वळीव
वळीव


तिन्हीसांजा ढळल्या नि अचानक आभाळ अंधारून येऊ लागलं. सगळीकडे धुळीचे लोट दिसू लागले. वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या सोबतीला ढगांचा गडगड़ाट ऐकू येऊ लागला.
नुकताच शेतातून परतलेला विठोबा ओसरीवर विसाव्यासाठी बसला होता. वेगाने धावणाऱ्या वाऱ्याबरोबर धुरळा डोळ्यात जावू लागताच तो आसऱ्यासाठी घराकडे वळला. तोच धडधड आवाजामुळे त्याने मागे वळून पाहिले. घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत टपोरे थेंब मातीच्या दिशेने झेपावताना दिसले.
इतक्यात तप्त उन्हाने तापलेल्या मातीचा कोरा सुगंध नाकात घुसताच एक प्रसन्नतेची छटा शरीरभर चमकून गेली.
'वळीव सुरू झाला वाटताया' विठोबाने मनात विचार केला.
पस्तीस वर्षे वयाचा विठोबा मोठा करारी स्वभावाचा शेतकरी होता. लहानपणीच बापाचे छत्र हरवले. चार बहिणीनंतर नवसाने जन्माला आलेल्या ह्या लेकाचे लाडकोड करायला आईच्या पदरात होतेच काय?
मोठ्या कष्टाने दोन घास भरवून या लेकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. बहिणींना कसेतरी उजवून,विठोबाच्या संसाराची घडी कुठेतरी बसत चालली होती. जिरायत जमीन, वर भावकीच्या भांडणाने पुरता मेटाकुटीस आलेला!! विठोबा आताशा कुठे स्थिरस्थावर झाला होता. संसारवेलीवर बहरलेल्या दोन फुलांनी जगण्याला वेगळी झळाळी येत होती.
ताब्यात मिळालेल्या शेतीच्या तुकड्याला वहितीजोगे करण्यासाठी त्याने सारे ऊन अंगावर घेतले होते. केनीने माती ओढून जमीन समान पातळीवर आणण्यासाठी तो राबत होता.कामाचा निपटारा झाला की समाधानाने दोन घास गळ्याखाली उतरून दुसऱ्या दिवसाच्या नियोजनात गढून जात होता.
पण आज कोसळणाऱ्या धुवाँधार वळीवाने त्याच्या मनात.आशेला नवे अंकूर फुटू लागले होते. यंदा पाऊसकाळ बरा झाला तर हातात चांगले पीक येण्याची संधी आहे. तो बसल्या बसल्या विचार करत होता.
जेवणाची वेळ होताच कारभारणीने लेकरांकडं सांगावा धाडला. समाधानाने चौघेजणाची जेवणे उरकली. पण बाहेर पावसाचे काहूर काही हटेना. संततधार पाऊसासोबत आता गारांचाही मारा सुरू झाला होता. लेकरांना जवळ घेऊन बसलेल्या कारभारणीने हाळी दिली.
"धनी,लय रात झालीया ,
झोपा कि वो आता",
"रखमे,पावसाच्या सरी लई कोसळू लागल्या बघ, नव्याने भरलेल्या बांधाच काय होईल माझ्या जीवाला घोर लागून राह्यलायां"
विठोबा म्हणाला,"कंदिल घेऊन जावून येतो बांधात"
"धनी एवढया अंधारात नि सोसाटयाच्या वाऱ्यात एकटं जाऊ नगा,मी पण येते तुमच्या संगट" रखमा म्हणाली.
लेकरांना झोपवून विठोबाने
हातात घमेले व फावडे घेतले ,रखमाने कंदिल घेतला व शेताकडे जाऊ लागले.रस्त्याने वाहणाऱ्या खळखळ पाण्यातून कसेतरी वाट काढत दोघे चालत होते. मधेच एखादं जनावर पायात वळवळत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते' क्षणभर अंगावर सर्रकन काटा उठत होता.
कसेबसे दोघे शेतात पोहोचले कंदिलाच्या उजेडात विठोबाने शेताकडे नजर टाकली. सारीकडे पाणीच पाणी बांध भरुन शेत तुडुंब भरले होते. कोणत्याही क्षणी बांध फुटेल की काय अशी शंका त्याच्या मनात डोकावली.त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. पोटाला टाच देऊन बांधाला केलेला भरावा फुटून कधी वाट मोकळी करुन घेईन याचा नेम नव्हता. किर्र अंधारात कोसळणाऱ्या पावसाची झड काही थांबायचे नाव घेईना. इतक्यात पाणी धो-धो करत धबधब्यासारखे उताराच्या दिशेने बांधावरुन वाहू लागले. पाण्याच्या रेट्यामुळे नुकताच केलेला पोकळ भराव मातीसकट पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. अंधारात काय करावे विठोबाला सुचेना.
हातात असलेल्या फावड्याने तो प्रवाहात मातीची भर टाकू लागला, पण एवढयाशा मातीला पाणी दाद देईलसे वाटेना. रखमा तिच्या परिने दगडधोंडे आणून भरावात टाकू लागली. त्यामुळे माती वाहून जाण्याला थोड़ा अटकाव होत होता सलग दोन तीन तास प्रयत्न करुनही पाण्याला थोपवता येईना. विठोबाची दमछाक होऊ लागली. श्रमाने नि काळजीने त्याचे मन सुन्न झाले. डोक्यावर लोखंडी टोकरीचे ओझे घेऊन डोक्यावर भलेमोठे टेंगुळ आले. शेवटी त्याने हतबल होऊन घमेले खाली ठेवले. तो चिखलातच मटकन खाली बसला. डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाण्याच्या थेंबाबरोबर वाहून जाऊ लागले. क्षणाक्षणाने वाढणाऱ्या भगदाडाकडे त्याला पाहवेना त्याने गच्च डोळे मिटून घेतले. हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. या उलाढालीत किती वेळ गेला त्याला समजलेच नाही. पूर्वेला फटफटीत होऊ लागले. तेव्हा तो भानावर आला. अंधुक प्रकाशात त्याने शेताकडे नजर टाकली. निम्मी अधिक माती पाण्याबरोबर वाहून गेली होती. विठोबाने हताशपणे घमेले व फावडे घेऊन तो घराची वाट चालू लागला. पाठोपाठ रखमाही त्याच्या पाठोपाठ चालू लागली.
रात्रभर घरात एकटे झोपलेल्या लेकरांची तिला सय झाली. झपझप पावले टाकत ती घराकडे धावली. पाठीमागून जड पावलांनी येणाऱ्या विठोबाच्या मनात विचारांनी थैमान घातले .तो मनाशी म्हणत होता.
"कसा कोपलास रे बळीराजा"
प्रत्येकाच्या ताटात भूकेसाठी घास देणारा तू, माझ्या अन्नात अशी कशी रे माती कालवलीस?"
डोक्यावरील टेंगळावरुन हात फिरवत तो सुन्नपणे ओसरीवर बसून राहिला.