराज म्हणाला.


मानेनेच नकार देत कल्पी तिथून निघून गेली. तसा युवराज कल्पीला मनातून आवडायचा. पण त्याचं आणि आपलं जमणार नाही या विचाराने ती शांत राहायची.


हा असा प्रकार आठवड्यातून चार वेळा तरी ठरलेलाच असायचा. पण कल्पी मात्र काही केल्या त्याला भीक घालत नव्हती. ना बापाचा आसरा ना भावाची सोबत त्यात वाट्याला आलेली गरिबी या परिस्थितीत देवाने तिला दिलेलं नितळ सौंदर्य कित्येकदा तिला शाप वाटायचं. आईची जबाबदारी होतीच तिच्यावर. दोघी मिळून खूप कष्ट करायच्या. बापाच्या माघारी त्यांची होती तेवढी जमीन चुलत्यानी हिसकावून घेतली होती. त्यांच्या वाटल्यावर एकच शेत होतं. त्यात पुरेसं उत्पन्न होत नव्हतं म्हणून दोघी मिळून मजुरी करायच्या. आल्या दिवसाला गावातल्या कितीतरी पोरांच्या घाणेरड्या नजरेचा सामना कल्पीला करावा लागायचा. 


बघता-बघता दिवाळी येऊन निघूनही गेली. भात काढणीच्या कामाने जोर धरला होता. शेतात पिवळसर धान्याच्या राशी लागत होत्या. भाताची उडवी रचल्या जात होती. कल्पी आईसोबत मजुरी करत राबत होती. कल्पीच्या हातात एकदा का विळा आला की सपासप शेतातील भात आडवं होत होतं. लोकांची लगबग चालू होती. जिथं भात काढून झालं आहे तिथे हरबरा-वाटाण्याच्या पेरण्या चालू झाल्या होत्या. मधेच डोंगरावर एखादा ढग जमा झाला की मात्र लोकांची पळापळ व्हायची. वातावरणात थंडी जाणवू लागली होती. जीवनातलं खरं सुख खरा आनंद आपल्या शेतात पिकलेक्या सोन्यासारख्या धान्याकडे पाहून होतो यात वावगं ते काय. दिवसभर काबाड कष्ट करून गाव रात्रीच्या अंधारात लवकरच गुडूप होऊन जायचा.


आज सकाळी कल्पीला जाग आली तेव्हा तिची म्हातारी आई अजून अंथरुणात पडून राहिली होती. एरव्ही भल्या पहाटे उठणारी आई आज अजून कशी काय झोपली म्हणून कल्पी म्हातारी जवळ गेली. म्हातारीच्या अंगात ताप भरलेला होता तिला थंडी वाजत होती. कल्पीच्या काळजात चर्र झालं. आई आजारी आहे या पेक्षा आईचा ईलाज कसा करायचा याचीच काळजी कल्पीला वाटून गेली. तिने घाईनेच आईला चहा नेऊन दिला आणि तशीच ती पाटलाच्या घरी जायला निघाली. पाटील वाड्याच्या दारात उभा राहून मिसरीने दात घासत होता. पाटलीन बाई बंबाला जाळ लावण्यात व्यस्त होती. वाड्याच्या दारातून कल्पीला आत शिरताना पाहून पाटील तिला म्हणाला. 


"कल्पे आज सकाळी-सकाळी काय काम काढलं.?"

 

थोडीशी खजील होत कल्पी बोलली, "म्हातारी सकाळपासून आजारी आहे थोडे पैसे मिळालं तर...." 


कल्पीचं बोलणं मध्येच तोडत पाटील म्हणाला, "आता पैसे मिळणं थोडं अवघडच आहे..." 


मनातून नाराज होत कल्पी परत बोलली, "बघा की काय होतंय का..."


पाटील कुणाच्याही मदतीला चटकन धाऊन जाणारा माणूस होता. पण जेव्हा त्याचा नाईलाज असेल तेव्हा तो काहीच करत नसे.

 

"दोन दिसांनी मिळतील बाळा पैसे आता तरी नाही माझ्याकडं..." समजावण्याच्या आविर्भावात पाटील कल्पीला म्हणाला. 


कल्पी तशीच खाली मान घालून माघारी फिरली. या दोघांचं बोलणं दारामागून युवराज ऐकत होता. चांगली संधी आहे असं मनोमन ठरवून युवराज कल्पीच्यामागे निघाला. वाटेत एका ठिकाणी कल्पीला अडवून युवराज तिला म्हणाला, "मी देतो तुला पैसे पण तू आज रात्री मला माळावरच्या खोपटात येऊन भेटलीस तर.." कल्पी काहीच न बोलता रस्ता बदलून निघाली तितक्यात युवराज परत कल्पीला बोलला, "बघ विचार कर..." न एेकल्यासारखं करून कल्पीने अजून जोरात चालायला सुरुवात केली.


घरी जाऊन कल्पी आईच्या शेजारी बराचवेळ तशीच बसून राहिली. नंतर सावध होऊन तिने मिठाच्या पाण्यात कापड ओलं केलं आणि आईच्या कपाळावर ठेवलं. तितक्यात कल्पीची आई म्हणाली, "काय झालं गं पोरी काय म्हणलं पाटील..? दिलं का पैसं..?"


"नाही... दोन दिसांनी देतो म्हणलं..." कल्पी म्हणाली.


हे ऐकून तिची आई काहीच बोलली नाही. कल्पीनेही विचार केला की दोन दिवस वाट पाहू. कल्पीने स्वयंपाकाला सुरवात केली. नंतर तापाने फनफनलेल्या आईला तिने जेऊ घातलं. वाण्याच्या दुकानातून आणलेली एक गोळी तिने आईला खायला दिली. दुपार होत आली होती तरीही अजून काही ताप उतरला नव्हता. कल्पीला अजून काळजी वाटत होती. तिने कुठं तरी ऐकलं होतं की असला ताप मेंदूत उतरला तर माणूस मरतो. या विचाराने कल्पी अजून चलबिचल होत होती. आपला एकुलता एक आधार असलेल्या आईला असं अंथरुणावर झोपलेलं तिला पहावत नव्हतं. तिच्या मनात असंख्य विचार कालवा करून जात होते. तेवढ्यात तिला युवराज पाटलाचे शब्द आठवले आणि तिने संध्याकाळी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला.


संध्याकाळ जवळ येत होती तसतशी कल्पीच्या मनाची धडधड वाढत होती. युवराज पाटील तिच्यासोबत काय करणार आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. पण आईला बरं करण्यासाठी तिला या प्रसंगाला सामोरं जावंच लागणार होतं. गावात अनेक जण पैशावाले होते पण निस्वार्थपणे मदत करणारा एकमेव पाटील होता. पण आज तो मजबूर होता. आणि तसंही गावातल्या लोकांच्या बोचऱ्या नजरा कल्पीला ठाऊक होत्या. म्हणून हाच एक पर्याय तिच्याकडे शिल्लक राहिला होता. घरातली बाकी कामं उरकून कल्पी माळाच्या दिशेने निघाली. कार्तिक महिना चालू होता. वातावरणात थंडीची लाट होती. जागोजागी शेकोट्या पेटलेल्या होत्या. कोणी पाहू नये म्हणून कल्पी आडवाटेने निघाली होती. गवतावर दव पडलेलं होतं. कशाचीच तमा न करता कल्पी चालली होती. एकदाची ती खोपटापाशी येऊन थांबली. युवराज दारात उभा राहून तिचीच वाट पाहत होता. तिला पहाताच त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य उमटलं. त्याने तशीच कल्पीला आत ओढली. एखाद्या वाघाला जसं सावज सापडाव तसंच कल्पी त्याच्या तावडीत सापडली होती. गालावर ओघळलेला अश्रू तसाच ठेऊन कल्पी खोपटाच्या छताकडे पाहून आल्या प्रसंगाला तोंड देत तशीच निपचित पडून राहिली होती. युवराज नामक नराधम तिच्या शरीराचे लचके तोडण्यात मश्गूल होता. एखादं सुंदर फुल चुरगळल्या जावं तशी कल्पी चुरगळल्या जात होती. वासनांधांना गरीब-श्रीमंत अशी तफावत नसते, त्यांना जात नसते. फक्त आपली तहान काशी भागेल हाच विचार त्यांच्या मनात असतो. थोडया वेळाने तो बाजूला झाला. आपली वासना शमवून तो समाधानी झाला होता. काहीच न बोलता त्याने खिशातून काढलेल्या नोटांचा बंडल कल्पीकडे भिरकावला आणि तिथून निघून गेला. रात्रीच्या अंधारातली शांतता भेदत त्याची फटफटी फटफट करत निघून गेली.

 

कल्पी अजूनही तिथेच बसून होती. असंख्य विचाराने तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. अंगावरचे कपडे सावरत इच्छा नसतानाही तिने तो बंडल उचलला आणि ती घराच्या दिशेने चालू लागली होती. आपल्या आईचा ईलाज होईल हेच काय ते समाधान तिच्याकडे शिल्लक राहिलं होतं. स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल इतकं नितांत सुंदर देखणं सौंदर्य आज शापित ठरलं होतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama