साद प्रेमाची भाग ३
साद प्रेमाची भाग ३
मीराने दिलेल्या सागरच्या धक्क्यातून सुबोध अजूनही पुरता सावरला नव्हता. खूप स्वप्नं चितारली होती त्याने. मी आणि मीरा , आम्ही दोघं आयुष्यभर एकत्र असू , सुखाचा संसार करू , आपली सगळी स्वप्नं प्रत्यक्षात उतरवू अन् अतुलनीय अशा प्रेमाचे धनी होऊ. पण ह्या सगळ्या स्वप्नांवर सागरने नांगर फिरवला होता. आता मीरावर आपला काहीएक हक्क नाही ही गोष्ट पचवणे सुबोधला कठीण जात होते. एक दिवस आई बाबा त्याच्याजवळ आले. दिवाकरराव म्हणाले ,
" सुबोध , तुझ्या अस्वस्थतेचं कारण आम्हाला त्याच दिवशी कळालं ज्या दिवशी मी शशांकला आणि त्याच्या फॅमिलीला आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं अन् मीराला पाहून तुझी कळी खुलली होती. खूप सुखावलो होतो आम्ही दोघे की तुझं मीरा सारख्या सालस , निरागस मुलीवर प्रेम आहे. पण त्या दिवशी सागरला पाहिलं आणि....पण तू मन छोटे करू नकोस बाळा. एखादी गोष्ट आवडली तरी ती आपल्याला मिळेलच हे आपल्या हातात नसते. माझी खात्री आहे तुला मीरापेक्षाही चांगली जीवनसाथी मिळेल जी तुला , तुझ्या मनाला जपेल."
गिरिजाताई - " हो रे सोन्या , मला देखील मीरा खूप आवडते. ती आमची सून झाली असती तर माझ्यासाठी दुधात साखरच असती. पण जाऊ दे , तिने तिच्या मनाला योग्य वाटला तो जोडीदार निवडला आहे. तुझ्या प्रेमाची साद तिला तुझ्या डोळ्यांतून वाचता नाही आली , त्याला नाईलाज आहे. पण तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. जेवढ्या लवकर यातून बाहेर पडशील तितक्या लवकर मोकळा होशील. आम्हाला नाही बघवत रे तुझी अशी अवस्था."
सुबोध - " आई बाबा , आय एम सॉरी , मी माझंच दुःख कुरवाळत बसलो होतो इतके दिवस. स्वार्थी झालो होतो मी , माझी जबाबदारी तुमच्यासाठी देखील आहे हे साफ विसरलो होतो. पण आता तुम्ही काळजी करू नका. मी सावरेन स्वतःला यातून."
आणि खरंच सुबोधने स्वतःला यातून लवकरात लवकर बाहेर काढले. मीरा त्याची एक चांगली मैत्रीण म्हणून तो कायम तिला जपणार होता पण अलवार प्रेमाचा रेशमी कप्पा त्याने कायमस्वरूपी बंद करून टाकला होता. मीराशिवाय तो स्वतः ला अधुरा , अपूर्ण समजत होता पण मीरासाठी सागर हे तिचं पूर्णत्व होतं. त्यामुळे सुबोध मीराला एक प्रेयसी म्हणून जरी विसरला असला तरी एक मैत्रीण म्हणून तो कायमच तिच्या पाठीशी उभा राहणार होता.
दिवस भरभर पुढे सरकत होते , काळ पंख लावून उडून गेला. मीरा अन् सुबोध दोघेही आपापल्या अभ्यासक्रमात मेरिट लिस्ट मध्ये उत्तीर्ण झाले. कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दोघांनाही उत्तम अशा पॅकेजची नोकरी देखील मिळाली. वरचेवर दोघांच्या गाठीभेटी होत असत. पण त्यावेळी सुद्धा मीरा केवळ सागर बद्दलच भरभरून बोलत असे. त्याचा बंगला, त्याची इंडस्ट्री ,त्याची स्वप्नं हाच विषय असे तिच्या बोलण्यात. ती धुवांधार बरसत राही अन् सुबोध एखाद्या शांतप्रवाही नदीप्रमाणे ऐकत राही.
मीरा सागरच्या सहवासात खूप खुश होती. सागरचं देखील खूप मनापासून प्रेम होतं मीरावर. हळूहळू सईला देखील एक माणूस म्हणून पहिल्या भेटीत आपण सागरबद्दल जो अंदाज बांधू पाहत होतो तो चुकीचा होता हे समजू लागलं होतं. एवढ्या मोठ्या उद्योगपतींचा मुलगा असून देखील त्याचे पाय जमिनीवर होते. त्याचेच काय? पण त्याचे आई वडील देखील खूप मोकळ्या मनाचे होते . सागरच्या घरच्यांना देखील मीरा सून म्हणून पसंत होती. त्यामुळे लवकरच त्यांच्या साखरपुड्याचा अन् लग्नाचा मुहूर्त काढून पुढचे सगळे कार्यक्रम ठरवायचे असे दोन्ही कुटुंबीयांनी ठरवले. ही आनंदाची बातमी मीराला आधी सुबोधला सांगायची होती. त्यासाठी मीरा , सागर अन् सुबोध तिघेही एका कॉफीशॉप मध्ये भेटणार होते.
ठरल्याप्रमाणे तिघे भेटले अन् मीराने इत्यंभूत माहिती सुबोधला सांगितली. सगळं ऐकत असताना दुःखाची एक बारीकशी लकेर सुबोधच्या मुखावरून तरळत जातांना सागरच्या नजरेने हेरले. पण त्याक्षणी त्याला काहीही न बोलणेच श्रेयस्कर वाटले. नंतर कधीतरी सुबोधसोबत बोलू असे त्याने ठरवले. पण कॉफीशॉप मधून मीराला तिच्या घरी सोडायला जाताना मात्र त्याने मीराजवळ हा विषय काढला.
"मीरा , तुला एक सांगू ? म्हणजे मला असं वाटतं की सुबोधला तुझं लग्न माझ्याशी होतंय हे आवडलं नाहीये."
मीरा - " सागर , अरे असं काही नाही रे. सुबोध माझा खूप जवळचा मित्र आहे. हां , आता लग्न होऊन मी सासरी गेल्यानंतर आमच्या गाठीभेटी जरा कमी होतील म्हणून जरा वाईट वाटत असेल त्याला. पण तुला वाटतंय तसं काही नाही. "
सागर - मीरे , त्याच्या डोळ्यांत मला काहीतरी वेगळंच दिसलं पण. तो..... तो तुझ्यावर प्रेम करतो मीरा. तू जेव्हा त्याला आपल्या साखरपुडा आणि लग्नाबद्दल सांगत होतीस तेव्हा थोडी नाराजी , किंबहुना दुःख त्याच्या चेहऱ्यावर आलेलं मी पाहिलं पण त्यावेळेस मी काही बोललो नाही. पण माझी खात्री आहे ही लव्हस् यू. "
मीरा - सागर , तुझं काहीतरीच असतं. अरे, आम्ही दोघं चांगले मित्र आहोत लहानपणापासून. आणि सुबोधच्या मनात तसच काही असतं तर त्याने मला का सांगितलं नाही ? तो खूप खुश आहे आपल्यासाठी. तू हे सगळं काढून टाक बरं मनातून."
आणि तो विषय तिथेच थांबला. पण मनातून सागरला वाटू लागलं होतं की आपण सुबोध आणि मीराच्या मैत्रीआड तर आलो नाही ना ? पण क्षणभरच... कारण मीराचं त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम होतं , तिचा श्वास होता तो आणि त्यामुळे त्याने सुबोधचा विचार मनातून काढून टाकला.
एके दिवशी मीराचा सुबोधला फोन आला अन् ती म्हणाली ,
" सुबोध , येत्या रविवारी सागर आणि मी पुण्याजवळच्या लोहगडला मस्त ट्रेकिंगला चाललोय. तू येतोस का ? सागरचे काही मित्र मैत्रिणी , माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत. म्हणून म्हटलं तुलाही विचारावं. मज्जा येईल खूप आणि येताना लंच सागरच्या फार्महाऊस वर घ्यायचं ठरलंय."
सुबोध - सॉरी गं मीरा , पण या रविवारी आईच्या एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे नाशिकला. तिथे जायचं आधीच ठरलंय आमचं तिघांचं. थोडं आधी सांगितलं असतं ना तर नक्की आलो असतो. पण लेट इट बी , आपण नेक्स्ट टाईम नक्की एकत्र जाऊ.
मीरा - " काय रे सुभ्या , पार मुड घालवला तू ! अरे, आमचं काल रात्रीच सगळं प्लॅनिंग झालं आणि तुला लगेच सकाळी फोन केला. सुबोध , जाऊ दे ना ते लग्न , प्लीज ये ना तू ?
सुबोध - मीरा , अगं आता वयोमानानुसार बाबांकडून कार चालवणं होत नाही म्हणून तर मी जातोय ना ! आणि ही मैत्रीण आईच्या खूपच जवळची आहे त्यामुळे आईचं तर खूप आधीपासून सगळं ठरलंय. पण मी म्हटलं ना पुढच्या वेळेस नक्की.... प्रॉमिस.... यावेळेस तुम्ही मज्जा करा.
मीरा - ओके डूड , आय विल मिस यू यार ! एनीवे , चल , बोलू नंतर , बाय.
सुबोधच्या मनाला आजदेखील मीराला नाही सांगताना असंख्य वेदना झाल्या. तो जरी नाशिकला लग्नाला जाणार नसला तरी त्याने मुद्दाम तसं सांगितलं मीराला. खरं म्हणजे आता प्रत्येक क्षणी मीराला सागरसोबत बघणं सुबोधला अवघड जात होतं म्हणून तो मीरा समोर जाणं टाळत होता. कारण कधीतरी मीरा आपली होईल या आशेवर जगणारा सुबोध आता ती कधीच माझी होणार नाही या वेदनेने एकांतात तीळतीळ तुटायचा. पण येणारा काळच त्याच्या या तुटण्यावर मलमपट्टी करू शकणार होता.
क्रमशः

