सावित्री
सावित्री
'चल गं माझे बाय, सूर्य डोईवर आयीला. रगात गरीम व्हून निघालं, पालख्या येसीवर आल्या असत्याल', अशा बनाबाईच्या हाकेनं, भांडी धुत असलेल्या चारूने आपलं काम आवरतं घेतलं.गावची याञा व्हती. चारू बनाबाईची सहा वर्षांची पोर. नवर्याला व्यसन त्यामुळे सुखी संसाराची राख झाली आणि बनाबाई लहानग्या चारूला घेऊन आपल्या भावाच्या म्हंजी नराबाच्या पालात रहायला आली. नराबाचं लगीन काइ अजून झालं नव्हतं. शेजारीच बायाक्का फरशीवर भाकरी थापीत बसली व्हती . बायाक्का म्हंजी बनाबाई आणि नराबाची माय. भाकरी कसली ती? गोलमटोल चंद्रावाणी एकदम मोठा पातळ कागजाचा तुकडाच जणु! एका भाकरीत आपल्यासारख्यांचं दोन दिस जात्याल. खानारी चार आणि कमवणारं येक त्यो म्हंजी नराबा. नराबा ऊसतोडणी च्या कामाला जायचा. कधी प्रसंगी भेटल ते काम करायचा. सगळं मिळत नसलं तरी कुटुंबाचे दिस एकदम झ्याक चाललं व्हतं. जळलेल्या खोडावर एखाद्या अंकुर फुटून यावं अगदी तसं! ऊसतोडी चा हंगाम संपला होता, सगळे मजूर आपापल्या गावी परतले. नराबा बी आपल्या पालाकडे परतला. यंदा नराबाचं नशीब फळाळलं व्हतं, या येळीस ज्यादा पैकं मिळालं व्हतं. त्याने येताना बायाक्का ला आणि बनाबाईला लुगडं आणलं आणि लहानग्या चारू साठी पाटी आणि दप्तर आणलं.
दप्तर आणि पाटी बघून बनाबाई आणि बायाक्का दोघीही आवासल्या. बायाक्का भाकरी चुलीवरनं काढुन ताडकन उठली. भयंकर रागेची वीज तिच्या अंगात भरली. बायाक्का जुन्या इचारांत रमलेली बाई व्हती. बायांनी शिकायचं म्हंजी संकटाला बोलावणं! बायांनी कसं चुल आणि मुल येवढचं पहावं, दुसर्या चार गोष्टींत नाक खुपसू नये, असं तिचं इचार व्हतं. त्यामुळे बनाबाई बी काय चार बुकं शिकली नाय. ती देखील आपल्या मायच्या इचारांची शिदोरी पास ठ्येवून व्हती. पालातली इतरं पोरं गावच्या शाळेत जायची पण चारूला शाळा काय असती हे देखील माहिती नव्हतं. आपल्या दोस्तासनी शाळेत जाताना पाहून ती बनाबाईकडं हट्ट करायची पण बनाबाई चार सनसनीत कानशिलांत लावून चारूला शांत करायची. चार भांडी धुयाची, घरात इतर कामात मदत करायची हेच चारुच विश्व झालतं. बायाक्का नराबाच्या अंगावर धावून गेली. जमदग्नीचं रूप तिनं धारलं व्हतं. नराबाला आल्यापावली ओल्या फोकीचा परसाद मिळाला. कपाळावर आठ्या ठेवून बायाक्का बोलली, "अयं नालाइका काइ इपरीत काम केलस हय. बायांनी शिकनं पाप हय पाप, ठावाक नाइ काइ? चार पैकं काइ आणायला लई शाना समजून राहीला काय? मी जिती हाय तवर या घरात येक बी पोर शाळेत जायची नाय, कुठनं सुचलं तुला ह्ये पाप?" बायाक्का चा नुसता तीळपापड चालला व्हता. बनाबाई आतच व्हती पण मायच्या रागा मौहरं तीचं बी काय चालीत नव्हतं. चारू बाहेर ओसरीवर रडत बसली. बायाक्का अनं बनाबाई जुन्या इचारांच्या असल्या तरीबी नराबा काळानुसार चालत व्हता. त्याला वाटायचं चारूनं बी इतर पोरींवानी शिकायला पाहिजे. एकदिवस मोठं माणुस व्हुन आपल्या पालाच नाव रोशन केलं पाहिजे. बायाक्का सोबत नराबा पण हट्टास पेटला आणि त्यानं चारूला शिकवायचा इडा उचलला. घरचा इरोध असताना त्यानं चारूचा दाखिला करून घेतला. तिचं नाव शाळेत घातलं. चारूपण आनंदून गेली. ती रोज शाळेत जाऊ लागली. नराबा तिचं समदं पाहत व्हता. दिस सरत गेलं पण बायाक्का चा राग कमी झाला नाइ, तिनं नराबाशी बोलनं सोडलं.
दिस सरत गेलं. घरात नुसती शांतता. एक दिस नराबा बी कामानं शेजारच्या गावी गेला. चारू शाळंला गेलती. बनाबाई अनं बायाक्का दोघीच घरी. बनाबाई कपडे धुत व्हती आणि बायाक्काने बाहेर ओसरीत वाळकी कणसं सोलायला घेतली. तोवर तिथं गाडीवरनं दोन धाकडं तरूणं आली. ती बायाक्का कडं आली. बायाक्का अनं बनाबाई दोघींच्या बी वळखीची नव्हती. बायाक्कानं त्यांना बायेरच थांबिवलं. दोघींच्या भरल्या गळ्यांकडे त्यांची नजर व्हती. पैकं साठवून नराबानं दोघीसनी जमल तस डाक केलं व्हतं. बनाबाईनं इचारलं, "क्वन पाव्हनं मनायचा तुमी? ओळीखलं नाइ. नवीन दिसतायसा. आज इकडं पालाकडं काइ काम काडलं?" त्यातील येक तरूण बोलला, "त्याचं कसं आहे ताई, तुमचे गावात जास्त येणं रहात नाही. गावात चोरी वाढलेय. जास्त करून दागिन्यांची. माझी या गावात नुकतीच बदली झाली आहे. पोलीस आहे मी. आम्हाला वरून आदेश आहेत की, गावातील सर्व महिलांचे दागिने पोलीसचौकीत सुरक्षित ठेवायचे. हे पहा माझे कार्ड" दोघीस्नी कारडं काइ कळीत नव्हतं पण त्यावरील तरूणाचा पोलीसातल्या येशातला फोटु पाहुन त्यांचा इश्वास बसला आणि तरूणांच्या बोलण्याने त्यांना भुरळ घातली गेली. दोघींनी समदं आपलं दागिनं तरूणांना दिलं. ते तरूण तिथुन निघुन गेलं. दोन दिस उलटलं. शिमग्याचं सण आला. नराबाला घडलेल्या घटनेची कल्पना नव्हती त्याला वाटलं असच आपलं काही कारणाने म्हणून दोघींनी काढून ठेवलं असत्याल दोन दिस. कुणाला काय कल्पना न देता दोघी आपलं डाक आणायला गावच्या चौकीत गेल्या. तिथं पवचल्यावर मोहरं सुरू असणारा कारीक्रम पाहून बायाक्काला भोवळ आली.
त्या दोघींपरमानं इतर काही बाया डाक घ्यायला चौकीत आलत्या. काही दिसात आपल्या गावात असं काय घडलय याची पोलीसांना बी कल्पना नव्हती. तशी तक्रार पण कोणी दाखल केली नव्हती आणि आज अचानक येवढा गोतावळा पाहून पोलीस पण चकरावलं. शांतपणे काहींचं बोलणं ऐकून पोलीसांना येड लागायची पाळी आली. एवढ्या समद्या बाया फसल्या गेल्या व्हत्या. पै पै जमवून कमवलेली संपत्ती एका झटाक्यात गेलती. बायका ऐकायला तयार नव्हत्या. कस बसं पोलीसांनी समदा परकार बायकांच्या लक्षात आणून दिला आणि सोडवायची हमी दिली. काही बायका भोवळ येऊन पडल्या तर काही तिथच उर बडवून घेऊ लागल्या. हळु हळु पोलीसांच्या समजावण्याने गर्दी पांगली. समदी डोक्यावर पश्चातापाचा भार घेवून आपापल्या घरी गेली. बायाक्का अजून धक्क्यातून सावरली नव्हती. घरी आल्या बरोबर तिनं नराबा आणि चारुला जवळ घेतलं. आस्वांत दोघं न्हाऊन निघाली. दोघं बी घडलेल्या परकारानं आवासली.बनाबाईनं घडलेला समदा परकार नराबाला सांगितला. नराबाच्या पायाखालची जमीनच सरकली. बायाक्कानं नराबाची माफी मागितली. आज जुन्या इचारांत रमून जायची सबक तिला मिळाली व्हती.
काही दिसांनी चोर पकडलं गेलं. समद्यांच डाक परत भेटलं. आता चौघही गुण्यागोविंदाने रहात्यात आणि बायाक्का बी आता रोज चारुला शाळेत सोडायला जाते.
