राधा (भाग २)
राधा (भाग २)


गाडी थांबली. राधाने डोळे उघडले. तिच्या स्वप्ननगरीत ती पोहोचली होती. दोघेही गाडीतून उतरले आणि त्यांच्या नव्या घराच्या दिशेने चालू लागले. घर कसले खुराडेच होते ते. इतक्या दिवसांच्या कष्टानंतर एक लहान खोली शरदला भाड्याने घेता आली होती. घर म्हणावे असे त्यात काहीच नव्हते. एक कोपऱ्यात ठेवलेले अंथरुणाचे कपडे आणि खुंटीला अडकवलेले शरदचे कपडे सोडून तेथे काहीच नव्हते. त्याला घरपण आता कुठे येणार होते. राधाने आत प्रवेश केला आणि तिने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. निवाऱ्याची तेवढी जागाच तिच्यासाठी पुरेशी होती. दोघेही दमलेले होते. घरून सोबत आणलेले जेवण जेवून दोघेही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी शरदला कामावर जायचे होते सकाळी उठून त्याने आवरले. राधाच्या जेवणाची सोय केली आणि कामावर निघून गेला. आज दुपारीच निघून येईल असेही तिला जाताना सांगून गेला. तो गेल्यावर राधाला करायला विशेष काहीच नव्हते. आपल्या घराच्या सफाईपासून तिला सुरुवात करायची होती. तिने तेच काम हाती घेतले. थोड्याच वेळात ते उरकलेही आणि मग जेवण करून शरदची वाट पाहत बसली. शरदही सांगितल्याप्रमाणे वेळेत घरी पोहोचला. तोपर्यंत तिने आपल्या संसाराला लागणाऱ्या कमीतकमी गोष्टींची यादी मनात बनवून ठेवली होती. दोघेही बाजारात गेले. जवळ आहेत तितक्या पैशांमध्ये जास्तीत जास्त गोष्टी त्यांना बसवायच्या होत्या. दुकानही त्या हिशोबाने निवडले गेले. अगदी ताटवाटी पेल्यापासून रेशनच्या सामानापर्यंत सगळेच घ्यायचे होते. त्यानुसार सध्या काय गरजेचे आहे, हे पाहून वस्तू घेण्यात आल्या. खरेदी उरकली.
संध्याकाळ झाली. दोघेही घरी पोहोचले. राधा प्रचंड खुष होती. तिला तिचा संसार थाटायचा होता. बघता बघता तिने सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मांडल्या. सारे काही तिच्या मनाजोगते होते. सर्व आवरून शरदला बनवलेला चहा घेऊन त्याच्या पुढ्यात उभीही राहीली. तो थक्कच झाला. तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहताच राहिला. आपल्या त्या अंधारलेल्या खोलीचे हे बदललेले रूप पाहून तोही आनंदून गेला. आपल्या राधाच्या त्याला अभिमान वाटला. राधा होतीच तशी. कष्टाळू आणि तितकीच जिद्दी. मनमोकळी अन तितकीच शांत. प्रेमळ पण तितकीच कठोर. आहे त्या परिस्थितीत आनंदाने कसे राहावे, हे तिच्याकडून शिकावे. कधीच तक्रार नाही आणि जास्तीच्या अपेक्षाही नाहीत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती तितकीच सहज स्वीकारत असे. तिच्यावर प्रेम करावे, असे हजारो गुण तिच्यात होते.
अशा या राधाचे नवे आयुष्य आशा थाटात सुरू झाले. एक एक दिवस जाऊ लागला. शरद कामावर जात असे, त्यानंतर संपूर्ण दिवस तिचाच असे. त्या घरातच तिचा सगळा दिवस जात असे. हळूहळू तिही बाहेर पडू लागली. घरात लागणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तू, भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने तिलाही जगाची ओळख होऊ लागली. दिवस जाऊ लागले तसा तिलाही घरात नसून राहण्याचा कंटाळा येऊ लागला. एवढ्याश्या पैशात संसार चालवणे अवघड आहे, ही जाणीव कुठेतरी घर करू लागली. आपणही काम करावे आणि संसाराला हातभार लावावा, असे तिला वाटू लागले. तिने तसे शरदला बोलूनही दाखवले. सुरुवातीस शरद ऐकायला तयार होईना; पण त्यालाही राधाचे म्हणणे पटले. शेवटी त्याने होकार दिला.
एक कारखान्यात मजूर म्हणून शरद कामाला जात असे. तेथे बायकाही कामासाठी येत. त्याने राधासाठीही कामाची चौकशी केली. ठेकेदाराने परवानगी दिली. आता दोघेही कामाला जाऊ लागले. गरजाही वाढू लागल्या आणि त्या पूर्ण करण्याचे साधनही मिळाले. त्यात दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ मिळू लागला. दोघेही खुष होते. पण राधाची दगदग मात्र वाढली. कामाबरोबरच तिला घरातले कामही सांभाळावे लागत. दमल्याचे कारण देऊन, शरद कामावरून आल्यावर झोपून घेत असे. राधा दमून भागून येऊनही जेवण बनवत, सगळी कामेही करत. तिची तक्रार काहीच नव्हती. पण अजून खूप काही पहायचे बाकी होते.