ऋचाचे धाडस
ऋचाचे धाडस
ऋचा आणि सौरभ ही दोघं सख्खी भावंडं, सौरभ मोठा, ऋचा त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान. दोघांनाही पोहायची विलक्षण आवड. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन दोघांनी पुष्कळ बक्षिसं मिळवली होती.
दिवाळीच्या सुट्टीत दोघंजण आई-बाबांबरोबर कोकणात ट्रिपला गेले होते. गणपतीपुळ्याला मंदिरात जाऊन आल्यावर सगळेजण समद्रकिनाऱ्यावर गेले. इतरही बरेच प्रवासी किनाऱ्यावर होते. कुणी निळाशार समुद्राचं विशाल दृश्य पहात वाळूवर बसले होते, कुणी किनाऱ्यावरून चालत होते. मुलं वाळूची घरं बनवत होती. काही मुलं पाण्यात खेळत होती. ऋचा आणि सौरभ तर पट्टीचे पोहणारे. तेही पाण्यात उतरले. थोडा वेळ पोहून दोघं परत निघाले तेवढ्यात आरडाओरडा ऐकू आला. 'वाचवा, वाचवा' म्हणून काही मुलं ओरडत होती. त्यांनी बोट केलेल्या दिशेला सौरभ आणि ऋचानं पाहिलं तर कुणीतरी गटांगळ्या खात होतं. ऋचानं क्षणाचाही विचार न करता त्या दिशेनं हातपाय मारले. 'ऋचा, थांब. नको जाऊ. भरतीची वेळ आहे, सौरभ तिला सांगत होता. पण ऋचा झपाट्यानं निघाली. जवळ गेल्यावर तिला बुडणारा मुलगा दिसला. त्याचा शर्ट पकडून ऋचानं खेचलं आणि एका हातानं त्याला आधार देत ती किनाऱ्यावर घेऊन आली.
किनाऱ्यावर तोवर पुष्कळ जण गोळा झाले होते. त्या मुलाच्या रडणाऱ्या आई-वडिलांकडे ऋचानं त्याला सोपवलं. जमलेल्या सगळ्यांनीच ऋचाची पाठ थोपटली. 'मुलगी ही मुलाइतकीच धाडसी असू शकते. कुठल्याच बाबतीत मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, हे आज तू दाखवून दिलंस, बेटा.' त्या मुलाचे वडील ऋचाला म्हणाले. हे ऐकताना ऋचाच्या आई-वडिलांचा चेहराही अभिमानानं फुलला होता.
