Nagesh S Shewalkar

Inspirational

3  

Nagesh S Shewalkar

Inspirational

पुरस्काराची कथा

पुरस्काराची कथा

8 mins
1.5K


       सायंकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी मी तयार झालो होतो. माझ्यासोबत माझा मित्र सुरेशही नित्यनेमाने फिरायला येत असे. त्यादिवशी मी त्याची वाट पाहात असताना त्याचा चिरपरिचित आवाज आला. पाठोपाठ तोही आत आला. आल्या आल्या जोरजोरात हसायला लागला. मला काहीच अर्थबोध होत नव्हता.

"सुरेश, अरे काय झाले? असे हसतोस का ?"

"थ..थ..थांब. सारे सांगतो. अरे, मला पुरस्कार मिळालाय...."

"पुरस्कार? तुला? काय सांगतोस, सुऱ्या? अभिनंदन! हा कितवा पुरस्कार रे?"

"थांब रे बाबा, थांब. ती गंमतच झाली आहे."

"गंमत आणि पुरस्काराची?"

"होय. पुरस्कार मिळावा म्हणून माझी शिफारस करणाऱ्या व्यक्तीलाच पुरस्कार मिळाला."

"आणि तुला?"

"तीच तर गंमत आहे. चल. सांगतो." असे म्हणत तो बाहेर पडला. मीही त्याच्या मागे निघालो........

   सुरेश आणि मी दोघे कार्यालयीन मित्र. दोघांची बदली एकाच दिवशी, एकाच कार्यालयात झाली. योगायोगाने दोघांनाही शेजारी शेजारी टेबल मिळाले. सुरुवातीच्या परिचयानंतर दोघांमध्ये हळूहळू मैत्री जुळून आली. कदाचित सुरेशचा विनोदी स्वभाव त्यासाठी कारणीभूत असेल. शिवाय दोघेही समवयस्क. थोड्याच दिवसात त्याचा आणखी एक स्वभावविशेष लक्षात आला. सुरेश एक चांगला विनोदी कथाकार होता. कार्यालयात, सोबत असताना तो छोट्याछोट्या गोष्टीवर विनोद करायचा. त्या विनोदावर नंतरच्या दोन-तीन दिवसात एखादी सुंदर विनोदी कथा लिहून मला वाचायला द्यायचा. काही कथा मोठ्या चमत्कारीक, अफलातून असायच्या. त्या कथा बाष्कळ किंवा वात्रट नसायच्या. त्या वास्तवावर आधारलेल्या असायच्या. वाचक हसता हसता अंतर्मुख होई. विनोदी फटकारे देताना तो वास्तव समोर आणायचा. त्याचे दोन-तीन विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले होते. त्याच्या संपर्कात आल्यापासून मलाही वाचनाची सवय लागली होती. त्याची भेट होण्यापूर्वी मी अक्षरशत्रू नसलो तरीही का कोण जाणे कथा, कादंबरी, कविता वाचायचा मला फार कंटाळा येत असे. मात्र सुरेशच्या कथांमुळे मला वाचणाची आवड निर्माण झाली.

   साहित्यिक सुरेशला अजून एक छंद होता. विविध स्पर्धा वा सामाजिक संस्थाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार स्पर्धेत तो सहभागी होत असे. कुठेही तशी जाहिरात आली की, तो त्याची तयार असलेली पंजिका पाठवून देत असे. पाच-सहा ठिकाणी पंजिका, माहिती, पुस्तके पाठवले म्हणजे त्यापैकी एक तरी पुरस्कार नक्कीच मिळत असे. पुरस्कार मिळाला की मग वर्तमानपत्रात बातमी देणे, कुणी कुणी अभिनंदन केले त्या नावांची यादी तो छापून आणत असे. अगदी पत्नीचेही नाव अभिनंदन करणारांच्या यादीत टाकत असे.

   पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था प्रस्तावासोबत शंभर ते हजार रुपयांपर्यंत फी घेत असत. सुरेश त्यांची ती अटही विनातक्रार पूर्ण करत असे. पुरस्कार म्हणून चमचमीत, आकर्षक सन्मानचिन्ह, रंगीत प्रमाणपत्र, शाल, हार, श्रीफळ मिळाले की तो प्रस्ताव पाठवण्यासाठी लागलेला खर्च, केलेले श्रम सारे काही विसरून जात असे. त्यातच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा त्याच्यासाठी दुग्धशर्करा योग! तो सर्वांना पुरस्कार म्हणून मिळालेले साहित्य, छायाचित्रे सारे काही दाखवत असे. पुरस्कार मिळाला की, कुणी न मागता कार्यालयात सर्वांनाच चहा, बिस्किटे अशी पार्टी ठरलेली असे. एखाद्या वेळी पुरस्कार घेऊन आला की तो वैतागून म्हणत असे,

"साला वीट आलाय या पुरस्कारांचा..."

"का रे का? कार्यक्रम झाला नाही का?"

"झाला रे बाबा, झाला. पण केवढा लांबलचक. शिवाय तब्बल तीन तास उशिरा सुरू झाला."

"पुरस्कार मिळाला ना?"

"मिळाला म्हणजे काय? उपकार केल्याप्रमाणे दिला. पुरस्कार प्राप्त लोक किती असावेत. चक्क सातशे! देवळापुढे भिकारी उभे करावेत त्याप्रमाणे सर्वांना एका रांगेत उभे केले आणि पुरस्कारांचे वाटप केले. या लोकांनाही काय होते ते माहिती नाही रे, पण असले विकत पुरस्कार घेण्यात कोणता आनंद मिळतो कुणाला ठाऊक?"

"सुरेश, तू सुद्धा पैस भरले होते ना?"

"हो रे बाबा, हो. पुरस्काराची एक नशाच असते यार. एकदा का चस्का लागला ना की मग राहवत नाही रे. पंजिका पाठवण्याचे आवाहन दिसले ना की मग प्रस्ताव पाठवेपर्यंत चैन पडत नाही रे. पुन्हा तो पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी वेगळ्याच."

   एका रविवारी सकाळी सकाळी सहा वाजता सुरेशचा फोन आला. तो म्हणाला,

"अरे, आपल्याला आत्ता अमरावतीला जायचे आहे. तयार हो. मी येतोय."

"अरे, पण कशासाठी?" मी विचारले.

"नसत्या चौकश्या करु नको. तयार रहा...."

काही वेळातच सुरेश आला. आम्ही अमरावतीच्या बसमध्ये बसल्यावर त्याने सांगितले की, तिथे एका सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होता. सुरेशला तो पुरस्कार मिळाला होता. आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो. तिथे तोबा गर्दी! कार्यक्रमही नियोजित वेळेनंतर दोन तासांनी सुरू झाला. प्रेक्षक कमी आणि पुरस्कार विजेते अधिक अशी अवस्था! आम्ही दोघे एका रांगेत शेजारील खुर्च्यांवरवर बसलो. प्रमुख पाहुणे म्हणून एक मंत्री उपस्थित होते. परंतु त्यांना इतर अनेक ठिकाणी जायचे असल्यामुळे सत्कार स्विकारुन, मोजून दोन मिनिटे बोलून मंत्री निघून गेले. संस्थेचे अध्यक्ष म्हणाले,

"विजेत्यांचे अभिनंदन! संस्थेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार स्विकारण्यासाठी राजाच्या कानाकोपऱ्यातून लाभार्थी उपस्थित आहेत. आम्ही पुरस्काराचे खऱ्या अर्थाने सार्वत्रिकीकरण केले आहे, पुरस्कार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविले आहेत. समोर बसलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये शिक्षक, साहित्यिक, डॉक्टर, वकील, इंज, कारकून, चपराशी, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तर आहेतच पण गावपातळीवर छोटामोठा व्यवसाय करणारा माणूस आहे. अगदी गवंडी, सुतार, पानपट्टीवालासुद्धाआहे. आज या ठिकाणी सतराशे बहात्तर व्यक्तींना पुरस्कारीत करण्यात येत आहे. आपणास विनंती की, आपण जागेवरच बसावे. आमचे कार्यकर्ते आपण बसला आहात तिथे येऊन शाल, श्रीफळ, हार, स्मृतिचिन्ह, स्मृतीपत्र दे आपला सन्मानपूर्वक सत्कार करतील. कृपया स्मृतीपत्रावर आपण नंतर स्वतःचे नाव टाकून घ्यावे. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी रांगे रांगेत पुरस्कार वितरण सुरू झाले. खुर्चीवर बसलेल्या एकूणएक व्यक्तीचा सत्कार होतोय हे पाहून मी म्हणालो,

"सुरेश सर्वांना पुरस्कार मिळतोय."

"होय. आपलाही होईल. "

"आपला म्हणजे? माझाही होईल?"

"होय. तुझाही..."

"पण मी तर प्रस्ताव, त्यासाठीची फिस काहीही भरले नाही."

"मी तरी कुठे भरलेय? अरे बाबा, साधे नाव न पाठवताही आजकाल पुरस्कार मिळत आहेत. कुणी कुणाला विचारत नाही. दोन-तीन कार्यक्रमांमध्ये माझ्या ही गोष्ट लक्षात आली. जसे लग्न लागल्याबरोबर बुफेसाठी गर्दी होते, त्या गर्दीत सारेच आमंत्रित असतात असे नाही तर केवळ जेवणावर ताव मारायला आलेले अनेक असतात. त्याप्रमाणे या पुरस्काराचे झाले आहे. तू का वाईट वाटून घेतोस. तू एक चांगला वाचक आहेस. असे समज, एका उत्कृष्ट वाचकाचा नकळत सत्कार होत आहे."

कुठलाही प्रस्ताव न देता, साधी फी न भरता, नावही न पाठवता आम्ही दोघे राज्यस्तरीय पुरस्कार घेऊन परतलो. त्यानंतर पाच-सहा महिन्यांनंतरची गोष्ट. सुरेश नेहमीप्रमाणे कार्यालयात आला. स्वारी भलतीच खुशीत होती.

"काय सन्मान्य, प्रसिद्ध साहित्यिक सुरेशजी, एखादा पुरस्कार पटकावला काय?"

हातातले वर्तमानपत्र टेबलावर टाकून तो म्हणाला,"होय. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार!"

"काही तरी बडबडू नकोस. तुला एका कारकूनाला आदर्श शिक्षक पुरस्कार?"

"मला नाही रे बाबा. आपण पाठविलेल्या नावाला."

"म्हणजे?"

"ऐक. आठवते का तुला? सात-आठ महिन्यांपूर्वी आपली पैज लागली होती की, शिक्षक नसलेल्या व्यक्तीला राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून देण्याची..."

"हो.हो. आठवते. मला....."

"मग तुला हे ही आठवत असेल की, आपण इथल्या मोठ्या पुढाऱ्याकडे गेलो होतो..."

"होय. त्यांनी शिफारस पत्र दिले होते."

"आणि त्या शिफारसपत्राने काम झाले."

"म्हणजे तू ज्या कुणाची शिफारस केली होती, त्याला हा पुरस्कार मिळाला?"

"अरे बाबा, जी व्यक्ती अस्तित्वातच नाही अशा माणसाला पुरस्कार मिळाला. ते नाव कपोलकल्पित होते. समजा, दैवयोगाने त्या नावाची व्यक्ती जिवंत असली तरी ती काळी का गोरी, ती शिक्षक आहे का नाही तेही मला माहिती नाही. केवळ शासकीय वेंधळा कारभार सिद्ध करण्यासाठी ...."

"पण हे झाले कसे?"

"झाले असे, त्या पुढाऱ्याचे शिफारस पत्र मी सरळ शिक्षणमंत्र्यांकडे आणि त्याची एक झेरॉक्स प्रत काढून मुख्यमंत्र्यांना रजिस्टर्ड पोस्टाने पाठवली होती. त्यांनी शेरा मारून संबंधित विभागाकडे पाठवली असणार. नंतर त्या पुढाऱ्याच्या नावाने मी अनेक फोन केले. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री या दोघांची शिफारस म्हणाल्यावर काय आगा देखा ना पिछा! दिले नाव टाकून. झाला पुरस्कार जाहीर! बघ हीच त्या पत्राची झेरॉक्स प्रत आणि वाच हे वर्तमानपत्र! आहे का नाही तेच नाव? दे टाळी! मी शर्यत जिंकलो...." सुरेश सांगत असताना मी हसावे का रडावे या अवस्थेत डोक्याला हात लावून त्याच्याकडे पाहात राहिलो. घडवून आणलेली घटना विनोदी की वास्तव? अशाच भन्नाट प्रसंगातून तो विचारात्मक विनोद घडवून आणत असायचा. अनेक ठिकाणी प्रस्तावासोबत कुणाचे ना कुणाचे शिफारस पत्र जोडावे लागायचे. ते मिळवण्यासाठी सुरेश जीवापाड धावपळ करायचा. एक म्हणता चार व्यक्तींकडे जाऊन शिफारस पत्र मिळवायचा. त्याने स्वतःची पंजिका अगदी सुव्यवस्थित, अद्ययावत तयार करून ठेवली होती. त्याचा प्रस्ताव कोणत्याही क्षणी तयार असायचा. आवश्यक असल्यास शिफारस पत्रे आणि फिसचा डी. डी. जोडून प्रस्ताव पाठवून देत असे. नंतर त्या संस्थेला, त्या प्रमुख व्यक्तीला, पदाधिकाऱ्यांना फोन करून येनकेनप्रकारेण तो पुरस्कार मिळवूनच दम घ्यायचा. त्याने पाठविलेल्या प्रस्तावासोबत अनेक छायाचित्रे असायची. त्याखाली त्या छायाचित्राची व्यवस्थित माहिती लिहिलेली असे. काही छायाचित्रे आणि त्याखाली लिहिलेल्या माहितीचा अर्थाअर्थी संबंध नसे. अनेक कार्यक्रमांना, लग्नाला तो केवळ फोटोसाठी जात असे. तिथल्या छायाचित्रकाराला पैसे देऊन स्वतःचे वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो काढून घेत असे. त्याखाली कोणताही संबंध नसलेली माहिती लिहायचा. एका लग्नात जेवणाच्या टेबलाजवळ उभे राहून जेवण वाटप करतानाचे छायाचित्र काढले आणि त्याखाली लिहिले,'कुष्ठरोग निवारण दिनी कुष्ठरोग्यांना सुग्रास जेवण वाटप करताना.... सुरेश!' त्याचा एक पाहुणा अपघातात सापडला. त्याला दवाखान्यात रक्त देत होते. सुरेशने त्याच्यासह छायाचित्र काढले आणि लिहिले,'रक्तदान शिबीर! आयोजक... सुरेश! या शिबिरात तीनशे व्यक्तीनी रक्तदान केले.'

एकदा त्याचा मुलगा शाळेत जाताना रडत होता, त्याला बिस्कीट पुडा हवा होता. बापबेटे शाळेत निघाले. जाताना बिस्कीट पुडा घेतला. सोबत नेहमीचा छायाचित्रकार घेतला. शाळेच्या पटांगणात स्वतःच्याच मुलाला बिस्कीट पुडा देताना छायाचित्र घेऊन लिहिले, 'वाढदिवसानिमित्ताने मुलांना खाऊ वाटप करताना प्रसिद्ध साहित्यिक सुरेश!'

एकदा त्याच्या घरी त्याच्या बायकोने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. खूप महिला जमल्या होत्या. सुरेशने छायाचित्रकार बोलावला. फोटो म्हणताच बायका व्यवस्थित बसल्या. त्या बायकांच्या पुढे भाषण करण्याची पोज घेऊन छायाचित्राखाली लिहिले,'महिला दिनाच्या निमित्ताने कथाकथन करताना... सुरेश!'

त्याच्या गल्लीत क्रिकेट स्पर्धा होती. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुरेशच्या हस्ते झाले. सुरेशने त्या छायाचित्राखाली लिहिले,'विभागस्तर क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ... हस्ते सुरेश!'

   पुरस्काराची एक आठवण सुरेश नेहमी खदखदून हसून सांगतो. एकदा वर्तमानपत्रातील जाहिरातीप्रमाणे स्वतःचा रंगीबेरंगी प्रस्ताव आणि सोबत आकारलेली फिस रुपये दोन हजार त्याने पाठवून दिले. दोन महिन्याने त्याची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र, कार्यक्रम पत्रिका त्याच्या हातात पडली. बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार म्हणून सुरेश कमालीचा आनंदलाः त्याने भेटेल त्याला पार्टी देण्याचा सपाटा लावला. कार्यक्रम पार तिकडे कोकणातील एका तालुक्याच्या ठिकाणी होता. पठ्ठ्याने चांगली दहा दिवस रजा टाकली. कुटुंबासह तो प्रवासाला निघाला. देवस्थानांना, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत तो कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सकाळी त्या गावी पोहोचला. शहर बरेच मोठे होते. लॉजवर सारे सामान टाकून, स्नान वगैरे करून तो आणि त्याचे कुटुंबीय कार्यक्रम स्थळी पोहोचले. पाहतात तर तिथे पंधरावीस लोक जमलेले होते. कार्यालय उघडले नव्हते. चर्चा करताना असे समजले की, तिथे जमलेले लोक दूरवरून आलेले होते. थोड्या वेळाने एक माणूस आला. त्याने कार्यालय उघडले. त्याला सर्वांनी कार्यक्रमाबाबत विचारले असता तो म्हणाला की, त्यादिवशी तिथे कोणताही कार्यक्रम नव्हता. कुणीतरी म्हणाले,

"अहो, आपण प्रस्ताव पाठवला होता , त्या पत्त्यावर चला."

तोपर्यंत तिथे खूप गर्दी झाली होती. ती सारी माणसे त्या पत्त्यावर पोहोचली असता तिथे कुलूप होते. शेजारची व्यक्ती म्हणाली,

"सात-आठ महिन्यांपूर्वी एक व्यक्ती येथे राहात होती. नंतर खोली सोडून ती व्यक्ती निघून गेली. "

न मिळालेल्या पुरस्कारासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब करीत सारे आपापल्या गावी निघाले. सुरेशला चांगला पंधरा हजाराचा चुना लागला होता........

    "सुरेश, काय ? काही तरी गंमत सांगणार होतास ना?" घरापासून थोडे लांब आल्यावर मी विचारले.

"अरे, दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी मी प्रस्ताव पाठवला होता. त्याच्यासाठी एक डॉक्टर आणि एक वकील अशी दोघांची शिफारस आवश्यक होती. ती अट मी पूर्ण केली. ते राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण आहे."

"ग्रेट! अभिनंदन!"

"अरे,बाबा, थांब. घोळ झालाय."

"घोळ? तो कसा?"

"या पुरस्कारा माझा चांगला पाच हजारांहून अधिक खर्च झालाय."

"झाला तर झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार...."

"तिथेच तर गोची झाली आहे. पुरस्कार मला नाही मिळाला तर माझी शिफारस करणाऱ्या डॉक्टरांना जाहीर झाला आहे. प्रस्ताव, फी, कुणाची शिफारस न पाठवता...अगदी फुक्कट! घर बसल्या बसल्या! विनासायास!"

"असे कसे होईल?" मी आश्चर्याने विचारले.

"भोंगळा कारभार सारा. निवड माझीच झाली असणार. यादी करताना प्रस्ताव समोर घेतला असेल. तो उघडला असेल. शिफारस करणाऱ्या डॉक्टरांचे पत्र दिसले असेल. दिले तेच नाव टाकून. डोळे असून आंधळे म्हणतात ते असे..."

"अरे, मग त्या संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला फोन करून झालेली चूक दाखवून दे ना. ते करतील दुर."

"अरे, आज कार्यक्रम आहे. फोन केला. कुणी उचलत नाहीत. कार्यक्रमाची गडबड चालू असे. जाऊ देत. कथा लिहिण्यासाठी एक मस्त विषय मिळाला. चल. न मिळालेल्या पुरस्काराचा पेढा खाऊया. चल. चल.... " असे म्हणणाऱ्या त्या हरफनमौला मित्राकडे विस्मयाने पाहात मी त्याच्या मागे निघालो......

                                                     


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational