विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Tragedy Inspirational

4.0  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Tragedy Inspirational

साथ तुझी नि माझी...

साथ तुझी नि माझी...

8 mins
241



"मी जरा बाहेर जाऊन येतो रे, कंटाळा आलाय बघ, घरात बसून -बसून".....


"हो जा तुम्ही, पण लवकरच या , जास्त लांब जाऊ नका हं, बाहेरची परिस्थिती कशी आहे माहितेय ना"......


"हो रे नाही लांब जात, पण तू जरा मला स्कुटी ची किल्ली देतोस का ?"


"काय हो बाबा, आज चक्क स्कुटी, लांब पण नाही जायचं म्हणताय, मग स्कुटी....."

आणि परवानगी काय घेताय माझी, जा ना घेऊन, अगदी तुम्हाला हवी तेव्हा....


बरं मी जाऊन येतो....


बाप लेकाचं संभाषण चालू होतं आणि तितक्यातच शालिनी किल्लीने दरवाजा उघडून आत आली......


सदाशिवरावांनी तिच्याकडे बघितलं न बघितलं करत, लिफ्ट ने, न जाता शिडीनेच खाली उतरले.....


स्कुटी चालू केली नि निघाले ..... हसतमुख चेहऱ्याने...


सदाशिवराव स्वतःशीच म्हणत आहेत - आज मी खूप खुश आहे, कुणास ठाऊक आज मला वेगळाच आनंद जाणवत आहे, कशाचीच तमा नसल्यासारखं वाटतय, हवेत बिवेत आहे की काय मी.........आणि ...आणि...........आणि.....


रस्त्यात एक दगड लागला टायर ला आणि सदाशिवराव पडले.......

कसेबसे उठत, ढोपरं चोळत उठले.......

च्यायला उगाच मनात बावळट सारखा बोलत होतो.......

एवढे बोलून, लागले रस्त्यातच एकटेच जोर-जोरात हसायला...

हा हा हा ...हा ..हा.. अगदी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसले आणि थकून बसले खाली....कोणीतरी पाणी आणून दिले....

पाणी आणणाऱ्या व्यक्तीकडे एकदा पाहिले, आणि सरळ उठले आणि त्या व्यक्तीला मिठीच मारली ना राव.....

आणि लागले पुन्हा हसायला- हो हो त्याच रस्त्यात, तिथेच दोघही हसायला लागले, कुठं काय लागलं नि काय, सगळं भान विसरून, अगदी जगाला विसरून हे दोघ हसतच होते..........


कोण ओरडतंय रे.....

सुमेध बेडरूम मधूनच बोलत होता.......


"आज मी शाळेत जाणार नाही म्हणजे नाही"


आधी आजोबांना घेऊन या, आत्ताच्या आत्ता, आजोबा आले तरच मी शाळेत जाईन, नाहीतर मी आज पासून शाळा सोडली ...

हे बघ मी माझी बॅग खाली ठेवली आहे.....


आठ वर्षाच्या सोनालीने ओरडतच शालिनीला सांगितले, आणि बसली सोफ्यावर रुसून....

सोनाली आज शाळेत जा, उद्या आजोबा येणार आहेत, सांगतेय ना मी तुला उठल्यापासून, मग आज जा, उद्या येतील आजोबा....


नाही आजच आले पाहिजेत आणि आत्ताच, तरच मी शाळेत जाईन...


झालं पोरीसमोर एक बाप तसंही काही करू शकत नाही त्यातच सुमेध तर काय, पोरीवर जीव ओवाळून टाकणारा माणूस, आणि शालिनीची तर ती परीच आहे म्हटल्यावर, रुसून बसलेली "रुसूबाई"चा रुसवा आजोबा आल्याशिवाय काही फुगा फुटणार नाही......


अचानक दरवाज्याची बेल वाजली - टिंग टॉंग-टिंग टॉंग..


आले आले जरा धीर म्हणून धरवत नाही या लोकांना, सगळे कसे घाईवर असतात, देव जाणो.......

शालिनी पुटपुटत दरवाजा उघडायला गेली........


तिने दरवाजा उघडला आणि अश्रूंच्या धारांनी ती रडू लागली, सोनाली अगं सोनाली ....!

सोनाली धावतच आली आणि बघते तर काय समोर उभ्या असलेल्या आजोबांना पाहून तिला राहवलं नाही, सकाळपासून रडकुंडीला येईपर्यंत ज्यांची वाट पाहत असणारी ही परी, आजोबांना बघून उडया मारतच रडू लागली, हात एखाद्या पक्षाप्रमाणे पंख फडफडावेत असे करत अगदी तिच्या मनाचा बांध फुटला होता.....पप्पा ...पप्पा...

सुमेध एवढ्यात बाहेर आला होता, बाबांना बघून त्यालाही गहिवरून आले.....

शालिनी अगदी बाबांना मिठी मारूनच रडत होती...

आई कशी आहे.......

बरी आहे आणि मजेत आहे........

बाबांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले.....


अरे मला आत घेणार आहात की इथूनच परत पाठवताय....

आपले डोळे खांद्यावरच्या नॅपकिन ने पुसत सदाशिवराव म्हणाले....


सुमेध तू ऑफिस ला निघालायस का ? सांभाळून जारे....

ये परी बाई, तुम्ही कुठे शाळेत निघालायत, हे नवीन शाळेचे कपडे घालून....

सुनबाई तुम्ही कशा आहात- तुमची विचारपूस केली पाहिजे नाहीतर उपाशी रहावं लागेल मला....


बाबा - मी आज सुट्टी टाकलीय ऑफिसला...

आजोबा - तशी पण मी तुम्ही आल्याशिवाय जाणार नव्हतीच त्यामुळे आज माझीही सुट्टी....डोळे पुसत ती सगळ्यांची परी म्हणाली...

शालिनी.....होय तर मला विचारलंत नाही तर खरोखरच उपाशी ठेवेन हं बाबा.....शालिनी थंडगार कोकम सरबत चा ग्लास पुढे करत मीश्किलीने म्हणाली.....


आज घर कसे एकदम प्रसन्न झाले होते.....

सुमेध, परी, शालिनी अगदी मनापासून सदाशिवरावांशी गप्पा मारत होते....घरात अगदी आनंदी-आनंद पसरला होता, कोणी बाबांच्या, तर कोणी आजोबांच्या ,तर एक "सून" आपले वडीलच आहेत असं समजून , सगळे सदाशिवरावांची कोणत्या ना कोणत्या कारणाने सेवा करण्यात दंग झाले होते...


सुमेध ची आई तीन वर्षांपूर्वी आजारपणात गेली आणि सदाशिवराव एकटे पडले.....


 परंतु शालिनीने बाजी मारत प्रसंग समजून घेऊन त्यांना सावरण्याचा जो प्रयत्न केला आहे तो कदाचित जगात कोणी केला असेल.....केला असेल कोणी, तर ते त्या करणाऱ्याचं भाग्यच म्हणावं लागेल....जे - तो कोणालातरी समजून घेऊ शकला आणि एवढे मोठे पाउल उचलले .....


सदाशिवराव गावावरून आले होते, एकटेच, घरचं सगळं नीट-निटके बघून, सावरून, सुखदाताईंना काळजी घ्या हं, मी दोन दिवसांत परत येतो...नातीला आणि लेकरांना भेटून येतो....


शालिनी तू म्हणतेयस ते बरोबर आहे, पण मला ते पटत नाहीय...


का पटत नाही आहे तुला, चुकीचं असं मी काहीच तुला सांगितलेलं नाहीय, मग न पटायला काय झालं....

अरे दोघांनीही आता वयाची साठी ओलांडलेली आहे, मग त्यांना नको का या वयात कोणीतरी एकमेकांच्या साथीला...


शालिनी, अगं हे तू बरोबर म्हणतेयस, अगं लोकं काय म्हणतील पण...


लोकं काय म्हणतील यावर आपण ठरवायचं असतं का ? आपण कसं जगायचं ते ! ...शालिनी थोडी चढ्या आवाजातच म्हणाली;


तू शांत हो जरा, मी विचार करतो नि तुला सांगतो.....

सुमेध शालिनीचा चढता आवाज ऐकून अगदी शांतपणेच बोलला....


तू फक्त विचार करत बस, पण माझा विचार करून झालेला आहे, आणि मी तुला करून दाखवेन बघच तू...


अगं तू भांडतेयस का माझ्याशी....!!


मी भांडत नाही आहे, पण, हे आपले या विषयावरचे शेवटचे बोलणे आहे, या नंतर, ना तू बोलायचं ना मी बोलणार....आता मी करूनच दाखवणार...


शालिनी उठली आणि शांतपणे, "मी बाजारात जाऊन भाजीला बघते काय मिळते का ?" असं म्हणाली आणि बाजारात निघून गेली....


बाजारातच तिला सुखदाताई भेटल्या .........

बऱ्याच दिवसाने भेटलीस गं, मला बरे वाटले तुला बघून, कसे आहेत सगळे, जावईबापू, सोनाली आणि तू कशी आहेस गं...


सुखदाताईंनी एका दमात सगळे प्रश्न विचारून जणू शालिनीवर तिरांचा वर्षावच केला.....


अगं-अगं जर थांबशील की नाही, एवढे प्रश्न एकदाच..!.आणि दोघीही हसू लागल्या....


अगं घरी चल मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.....


काय बोलायचंय तुला सांग ना....


आधी घरी जाऊ मग बोलू, घरी जाऊन सांगते.....


लगेच तिथून दोघीही घरी आल्या.....


सुखदाताईंनी शालिनीला ग्लास भरून पाणी दिलं आणि स्वतःलाही ग्लास भरून घेऊन दोघी समोरा-समोर बसल्या......


हं बोल गं, काय सांगणार आहेस...! सुखदाताई उत्सुकतेपोटी बोलल्या......


काही नाही गं, बघ तुला पटतंय का ? माझे सासरे आहेत ना... माझ्या सासूबाई,आजारपणात वारल्यापासून खूप एकटे पडले आहेत गं, म्हणून मी विचार करत होती की.....तू....

 

काय पण काय बडबडतेयस गं तू वेडयासारखं, मला समजतंय तू काय बोलतेयस ते.....जरा रागातच पण सौम्य आवाजात सुखदाताई म्हणाल्या....


शालिनी थोडा वेळ शांत होती, पण तिच्या मनात काहीतरी विचार आला आणि ती सुखदा ताईंशी बोलू लागली. 

- बघ मला माहितेय तुही आता एकटीच आहेस, तुलाही किती त्रास होतोय हे मलाही समजतंय, जरी बोलून दाखवत नसशील तरीही मला ते कधी न कधी इथे आल्यावर जाणवतेच, आणि इथे एकटी राहण्यापेक्षा तू कायमचीच माझ्या सासऱ्यांबरोबर इथेच राहिलीस तर......


सुखदाताई - बघ शालिनी मी जगतेय ते यांच्या आठवणीतच, तू म्हणतेयस तसं कोणीतरी या वयात असावं आपलं, असं मला वाटतंच पण हा विचार त्यांना पटणार आहे का ?


शालिनी - त्याची काळजी तू करू नकोस मी त्यांच्याशी बोलूनच इथे आलेय....


मग तर ठरलं.....मी आताच घरी जाऊन सुमेधला सगळं सांगते....


शालिनी उठली आणि हसतच सुखदाताईंचा निरोप घेऊन सरळ घरी आली.....


सुमेध ये सुमेध कुठे आहेस तू, लवकर इकडे ये, .....


अगं झालं काय, कशाला आरडाओरडा करतेयस...


अरे "ती" हो म्हणाली.....


काय? काय सांगतेस काय?....


अरे हो "ती" हो म्हणाली......


बरं तसं तू गेल्यावर मी बाबांना समजावून सांगितलंय तेही तयार आहेत, पण मला खूप काही समजवायला लागले बाबांना, ऐकतच नव्हते...

 "असं कसं रे मी करू शकतो" तुझ्या आईला मी नाही विसरू शकत, एवढी वर्ष एकत्र घालवली आणि आता असं, नाही- नाही, मला जमणार नाही .....

असे बरंच काही न काही बोलत होते, पण मी त्यांना समजावलं....


"आयुष्याच्या सरते शेवटी आपलं कोणीतरी असावं आपल्याजवळ, कोणालातरी हक्काने हाक मारू शकतो असं, आपण झोपेतून उठायच्या आधी - चल उठ सकाळ झाली बघ, किती झोपायचं माणसाने, असं आपल्यावरही हक्क गाजवणारं, हक्काचं माणूस आपल्या जवळ नेहमी असावं....

उतारवयात आपली काळजी घेणारं, आपण त्याची काळजी घ्यावी असं वाटायला मन व्हावं, असं कोणीतरी असावं आपल्याजवळ"....


असे खूप काही त्यांना समजावून सांगितलं तेव्हा कुठे ते तयार झाले......


तू जाऊन सांग त्यांना, ती तुमच्या फोनची वाट बघतेय म्हणून...

शालिनी सुमेधला आनंदातच म्हणाली...


परी.....ये परी...

चल शाळेत जाण्याची वेळ झाली.....

हो आजोबा, आले -आले.......


सोनाली (परी ) तयार होऊन शाळेत जायला निघाली तसे, सदाशिवरावांनी आपला मोबाईल उचलून पटकन खिशात ठेवला...


हे शालिनी आणि ऑफिस मध्ये जायला निघालेल्या सुमेध ने एकाचवेळी पाहिले आणि एकमेकांकडे बघून हसू लागले....


आम्ही येतो हं - असं म्हणून आजोबा आणि परी बाहेर पडले...

सदाशिवरावांनी सोनालीला शाळेत सोडले आणि बागेत येऊन बसले.....


बघू का फोन करून....?

या आधी खूप वेळ आपण बोललोय, पण ही वेळ वेगळीच आहे...


तरीही मनाची घालमेल करत करत त्यांनी खिशातून फोन काढला आणि फोन लावलाच तो सरळ.... सुखदाताईंनाच !!


हॅलो, मी सदाशिवराव बोलतोय, आपण कशा आहात...


हो मी बरी आहे , तुम्ही कसे आहात, काळजी घेताय ना...


हो, हो घेतोय ना...ब.ब..ब... ते ...मी...


काय हो सदाशिवराव , काय झालं....


काही नाही ते...मुलांनी..तुम्हाला..काही...


अहो सदाशिवराव आपली आता साठी झाली आहे, या वयात पण तुम्ही बोलायला बाचकताय म्हणजे काय, हो मुलांनी मला सगळं काही सांगितलंय मला मान्य आहे.....


मग आपण भेटू शकतो का......


हो आपल्या बागेत संध्याकाळी सहा वाजता भेटूया.....


शालिनी पाच वाजता परीला आणायला गेलेली घरी आली, दरवाजा किल्लीने उघडला आणि सदाशिवराव तिच्याकडे न बघताच जिन्यांनी खाली उतरले ते थेट स्कुटी घेऊन निघाले....


सदाशिवरावांना पाणी द्यायला आलेली व्यक्ती ...

आण्णा-साहेब पराडकर होते....


जुने दोन मित्र, शाळेपासूनच एकत्र असलेले, अतिशय मस्तीखोर आणि हुशार असे मित्र आज रस्त्यातच भेटले होते....

एकमेकांकडे बघून एकदुसऱ्याला हसू आवरत नव्हते.....


अरे सदा, इतक्या घाईने आणि ते सुद्धा स्कुटीवरून पडावे इतक्या घाईने कुठे निघालायस.....आण्णा-पराडकर यांनी विचारले.....


अरे कुठे नाही....इकडेच....


साल्या अजून पण तू खोटं बोलतोस ना, ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं......


अरे, सांगतो....


आणि सगळा किस्सा सदाशिवरावांनी आण्णा पराडकर यांना सांगितला......


पण....च्यायला या वयात......ऑल द बेस्ट.....हं.....सदा !


आण्णा, तुही बदलला नाहीस रे अजून.....


आणि पुन्हा दोघे एकमेकांकडे बघून डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसले....

एक मिठी घेतली मित्राची ....आणि निघाले सदाशिवराव..


मधेच थांबून "पासलकर फ्लॉवर्स" मधून गुलाबाचं फुल घेतलं ...

तसे दुकानाचे मालक "माणिक पासलकर" म्हणाले....


काय काका आज एकदम गुलाबाचं फुल हं....


या गुलाबाला काटे ही असतात म्हटलं मी....सदाशिवराव म्हणाले....


तसे "पासलकर " हसले नि त्यांनी सदाशिवरावांना कोपरापासून नमस्कार केला.......


बागेच्या गेटवर येऊन आपली नजर भिरभीरवली तर सुखदाताई एका बाकड्यावर बसलेल्या दिसल्या.....

त्यांना जाणवणार नाही असे सदाशिवराव सुखदाताईंच्या समोर ,पाठीमागे हातात गुलाबाचं फुल घेऊन उभे राहिले....


सदाशिवरावांना बघताच सुखदाताई भूतकाळातून बाहेर आल्या नि थोड्या काळजीनेच उठून उभ्या राहिल्या.....


सुखदा काय झालं, नाराज आहात का आपण....


नाही -नाही तसं काही नाही थोडं भूतकाळातील गोष्टी आठवत होत्या म्हणून....

आणि सगळं रडत-रडतच त्यांनी - त्यांना सांगून टाकले...


आमचे हे ( शालिनीचे बाबा ) गेल्यापासून मी एकटीच पडली होती, एकुलती एक लेक तुमच्या घरी सून बनून गेली होती, मला घर खायला उठायचं, पण शालिनीने माझं मन बरोबर हेरलं आणि हा घाट घातला....


सुखदाताईंचे शब्द मधेच तोडत सदाशिवराव बोलू लागले...


सुखदा ! आज आपलं नातं आपल्याच मुलांनी जोडण्याचा विचार केलेला आहे, त्यांनाही वाटतंय, आपण पुढचं आयुष्य एकटेपणात घालवण्यापेक्षा एकमेकांसोबत घालवायला हवं, त्यांचंही काही चुकत नाही आहे.

आपल्या आईला आणि आपल्या बाबांना दोघांनाही त्यांना सुखात बघायचं आहे एवढंच......


सुखदा....!


हे घे आज पासून आपण जीवनाची नवी सुरवात आणि एक नवी पहाट एकमेकांच्या साथीने पाहूया...


पाठीमागचा हात पुढे करत, सुखदाताईंच्या समोर ते सुंदर आणि मन-मोहक असं गुलाबाचं फुल दोन्ही हातांनी धरलं....


सुखदाताईंनी ते गुलाबाचं फुल हसत-हसत घेतलं, आणि दोघेही, एकमेकांच्या पावलावर पाऊल टाकत एकमेकांचे होऊन घरी निघून गेले.....



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance