STORYMIRROR

Sunita Ghule

Thriller

4  

Sunita Ghule

Thriller

साहसी सारंगी

साहसी सारंगी

4 mins
10

झुंजूमुंजू झालं तसं तीनं हातात खराटा घेऊन सारं अंगण स्वच्छ केलं. गोठ्यातला गुरांचा शेणमूत आवरून तीने त्यांना चारापाणी केलं . दुधाची धार काढली आणि झोपडीत आली. सारंगी आदिवासी पाड्यावर राहणारी एक सोज्वळ कामसू स्वभावाची स्त्री. रोज सकाळी उठून जनावरांचे करायचे,चरवीभर दूध काढून, स्वतःचे आवरायचे, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची काळजी घेत स्वयंपाकपाणी उरकायचा आणि नवऱ्याबरोबर जंगलात जाऊन वाळलेल्या काटक्या गोळा करत भटकायचं, कधी रानफळं रानभाज्या, औषधी वनस्पतींची साल, पाने ,फळे गोळा करायची हाच तीचा नित्यक्रम. तीचा नवरा गिरजूही तीला मदत करायचा. जमा झालेला रानमेवा , औषधी साली फळं विकून तर कधी लाकूडफाटा विकून त्याच्या कुटुंबाची गुजराण करायचा. सारंगीच्या कमरेला नेहमी एखादा कोयता किंवा विळा अडकवलेला असायचा. फाटं मोडताना तीला त्याची मदत व्हायची. दोघं नवरा बायको सोबतीने जंगलात फिरायचे. पण हल्ली सरकारने जंगलातील वन संपत्ती गोळा करायला बंदी घातल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावून घेतल्या सारखे झाले होते. दोघेही काळजीत होते काय करायचे. घरातून निघताना गिरजू म्हणाला " सारंगे चल आटप लवकर, भाकरी बांध आज जरा दूर रानात जाऊ , तिथं काय कोणी आपल्याला पाह्यचं नाय ." त्याच्या मनात आले दोन दिवस झाले काहीच मिळालं नाही इकायला . "आज काही फळं नि साली गोळा करू दूर रानात जाऊन " तो म्हणाला. सारंगी उत्तरली, व्हय, ओ आवरलं माहं , पटक्यात निघू लगेच " दोघं पहाऱ्यावरच्या सायबाला डोळा चुकवून चोरपावलांनी जंगलाच्या दिशेने निघाले. सायबाला टाळून जायचं तर दाट रानात घुसावं लागणार होतं. पायीशी येणारं उंच गवत आणि मधूनच सरपटत जाणारे जीव यांच्यापासून बचाव करत दोघे जंगलाच्या दिशेने जाऊ लागले , तितक्यात सारंगी उद्गारली, " अवं , इकडं या कि बघा केवढं मोठं मधाचं पोळं हाय ! लई मध . " दोघांनी पटकन काटक्या गोळा करून पोळ्याच्या खाली जाळ केला , क्षणभर धूर झाला नि शेकोटी पेटली, तशी मधमाशांना उष्णता लागली. आगीच्या धगीने काही मरून पडल्या तर काही माशा भिरभिरत स्वतःचे पंख वाचवत दूर उडू लागल्या. काही सारंगी व गिरजूच्या डोक्यावर घोंगावत मानेवर चेहऱ्यावर , मिळेल तिथे दंश करू लागल्या. गिरजूने पटकन झाडावर चढत पोळ्याला हात घातला. पोळ्याची फांदी कोयत्याने तोडून ती जवळच्या गोणीत टाकली व दूर पळत जाऊ लागला. तरी माशा काही पाठलाग सोडीना. सारंगी ही त्याच्या मागे धावत जात होती. थोडे अंतर पळत गेल्यावर तीला दम लागला . गिरजू ही दिसना. तिने तिथेच एका उंचवट्यावर बसकन मारली व गिरजूला हाका मारू लागली. "गेल्या माशा या की मागं " पण गिरजूचा काहीच मिळेना. जवळच झरा वाहत होता. तिथे जाऊन सारंगीने तोंडावर पाण्याचा हबका मारला . ओंजळभर पाणी पिऊन पुन्हा गिरजूला हाका मारत झाडीमध्ये जाऊ लागली. तितक्यात वाघाची डरकाळी ऐकू आली त्या पाठोपाठ गिरजूची किंकाळी ! सारंगीच्या पायाखालची जमीनच सरकली. जीव भितीने गारठून गेला. तरी तीने गिरजूच्या काळजीने क्षणात झऱ्यापल्याड उडी मारली नि पुढे झाडी पलीकडे पाहते तर काय? वाघाने गिरजूच्या अंगावर झेप घेतली होती . त्यांची दोघांची झटापट चालू होती. हातातल्या कोयत्याने तो वाघासोबत झुंजत होता. क्षणात सारंगी भानावर आली. नवऱ्याच्या जीवावर बेतलेले पाहून तिथे नेम धरून हातातला कोयता वाघाच्या दिशेने भिरकावला. अशा अचानक झालेल्या हल्ल्याने वाघ बावचाळला. त्याची गिरजू वरची पकड सैल झाली. या संधीचा फायदा घेऊन गिरजू मोठ्याने ओरडू लागला. हातातला कोयता वाघाच्या दिशेने रोखत तो म्हणाला , " सारंगे पळ, पळ , तुझा जीव वाचिव !" पण सारंगी बोटभरही हलली नाही. उलट तिने जवळच पडलेले वाळलेले लाकूड वाघाच्या दिशेने फेकले. पाठोपाठ हातात येईल त्या दगडांचा वर्षाव ती वाघाच्या दिशेने करू लागली. या प्रतिहल्ल्याने वाघ बावचळून डरकाळी फोडत झाडीत पळून गेला. आता सारंगी गिरजूकडे वळली. तो मोठ्याने रडत कळवळत होता. सारंगीने जवळ जाऊन त्याला सावरायचा प्रयत्न केला. तो थोडासा भानावर आला. पण भितीने त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. त्याचा हात रक्ताने माखला होता. मानेवर ,छातीवर वाघाच्या पंजाचे वार दिसत होते . रक्त येत होते. तो वेदनेचे घायाळ झाला होता. सारंगीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पायातले त्राणच संपून गेले होते. कसेबसे त्याला उठवत सारंगी धीर देऊ लागली . " मी नाय जगत आता सारंगे, तू जा कोणास्नी तरी बोलवून आण " " नाय, नाय मी नाय जोडून जायची तुम्हास्नी , इथं आड रानात ! " सारंगी काळजाने म्हणाली. सारंगीने जवळच्या गवतातून काहीतरी झाडपाला हातावर चुळगळून त्याच्या जखमेवर रस पिळला. खोलवर झालेली जखम अजून जळजळू लागली. पण आता रक्त यायचे थांबू लागले. पदराची चिंधी काढून तीने त्याच्या हाताला बांधली. जवळच्या झऱ्यावरून ओंजळभर पाणी आणून त्याला पाजले. गिरजू थोडा सावरला, सारंगीला म्हणाला. " चल सावकाशीनं इथून बाहेर पडाया पायजे , नाहीतर जनावर परत यायचं , त्याच्या तोंडाला रगात लागलयं " दोघे कसेबसे जंगलाच्या बाहेर पडून झोपडी कडे आले. रक्ताने माखलेल्या गिरजूला पाहून त्याच्या माय बापाने मोठ्याने टाहो फोडला. पाडयावरच्या लोकांनी एकच गिल्ला केला. कोणीतरी जाऊन जंगलच्या सायबाला खबर दिली. तो गाडी घेऊन गिरजूच्या झोपडीकडे आला. गिरजूला पाहून त्याचा पारा चढला. " जंगलात जायचं नाय सांगितलं तरी कशाला मरायला जाता रे ?आमच्या डोक्याला ताप. जंगलचा कायदा मोडला म्हणून तुमच्या दोघांवर खटलाच भरतो. तो तणतणत निघून गेला. दवाखान्यात उपचार मिळलं , औषधासाठी खर्ची मिळेल या आशेने त्याने सायबाकडे पाहीलं. तो तसाच घोंगडीवर कण्हत पडून राह्यला. सारंगीने पदरात बांधून आणलेला झाडपाला पाट्यावर वाटायला नि नशिबाला दोष देत गिरजू छताकडे पाहत पडून औषधाची वाट पाहू लागला. ,©®सुनिता घुले


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller