Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

राधा

राधा

4 mins
86


     आज कॉलेजचा पहिला दिवस होता. सर्वच मुलांना आणि मुलींनाही एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. दहावी नावाचं खडतर वर्ष कसंबसं रेटत नेऊन एकदाचा सर्वांनी मोकळा श्वास घेतला होता. बाहेर पावसाला आणि आत मनात आनंदाला उधाण आलं होतं. टीव्ही आणि फिल्म मध्ये दाखवतात ना कॉलेज वगैरे तसलं फिल सर्वच मुलं घेत होती. पण हे कॉलेज म्हणजे फक्त ज्युनिअर कॉलेज होतं. ज्या शाळेत शिकून पुढे शिकण्यासाठी जायचं होतं त्याच शाळेत आणखी दोन वर्षे काढावी लागणार होती हेही तितकंच खरं होतं. हो पण मोकळेपणा नक्कीच होता. आणि बाहेरील गावच्या शाळेतील मुले मुली नव्याने येणार याची उत्सुकताही लागलेली होती. 

       

शैलेश आणि बाळ्या कधीच येऊन वर्गात बसलेले होते. नेहमीप्रमाणे त्यांचं बस्तान हे शेवटच्याच बाकावर होतं. अजून तरी वर्गात कोणी शिक्षक आलेलं नव्हतं नुसता धिंगाणा चाललेला होता. शैलेश तसा शाळेच्या दिवसात शांत असायचा पण आता तो जरा जास्तच खोडकर वाटत होता. बाळ्या त्याचा जिगरी तसं बाळ्याचं नाव दीपक होतं पण गावात त्याला बाळ्या म्हणायचे. शैलेश आपला साधा सरळ होता. कुणाच्याही वाकड्यात जाणं त्याला कधी जमत नव्हतं. केसांच्या भांगापासून त्याच्या रहाण्याच्या सवयीपर्यंत त्याच्या सर्वच गोष्टी वेगळ्या असायच्या. आज पहिला दिवस असल्याने तो ही वेगळ्याच उत्साहात होता. 

      

बऱ्याच वेळा नंतर लांब गावाहून येणाऱ्या मुलींचा घोळका वर्गाच्या दारावर येऊन धडकला आणि सर्वच मुलांच्या भुवया उंचावल्या. एक एक मुलगी आत येत होती. तसतशी मुलांच्या नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या मनांची घालमेल होत होती. आणि इतक्यात राधिका वर्गात शिरली. खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या झोताने ती बंद करत असलेल्या छत्रीला सावरण्यासाठी तिची ती केविलवाणी धडपड कित्येक जणांच्या काळजावर वार करून गेली. गोरा वर्ण, चाफेकळी नाक, डोळे तर असे होते की अगदी सहज त्यामध्ये बुडून जाता येईल. तिची ती नजर नक्कीच काहीतरी सांगत असावी असं क्षणभर शैलेशला वाटून गेलं. ती नजर काहीतरी बोलत आहे असं त्याला वाटलं खरं पण त्याने तिच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं. कारण त्याच्या मनात आधीपासूनच दुसऱ्या मुलीने राज्य केलं होतं. 

       

बघता बघता अकरावी झाली. बारावीचं खडतर वर्ष चालू झालं पण तरीही वर्गात केली जाणारी मस्ती ती मजा काही कमी झालेली नव्हती. त्यात शैलेश आणि बाळ्या हे दोन बहाद्दर असताना काय बोलायलाच नको. राधिकावर लाईन मारणारी पोरं नुसती स्वप्नातच होती. शैलेश सुद्धा अधून मधून बघायचा तिच्याकडे पण का कोणास ठाऊक तो त्याला आवडलेल्या मुली मध्ये पूर्ण गढून गेलेला होता. मुलींना चिडवणे, वर्गात मस्ती करणे या सर्वात जरी तो अग्रेसर असला तरी त्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चालू असायचं. त्याला ओळखणं इतकं सोप्प नव्हतं. 

       

बारावीचं वर्ष सुद्धा आलं तसं निघून गेलं. निकाल लागल्यानंतर जो तो आपापल्या विश्वात हरवून गेला. शैलेश पुढे जॉब करू लागला होता. त्याच्या नंतरच्या आयुष्यात त्याने कित्येक मुलींशी मैत्री केली असेल पण तरीही तो अजूनही स्वतःला अपूर्णच समजत होता. त्याचं पहिलं प्रेम त्याचं कधीच झालेलं नव्हतं त्यानंतरही अनेक मुलींशी मैत्री करूनही तो प्रेमात कधी पडला नाही. आणि त्याच्या आयुष्यात ती आली इथे मात्र तो थोडासा विसावला होता. पण वर्षभराच्या काळातच ती सुद्धा त्याला सोडून निघून गेली. दिवस असेच निघून जात होते. कॉलेजमध्ये केलेली मस्ती आणि सर्व मुलांच्या मनावर राज्य करणारी राधिका कधीतरी आठवणी बनून डोळ्यासमोरून जात होत्याच. पण अशा कित्येक आठवणी बोचक्यात गुंडाळून ठेवलेल्या होत्या. आता मात्र शैलेशचं लग्न सुद्धा झालं होतं इथपर्यंत त्याच्या आयुष्यात आलेल्या मुलींची लिस्ट मात्र खंडित झालेली नव्हती. अनेक मित्र त्याला कृष्ण म्हणायचे. आता तर त्याला रुक्मिणी सुद्धा मिळालेली होती. पण जेंव्हा कधी तो मागे वळून पहायचा तेंव्हा त्यालाच कळायचं नाही की त्याच्या आयुष्यात आलेली राधा नक्की कोण होती. 

       

अजून पाच-सहा वर्षे उलटून गेली. एक दिवस त्याला कुठल्याश्या सोशल साईटवर राधिका दिसली. आणि त्यांची पुन्हा नव्याने ओळख निर्माण झाली. असंच बोलता-बोलता त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. भेटायचा दिवस ठरला आणि त्या दिवशी ते एकमेकांना भेटले. वर्गातल्या गमती जमती सांगताना हास्याचे फवारे उडत होते. त्या हॉटेलमध्ये बसल्या-बसल्याच ते मनाने कधीच कॉलेज मध्ये गेले होते. इतक्यात राधिका म्हणाली

"शैलेश अजून काय आठवतं रे तुला कॉलेजमधील"

"अजून काही बाकी आहे का. ?" शैलेश बोलला

"काही नाही जाऊदे" थोडंस नाराज होत राधिका बोलली. 

"अरे बोल की काही बोलायचंय का" शैलेश असं म्हणत होता तितक्यात राधिका उठली आणि तिने रागातच शैलेश च्या कानाखाली वाजवली. क्षणभर काय झालं हे दोघांनाही कळालं नाही. बराच वेळ शांततेत गेला. मग राधिका म्हणाली " मला वाटलं बदलला असशील पण अजूनही तसाच आहेस मनाचा तळ कळू न देणारा"

यावर न राहवून शैलेश बोलू लागला. तू मला आवडत होतीस पण का कोणास ठाऊक माझं तुझ्यावर प्रेम होतं की नाही हे मला अजूनही कळलेलं नाही. तुला तर माहीतच असेल त्या वेळी माझं विश्व वेगळं होतं. त्या वेळी धड मैत्रीचाच अर्थ नीटसा समजलेला नव्हता प्रेमाचा काय समजणार. पण हो इतर मित्र मैत्रिणीप्रमाणे मला अजूनही तू आठवतेस. एक छान मैत्रीण म्हणून. 

     

दोघांच्याही मधील कॉफी कधीचीच थंड होऊन गेली होती. शैलेश ने राधिकाकडे पहिलं तर तिचे डोळे भरून आले होते. ती सांगत होतीस. मला तू आवडायचास रे.. माझं प्रेम होतं तुझ्यावर.. तुला कळालं कसं नाही.? मीच चुकले मीच बोलायला हवं होतं. पण असो आता इतकंच सांगेल माझं सर्व छान चालू आहे. संसारात अपेक्षेपेक्षा खुप काही आहे. फक्त मनाचा एक कप्पा रिकामाच राहील तुझ्यासाठीचा. ती रडतच होती. शैलेशही पूर्ण भांबावला होता. थोडा वेळ बसून तो तिला म्हणाला "आपण एकमेकांसाठी नव्हतोच बनलो कदाचित पण आपली मैत्री तर कायम राहू शकते ना.." त्याच्या या वाक्यावर राधिका थोडीशी हसली. आणि तिने शैलेश ला घट्ट मिठी मारली. ती शांत झाल्यावर शैलेशने तिला बाजूला केलं. नंतर दोघेही घरी निघून गेले. 

      

आता त्यांच्या मध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. वेगवेळ्या विषयांवर त्यांचं बोलणं व्हायचं. एक दिवस असंच फोनवर बोलताना शैलेश राधिकाला म्हणाला. मला माझे मित्र कृष्ण म्हणायचे पण खरं सांगायचं झालं तर या कृष्णाची राधा नक्की कोण होती हे कळालं नाही. कदाचित तिला शोधायला मीच कुठेतरी कमी पडलो असेल. पण एक सांगू... मला ना माझी राधा सापडली आहे.... 

पण त्या कृष्णा सारखंच त्यांचं एकमेकांना भेटणं शक्य नाही.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance