Manish Vasekar

Drama

2  

Manish Vasekar

Drama

परिचय

परिचय

12 mins
9.7K


शिक्षक बनण्यासाठी लागणारा डी.एडचा अभ्यासक्रम पूर्ण करून सुनीलला आता चार वर्ष होऊन गेली होती. सुरुवातीचे दोन वर्ष शिक्षक भरतीची वाट बघण्यात गेले आणि नंतरचे शिक्षण सेवक भरती पूर्व परीक्षेच्या तयारीत गेले. वडील वारल्यानंतर सुनीलच्या आईला अनुकंपाधारक म्हणून त्याच ऑफिसमध्ये नोकरी लागली होती. स्वतःचं राहतं घर हीच काय ते सुनीलच्या वडिलांची कुटुंबसाठीची सोय. बँक खाते ही रिकामे आणि ना कुठली पॉलिसी. आईच्या पगारात दोघांची गुजराण चाले. अन् म्हणूनच सुनीलने बारावी झाल्यावर लवकर नोकरी लागावी म्हणून डी.एड केलं होत. असं असूनही बरीच वर्ष त्याला बेरोजगारीत काढावी लागली होती. मग मात्र त्याने पूर्ण तयारीनिशी भरती पूर्व परीक्षा देऊन उत्तम गुण मिळवले होते. त्याला पूर्ण खात्री होती की इंटरव्ह्यू कॉल नक्की येणार आणि पोस्टिंग ऑर्डरही आणि तसंच झालं. इंटरव्ह्यू कॉल आला, तो उत्तम पार पडला आणि १५ दिवसात पोस्टिंगच पत्र पण घरी धडकलं.

पत्र वाचताना मात्र सुनीलच्या तोंडावर नाराजीच मोठ प्रश्नचिन्ह दिसत होत. त्याच्या आई ने त्याला विचारलं "सुनील, काय झालं. एवढा का चेहरा पडला आणि सारखंसारखं ते पत्र काय घोकून घोकून पाठ करणार आहेस का?"

सुनील रडवेल्या सुरात म्हणाला "पोस्टिंग आली आहे, आडगाव की फाडगाव!!" आई उल्हासाने हसत बोलली "अरे वा, छान की, अभिनंदन सर. कुठे आलं हे आडगाव. किती दूर आहे आणि मुख्य म्हणजे नाशिक जिल्ह्यात आहे की नाही" सुनीलने फक्त खालचा ओठ पुढे घेऊन दुमडून 'काय माहित' हे दर्शिवले.

सुनील फार नाराज झाला होता. त्याला अगदीच नाशिकमध्ये नाही पण कमीतकमी परिचय असलेल्या गावी त्याची पोस्टिंग हवी होती. आता हे गाव ज्याअर्थी आपल्याला माहित नाही त्या अर्थी ते फार बकवास, मागासलेलं असणार हा अंदाज त्याने केला होता.

आई थोडी समोर आली आणि तिने सुनीलच्या पाठीवर हात फिरवत प्रेमाने समजावत म्हणाली, "अरे बाळा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. इतके दिवस तुला नोकरी नव्हती तर दुःखी असायचास आणि ती लागली तरी तसंच. ही सरकारी नोकरी आहे, त्यासाठी तुला इथे तिथे बदलीच्या गावी हे फिरणे आता अटळ आहे आणि ही तर तुझी पहिली पोस्टिंग तिथे जाणे तुला भागच आहे ."

सुनील हिरमुसून म्हणाला, "अगं आई, मी काय जाणार नाही का? मलाही या नोकरीची गरज आहे. वाईट एवढंच वाटतंय की, त्यासाठी एकदम कुठे तरी आडरानात जावं लागणार आहे."

आईने हसतहसतच चूक दुरुस्त केली "आडरानात नाही आडगावात" आणि वातावरण थोडं थंड झालं.

आढेवेढे घेत सुनील आडगावला जायच्या तयारीला लागला कारण दोनच आठवड्यात त्याला तिथे रुजू व्हायचं होतं. या पंधरा दिवसात त्याला बरीच कामे होती. सर्व मित्रांना भेटायचं होतं, आत्याकडे जाऊन यायचं होत. काही नवीन कपडे, एक चांगली सुटकेस आणि असं बरंच काही खरेदी करायचं होत. गाव फार मामुली असल्यामुळे सर्व तयारी इथूनच करणे जरुरी होते. स्टेशनात न थांबणारी एखादी सुपरफास्ट एक्सप्रेस जशी धडधडत जावी तसे हे १५ दिवस गेले.

आईचा आणि नाशिकचा निरोप घेऊन सुनील मास्तर नोकरीच्या गावी रवाना झाले. आडगाव तसे फार दूर नव्हतं, धुळ्याच्या बाजूला २ तास प्रवास केला की मुख्य रस्ता सोडून पुन्हा अर्ध्या तासावर पहिले तासगाव अन् तिथून टमटमने १५ मिनिटात आडगाव. आडगावात घुसताना एक छोटी नदी पार करावी लागत असे, ही काय ती सुनीलला जमेची बाजू वाटत होती. आडगाव तसं पहिल्या नजरेत भरण्यासारखं होते. मोहक, सुटसुटीत घरांचं. इनमिन २०० घरांचं अन् ते पण इथे तिथे विस्तृत झालेलं. ज्या इमारतीचा सुनीलला रोज संबंध येणार होता ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्त्यालगत होती. शाळा, छोटी टुमदार मोजून ५ खोल्या असतील. शाळेसमोर मैदानात एक मोठं-खोड उंच निलगिरीचे झाड होते आणि त्या झाडाखाली सुंदर पिवळ्या फुलांचा सडा पडलेला होता.

शाळा सकाळचीच होती. सुनील तसाच शाळेत गेला आणि मुख्याध्यापक यादव सरांची भेट घेतली. पहिल्या भेटीतच वजन पडावं असे यादवसर सुनीलला खूप छान वाटले. तो मनात म्हणाला 'चला कमीत कमी एचएम सर तरी बरे दिसतायत, अगदीच गावठी नाहीत.' यादव सर आडगाव जवळ असण्याऱ्या तालुक्याच्या गावी राहत. ते सुनीलला चहा-पाणी वगैरे झाल्यावर शाळा बघायला आणि सर्वांची ओळख करून द्यायला निघाले.

हजेरीपटापेक्षा प्रत्यक्ष हजर मुले बरीच कमी होती म्हणून सुनीलने यादव सरांना याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले "यात काही नवीन नाही. तरी बरं आहे, गावातील पाटीलसाहेब आहेत म्हणून ही संख्या इतर गावाच्या मानाने बरीच आहे. पाटीलसाहेब, गावातले प्रतिष्ठित आणि सज्जन व्यक्ती. दुपारी आपल्याला त्यांच्या वाड्यावर जायचे आहे. खास जेवण ठेवलंय, तुम्ही आज शाळेवर रुजू होणार म्हणून"

नोकरीच्या पहिलाच दिवस म्हणजे मधुचंद्रच जणू, ना काम ना धाम. माझ्या नोकरीचा पहिला दिवस, खूप छान मजेत जात होता. खाण्याच्या आणि राहण्याच्या प्रश्नामुळे थोडी रुख-रुख होती. आडगावबद्दल असलेले नकारार्थी मळभ बरेच कमी झाले होते. शाळेचं वातावरण खरंच छान होतं. पण दुपारी पाटीलसाहेबांच्या घरी जायचं होत. शाळेची घंटा खणखणू लागली. शाळा सुटल्याच्या आवेशात म्हणा किंवा कर्तव्यदक्षता म्हणा, शिपायानी वाजवलेल्या घंटेचा आवाज आसमंतात दुमदुमू लागला.

शाळा सुटल्यावर लगेच सुनील यादव सरांना त्यांच्या खोलीत जाऊन भेटला. यादव सर पण तयारीतच होते. दोघे शाळेबाहेर आले. यादव सरानी त्यांची जुनाट स्कुटर एका झटक्यात सुरु केली. सुनील आपला त्यांच्या मागे स्कुटरवर बसत म्हणाला "सर, पाटील साहेबांचं घर दूर आहे का?" "दूर!! चांगलं ६ किमी दूर आहे, आपल्या शाळेपासून. पाटील साहेब पार गावाबाहेर राहातात. त्यांचा वाडा मळ्यात आहे. वाडा कसला किल्लाच आहे."

खडतर मुरबाड रस्त्यावरून यादव सर लीलया गाडी हाकत होते. सुनील मात्र मागच्या दांडीला गच्च पकडून बसला होता. रस्ता खराब असल्याने गाडी, झेंडावंदनच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांना सलामी ठोकत अगदी थाटता जाते तशी संथ गतीने जात होती. सुनील रस्त्याच्या दोन्ही बाजून छान निहाळत होता. रस्त्याच्या बाजूने शेतात नांगरणीची कामे चालू होती. रस्त्यालगतची काही तुरळक मोठमोठाली आंब्याची झाडं वाटसरूंना शांत सावलीची सोय करून देत होती. गाव सोडून थोडं अंतर गेलं की उथळ पाण्याच्या नदीने या दोघांची सोबत केली. सुनीलच्या मनात आलं, ही नदीची सोबत म्हणजे एखाद्या प्रियकराने प्रेयसीच्या हातात हातात घालून स्वछंद बागडणे होय. ह्या विचारातच सुनीलला थोडी स्वतःची लाज वाटली. इथे येण्यापूर्वी आपण किती आढेवेढे घेतले. ह्या गावाला नको नको ते बोललो. जर आपण इथे आलो नसतो तर नोकरीला हुकलोच असतोच पण ह्या सुंदर गावाला पण नक्कीच मुकलो असतो. सुनीलच्या ह्या अशा वागण्यामुळे, त्याची आई पण खरंतर टेन्शनमध्ये आली होती. पण तिने ते फक्त वरवर न दाखवता सुनीलला आडगावला जाण्यासाठी धीर दिला होता. सुनीलला पण त्याची शाळा, शाळेत भेटलेले सहकारी आणि वरिष्ठ या सर्वाना भेटून थोडस हायसं वाटलं होतं आणि म्हणून त्याने ठरवलं होतं की आजच संध्याकाळी आईला फोन करून इकडची खुशाली खुशाली कळवावी.

ह्या सगळ्या विचारातच एकदम गाडी थांबली अन् त्याने समोर पहिले तर एका भव्यदिव्य दगडी वाड्यासमोर तो उभा होता. यादव सर आणि सुनील दबकतच वाड्यात शिरले. समोरच पाटील साहेब पांढऱ्या शुब्र कपडयात सुनीलच स्वागत करण्यासाठी उभे होते. काळसर तांबूस वर्णाचा, पिळदार मिश्यांचे पाटील साहेब बघताक्षणी वजन पाडत. पाटील साहेबानी यादव सरांकडे बघून "या या सर, घेऊन आले का तुम्ही नवीन गुरुजींना." मग सुनीलकडे बघून ते म्हणाले "काय सुनील सर, आवडलं का आमचं गाव आणि शाळा?"

सुनीलही मग अदबीत नमस्कार करत म्हणाला "दोन्ही गोष्टीत नाव ठेवण्यासारखं काहीसुद्धा नाही. तुमच्या देखरेखीत सगळं सुंदर आहे साहेब"

यावर पाटील साहेब आणि यादव सर छान हसले. नमस्कार चमत्कार झाल्यावर सुनील आणि सर दिवाणखान्यात पाटील साहेबांसमोर बसले. पाटीलसाहेब करारी आवाजात बोलत "आमच्या गावात नवीन गिरुजी आले की आम्ही झकास कोंबडंच कापून त्याला मेजवानी देतो. हेडमास्तर म्हणाले तुम्ही शुद्ध शाकाहारी. म्हणून आज बासुंदीचा बेत आखला. यादव सर आज तुम्ही जमवून घ्या, कोंबडीशिवाय"

मग त्यांनी गड्याला "मॅडमला म्हणा, जेवणाची तयारी करा. गुरुजी लोक आलेत म्हणावं" असा सांगावा धाडला. सुनीलच नाव गाव, कॊटुंबिक माहिती विचारल्यावर पाटीलांनी सुनीलला विचारले "सर, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे. मी तुम्हाला सुनील असं एकेरी म्हणालो तर चालेल ना" यावर सुनील ओशाळून म्हणाला "साहेब, चालेल नाही. पळेल. माझे भाग्य समजेन मी, पाटील साहेब"

मग पाटील थोडे खुलून बसले आणि विचारलं "यादव सर, यांची राहण्याची सोय कुठे बघताय. वाड्यावर राहिला पण काही अडचण नाही. पण इथून शाळा फार लांब पडेल."

या वर यादवांनी होकार देत मान हलवली. मग पाटील थोडा विचार करून म्हणाले, "तुम्ही असं करा. इथून निघाल्यावर त्या दुकानदार बियाण्याकडे जा. त्याच्याकडे माझे मागच्या दिवाळीला दिलेले १० हजार रुपय आहेत. ते पैसे वसूल कराचे आहेत मला. तेव्हा बियाणीला म्हणा, या आमच्या नवीन सरांची राहण्या खाण्याची सोय कर. पाटील साहेबांचा निरोप आहे म्हणा, म्हणजे आढेवेढे घेणार नाही तो"

यादव सरांनी "हो साहेब. भेटून निरोप देतो मी बियाणींना" असे सांगितलं. सुनीलचे हे पण टेन्शन मिटलं म्हणून त्याला खूप बरं वाटलं. त्यांनी साहेबाना "खूप उपकार झाले" असं लगेच म्हणून दाखवलं. आता सुनीलला कळलं पाटील साहेबांचं गावात खूप नाव का आहे ते.

हे चर्चा सत्र चालू असतानाच मधून एक वयस्क आवाज आला "साहेब, चला जेवण करून घ्या. मग निवांत बोला"

तसे सर्वजण मधल्या खोलीत गेले. जेवणासाठी भारतीय बैठकीची सोय होती. पाटासमोरच्या प्रत्येक ताटाच्या बाजूने सुरेख रांगोळी काढली होती. धूप लावल्याने सुगंध दरवळत होता. तिघेही जेवायला बसले. पहिल्या घासलाच सुनीलला आईची आठवण आली. स्वयंपाक फारच छान झाला होता. पाटीलबाई सुग्रण होत्या यात काही शंकाच नव्हती. जेवण आटपून सुनील आणि यादव सरांनी पान-सुपारी घेऊन पाटील साहेबांचा निरोप घेतला.

जाता जाता, यादव सरांनी बियाणींची भेट घेतली आणि त्यांना पाटील सरांचा निरोप दिला. बियाणीला त्यात काही हरकत नव्हती. जेवणाखाण्याची काही अडचण नव्हती, कारण बियाणी परिवार आणि सुनील दोघेही शाहाकारीच होते. बियाणीला पाटीलांच्या उपकाराची परतफेड करण्याची ही चांगली संधी होती. सुनीलची बॅग शाळेमध्ये ठेवली होती, ती घेऊन तो संध्याकाळ पर्यंत बियाणींच्या घरी येणार होता. तसं बियाणींलाही थोडी आवाराआवर करण्यासाठी वेळ हवाच होता.

संध्याकाळी सुनील बियाणींच्या घरी आपलं सामान घेऊन आला. बियाणींनी त्याचं रीतसर स्वागत करून कुटुंबाशी ओळख करून दिली. मग त्यांनी सुनीलला पूर्ण घर दाखवलं. रस्त्याच्या बाजूने बियाणींच किराणा दुकान होतं. खालच्या मजल्यावर चार रूम आणि नुकत्याच बांधून झालेल्या वरच्या दोन रूम. वरच्या दोन पैकी एक रूम ते सुनीलला देणार होते. रूमसमोर प्रशस्त गॅलरी होती. बियाणींनीच कुटुंब म्हणजे मोजून चार डोकी. तो, त्याची सौ आणि एक मुलगा दिनेश आणि मुलगी रमा. रमा सोडलं तर बाकीच्याशी सुनीलची ओळख झाली होती. रमा दोन-तीन दिवसासाठी नाशिकला तिच्या काकाकडे गेली होती. बाकी घर अगदी स्वछ आणि प्रसन्न होते. दुपारच्या पाटीलांच्या घरच्या भरपेट मेजवानीनंतर सुनीलला रात्रीच्या जेवणाची वासना नव्हती पण बळेबळे त्यांनी चार घास गळ्याखाली ढकलले. जेवताना त्याला एक लक्षात आलं, की रोज संध्याकाळी त्याला जेवणासाठी खाली यावे लागणार. बाकी सर्व सोयी वरच्या रूममध्ये होत्याच.

दुसऱ्या दिवशी सुनीलचा दिनक्रम चालू झाला. घर खेडेगावात आसाल तरी सर्व सुखसुविधांनी युक्त असल्याने सुनीलला काही अडचण येत नव्हती. बियाणीकाकू पहाटेच उठून झाडलोट आटपून, चहानाश्त्याच्या कामाला लागत. दिनेश तालुक्याच्या ठिकाणी अकरावीत शिकत होता, त्यासाठी काय ते काकू ला डब्बा करावा लागत. सुनीलची शाळा दुपारीच सुटत असल्याने त्याला दुपारचा जेवणाचा डबा घेऊन जायची आवश्यकता नव्हती.

नाश्तापाणी आटपून सुनील शाळेत गेला. सुनीलला शिकवण्याची आवड तर होतीच. त्यात मुलेही नवीन देखण्या सरांना छान सहकार्य करत होते. यादव सर वेळेचे फार काटेकोर होते. सुनीलचा शाळेतला वेळ कसा झर्रकन जायचा. त्याला प्रश्न पडायचा तो शाळा सुटल्यावर काय करायचं. तसं यादव सरांनी त्याला एक कादंबरी वाचायला दिली होती. पण वाचून-वाचून माणूस कितीसं वाचणार. सुरुवातीचे दोन दिवस तो गावभर फिरला, नदीवर चक्कर टाकून आला.

आज त्याला तिकडेही जावसं वाटत नव्हतं. म्हणून शाळा सुटली की तो तडक रूमकडेच निघाला. ऊन जबराट लागत होत, अंगाची लाहीलाही झाल्यासारखं त्याला भासल. घामाघूम होऊन तो घरी येत होता. येतायेताच दुकानासमोरच बियाणींनी सुनीलला हटकलं "काय सर, आज लवकर." सुनील उत्तरादाखल फक्त हसला आणि गेट उघडण्यासाठी समोर चालता झाला. तेवढ्यात बियाणींनी आवाज दिला "ही घरी नाहीय, दिनेश आणि ही दोन दिवसासाठी राहुरीला गेलेत, दिनेशच्या आत्याकडे. पण काही लागलं तर रमा आली आहे, तिला सांगा" ठीक आहे असे मानेने संबोधून सुनीलने समोर जाऊन दाराची कडी वाजवली. आतून काहीच आवाज न आल्याने, त्याने पुन्हा कडी वाजवली. अन लागलीच मधून एक मधुर स्वरनाद झाला "आले ! आले !!" या आवाजावरून आतील व्यक्ती सुंदर असेल हे सुनीलने मनातच हेरले.

दार उघडून ती समोर उभी टाकली, अन दोघांची नजरा नजर झाली. तिला पाहून अचम्बून सुनीलच्या तोंडाचा चंबूच झाला. तिच्या आवाजावरून आणि आतापर्यंत बघितलेल्या मारवाडी मुलींच्या अनुभवावरून सुनीलने रमाची सुंदर सुबक ठेंगणी इमेज बनवली होती आणि समोर साक्षात जी रमा होती ती तर एक अस्सल सुंदर-लावण्यवती उभी टाकली होती. तिला बघून सुनीलच तनमन दोन्ही शहारून गेलं, तिच्या त्या तेजाने सुनीलचं मन एकदम उल्हासित झालं.

सुनील अडखळतच आत आला. रमाने त्याला चहा-पाण्याचं किंवा काही खायचं आहे का, म्हणून विचारलं. सुनीलने तृप्त मनाने, मानेनेच नकार देत पुन्हा एकदा ते लावण्य निहाळलं. तो जिना चढून रूम कडे गेला.

आता ती त्याच्या सोबत नव्हती पण तिने त्याच्या मनात १ BHK नाही २ BHK नाही, तर चांगलं ५ BHK डुप्लेक्स घर करत, विसावली होती. रमाची नशा अजून उतरली नव्हती. सुनील तसाच पलंगावर पडून घरघरणाऱ्या फॅनकडे बघत, तिचाच विचार करू लागला. ह्या विचारातच त्याला झोप लागली.

संध्याकाळी जेवण्याच्या वेळी चोरून-चोरूनच पण सुनीलने तिला निहाळण्याची संधी दवडली नाही. सुनीलने बियाणींना विचारल "काका, काकू आणि दिनेश परत केव्हा येणार आहेत."

बियाणींनी थोडं कुऱ्ह्यातच सांगितलं, "दोन-तीन दिवस लागतील त्यांना.....का सर"

सुनील नरमुन म्हणाला "काही नाही, सहजच विचारलं."

दुसऱ्या दिवसाची सकाळ मात्र खूप वेगळी होती. बळेबळे उठून गडबडीत आवराआवर करून शाळेला जाणारा सुनील (मास्तर) आज पाचच्या ठोक्याला उठून नदीवर फिरायला गेला. फिरून आल्यावर दारातच रमा त्याला रांगोळी काढताना दिसली. सुनीलच्या रोमांचकारी मनात एक सुंदर कल्पना चाटून गेली 'आपण घरधन्यासारखं कामावरून परत आलेलो आहोत आणि आपली सौ. दारात स्वागतासाठी नटून उभी आहे' आणि दोघांची नजरानजर झाली, तो लाजतच तिच्या समोरून आत गेला. तिच्या नजरेत नक्की काय आहे हे त्याला खरंतर उमजत नव्हतं. एक तर तिच्या डोळ्यात काठोकाठ सुनील साठी प्रेम असेल. कदाचित 'एकच प्याला' अर्धा रिकामा की भरलेला यासारखं कन्फ्युज स्टेटसही तिच्या डोळ्यात असू शकेल. पण मराठवाडी विहरीसारखी कोराडीफटक तिची नजर असेल तर, या विचाराने त्याच्या काळजात चर्र झालं.

अंघोळपांघोळ उरकून सुनील परीट घडीचे कपडे करून तयार होऊन तो खाली आला. नाश्ता करून चहा घेत त्याने रमाच्या अभ्यासाची अन् कॉलेजची विचारपूस केली. रमा थोडी लाजिरी गोजिरी होतीच पण सुनीलही तिच्याशी लाजत लाडिकपणाने बोलत होता. काही वेळाने बियाणी आले आणि मग सुनील अन् ते गावाविषयी असेच काहीतरी बोलत बसले. शाळेची वेळ झाल्यावर मग सुनील निघाला.

अशा ह्या रमाच्या रमणीय रोमांचकारी विचारात सुनीलचे दिवस कसे चटकन निघून गेले. बियाणी काकू ठरल्याप्रमाणे परत घरी आल्या. ह्या दोन दिवसात सुनीलचा त्याच्या आईलाही फोन झाला नाही म्हणून तिकडे आई चिंताग्रस्त झाली होती. आडगावसंबधी नातेवाईकांची वर्दी लागतच नाही म्हणून सुनीलची तिकडे आबाळ होत असेल असेही सुनीलच्या आईला वाटत होते. पण त्यांचे कुणीतरी नातेवाईक त्या आडगावात राहतात ह्याची तिला खबर लागली होती आणि त्यासाठी ती तिच्या काकाला जाऊन भेटणार होती. काकांची भेट घेतल्यावर लगेच त्यांनी सुनील उत्साहात फोन केला "सुनील, आता काळजी नसावी. आपले एक नातेवाईक त्या आडगावात रहातात म्हणे. त्यांचा पत्ता काढून मीच तिथे येते बाळा, या रविवारी" हा निरोप त्यांनी सुनीलला दिला.

आता सुनील विचारात पडला, या गावात आपले कोण नातेवाईक असतील, ते कुठे राहत असतील. जवळचे असतील तर आपल्याला आई तिकडे राहायला सांगेल. असं असेल तर खूपच वाईट होईल. कारण आता तर कुठे आपली रमासोबत ओळख होतेय. सुनील या विचारांनी थोडा खिन्न झाला. हां हां म्हणता गुरुवार गेला, शुक्र गेला शनिवारही गेला आणि आला रविवार. रविवारी सुनीलची आई पहाटेच्या पहिल्या गाडीने आडगावला निघाल्या. तासगाव फाट्यावर सुनील त्यांना घ्यायाला जाणारच होता. दोघांची गाठभेट झाल्यावर, अगोदर सुनीलने आईला आपली शाळा दाखवली. मग ते त्याच्या रूमकडे निघाले.

चालताचलता सुनीलने आईला विचारले "आई, काय मिळालेला का मग तो नातेवाईकांचा पत्ता ?"

ह्या वर आई खुशीत म्हणाली, "मग, मिळणार नाही तर काय. त्या पत्तासाठी मला चांगली पायपीट करावी लागली पण. खूप दिवसांनी तात्यांची पण भेट घेतली मी. आता चांगलेच थकलेत तात्या."

मधेच आईच बोलणं तोडीत त्यांनी विचारलं "मग, रूम वर जाऊन तडक तिकडे जाऊन भेटू आपण त्यांना. काय नाव काय आहे त्यांच?"

ह्यावर आई बोलली "बियाणी"

"काय ! बियाणी !!","अरे ती एक गंमत आहे तुला घरी गेल्यावर सांगते" हे ऐकतच सुनील जाम खुश झाला. त्याच्या मनात सुमधुर सनई चोघडे वाजू लागले.

मग ते दोघेही पटापट रूमकडे निघाले. विजयी मुद्रेनीच सुनीलने बियाणींच्या घरात प्रवेश केला आणि बियाणी काकूला, आई आल्याची वर्दी दिली.

बियाणी काकू आणि रमा दोघीही मग त्यांना भेटायला म्हणून बाहेरच्या खोलीत आल्या. काकूंची आणि सुनीलच्या आईची नजरानजर झाली, काही क्षण त्या दोघी भरवलेल्याला डोळ्यांनी एकमेकींना बघतच राहिल्या आणि मग एकदम दोघीनी बिलगून गळाभेट घेतली. रमा आणि सुनील हे काय चाललंय ते बघतच राहिले.

छान भेट झाल्यावर सुनीलच्या आईने सुनीलकडे बघून सांगितलं "अरे सुनील, ही तुझी मावशी. सख्खी चुलत मावशी. सुमन मावशी. सुमन कुलकर्णी आणि आता लग्नानंतर ‘सुमन बियाणी’ झाली आहे"

बियाणी काकू मग रमाला म्हणाल्या" रमा आणि हा तुझा मोठा भाऊ, दादा! सुनील दादा!!"

खूप हिमतीने आपण हिमालय शिखर पार करावा आणि विजयी पताका गाडण्यासाठी समोर जाताच, खोल दरीत लोटलं जावं असंच सुनीलला वाटलं. "दादा! सुनील दादा !! हे शब्द ऐकताच सुनीलला त्याच्या कानात कुणीतरी गरम शिसे ओतल्यासारखे वाटले. सुनीलने मनात बांधलेले इमल्यावर इमले, एक एक करून कोसळून नुसता धुराळा उठत होता. सुनील शून्य नजरेने रमाकडे बघत होता. त्याला ती बंधू-प्रीतीच्या नजरेने बघत "दादा! सुनील दादा!!" बोलवत, स्वतःचा परिचय देत असल्याचा भास होत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama