Shobha Wagle

Drama


3  

Shobha Wagle

Drama


रिपोर्ट

रिपोर्ट

12 mins 582 12 mins 582

दामोदर पंत व सरला यांचा रोजचाच नियम, साडे पाच वाजले की फिरायला जायचे. तेथे बाकीची मंडळीही यायची. म्हणजे सगळे पेन्शनर. दोन वेगळे ग्रुप, बायकांचा एक व पुरुषांचा एक. त्यांच्या गप्पा-गोष्टी, खाणे-पिणेही असायचे. सात-साडेसात झाले की एकमेकांना हाका मारून जोड्यानी घरी परतत.


नेहमी प्रमाणे दामोदर पंत तयार झाले. "अगं, चल. निघूया ना?" 


"तुम्ही चला. आज माझ्या पोटात खूप दुखतंय, मी घरीच आराम करते.”


“अगं चल बाहेर. मोकळ्या वातावरणात तुला बरं वाटेल." तरी सरला त्यांच्या बरोबर गेली नाही.


गेला आठवडाभर तिच्या पोटात खूप दुखायचे व अधूनमधून चक्कर आल्यासारखेही वाटायचे. पंतांना सांगितले तर ते बाऊ करतील म्हणून ती पेन किलर वगैरे घेऊन गप्प बसली. बायकांच्या गप्पांमध्ये कधी कधी मोठमोठ्या आजारांच्या गोष्टी निघायच्या. त्यामुळे तिचे मनही थोडे साशंक झाले. पंत गेल्यावर ती तयार झाली व तिच्याच मैत्रिणीच्या दवाखान्यात गेली आणि काय काय होतंय ते सांगितले. जिवाभावाची मैत्रीण, उगीच वेळ काढायला नको म्हणून तिने सगळ्या तपासण्या करूया म्हटले. चिठ्ठी लिहून सगळे रिपोर्ट आणायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी पंतांची सोसायटीची मिटिंग होती तेव्हा सरला सगळ्या तपासण्या करून आली. आता संध्याकाळी रिपोर्ट, तो ही गुपचूप आणायचा, पंतांना कळू न देता, असा विचार करून त्या कामाला लागल्या. पोटातलं दुखणंही त्यांचे कमी झाले होते.


संध्याकाळी रोजच्याप्रमाणे त्या पंतांबरोबर फिरायला गेल्या. जाताना त्यांना म्हणाल्या, “मी एक तासभर बसेन नंतर विमलाकडे तिथूनच जाणार. तिने लोणच्याचा घाट घातलाय. मला मदतीला बोलावलंय. मला यायला आठ तरी वाजतील.” त्यांनीही "बरं बुवा, येताना चव बघायला लोणचं घेऊन ये हां..." असं म्हटलं. तिने ही "हो, हो" म्हटले. 


सगळ्या बायका गप्पा मारत होत्या, पण सरलाचे लक्ष लागत नव्हते. सहा वाजल्यावर ती उठली. थोडं काम आहे सांगून तडक रिपोर्ट आणायला गेली. "एकट्याच आलात? कुणी नाही बरोबर?" डॉक्टरनी विचारले. तिने "हो" म्हटले. पण तिच्या काळजात धस्स झाले. त्यांनी बंद लिफाफा दिला व तुमच्या डॉक्टरांना दाखवा असे म्हटले. तो घेऊन ती सरळ आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिने बघितला व वाचताना तिचा चेहरा पडला.


"काय झालं गं, सांग मला, मी घाबरणार नाही." तेव्हा डॉक्टर मैत्रीण बोलली, "अगं तुला 'आतड्यांचा कॅन्सर' झालाय, व तोही तिसऱ्या स्टेजवर आहे. आपण उपाय करू. दुसऱ्या डॉक्टरचा पण सल्ला घेऊ. या रिपोर्टनुसार तुझ्याकडे फक्त सहाच महिने आहेत." असे म्हणून तिने तिला मिठी मारली व ती रडू लागली. डॉक्टर असली तरी ती तिची मैत्रीणच होती. सरलाने तिला शांत केले व तिला ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये अशी सक्त ताकीद दिली. “नियती पुढे कुणाचे काही चालेना. आहे ते सहा महिने मी आनंदाने घालविन. त्या आनंद सिनिमा सारखे." असे सांगून ती घरी आली. पंत टी.व्ही. बघत होते. रात्री जेवताना तिने आपल्या घरातलेच लोणचे त्यांच्या पानात वाढले. त्यांनी ही तिच्या मैत्रिणीकडचे म्हणून आवडीने खाल्ले. सगळ्या पुरुषांना थोडीच कळते फ्रेश लोणच्याची चव!


रात्रभर तिला झोप लागली नाही. किती सुखाचा संसार आपला. दोन मुलं. एक मुलगी व एक मुलगा. मुलगी परक्याचं धन असतं. तिला सासरी जावंच लागतं. माझी मेघा लग्न झाल्यावर अमेरिकेला गेली. पण मुलगा, तो कुठं राहिलाय माझ्या जवळ. परजातीय बायको आणली म्हणून मी आकांततांडव केला. पण पोरगी समजुतदार होती. माझंच चुकलं. काही झालं तरी ती माझ्या मुलाची बायको होती. माझ्या मुलाकरता मी थोडं नमतं घ्यायला हवं होतं. चुकलंच माझं. बघुया सुधारता येतं का! सुनबाईंचं आणि सासरेबुवांचं चांगलं जमतं. आता पुढच्या आठवड्यात माझ्या नातवाचा वाढदिवस आहे. दोघंही जाऊ वाढदिवसाचं निमित्त करून व सुनबाईशी गोड बोलून समेट करता येतो का बघू. नंतर त्यांच्या हातून श्री सत्यनारायणाची पूजाही घालू. लग्ना नंतर घालायची राहिली होती, ती पूरी करता येईल.


माझ्या सगळ्या इच्छा या सहा महिन्यात पुऱ्या करायच्या आहेत. सरला एक एक मनसुबे रचू लागली. त्याची नोंदही तिने डायरीत लिहून ठेवली. नीट आराखडा केला जेणेकरून सगळं भोगता येईल. लहानपणापासून फोर व्हिलर चालवायची इच्छा होती. ती ही पूरी करू. एक महिन्याचा कोर्स असतो. फार लांब नेता आली नाही तरी चालेल, पण स्टेअरिंग हातात धरून जवळच्या जवळ गाडी फिरवता आली तरी पुरे. पोहायचीही इच्छा होती. माझी मैत्रीण स्नेहा, पट्टीची पोहणारी. ती पोहण्याचे वर्गही घेते. उद्याच भेटते तिला. स्विमिंग सूट घालून पाण्यात हात-पाय मारेन. थोडंसं पोहायला आलं तरी पुरे. एका महिन्यात होऊन जाईल. असे विचार करता करता तिला झोप लागली.


"अगं, आज काय झालंय? किती वेळ झोपली? चल उठ, मी चहा करून ठेवलाय..” या पंतांच्या आवाजाने तिला जाग आली. 


तिची सगळी मरगळ गेली होती. रात्री झोप नीट लागली नव्हती तरी तिला एकदम फ्रेश वाटत होतं. आपलं सगळं आवरून चहा घेऊन टेबलावर बसली. पंत चहा मस्तच करत होते, पण आजच्या चहाची चव जरा जास्तच बरी होती. त्याची पावती तिने पंतांना दिली. "उठा रोज उशीरा बाईसाहेब, मग हा पामर देईलच फक्कड चहा. आज बाईसाहेब जास्तच छान दिसतात म्हटले. कुठे बाहेर वगैरे जायचं आहे का?" पंतांनी विचारले. "नाही हो, पण एक विचार येतोय. सांगू का?"


 "काय बरं?"


"मला ना कार चालवायला शिकावी असे वाटते. आपली गाडीही पडूनच आहे. मध्ये थोडी चालवलेली बरी म्हणतात ना?"


”अगं, लागेल तेव्हा आपला ड्रायव्हर येतो ना?"


"पण मलाच चालवता आली तर?"


"अगं, पण हया वयात!"


"त्यात काय? ड्रायव्हर असेलच ना?"


"चला शिका बाईसाहेब. मग आम्हाला लॉंग ड्राईव्हला घेऊन चला." लगेच त्यांनी त्यांच्या रमेश ड्रायव्हरला फोन लावला व नीट समजावून बाईसाहेबांचा हट्ट पुरवायला सांगितला. आणि खरंच एका लहान मुलीसारखी गाणे गुणगुणत ती न्याहरीची तयारी करायला गेली. रमेश येईपर्यंत सगळं आटपून घ्यायला हवं होतं. बरोबर दहा वाजता रमेशचा फोन आला आणि त्याला महत्वाचे काम असल्या कारणाने आता येऊ शकणार नाही, पण संध्याकाळी नक्की येतो असा त्याने निरोप दिला. ती थोडी हिरमुसली, पण लगेच तिला स्नेहाची आठवण झाली. तिच्याकडे पोहायला शिकायचे. मग आताच फोन लावू म्हणून तिने तिचा नंबर लावला. पलिकडून स्नेहाचा आवाज आला. तिला हायसे वाटले. तिने सरळ विषयालाच हात घातला.


"अगं स्नेहा, मला पाठीचे दुखणे आहे. तुला माहीत आहे ना? त्या करता डॉक्टरांनी व्यायाम म्हणून स्विमिंग करायला सांगितलंय. एक महिना करून बघायला सांगितलंय. मग येऊ ना तुझ्याकडे? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे जाईन म्हणा मी?"असे बोलून ती हसली. मग स्नेहा आणि ती थोडावेळ गप्पा मारत बसल्या. संध्याकाळची सहाची वेळ स्विमिंग करायची ठरली.


पंत दुपारी बाहेर गेले होते तेव्हा तिने आपल्या सूनेला, मेघाला, फोन लावला. खबरबात घेतली व निखिलच्या वाढदिवसाला आम्ही दोघं येतो हे कळवलं. तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल तर आमचं राहू दे म्हणाली. आता सासूबाई आपणहुन येते म्हटल्यावर सुनबाईला आनंदच झाला. तिला थोडे नवलच वाटले. माझ्या करता नाही तरी नातवाकरता येतात तर येऊ दे. निखिलही खूप आनंदित होईल, म्हणून ती त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागली.


दुपारची जेवणे आटपून ती थोडावेळ टी.व्हि. बघत लोळत पडली. थोड्या वेळात तिचा डोळा लागला. ती झोपलीय म्हणून पंत बाहेर वर्तमानपत्र वाचत बसले. साडेपांच वाजले तरी ती उठेना त्यांना काळजी वाटली. त्यांनी हाक मारून उठवले. रात्री झोप नसल्याने तिचा डोळा लागला होता. तिने उठून चहा ठेवला. नंतर पंत व ती चहा घेताना तिने मेघाचा विषय काढला.


"आज रात्री आपण मेघाला फोन लावूया."


"अगं पण तिचा येतोच ना? ती करेलच की आज नाही तर उद्या."


"रोजच ती करते, आज त्याच वेळेला आपण करू."


"बरं बाबा नऊ वाजता ना? लावूया हं...” आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे मेघाला फोन लावला. ख्याली खुशाली, मुलांच्या खोड्या, नवऱ्याच्या तक्रारी सगळं झाल्यावर मेघाने विचारले, "का गं मम्मा, मी उद्या फोन करणारच होते. तू बरी आहे ना?"


"हो गं बाई, अगं, तुम्ही सहा महिन्यानी येणारच ना? पण मुलांची खूप आठवण येते गं. पुढच्या महिन्यात त्यांना सुट्टी आहे ना तर यायला जमतं तर बघा, म्हणून केला होता गं. बघ जावई बापूंना विचार आणि जमलं तर या हो."


"हो बघते. मलाही वाटतं गं. आम्ही प्रयत्न करू. ठेवते हं फोन." असं सांगून तिने फोन ठेवला. सरलाने हळूच डोळे पुसून घेतले. पंतांनी लक्ष दिले नाही कारण माय लेकीचे हे नेहमीचेच होते. सरलाने विचार केला, आली तर माझी भेट होईल, नाहीतर देवाची इच्छा. एवढ्यात रमेशने फोन करून मॅडमना गाडी शिकवायला सकाळी सात वाजता येतो असे सांगितले. उद्या गाडीचे स्टीयरिंग हाती येणार याची स्वप्ने पहात ती झोपी गेली.


दुसऱ्या दिवशी गाडी चालवायचा श्री गणेशा झाला. तिचा उत्साह व धीटपणा पाहून रमेशने आपले मत प्रकट केले. "मॅडम, मला वाटतं तुम्ही आठ दिवसात गाडी चालवणार. खूप हुशार आहात हो. मी एवढ्या लोकांना शिकवतो, पण तुम्ही लगेच शिकून घेतात." त्याच्या अशा बोलण्याने तिचा आणखी उत्साह वाढला. 


त्याच संध्याकाळी ती स्नेहाच्या क्लासला गेली. सुरुवातीला बरीच घाबरली पण स्नेहा तिच्याच बरोबर होती. आपण बुडणार नाही याची खात्री होती. रात्री झोपतेवेळी विचार करायला लागली. बरंच काम केलं फक्त दोन दिवसात. मग सगळी स्वप्ने सहा महिन्यात पुरी होतीलच. तिला तिची बालपणची मैत्रीण माया आठवली. किती वेळा तिने तिच्या घरी बोलावलं, पण तिला भेटताच आलं नाही. मेघाच्या लग्नाला आली होती, पण नंतर भेट नाही. फोनवर बोलतोच. पण नाही, आता तिला भेटायला जायचेच. केवढं कौतुक करते ती स्वतःच्या बंगल्याचं. तो बघून घ्यायलाच हवा. विमानाने जाऊ व दोन दिवसांनी परत येऊ. माझं शेवटचं तिला भेटून यायलाच हवं. पंतांना पण गोवा आवडतो. ते ही आनंदाने तयार होतील. उद्या पंतांशी बोलू. नंतर मायाला फोन लावून येतेय हे सांगू. किती आनंद होईल तिला. चला आता झोपू. आपल्या मैत्रिणीच्या सुखद भेटीचे चित्र रंगवत ती झोपी

गेली.    


 आज सकाळी लवकर उठून सरलाने सगळी कामे आटपून घेतली. रमेश बरोबर दहाला आला. तो सूचना देत असे व त्याप्रमाणे ती सराईतपणे गाडी चालवायची. मध्ये मध्ये तो तिला प्रोत्साहनही द्यायचा व त्यामुळे तिचा उत्साह द्विगुणित व्हायचा. असे दोन तास गाडी चालवून ती घरी यायची. आल्या आल्या शाळकरी मुलीसारखा सगळा रिपोर्ट पंतांना द्यायची. त्यांनाही ते ऐकण्यात मजा यायची. दुपारी जेवण उरकून वामकुक्षी करत होती तेव्हा तिच्या मनात एक विचार आला. आपल्या दोन्ही कट्टा ग्रुपची एक टूर आयोजित केली तर! जसा विचार आला तसा तिने तो जवळ झोपलेल्या पंतांच्या कानावर घातला. त्यांना ही कल्पना आवडली.


ते ही म्हणाले, "सर्वांचे हात-पाय धड असतानाच जाऊन येऊ. नामी कल्पना! आजच संध्याकाळी बोलू. मग सर्वांची एक बैठक घेऊन ठरवू कोठे कधी व कसे जायचे ते." आणि संध्याकाळी दोघांनी आपआपल्या ग्रुपमध्ये चर्चा केली व दुसऱ्या दिवशी त्याच कट्टयावर सर्वांची बैठक घेऊन ठरवायचे ठरले. ठरल्याप्रमाणे बैठक झाली. सरलानेच सर्व पुढाकार घेतला आणि सर्वांच्या मतानुसार पुढच्या महिन्यात कन्याकुमारी व केरळ ला जायचे ठरले. टूर ऑपरेटरला फोन करून बाकीचं कसं काय करायचं ते ठरवलं. पंत व सरलाने पैसे गोळा केले व पुढच्या ५ तारखेला जायचं ठरलं.


अजून एक महिना होता. तो पर्यंत गोव्याला मायाकडे जाऊन यायचे होते. अगोदर सरलाचा विचार होता प्लेनने जावं पण आता केरळ वगैरे जायचं म्हटल्यावर त्यांनी कारनेच जायचे ठरवले. रमेश असणारच, मग गोव्याला फिरायला वगैरे बरं पडेल. आरामशीर येता येईल असा विचार केला. सरलाच्या मनासारखे व्यवस्थित सगळं आखलं गेलं. मध्ये तिच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला तिची खबर घ्यायला.


तिने तिला सुचवलं, "आपण दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेऊया का?" तर सरला बोलली, "नको गं, सगळ्यांना कळेल. आणि त्यांना दाखवून रिपोर्ट थोडाच बदलणार आहे. असू दे, मी सगळं स्वीकारलंय. तू काळजी करू नको."


"अगं त्यावर मग ट्रीटमेंट तरी घेणार की नाही."


"काही नको. सहा महिन्यांनी मरणारच, मग ट्रीटमेंट घेऊन त्रास कशाला वाढवू आणि पैसेही वाचतात. ते पैसे मी चैन करायला वापरते बघ." असं म्हणून तिचे सगळे प्लॅन, कुठे कुठे जाणार, काय काय करतेय हे सगळं सांगितलं. आपल्या आजाराबद्दल कुणाला कळता कामा नये हे ही सांगितलं. हे सगळं ऐकून डॉक्टर चक्रावून गेली व तिला तिचा अभिमानही वाटला.


दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मुलाचा, समीरचा, फोन आला. बायकोकडून आईचा आपल्याकडे यायचा विचार आहे म्हटल्यावर तो खूप खूश झाला. "आई मी तुम्हाला न्यायलाच येतो. सोमवारी वाढदिवस आहे, तरी मी शनिवारीच येतो. तुम्ही तयार राहा." तिला नाही म्हणता आले नाही. एरवी म्हटले असते, पण आता समेट करायचा होता. थोडेच दिवस आहेत, गोडीगुलाबीने राहू. त्या प्रमाणे नातवाच्या वाढदिवसाला भरपूर खरेदी करून सरला व पंत दोन दिवस चांगला पाहुणचार घेऊन परतले. मुलाला आणि सुनेला पुजेचे पण सांगितले. गोव्याला मायाकडून आल्यावर पुजेचा घाट घालायचे पण ठरले. सगळं मनासारखं होतंय म्हणून सरलाच्या अंगी नवचैतन्य संचारले होते.


ठरल्याप्रमाणे रमेशला घेऊन तिघंही मायाकडे गेले. तिनेही त्यांच खूप आदरातिथ्य केलं. जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. सर्व सुखाच्याच गोष्टी केल्या. तिचे मिस्टर व पंतांच पण चांगलं जुळत होतं. परकेपणा अजिबात नव्हता. मायाचा बंगला सुध्दा तिने सांगितल्याप्रमाणे प्रशस्थ होता. सुन मुलगा व तिच्या नातवंडांच्या घोळक्यात चार दिवस कसे गेले ते कळलेच नाही. भरल्या अंतःकरणाने मायाचा निरोप घेऊन ती परतली.


लगेच पूजा करायची ठरली. सूनेला पूजेला बसताना आपला चंद्रहार दिला व "तुलाच ठेव गं" असंही सांगितलं. तिही आनंदली. दोन्ही कट्ट्यावरचे मित्र मैत्रिणी, नातलग, सगळ्यांना तिर्थ प्रसादाला बोलावले. पाहुण्यांनी अचानक पूजा का घातली असं विचारलं तर हिचं उत्तर, "निखिलचा गेल्या आठवड्यात वाढदिवस झाला त्याबद्दल घालायची होती, ती आता घातली." सगळं घर गजबजून गेलं. सरला खूप आनंदित झाली.


तिचं सगळं सुरळीत चाललं होतं. वागण्यात एक ओलावा, प्रेमळपणा व आपूलकी दिसत होती. तिच्या वागण्याने शेजारी - पाजारी, नातेवाईक सगळे जरा कोड्यातंच पडले होते.


केरळ-कन्याकुमारीची सहलही ठरल्याप्रमाणे खूपच छान झाली. तिकडचे फोटो वगैरे भरपूर काढून मेघा व समीरलाही पाठवले. दहा दिवस कसे गेले काही कळलेच नाही. सर्व मित्र-मैत्रिणींनी खूप धमाल केली आणि ती टूर चिरस्मरणीय ठरली.

मेघा सहकुटुंब २५ तारखेला येणार असे तिने कळवले. मग सरलाच्या मनात अजून एक कल्पना आली. मेघा येतेय तर एक 'गेट टुगेदर' ठेवू. सगळे नातलग, मित्र - मैत्रिणी, शेजारी-पाजारी. मला सर्वांना डोळेभरून पाहता येईल. आलेल्या सर्वांना एक रिटर्न गिफ्टही देऊ. हे सगळं तिनं रात्री पंतांना सांगितले. पंतांनाही बरे वाटले. सासू-सुनेचा दुरावा दूर झालाय. सुखद दिवस आलेत. मेघाही येतेय. आणखी सुख ते काय हवंय म्हातारपणात! होऊ दे सगळं तिच्या मनासारखं म्हणून पंतही जोराने तयारीला लागले. समीरलाही सगळं सांगितलं. तो व सुनबाई ही अधुन मधुन येऊन मदत करू लागले. जणू काही एका लग्नाचीच तयारी करतायत असं वाटत होतं. तो हॉल, ते केटरिंग, शोपिंग वगैरे. ह्या सगळ्यांत तिचं स्विमिंग व गाडी चालवणेही चालू होतेच.


मध्यंतरी तिची डॉक्टर मैत्रीण स्वस्थ बसली नाही. एकदा तिने सरलाकडून तिचे सारे रिपोर्ट मागून घेतले. सरला ते द्यायला तयार नव्हती. मग तिने समजावलं. "अगं मी ते गुपचूप एका मोठ्या डॉक्टरांना दाखवणार आहे. तुला काही त्यांच्याकडे नेणार नाही. मग तर झालं?" असं म्हटल्यावर तिने ते दिले.


तिच्या मनात विचार आला, आता एकच कार्यक्रम बाकी, तो म्हणजे गेट - टुगेदर. मग यमाला यायचं तेव्हा येऊ दे. हल्ली माझं पोटदुखीकडे लक्षच नाही. एवढ्या गडबडीत दुखणं विसरूनच गेलेय मी. माणूस आनंदी असला की दुखणं वगैरे विसरायला होतं.


समीरने घरच्या सर्वांबरोबर बसून हॉल, केटरिंग, मेनू वगैरे जवळ जवळ हजार लोकांचा ठरवला. शाॅपिंगला चौघेही गेले. प्रत्येकाचे नवीन स्टायलिश कपडे व रिटर्न गिफ्टसाठी चांदीच्या लहान समया घेतल्या. दिवस ठरला. सर्वांना आमंत्रणे दिली गेली. मेघा वगैरे आल्यावर लग्नघरा सारखंच वाटलं. तिने माया व तिच्या मिस्टरांना पण आवर्जून बोलावले होते. लांबचे नातेवाईक एक दिवस अगोदरच आले होते.


पार्टी संध्याकाळी पाच ते रात्री पर्यंत ठेवली होती. सगळे तयार होऊन चार वाजताच हॉलवर पोचले, पाहुण्यांचे स्वागत करायला. अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणाने सरला एकदम भारावून गेली. एका नवरीसारखी ती नटली होती. सगळा साज चढवताना मनात आले होते, बस पुन्हा काही हे अंगावर चढवले जाणार नाही. हळुवारपणे साऱ्या दागिन्यांवर तिने हात फिरवला. एवढे दिवस टिकवून ठेवलेला धीर आता घसरतो की काय असं वाटलं, पण नाही. लगेच ती सावरली. बाहेर येऊन पाहुण्यांचे स्वागत करू लागली. तेवढ्यात तिची डॉक्टर मैत्रीण आली. आल्या आल्या तिला घट्ट मिठी मारली व तशीच ओढत तिला आतल्या रूममध्ये घेऊन गेली. रुमचे दार बंद केले आणि ओरडली, "माय डार्लिंग सरला, तुला काहीही झालेले नाही! तो रिपोर्ट तुझा नव्हताच. तुझे नाव टायपिस्टच्या चुकीमुळे छापले गेले व सगळा घोळ झाला."


"अगं, पण हे तुला कोणी सांगितलं?"


"मी मोठ्या डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनीही तसंच सांगितलं. पण त्यांना काही तरी शंका आली. त्यांनी तेथे फोन लावला आणि तुझे रिपोर्ट पुन्हा मागितले. हा माझ्या हातात आहे तो रिपोर्ट." दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.


"बरं झाल गं त्या रिपोर्टमुळे. चल ये बाहेर, मला सर्वांनाच हे सांगायचंय", असे म्हणून ती बाहेर स्टेजवर चढली. मायक हातात घेऊन ती बोलू लागली, "सर्वांचे स्वागत. तुम्हा सर्वांच्या मनात आलं असेल, ही पार्टी कशासाठी? माझी ही तुम्हा सर्वांबरोबर शेवटची पार्टी म्हणून मी आयोजित केली होती. पण या डॉक्टर, मालिनी देशपांडे, आल्याने माझ्या आयुष्यातला सारा गुंता मोकळा झाला. गेले तीन महिने मी एका वेगळ्याच तणावात वावरत होते. त्याचे कारण, माझ्या पोटात खूप दुखत असल्याने मी डॉक्टरकडे गेले. त्यांनी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या. त्यात मला आतड्यांचा कॅन्सर असल्याचे निदान झाले व फक्त सहा महिनेच माझ्याकडे असल्याचे सांगितले. या सहा महिन्यात माझ्या सगळ्या आशा आकांक्षा पुऱ्या करायच्या म्हणून मी जोमाने कामाला लागले. पहिली गोष्ट माझ्या सुनेला माझ्या जवळ केली, आता आमची मैत्री जमलीय. तिच्या हातून पूजा घालून घेतली. मी माझ्या आवडी पूर्ण केल्या. पोहणे, गाडी चालवणे, अमेरिकेतल्या मुलीला मुद्दाम बोलावले, गोव्याला मैत्रिणीला भेटले, कन्याकुमारी-केरळ टूर केली व आता या पार्टिचे आयोजन केले."


हे ऐकल्यावर सगळेच दचकले. मेघा तर रडायलाच लागली. सरला बोलतच राहिली, "बिचाऱ्या कुणाच्या तरी रिपोर्टवर चुकीने माझे नाव लिहिले गेले व सगळे रामायण घडले. पण एक बरे झाले, चुकीच्या रिपोर्टने माझे जीवन बदलले व माझा मुलगा सून व नातू माझ्या जवळ आले. आयुष्यभर शिकले नव्हते ते अवघ्या दोन महिन्यात आत्मसात केले. वाईटातून चांगलच झालं. खूप खूप धन्यवाद... डॉक्टर साहेब व तुम्हा सर्वांचे. चला, लेट अस एन्जॉय द पार्टी." टाळ्यांच्या कडकडाटात सगळ्यांनी तिला अभिनंदन केले व पार्टीचा आनंद घेऊ लागले.


 समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Shobha Wagle

Similar marathi story from Drama