साता जन्माच्या गाठी भाग २
साता जन्माच्या गाठी भाग २
दिल - ए - धडकन की महफिल को इस कदर तुमने महकाया हैं जान जैसे किसी इत्र की लाखों शिशिया टूटकर बिखरगयी हो मखमल पर.....
नकुल सोबत साता जन्मांच्या आणाभाका घेऊन देशमुखांच्या अंगणातून भाटियांच्या टोलेजंग बंगल्यात आलेली नववधू नेहा खूपच आनंदात दिसत होती. सासरी या नव्या सदस्याचे खूप जल्लोषात स्वागत झाले. तिचे सगळे दीर ,नणंदा ,नकुलचे मित्र मैत्रिणी सगळेच नवपरिणीत दाम्पत्याला चिडवत होते आणि हे दोघे देखील त्याचा पुरेपूर आनंद घेत होते.
सिंधी परिवाराच्या परंपरेप्रमाणे सगळे विधी पार पडल्यानंतर आता वेळ होती ती नकुल आणि नेहाच्या एकत्र येण्याची. त्यासाठी नकुलचे मित्र मैत्रिणी , नेहाच्या काही खास मैत्रिणी आणि नकुलची सगळी भावंडं यांनी त्यांच्या खोलीचा ताबा घेतला होता. इतक्या प्रतीक्षेनंतर आज जे नातं जुळून आलं होतं, त्या नात्याचा प्रारंभ एका वेगळ्या आणि हटके पद्धतीने व्हावा अशी सगळ्या मित्र परिवाराची इच्छा होती. त्यामुळे सगळेजण तयारीत गुंतले होते..
अखेर तब्बल ४/५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर नकुल आणि नेहाची खोली सजून धजून तयार होती पण त्यात इतक्यात कुणालाही प्रवेश नव्हता , अगदी नवपरिणीत दाम्पत्याला देखील.
नेहाच्या मैत्रिणींनी आता तिचा ताबा घेतला होता.. लग्नानंतरची नकुलसोबतची पहिली रात्र होती तिची आज आणि ज्या सोज्वळपणामुळे नकुल घायाळ झाला होता त्याच तिच्या सोज्वळ रूपावर आज नकुलच्या प्रेमाची चमक आली होती. नेहाच्या मऊशार केसांचा घट्ट अंबाडा , त्यावर माळलेले मोगरा आणि अबोलीची भरगच्च गजरे , प्रितस्वप्नानी सजलेल्या रेखीव डोळ्यांत घातलेलं काजळ , नाजूक मऊशार ओठी लावलेली पेस्टल शेडची लिपस्टिक , नकुलच्या आवडीच्या जांभळ्या रंगाचा परिधान केलेला लाछा , त्यावर भरजरी असा दुपट्टा आणि दोन्ही हातात सौभाग्याचा लाल चुडा...खरंच एखाद्या महाराणीसारखी दिसत होती नेहा.
दर्पणात स्वतःचे खुलून आलेले आणि नेहा देशमुख ची नेहा भाटिया झाल्यानंतरचे तिचे रूप पाहून क्षणभर ती देखील दंग राहिली. बालपणापासून ते आतापर्यन्त आपल्या लेकीच्या झालेल्या बदलाचे साक्षीदार असलेले नेहाचे आई वडील देखील तिच्या या भरल्या घराला भरल्या संसाराला पाहून तृप्ततेची अनुभूती घेत होते.
अन अखेर ती वेळ आली... धुंद होण्याची..प्रेमसुगंधात न्हाऊन निघण्याची...एकमेकांना समर्पित होण्याची... नकुल आणि नेहाला मात्र सहजासहजी कुणीही आत जाऊ दिले नाही. आधी आम्हाला लाच द्या मगच आम्ही आत सोडू असे सार्यांनीच बजावले. अखेर नकुलने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी देण्याचे कबूल केले तेव्हा कुठे सगळ्यांनी दोनच प्रेमीजीवांच्या मार्गातून दूर होणे पसंत केले.
मोगरा गुलाब रातराणी यांनी नखशिखांत सजवलेल्या नकुल - नेहाच्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात नकुल आणि नेहाच्या कॉलेजमधल्या परफॉर्मन्सचे , एकमेकांच्या दृष्टीत हरवल्याचे , प्रेमाच्या आणाभाका घेतानाचे , लग्नातल्या विधींचे अनेक सुंदर असे फोटोज कोलाज करून लावले होते. चंदनाच्या मंद सुगंधाचा शिडकावा सर्वत्र दरवळत होता ,पलंगाशेजारी असलेल्या टेबलवर चांदीच्या पेल्यात भरलेलं केसर दूध, हिरव्याकंच पानांचा विडा आणि आता दोन प्रेमीजीवांच्या नाजूक अलवार किलबिलाटाला आसुसलेल्या त्या खोलीत होते अखेर आला होता तो प्रेमी जोडा जो इतके दिवस एकमेकांपासून दूर राहत होता , जे एकमेकांची एक झलक पाहण्यास आसुसले होते, ज्यांना एकमेकांशिवाय दुसरे काहीही सुचत नव्हते ते नकुल आणि नेहा एकमेकांसमोर होते.. लाजेने आरक्त झालेली नेहा तर मन वर करून नकुलकडे बघायला देखील तयार नव्हती
नकुल : जिस चांद को मेरे लिये धरतीपर आना पडा वो चांद तो अब इस नाचिज को देख ही नही रहा लगता है अब इस चांद को दूर से निहारकर ही रात काटनी होगी.
त्याची ही शायरी ऐकून नेहा अगदी खळखळून हसली आणि त्याला जाऊन अत्यानंदाने बिलगली.
नकुल : हा....शुक्रिया ए खुदा , आखिरकार इस चांद ने चांदनी के दामन मे प्यार के सितारे बिखेर ही दिये
नेहा : पुरे आता...किती शायरी करणार आहेस ?
नकुल : किती ? अगं मी तर रात्रभर आता शायरीच करत बसणार आहे तुझ्या असण्यावर , तुझ्या दिसण्यावर ,तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर.
नेहा : नकुल , मी खरंच खूप नशीबवान आहे रे मला मला खरंच कधी असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं कि तुझ्यासारखा इतका देखणा रुबाबदार तरुण मला लग्नाची मागणी घालेल म्हणून तुझी आणि माझी कधी काहीच तुलना होऊ शकत नाही रे.
नकुल : ए वेडाबाई , अरे प्यार मे कैसी तुलना होती है ? प्यार तो प्यार होता है और एक बात बोलू ? हे रूप रंग वगैरे आपल्या हातात नसत ग. आपल्या हातात असत फक्त स्वतःला घडवणं , स्वतःला ओळखून तसं वागणं आणि आपण तेच तर केलं ना... मला गिटार वाजवायला आवडते आणि तुला गायला आणि नाचायला मग आपल्यातला हाच एक सामान धागा पकडून त्या झुलेलाल म्हणूया किंवा कृष्ण म्हणूया त्याने आज आपल्याला एकत्र आणलं आहे.
नेहा : हो रे नकुल , आपल्या दोघांनाही सुरांची आवड आहे म्हणूनच तर त्या विधात्याने आपल्याला आपल्या आयुष्याचे सूर एकत्र अनुभवण्यासाठीच एकत्र आणलं आहे.
नकुल : मग ? आळवयाचे का आता आपले सूर ? आपल्या प्रेमाचे , आपल्या आपल्या पहिल्या रात्रीचे....
नेहा : इश्श्य
आणि आपल्या इतक्या लडिवाळपणे लाजणाऱ्या अवखळ अशा पत्नीला नकुलने आपल्या बाहुपाशांत भरून तिच्या कपाळाचे अवघ्राण केले आणि मग नेहाने ही इतक्या दिवसांपासून रेशमी कप्प्यांत साठवूं ठेवलेल्या सगळ्या मखमली आठवणी नकुलच्या नावे केल्या.. अन ती रात्र जणू काही अत्तराच्या असंख्य कुप्या रित्या झाल्याप्रमाणे मग नकुल आणि नेहाच्या प्रेम सुगंधात आपादमस्तक न्हाऊन निघाली होती..
क्रमशः

