सासूबाई ते सासूआई
सासूबाई ते सासूआई
सुनीताबाई अतिशय खडूस सासूबाई, त्याच्या सुनेला नुसते खाऊ की गिळू करायच्या... सून स्वाती अगदी एकदम साधी... सावत्र आई त्यामुळे माहेरी कधी सुख मिळालेच नाही... सासरी आल्यावर तरी आईची माया मिळेल या आशेवर ती लग्न करून या घरात आली.. नवरा राहुल, सासरे खूप छान होते, पण सासूबाई मात्र सावत्र आईची कसर भरून काढत होत्या... सारखे उठता, बसता टोमणे मारायच्या पण सगळे काही शिकवायच्या सुद्धा... त्या तिला कधी उमजल्याच नाहीत...
नणंद सीमा तिचे लग्न आधीच झाले होते, मैत्रिणीसारखीच वागायची.. वहिनी, आई थोडी फटकळ आहे, पण तू लक्ष देऊ नको तिच्याकडे.. तू कितीही काम केलस तरी ती चुका शोधून तुला बोलत राहणार... आणि हो ती वाईट म्हटली, अन् पोटभर जेवली की समजून जायचं आपण, चांगले झाले आहे पण कौतुक करणे तिच्या रक्तात नाही... स्वाती ऐकतच बसली, तुमच्या आई बद्दल असे का बोलता तुम्ही? सीमा म्हणते, हे बघ वहिनी स्वभावाला औषध नाही... त्यामुळे मनाला लावून घ्यायचे नाही.. नाहीतर त्रास आपल्यालाच होतो.. आणि दोघी हसू लागल्या...
सुनीताबाई येताच परत चिडीचूप... रागाने बघत फणकारत गेल्या... सीमाला म्हणाल्या, अशाने नणंदेचा मान कमी करून घेशील स्वतःच स्वतःच्या हाताने... सीमा म्हणाली, मला मान नकोच आहे, मैत्री हवी आहे, बहिणीचे प्रेम हवे आहे... तश्या परत चिडचिड करत म्हणाल्या, काय हव ते करा... अनुभवाचे बोल आहेत, प्रत्येक नाते त्याच चौकटीत ठेवावे... अती तेथे माती...
तू नको लक्ष देऊ ग आई, सोड.... आम्ही आमचे बघून घेऊ... दोघी नणंद-भावजय मस्त बाजारात गेल्या.. फिरून आल्या.. सासूबाई अगदी आत-बाहेर करत होत्या... जेवण व्हायचं आहे, एवढ्या वेळ काय करत होतात? सीमा म्हणाली, आई जेवणाच काय टेन्शन घेतेस, आता होईल आम्ही दोघी आहोत, तू भाजी चिरून दे, लाडक्या लेकीपुढे त्यांचे काही चालेना.. झाला तो दिवस गेला... लेक जायला निघाली, ह्यांची लगबग सुरू झाली, स्वातीचा पण चेहरा पडला, कारण आता परत सासू आणि ती...
स्वाती आपले काम करून बाजूला होई... पण ह्यांचा स्वभावच असा होता की त्या कटकट करायच्याच... स्वाती 'ओम दूर्लक्षाय नमः' म्हणत आला दिवस ढकलत होती, गोड बातमी आली.. तिला वाटलं आता तरी ह्या बदलतील पण नाही... सगळे करायच्या पण 'भीक नको, कुत्रा आवर' अशी परिस्थिती होती.. करायच आणि एवढ्या वेळा बोलायचे की तिला वाटायचं काही करू नका पण तोंडाचा पट्टा आवरा...
काही वर्षे गेली दोन मुले मोठी झाली, स्वातीने आपले छंद जोपासायला, घर बसल्या काही ना काही उद्योग करायला सुरुवात केली... आता घरात सुनीता बाईंकडे कोणी लक्ष देत नव्हते, त्यांच्या ह्या स्वभावाचा सर्वांना कंटाळा आला होता...
मार्च महिना आला लेकीकडे जायची तयारी सुरू केली त्यांनी... स्वातीने सीमाला विचारून सर्व गोष्टी त्यांच्यासोबत दिल्या... खरतर या वर्षी सीमाच्या सासूबाई सीमाकडे होत्या म्हणून सीमाने आईला सांगितलं, नाही आलीस तरी चालेल.. पण ऐकतील त्या सुनीताबाई कसल्या??
शेवटी स्वतःच तें खर करत सुनीताबाई लेकीकडे आल्या... मुलांची परीक्षा व्हायच्या आधी त्या दरवर्षीच यायच्या.. त्यांची मुलगी नोकरी करून घर सांभाळत असे, खूप कौतुक होते त्यांना तिचे... म्हणूनच मदतीसाठी यायच्या त्या...
दहा दिवस सीमाच्या सासूबाई आणि त्या एकत्र होत्या... त्यांचे वागणे बघून त्यांना स्वतःची लाज वाटली, पण कबुल करणे त्यांचा स्वभावच नव्हता... शेवटी दोघींच काय काम? तुम्ही आता इथे आहात तर मी माझ्या मोठ्या लेकाकडे जाते, तसेही आमच्या मोठ्या सूनबाईला जरा बरे नाही.. माझी मदत पण होईल... त्या गेल्यावर त्यांनी सीमाला विचारले ह्या नेहमीं अशाच वागतात की मी होते म्हणून... सीमा चिडुन आईला म्हणाली, आई प्लीज गप्प बस त्या तुझ्या सारख्या सासूबाई नाहीत... उलट त्या माझ्या सासूआई आहेत.. त्यांना हे वाक्य खूप लागले, पण जावई काय म्हणतील म्हणून काही दिवस राहिल्या...
निघायची वेळ झाली अन् लॉकडाउन झाले.. त्यामुळे त्या खुपच काळजीत होत्या, आता घरचे कसे होणार? या वर्षीची आगोट, पापड, लोणची... तोंडांचा पट्टा सुरू होता.. सुनेच्या नावाने शंख फोडत होत्या.. लेकीने किती समजावलं, अग आई किती बोलतेस, वहिनी करेल.. सगळे करते ग वहिनी... किती बोलतेस? स्वभाव बदल आता आई... नाहीतर तुला कॊणी विचारणार नाही... अगं आजी झालीस तरीही तुझा "मी"पणा काही कमी होत नाही... ती वहिनी कशी सहन करते तुला काय माहित? लेकीचा खूप राग आला त्यांना... जावई घरात म्हणून गप्प बसल्या... जावई घरात किती काम करतो, तिच्या सासूबाई कशा वागतात सर्व बघून त्यांना त्यांची चूक जाणवत होती....
शेवटी एकदाच अनलॉक १ झाले.. त्या घरी आल्या.. तोपर्यंत जून महिना आला होता.. त्यांच्या कपाळ्यावरच्या आठ्या अजूनच वाढल्या होत्या... सूनबाईने घाबरत सर्व आगोट दाखवली.. आणि म्हणाली, आई तुम्ही असताना मला जाणवत नाही... पण ह्या वर्षी पहिल्यांदाच एकटीने केलंय सर्व, काही चुकले असेल तर माफ करा... तिच्या ह्या वाक्याने त्यांचे मन भरून आले.. तिला प्रेमाने जवळ घेतले, तिची माफी मागितली... आजपासून तूच माझी लेक आणि मी तुझी आई... आई म्हणूनच हाक मारायची हं मला... अन् त्यांच्या नात्याची व्याख्याच बदलून गेली....
स्वातीने मनातूनच सीमाचे खूप आभार मानले.....
