लेकरा, तुच माझं सर्वस्व
लेकरा, तुच माझं सर्वस्व
आज आभाळात सूर्य जास्तच तळपत होता.सारे शिवार तप्त उन्हात भाजून निघत होते. खांद्यावरती पैरण टाकून रायबा शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली अंगावरच्या घामाच्या धारा पुसत अमिनिष नेत्रांनी दूर क्षितिजावर आपल्या अधू डोळ्यांनी टक लावून बसला होता. मनात विचारांचे काहूर माजले होते ,काय होईल बुवा अवंदा? मृग,रोहिणी सरला तरी अजून आभाळ ठक्क निळे,कुठे रान उकलून पडले होते. माणसे व जनावरांच्या घशाला कोरड पडली होती. शेतकरी नांगरणी करुन पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. पाऊसकाळ सुरू होऊन महिना उलटला तरी वळीवाचा एक पाऊस सोडता थेंबही जमिनीवर पडला नव्हता.
रोजचा दिवस असाच कोरडा चालला होता. चिंतेत भर पडत चालली होती.
तिन्ही सांजा झाल्या उन्हं कलली तशी रायबाने अंगात पैरण चढवली नि गावाच्या दिशेने तो हळूवार चालू लागला. इतक्यात एक वाऱ्याची गार झूळूक अंगाला सुखावून गेली. रायबाने आभाळाकडे डोळे भरून पाहिले. कुठे कुठे काळ्यामिट्ट ढगांची गर्दी होऊ लागली होती. हळूहळू वाऱ्याचा वेग वाढला,ढगात गडगडाट ऐकू येऊ लागला आणि हा हा म्हणता पावसाचे थेंब टपटप पडू लागले.
आता आपल्याला पाऊस घर गाठू देत नाही.असे ध्यानात आल्याने रायबाने जवळच्या वस्तीचा आसरा घेतला. आता पावसाचा जोर आणखी वाढू लागला. सुसाट येणाऱ्या वाऱ्याच्या वेगाबरोबर टपोरे थेंब स्पर्धा करू लागले.
वस्तीवरल्या हरिने रायबाला घरात आडोशाला बोलावले.बाजले टाकून दोघेजण निसर्गाचे ते रौद्ररुप डोळ्यात साठवू लागले. हरी रायबाकडे पाहत म्हणाला" तात्या घराकडं लवकर निघायचस नव्हं,घरचे काळजी करत असतील की?"
"व्हयं रं पावसाचा अंदाजचं आला नायं रं. रोजच्या परमाण म्या ही निघालो."
दोघांनी कढत चहा घेतला; एव्हाना पावसाचा जोर ओसरला होता. गावाकडून येणारा उजेड दूरवर चमकू लागला.
"हरि कोणतरी येतयं बा वस्तीकडे."
"व्हयं रं दिसतयं तं तसं"
हरी म्हणाला
"हा तर तुझ्या दत्ताचा आवाज."
"तात्या अरं तू इथं हाय नव्ह? "
"जीवाला घोर लागला की रं माझ्या!" दत्ता म्हणाला. आता दोघे बापलेक पाण्याचे ओहोळ टाळत, चिखल तुडवत घराकडे आले . म्हाताऱ्याचे मन आनंदाने थुईथुई नाचत होते, लेकाच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष होते कुठे?
दोन दिवसांनी पावसाची झड ओसरली, तशी शेतीच्या मशागतीला जोर चढला, आठ दिवसात पेरण्या पूर्ण झाल्या,हिरवे कोंब शिवारभर डुलू लागले. गावातल्या पारावर कोणी दिसेनासे झाले. सारी तरणीबांड पोरं शेतावर मळ्यात पिकांची हिरवाई पाहण्यात रंगून गेली . कुठे तरी एखादा म्हातारा पारावर खोकलताना ऐकू येई.सारे वातावरण उत्साहाने नि नाविन्याने भरून गेले.शेतकऱ्याची मने आनंदाने डोलू लागली.खाचरातील भात शेते वाऱ्यावर झुलू लागली.बघता पीके जोर धरू लागली,आषाढ व श्रावण सरीनी चिंब भिजवत शिवारातील हिरवाई कुरवाळली. पाडोशीच्या रानात भातशेतीचा घमघमाट येवू लागला. पण आज सकाळपासून आभाळाचा नूर काही वेगळाच दिसत होता, कुंद वातावरण काळ्याकुट्ट ढगांनी वेढले होते.
पडवीत बसून आकाश न्याहळत दत्ता म्हणाला," तात्या आज लईच दाटून आलया बघा, शेताकडं जावू नगस बा तू!"
"असं म्हणतो व्हयं"
गुडघ्याभोवती हाताची मिठी घालून रायबा शिवाराकडे नजर लावून बसला. सूर्यनारायण काही उगवायची चिन्ह दिसनात. सुनेला आवाज देऊन रायबाने चहा मागितला चिंताग्रस्त मनानेच चहाचे घुटके घेत रायबा बसून राहिला.
हळूहळू आणखीनच अंधारून आले. गार वाऱ्याच्या झुळका अंगाला झोंबू लागल्या.तसा म्हातारा उठून घरात जाऊन बसला.घरातल्या चुलीतला धूराचा लोट खापऱ्या कौलारातून बाहेर पडू लागला. टपटप थेंबांचा आवाज जोर धरू लागला.बघता बघता तासभरात सारीकडे पाणीच पाणी दिसू लागले. दूरपर्यंत काहीच दिसत नव्हते.मुलाच्या विचाराने त्याचे मन अधिकच व्याकूळ होऊ लागले.
पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहू लागले,भाताच्या उभ्या पिकांतील रोपे मूळासकट उपटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागले, शेतकाऱ्याचा धीर सुटला होता. हातातोंडाशी आलेला घास नजरेसमोरून पाण्यात जाताना पाहून त्याचे काळीज पिळवटून निघत होते.
बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या, रायबाची बायकोही आता हळूच दारातून डोकावून पतीच्या हालचालीचा मागोवा घेऊ लागली.दिवसभर दत्ता पावसामुळे शिवारात अडकून पडला होता. तो कुठे थांबला असेल या विचाराने तिचे काळीज व्याकूळ होऊ लागले.तिच्या लग्नाला दोन वरिस झाले होते,पदरात मूल नव्हते, डवरलेल्या भातशेताप्रमाणे त्यांचा संसारही बहरत, फुलतं होता. आज प्रथमच पावसामुळे दत्ता एकटाच शेतात गेला होता.
रायबाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते,त्याला वाहणारी पिकेही दिसेनात, लेक कधी दिसतो,असे त्याला झाले. दत्ताची आई गेल्यापासून त्याने लेकाला हातावरच्या फोडावाणी जपले होते. संसारवेलीवरचे हे प्राणप्रिय फूल त्याला साऱ्या सुखात प्रिय होते. हरिबा हवालदिल झाला, काय करावे ,बोलावे त्याला सुचेना.
एवढयात दारात पावलांचा आवाज झाला,रायबा ताटकन उठून दाराकडे धावला. चिंब भिजलेला दत्ता त्याच्या नजरेस पडताच त्याचे उरले सुरले अवसान गळून पडले . लेकाला छातीशी कवटाळीत तो म्हणू लागला. "आरं लेका इतक्या पावसात कुठं गाठला होता रं" "बीगीनं घरी यायचं की नाही? कुणाकड पाहून जगावं रं या म्हताऱ्याने?"आता बापाला कसं समजवावं हे दत्ताला कळेना. त्याच्या काळजीनं हळवं झालेलं बापाचं मन पाहून त्यालाही भरून आलं, या भरल्या संसारात बापाला कधी अंतर देणार नाही. त्याने मनोमन स्वतःला वचन दिले.
बाहेर पावसाच्या झडी जोराने बरसत होत्या,नि रायबाच्या डोळ्यातील आसवांच्या झडीने दत्ताच्या मस्तकावर जलधाराचा अभिषेक होत होता.